गेल्या काही महिन्यांपासून नर्मदालयाच्या गोशाळेसाठी गीर गाई खरेदी करायच्या होत्या. काही दात्यांनी त्यासाठी पैसेही पाठवले होते. पण आसपासच्या गावांमध्ये गीर गाई काही मिळेनात. एका दलालाने तर एक महिना आगाऊ पैसे घेऊन नंतर नाही म्हणाला. कुणी म्हणे चांगल्या प्रतीच्या गाई घ्यायच्या असतील तर गुजरात मध्ये राजकोट -जुनागढ मध्ये मिळतील. राजकोट येथील रामकृष्ण आश्रमातले श्री. जगन्नाथ महाराज ओळखीचे होते. त्यांना फोन केला. अकरा तासांचा प्रवास करून आम्ही 07 सप्टेंबर 2021 ला रामकृष्ण आश्रम, राजकोट येथे पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आश्रमाचे अर्थात श्रीरामकृष्ण परमहंसाचे  दोन भक्त श्री जयेश जी आणि श्री भरत जी आमच्या बरोबर गाई दाखवण्यासाठी निघाले. हरीकृपा गोशाळेत आम्ही गाई बघायला गेलो. अचानक पाऊस सुरू झाल्याने मी आडोशाला खुर्ची टाकून बसले. गोशाळेचे मालक श्री लक्ष्मण भाई माझ्याशी बोलायला आले. लेपा येथील आमच्या संस्थेच्या कामाबद्दल मी त्यांना थोडक्यात कल्पना दिली. पण त्यांच्या मनात मात्र दुसरेच विचार चालू असावेत.  ते मला म्हणाले, “आमच्या गोशाळेच्या मागच्या बाजूस एक स्क्रॅप मटेरियलचे दुकान आहे. ते  मेटल स्क्रॅपचा धंदा करतात. त्यांच्याकडे पितळेच्या दोन मूर्ती आहेत. कुणाच्या आहेत हे त्या दुकानदाराला वा मलाही ठाऊक नाही. त्यापैकी एक बहुधा राधामातेची असावी. तुम्ही त्या मुर्तिंचे दर्शन घ्याल का ?” दोन तीनदा त्यांनी त्या मुर्तिंच्या दर्शनाबद्दल आग्रह केला. 

आम्ही गेलो होतो गाई खरेदी करायला आणि तो माणूस मला स्क्रॅपच्या दुकानात (त्याच्या शब्दात ‘भंगार की दुकान’) चल म्हणत होता. आजवरच्या आयुष्यात मी कधी भंगार मालाच्या दुकानात गेलेच नव्हते. त्याच्या आग्रहाखातर मी आणि माझे सहकारी – दिग्विजय, गोलू- शिवम्      

आणि आमचे दोन्ही मार्गदर्शक त्या दुकानात गेलो. सर्वत्र धूळ आणि अडगळीचे सामान. आतल्या बाजूच्या दरवाज्या मागील जागेत बरेचसे स्क्रॅप सामान पडलेले होते. त्याला लागून श्रीरामकृष्ण परमहंस (भक्त त्यांना प्रेमाने ठाकूर म्हणतात) आणि सारदा मां यांच्या सव्वा दोन फुट उंचीच्या - बसलेल्या अवस्थेतल्या पितळीच्या अत्यंत देखण्या मूर्ती लक्ष वेधून घेत होत्या. आजूबाजूला भरपूर पसारा होता. मूर्तीं वर प्रचंड धूळ बसलेली होती. पितळीच्या असूनही मूर्ती काळ्या पडल्या होत्या. सारदा मां आणि ठाकुरांना त्या अवस्थेत पाहून माझे डोळे भरून आले. इतक्या सुंदर मूर्ती या भंगार मालाच्या दुकानात कशा आल्या ? मी त्या दुकानदाराला विचारलं तर म्हणाला, “तीन वर्षापूर्वी या मूर्ती जहाजाने  परदेशातून गुजरातमधील जामनगर बंदरात स्क्रॅप समानाबरोबर आल्या. आम्ही ते सामान विकत घेतलं. तेव्हापासून त्या इथेच पडून आहेत.”  

“मला ह्या मूर्ती विकत घ्यायच्या आहेत. द्याल ना ?” मी अचानक दुकानदाराला म्हणाले. सारदा मां आणि ठाकुरांच्या मूर्ती त्या अवस्थेत बघून मी खूपच अस्वस्थ झाले.

“पितल के मोड के भाव में देंगे- वजन करना होगा |” दुकानदार उत्तरला. त्याच्या ‘मोड के भाव’ या शब्दांनी मन अधिकच विषण्ण झालं. एक-एक मूर्ती त्याने वजन काट्यावर ठेवल्या. दोन्ही मुर्तिंचं वजन भरलं एकशे दोन किलो.   

गाई विकत घेण्यासाठी आम्ही नेलेली रोकड रकम मर्यादित होती. शिवाय एवढा मोठा खर्च संस्थेच्या खात्यातून इतर सदस्यांना न विचारता कसा करणार ? मनात विचार आला, संस्थेच्या कशाला ? ‘मी’ ‘माझ्याच’ पेन्शन खात्यातून पैसे देते. आता सध्या गाईसाठी आणलेल्या पैशातून पेमेंट करू या. वाटेत एटीएम मधून पैसे काढता येतील. मला क्षणात ‘माझे’ पैसे आठवले.  

ठाकुरांना मात्र आपल्या भक्तांचं ‘मी’ – ‘माझेपण’ फार सहजपणे दूर करता येतं.

गाई बघायला आम्ही आणखी दोन चार ठिकाणी जाणार होतो. वाटेत एका हॉटेल मध्ये आम्ही चहासाठी थांबलो. पाऊस होता म्हणून मी गाडीतच थांबले. आमचे कार्यकर्ते आणि मार्गदर्शक हॉटेल मध्ये चहा प्यायला गेले. हॉटेल मालकाशी गप्पा मारतांना नर्मदालयाच्या कार्याविषयी बोलणं झालं. तो दिग्विजयला म्हणाला, “माझी गोशाळा जवळच आहे. येता बघायला ? पण मी गाई विकत नाही हं”.

ही मंडळी गोशाळा बघायला गेली. तोवर त्या गोशाळेच्या मालकाला काय वाटले कुणास ठाऊक ? म्हणाला, “एक गाय मी नर्मदालयाच्या मुलांसाठी दान देऊ इच्छितो. पण तुम्ही ती कुणाला विकू नका.”

दिग्विजयने ही गोष्ट मला सांगितली तेंव्हा डोळे पुन्हा भरून आले. अनोळखी प्रदेशात एरवी कोण असे दान कोण देणार ? गाईसाठी आणलेले पैसे मूर्तीसाठी वापरले म्हणून ठाकुरांनी ही योजना केली असेल का ? की माझा ‘मी’ दूर करण्यासाठी ती योजना होती ?    

आमच्या सर्वांच्या राजकोट येथे जाण्याचे प्रयोजन नक्की काय होते ? केवळ गाईंची खरेदी की मां आणि ठाकुरांची भेट ? की त्या मुर्तिंचीच  नर्मदालयात यायची इच्छा होती ? सर्वच अनाकलनीय.              

 

Comments

  1. Maharashtra Compatative exams study material free platforms Downloaded every spardha pariksha pdf paper here
    Previous Exams Old Paper PDF Download Arogya Vibhag Exams Paper Pdf

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....