बाबूजींचा मानस पुत्र

बाबूजींचा मानस पुत्र 


भटकंतीच वेड मला नेमक कधी लागल सांगता येणार नाही. अशा भटकंतीमध्ये आकर्षण फक्त निसर्गाचंच  असतं असं नाही तर त्या त्या प्रदेशातलं लोकजीवन, संस्कृती, खाद्यपदार्थ, स्थानिक उत्सव यांचंही तेवढंच आकर्षण असत. मला तर वाटतं की प्रवास, भटकंती ही जीवन शिक्षण देणारी एक सुंदर पाठशाळाच आहे.

2001साली  नाशिकच्या चित्रा देशपांडे, प्रतिभा कुलकर्णी आणि मी अशा आम्ही  तिघी मैत्रिणी अरुणाचल प्रदेशातल्या 'तवांग' या ठिकाणी जायला निघालो. तवांग हा भारत चीन सीमेलगत असलेला भारतीय हद्दीतला प्रदेश.  वर्षातले बरेच महिने हा भाग बर्फाच्छादित असतो. तेजपूर ते तवांग हा रस्ता पूर्णपणे डोंगरातून जाणारा. घाट संपता संपेना असा हा रस्ता. या भागात भारतीय सैन्याच्या अनेक छावण्या आहेत. सैनिक व त्यांना लागणाऱ्या साधनसामग्रीसाठी होणारी तुरळक वाहतूक सोडली तर इतर वाहने या रस्त्यावर क्वचितच दिसतात. तेजपूर ते तवांग अंतर फार नसलं तरी अत्यंत वळणावळणाच्या घाटातून जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची गती आपो-आपच कमी होते. शिवाय बेभरवशाचे हवामान, बर्फवृष्टी कधी होईल सांगता येत नाही. वाटेत दरडी कधी कोसळतील याचा भरवसा नाही. त्यामुळे 'बोमडिला' या गावी मुक्काम करून मग दुसऱ्या दिवशी तवांगला जावे लागते.

      चीन युद्धाच्या वेळी चीनी सैनिक फक्त तवांग - बोमडिला मार्गे आसाम मध्ये घुसले नव्हते तर तवांग, बोमडीला हा भाग उद्ध्वस्त करत ते पुढे गेले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे व पुरेशी कुमक या भागात भारतीय सेना नाही म्हटलं तरी हादरलीच होती. या भागावर चीनी सैन्याने  काही काळ कब्जा देखील केला होता. नंतर पुन्हा तो भाग भारताच्या ताब्यात आला. अशावेळी चीनी सैन्याशी लढण्यामध्ये स्थानिक जनतेचा सक्रीय सहभाग होता. युद्ध चालू असताना तवांग, बोमडीला तेजपूर हा भाग आता भारताचा राहत नाही, अशी भीती वाटून जेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी इथल्या जनतेला 'अलविदा' म्हटलं तो अपमान, दु:ख आसाम-अरुणाचली लोक अजूनही विसरलेले नाहीत. तुम्ही आम्हाला भारतीय समजत नाही का? ही खंत त्यांच्या मनात मधून-मधून डोकावतेच. चीन युद्धाची जखम अजूनही उरात बाळगून असलेलं असं हे बोमडीला गाव.

          आमचा मुक्काम एक दिवस बोमडीला येथे होणार आहे हे ऐकताच विवेकानंद केंद्रातली माझी एक मैत्रीण अपर्णा पालकर म्हणाली, बोमडीला येथे 'लेकी फुन्सो' नावाचे एक अरुणाचली गृहस्थ राहतात. मुंबईत त्यांचे शिक्षण झालंय. त्यांना नक्की भेटा कारण ते मराठी खूप सुंदर बोलतात, असं म्हणून तिने त्यांचा पत्ता लिहून मला दिला. सहज शक्य झाले तर नक्की भेटू  असा आम्हीही विचार केला. तेजपूरहून यांचा प्रवास सुरू झाला.

         तेजपूर ते बोमडीला रस्ता मोठा सुंदर आहे. एका बाजूला दाट हिरवीगार झाडी असलेले डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी तून खळाळत वाहणारी कामेंग नदी ! घाट चढून आमची गाडी डोंगर माथ्यावर आली. इतका वेळ नागमोडी वळण घेत वाहणारी कामेंग नदी दिसेनाशी झाली अन् धुक्यात लपाछपी खेळणारी पर्वतांची अजून एक रांग समोर आली. या डोंगरांच्या अवती-भोवती असणारे ढग एवढे पांढरे शुभ्र होते की वाटावं बर्फाचेच डोंगर आहेत. 

सकाळी अकराच्या सुमारास बोमडीला येथे पोहोचलो. गाव मोठं टुमदार आहे. प्रत्येक घराच्या अंगणात असंख्य फुलं फुलली आहेत. विशेष करून ऑर्किडस. मे-जून म्हणजे इथे निसर्गाने भरवलेला ऑर्किड महोत्सवच असतो. लॉजवर सामान टाकलं. जेवणं आटोपली. हॉटेल मालकाशी बोलताना सहजच लेकी फुंसो यांची चौकशी केली. तो म्हणाला, हे काय ! समोरच तर आहे त्यांचं ऑफिस ! डेप्युटी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रिज या पदावर ते कार्यरत आहेत. सहज म्हणून आम्ही त्यांच्या ऑफिस मध्ये गेलो. त्यांच्या सेक्रेटरीकडे आम्ही आमची नावे व पत्ता दिला. मराठी नावे वाचून ताबडतोब त्यांनी आम्हाला आत बोलावलं. प्रसन्न व्यक्तिमत्त्व. छानसं हसत त्यांनी आमचे स्वागत केलं. म्हणाले, 'या, कसं काय येणं केलंत?' अरुणाचली चेहऱ्याच्या माणसाच्या तोंडून इतकं शुद्ध मराठी ऐकून आम्ही आश्चर्यचकीत झालो. सगळंच संभाषण शुद्ध मराठीत. हिंदी, इंग्रजीची खिचडी कुठेही नाही. त्यांना इतकं चांगलं मराठी कसं येतं हा आमच्या चेहऱ्यावरचा प्रश्न त्यांनी वाचला असावा. आम्हाला अधिक कोड्यात न टाकता त्यांनी सांगायला सुरुवात केली. प्राथमिक शिक्षणापासून ते पदव्युत्तर शिक्षण होईपर्यंत ते प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक व गायक सुधीर फडके यांच्या घरी राहत होते. आजही अनेक सामाजिक संस्था ईशान्य भारतातील मुलाना महाराष्ट्रात आणून त्यांच्या शिक्षणाची सोय करतात. तसंच चीन युद्धानंतर एका विद्यार्थी संघटनेमार्फत ते महाराष्ट्रात आले. त्यांच्या नशिबाने (हेवा वाटावं असं नशीब!) त्यांची राहण्याची व शिक्षणाची व्यवस्था सुधीर फडके या थोर व्यक्तीच्या घरी झाली. सुधीर फडके व त्यांच्या पत्नीचा उल्लेख त्यांच्या बोलण्यात आई-बाबा असाच ते करत होते आणि माझंच मन अभिमानाने-कौतुकाने भरून येत होतं.

संध्याकाळी अत्यंत अगत्याने ते आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यांची पत्नी दोन दिवसासाठी तवांगला गेली होती. घरी त्यांची वृद्ध आई आणि बारावीत शिकणारा मुलगा होता. मराठी माणसं घरी आलीत म्हणजे माहेरची माणसं भेटायला आल्यासारखा आनंद त्यांना झाला होता. त्यांचा मुलगा व आई आम्हाला त्यांच्याकडचे जुने फोटोंचे अल्बम दाखवत होते. त्यात काही अत्यंत दुर्मिळ फोटोही होते विशेष करून सुधीर फडके परिवाराचे. दुसऱ्या एका अल्बममध्ये एकाच बौद्ध भिक्षूचे अनेक फोटो पाहून मला कुतूहल वाटलं. त्याबद्दल विचारलं तर परत एकदा आश्चर्याचा धक्का या कुटुंबाने दिला. लेकी फुन्सोंचा मुलगा म्हणाला, 'हे माझे काका!'

अरुणाचल प्रदेशातील प्रथेप्रमाणे बौद्ध कुटुंबातील  एखाद्या जोडप्याला जर तीन मुलं असतील तर मधला मुलगा भिक्षु होण्यासाठी बौद्ध विहारांना दिला जातो, पण तसं नसतानाही एखाद्याला  आपण भिक्षु व्हावे असं वाटलं तर त्याला ती मुभा आहे.

लेकी फुन्सोंच्या आईला दोनच मुलं. पण तरीही दुसरा मुलगा भिक्षू झाला. ती माऊली एवढी थोर की एका मुलाला दुसरीत असतानाच शिक्षणासाठी मुंबईला पाठवलं तर दुसऱ्याला भिक्षू बनायला. एक आदिवासी अशिक्षित स्त्री. पण तथाकथित सुशिक्षितांनाही लाजवील असं तिचं मोठं हृदय. मनोमन प्रणाम तर त्यांना आधीच केला होता. आता प्रत्यक्ष चरण स्पर्श करून त्यांचा निरोप घेतला.

लेकी फुन्सो व त्यांच्या परिवाराची जशी | नव्यानेच ओळख झाली होती तशी अजून एक ओळख झाली होती ती श्री सुधीर फडके यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या एका सुंदर अशा वेगळ्या पैलूची. वीर सावरकर या चित्रपटातून । त्यांची देशभक्ती, त्यांची दूरदृष्टी तर प्रत्ययाला आलीच होती, पण त्याचा अधिक प्रत्यय आला त्यांच्या या मानस पुत्राच्या भेटीतून!


भारती ठाकूर 
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन 

मध्य प्रदेश
Website -
Facebook -

Comments

Popular posts from this blog

आत्मभान