16 ऑगस्ट रोजी माझ्या वडलांची म्हणजे स्व. कन्हैयालाल श्रीपत ठाकूर यांची तारखेने पुण्यतिथी असते. आम्ही भावंडे त्यांना अण्णा म्हणत असू. त्यांच्या दोन - तीन आठवणी आज मनात ताज्या झाल्या आहेत. अण्णा स्वातंत्र्य पूर्व काळात काही वर्षे नाशिक येथे पुणे अनाथ विद्यार्थी गृहात शिकले. साल मला ठाऊक नाही. त्या काळात या संस्थेला कुठलेही सरकारी अनुदान नसायचे. बहुधा तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. महागाई प्रचंड वाढली होती. त्यामुळें वार लावून- माधुकरी मागून शिक्षण होत असे. दर रविवारी त्यांच्या वर्गातल्या मुलांना नाशिक येथील काळा राम मंदिर परिसर झाडून स्वच्छ धुवावा लागे. मग कुणा दात्या तर्फे जेवण मिळत असे. तहसीलदार म्हणून अण्णा नाशिकला आले त्या वर्षी तालुका दंडाधिकारी म्हूणून राम नवमीला पूजेचा मान माझ्या आई अण्णांना मिळाला. मानाचा फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला. पूजा चालू असताना अण्णांचे डोळे सारखे भरून येत होते. पुजाऱ्याने दोन तीनदा 'रावसाहेब, काही त्रास होतोय का ?' असेही विचारले. त्यावर साहजिकच अण्णा नाही म्हणाले. पूजा -सत्कार संपल्या नंतर पुजाऱ्यांना अण्णा म्हणाले, "शाळेत असतांना दर रविवारी मंदिराचे अंगण झाडायला येत होतो ते आठवलं आणि डोळे भरून आले. ती सेवा रामरायाला पावली असावी".त्या क्षणाची मी साक्षीदार होते. तेंव्हा मी सातवीत शिकत होते आणि हट्टाने त्या दिवशी आई-अण्णांबरोबर काळा राम मंदिरात गेले होते. पुढे काही वर्षांनी आई अण्णा निवर्तल्यावर मी एकटीच काळा राम मंदिरात जात असे. त्यात ओढ रामाची होती की आई अण्णांची आठवण म्हणून जात होते हे सांगता येत नाही. आज वाटतं की केवळ 'अण्णांची' मुलगी म्हणून तो प्रभू रामचन्द्र आजही माझ्यावर प्रसन्न आहे. आई वडलांची पुण्याई म्हणतात ते खरंच आहे.

ज्या कुटुंबात अण्णा माधुकरी मागायला जात किंवा वार लावून जेवायला जात त्या लोकांना नाशिकला बदली झाल्यावर अण्णा आवर्जून भेटायला जायचे. काही जणांचे औषधोपचार किंवा ऑपरेशन्स देखील डॉ गोंदकरांच्या हॉस्पिटलमध्ये झाल्याचे मला आठवते. आई- अण्णा अनेकदा वणीच्या गडावर सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला जात असत. सोबत मी आणि माझी धाकटी बहीण वीणा देखील असायचो. मला बरोबर नाही नेलं तर मी रडून धुमाकूळ घालत असे. अण्णांना गडावर देवीच्या दर्शना इतकीच उत्सुकता त्यांना तिथे पायथ्याशी असलेल्या स्वामी प्रकाशानंद महाराजांच्या विना अनुदानित आश्रम शाळेची असे. साठ सत्तर आदिवासी मुले तिथे राहून शिकत. या मुलांची गीता पाठ होती याचे अण्णांना खूप अप्रूप होते. यथाशक्ती ते या आश्रमाला मदत करत. स्वामी प्रकाशानंद यांच्या बरोबर अण्णांची छान wave length जुळली होती. 1972 -73 साली प्रचंड दुष्काळ पडला होता. 1973 साली अण्णांची बदली जळगाव येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून झाली होती. आम्ही सर्व भावंडे आणि आई नाशिकलाच होतो. एकदा अण्णा नाशिकला आले असताना आम्ही वणीच्या गडावर गेलो. स्वामी प्रकाशानंदांचा आश्रम अगदीच रिकामा होता आणि स्वामीजी उदास बसलेले होते. अण्णांनी विद्यार्थ्यांची चौकशी केली तर समजलं की दुष्काळा मुळे आश्रमाला मिळणारी धान्यरुपी मदत अगदीच बंद झाली होती. नाईलाजाने मुलांना घरी पाठवावे लागले. "काही व्यवस्था झाली तर मुलं परत येतील ?" अण्णांनी स्वामीजींना विचारलं. अण्णांना त्यांचं बालपण स्मरलं असावं. "हो, येतील की ! अगदी एका हाकेत येतील." स्वामीजी उत्तरले. पुढे काय घडलं हे अण्णांनी आम्हाला कधी सांगितले नाही. नंतर त्यांची बदली अलिबागला झाली. अण्णा निवर्तल्यावर दोन वर्षांनी आम्ही वणीच्या गडावर गेलो. गडाच्या पायथ्याशी नांदुरी नावाचे छोटेसे गाव आहे . तिथे खान्देशातील अडावदच्या एका कुटुंबाचे हॉटेल आहे. अण्णांचे बालपण अडावदचे. माझे मोठे काकाही तिथे रहात. त्यामुळे परिचय होता. त्यांच्या हॉटेलात नाश्ता केल्या शिवाय ते आम्हाला पुढे जाऊ देत नसत. 1982 साली त्यांना न भेटताच पुढे गेलो असतो तर ते बरे दिसले नसते. भेट घडताच अण्णांच्या आठवणींनी त्या कुटुंबातील सर्वांचेच डोळे भरून आले. त्यांनी अण्णांची एक आठवण सांगितली. 1973 साली त्यांच्या दारा समोर एक धान्याने भरलेला ट्रक थांबला. ड्रायव्हरने अण्णांची एक चिट्ठी त्यांना दिली. त्यांनी हमाल लावून सारे धान्य त्यांच्या कोठी घरात उतरवून घेतले. स्वामीजींकडे निरोप गेला. मुलांचे पालक आणि काही मोठे विदयार्थी यांनी पंधरा वीस दिवसात ते धान्य आश्रमात पोहोचवले. त्या काळात वणीच्या गडावर बस अथवा अन्य वाहन जात नसे. 'रडकुंडीचा घाट' नामक एक अवघड घाट चढून जावे लागे. गडावर पोहोचायला किमान अडीच ते तीन तास लागत. इतक्या कठीण परिस्थितीत ते धान्य गडावर पोहोचले आणि आश्रमशाळा पुन्हा सुरू झाली. अण्णांनी एवढे धान्य कुठून गोळा केले असेल ? जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून त्यांच्यावर काही दबाव नसेल का ? तोही दुष्काळग्रस्त काळात ? माझ्या मनातल्या या प्रश्नाचे उत्तर स्वामीजींनी आश्रमात दिले. ते म्हणाले, "हाच प्रश्न मी ठाकूर साहेबांना विचारला. कारण विषय नैतिकतेचा होता. मी आश्रम शाळा चालवत होतो. ठाकूर साहेब म्हणाले, " महाराज, मी गावातील सर्व घाऊक किराणा दुकानदारांची एक मीटिंग बोलावली आणि त्यांना ही समस्या सांगीतली. माझा आग्रह नाही पण तुमच्या संवेदनशील मनाला जर काही द्यावेसे वाटले तर ट्रकचा खर्च मी करेन. ट्रक सरळ नांदुरी येथे जाईल. मुलांचे शिक्षण थांबणार नाही". बघता बघता एक ट्रक भर धान्य गोळा झाले आणि मुलांचे शिक्षण पुन्हा सुरू झाले. 15 ऑगस्ट 1980ची संध्याकाळ. दोन दिवस आधीच अण्णांना हृदय विकाराचा झटका आला होता. मुंबई आग्रा रोड जवळ प्रभुकृपा नावाचे एक मिशनरी हॉस्पिटल होते. तिथे इलाज चालू होता. डॉक्टरांनी आशा सोडली होती. त्रास होत होता तरी अण्णा अधून मधून एखाद दुसरं वाक्य बोलत होते. अचानक ते आईला म्हणाले, "अगं, प्रकाशानंद महाराज आलेत. त्यांना आत घेऊन ये." आई म्हणाली, "महाराजांना कसे कळणार आपण इथे आहोत ते. वणीच्या गडावर त्यांच्याकडे तर फोनही नाही. पाऊसही खूप पडतोय. तुम्हाला भास होतोय." पुन्हा अण्णा म्हणाले, "त्यांना खोलीत घेऊन ये." नाईलाजाने आई उठली आणि हॉस्पिटलच्या व्हरांड्यातून पहाते तर काय ? महाराज हॉस्पिटलच्या गेट मधून आत येत होते. महाराजांना अण्णांच्या आजारपणाची बातमी भलेही कुठून कळली असेल. पण ऑक्सिजन वर असलेल्या नि सलाईन चालू असलेल्या अण्णांना ते आत्ता या क्षणी आलेत हे कसं समजलं ? ही नेमकी कुठली टेलीपथी ? भारती ठाकूर Website - https://narmadalaya.org/ Facebook - https://www.facebook.com/narmadalaya.ngo Blog - https://narmada-bharati.blogspot.com/ Nimar Abhyudaya Rural Management And Development Association (N.A.R.M.A.D.A) Documentary - https://www.youtube.com/watch?v=9uU0PbZHqqc&t=155s Activity Report 2020-2021- https://narmadalaya.org/main/documents/N.A.R.M.A.D.A.%20Activity%20Report%202020-21%20%20-%20Hn.pdf

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....