माझ्या मराठीची गोडी

माझ्या मराठीची गोडी 


आसाम राज्यातील गोलाघाट या गावी विवेकानंद केंद्राच्या शाळेचे बांधकाम सुरु होते. सकाळी मुलांना शाळेत शिकवणं आणि दुपारी बांधकामावर देख्ररेख करण्यासाठी जाणं यात मी पुरती गुंतून गेले होते. तशात अतिरेक्यांच्या धमक्यांचे टेन्शन होतेच.   अशावेळी क्वचित कधी  निराशेचे ढगही मनात जमा व्हायचे . भरीस भर म्हणून मलेरियाचा ताप दर तीन आठवड्याने उलटायचा.

 एक दिवस दुपारी पस्तीस चाळीस वर्षाची एक महिला मला भेटायला आली. म्हणाली, “माझे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. गोपाल बरूआ त्यांचे नाव. त्यांनी तुम्हाला आमच्या घरी चहाला बोलावलं आहे मी सासरी असते. दहा पंधरा  दिवस आहे इथे.  त्या दरम्यान आलात तर मलाही आनंद होईल.” आमंत्रणाचा स्वीकार करून मी म्हटलं, “आता लगेच काही जमणार नाही मला यायला. पण सवडीने येईन. तुमच्या वडिलांना माझे धन्यवाद सांगा.”  त्या नंतरही दर दोन-तीन दिवसांनी ती मला कुणा न कुणा मार्फत निरोप पाठवायची, “आमच्याकडे चहाला या”. 

 एवढ्या कामाच्या व्यापात खरंच वेळ नव्हता.  पण  इतक्या आस्थेने बोलावत आहेत तर  जावं त्यांच्याकडे. माझ्या शेजारणीला  त्यांचं घर माहित होतं म्हणून तिलाही बरोबर नेलं .चहा नाश्ता  झाला. आपल्या माहेरचं माणूस भेटल्यावर सासुरवाशिणीला व्हावा तसा आनंद श्री  बरुआ  यांना झाला होता. मला मात्र ते सगळं गुढ  वाटत होतं .   चहापान झाल्यावर श्री बरुआ  मला म्हणाले, “ मी तुमच्यासाठी एक गाणं म्हणणार आहे. चालेल न.?”

 या सगळ्या  स्वागताचा जरा अतिरेक होतो आहे असा विचार मनात आला. पण ते चेहऱ्यावर न दाखवता मी हसून म्हटलं ,  “ हो, म्हणा ना.”  त्यांनी गायला सुरुवात केली. 

 बहु असोत सुंदर संपन्न की महा
 प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ||

 मी आश्चर्याने थक्क !  आधीच भावपूर्ण असं  ते मराठी माणसाचं लाडकं  गीत त्यांच्या सुरेल आवाजात आणि आसामी  उच्चारात अधिकच भावपूर्ण वाटत होतं.  डोळे  आपोआपच पाणावले. 

 गाणं संपल्यावर श्री. बरुआ यांनी  खुलासा केला.  1966 साली  भारत सरकारच्या शिक्षण खात्याच्या एका सांस्कृतिक  देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत काही शिक्षकांना वेगवेगळ्या राज्यात दोन महिन्यासाठी पाठवलं होतं. या शिक्षकांनी त्या त्या राज्यातील  भाषेचा एक सर्टिफिकेट कोर्स करणंही अपेक्षित होतं. बरूआंनी त्या साठी मराठी भाषा निवडली.  दोन महिने पुण्यात राहून त्यांनी तो कोर्स पूर्ण केला. पुण्याच्या आठवणी सांगताना ते भूतकाळात रमून गेले . गप्पा मारताना दोन तास कधी संपले समजलं  नाही.  निरोप घेण्यासाठी मी उठून उभी राहिले तर म्हणाले,  " तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू द्यायची आहे. स्वीकार करा ना ?”

 मी संकोचाने म्हटलं,  “त्याची खरंच काही आवश्यकता नाही.” 

 “पण मला त्याची आवश्यकता वाटते. कारण ती  वस्तू छोटी असली तरी माझ्यासाठी फार मौल्यवान आहे.”  असं म्हणत श्री बरूआंनी  कपाटातून एक पुस्तक काढून माझ्या हाती दिलं. म्हणाले,  “ माझ्या पुण्याच्या मराठी मित्रांनी मला भेट दिलं. हे पुस्तक वाचता येण्या इतकं काही मी दोन महिन्यात मराठी  शिकलो  नाही. पण मित्रांनी दिलेली भेट जिवापाड जपून ठेवली.  आता माझं वय झालंय.  आयुष्याचा काय भरवसा?  ही  मौल्यवान वस्तू योग्य माणसाच्या हाती गेली पाहिजे.  पुस्तकाचं नाव होतं  "श्यामची आई”.

 निराश मनस्थितीत  मन रिचार्ज करण्यासाठीच अशा प्रसंगांची योजना नियती आपल्या आयुष्यात करत असते का?

 दुसराही एक प्रसंग असाच मनाला हळवं  बनवणारा .  गोलाघाटहून  गुवाहाटी येथे काही कामानिमित्त  गेले होते.   दुसऱ्या दिवशी  गोलाघाटला  शाळेत हजर होणे आवश्यक होतं म्हणून रात्रीचा प्रवास करावा लागला. 

 सुदैवाने गुवाहाटी ते गोलाघाट ही खाजगी बस गोलाघाटचीच  होती.  बसचा ड्रायव्हर देखील ओळखीचा होता.  ड्रायव्हर  सरदारजी होता.  तिकीट काढून बस मध्ये शिरले तर लक्षात आलं,  आत  फक्त दहा प्रवासी आहेत.  
 मी एक  महिला आणि बाकी पुरुष.  एकूणच ईशान्य भारतातलं  स्त्री दाक्षिण्य वाखाणण्यासारखा आहे.  त्यामुळे ती काळजी नव्हती.  रात्री साडेअकराच्या सुमारास बस नागाव जवळच्या एका ढाब्यावर थांबली.  ड्रायव्हरने सूचना दिली,  “गोलाघाट च्या दिशेने जाणाऱ्या अजून पाच-सहा  गाड्या इथे पोहोचल्या म्हणजे सर्व गाड्या एकत्रच पुढे जातील.”  कारण पुढे काझीरंगा चे जंगल आहे. अतिरेकी कारवाया वाढल्यामुळे ही सुरक्षिततेची उपाय योजना.  सर्व प्रवासी जेवणासाठी ढाब्यावर उतरले.  ढाब्या  जवळचा एक दिवा सोडला तर बाहेर  मिट्ट काळोख.  ड्रायव्हर  चहा पिऊन लगेच त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसला.  कदाचित त्याला माझी काळजी वाटली असेल. मी चांगलीच पेंगुळले होते.  पण लगेचच एका गाण्याच्या आवाजाने खाडकन भानावर आले.  गाणं होतं-
 "मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं ..!" आपण खरच जागे आहोत की स्वप्नात आहोत?  स्वतःला चिमटा घेऊन पाहिला.  खरंच जागी होते.  धावतच ड्रायव्हरच्या केबिन जवळ गेले.  विचारलं, "यह कॅसेट आपने  लगायी  ?”

 “जी,  आपको अच्छी नही  लगी?  बंद करू क्या?”  ड्रायव्हरने घाबरून विचारलं. 
 "अरे वेड्या बंद काय.. " मराठीत बोललेलं वाक्य अर्धवट ठेवून मी त्याला घाईघाईने म्हणाले, “नही नही !   बंद मत करो |  लेकिन ये  कॅसेट आपके पास कहां से आयी  ?”

 “दीदी जी , मै एक बार बंबई  गया था  |  वहां  सुनी |  बहुत अच्छी लगी इसलिये खरीद के लाया हूं | कई  बार
 बजाता हूं  इसे |” 

 ती रात्र होती 31 डिसेंबरची.  आसाम राज्यातल्या एका बस मध्ये अगदी मध्यरात्री एक पंजाबी माणूस मराठी गाणं ऐकतोय.  राष्ट्रीय  एकात्मता वाढावी म्हणून इतर राज्यात जाऊन काम करणाऱ्या माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्तीला नवीन वर्षाची याहून सुंदर भेट काय असणार? 


भारती ठाकूर 
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन 
मध्य प्रदेश
www.narmadalaya.org

Comments

Popular posts from this blog

आत्मभान