तू ही राम है - तू रहीम है
तू ही राम है - तू रहीम है ।।
खूप वर्षे होऊन गेली या घटनेला. देशपांडे काकूंचा एक दिवस फोन आला. त्यांच्या परिचयाची शबनम नावाची एक मुसलमान मुलगी मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर राहत होती. मात्र होस्टेलवर मैत्रिणींच्या गप्पा गाणी यामुळे तिचा अभ्यास होत नसे. परीक्षेपर्यंत एक महिनाभर तिला राहायला खोली हवी आहे. तुझ्याकडे राहिली तर चालेल का? मुलगी स्वभावाने खूप चांगली आहे म्हणाल्या. अभ्यासासाठी जागा हवी आहे म्हटल्यावर नाही म्हणायचं माझ्याही जीवावर आलं. मी म्हणाले, “स्वतंत्र खोली नाही देता येणार मला पण ती माझ्याकडे राहिली तर काही हरकत नाही. एरवी माझ्याकडे कोणी नसतं तिला शांतपणे अभ्यास करता येईल.”
दुसऱ्याच दिवशी शबनम सामानासह माझ्या घरी पोहोचली. गोरी पान, टपोऱ्या डोळ्यांची, हसतमुख आणि बोलकी. मी तिला खोली दाखवली. तिच्या पलंगाच्या समोरच आमचा देव्हारा. सामान लावून झाल्यावर तिने जरा घाबरतच विचारलं,
“ भारती ताई मी सकाळ-संध्याकाळ नमाज पढते. चालेल तुम्हाला ?”
“हो, हरकत नाही.” मी तिला आश्वस्त केलं. मी सुद्धा रोज गीतेचा एक अध्याय आणि रामरक्षा म्हणते- पूजा करते . तुला चालेल ना ?” तिची देखील हरकत नव्हती . रोज सकाळ संध्याकाळ देव्हाऱ्यासमोर तिला नमाज पढताना पाहून मलाही छान वाटायचं.
मला सकाळी आठ वाजताच ऑफिसला जावं लागायचं . देव पूजा करूनच मी ऑफिसला जायचे. बागेत फुलांना तोटा नव्हता . त्यामुळे रोज फुलांची छान आरासही देवापुढे असायची. एक दिवस रात्री उशीरा पर्यंत पुस्तक वाचत बसल्याने झोपायला उशीर झाला आणि सकाळी जाग अशी जरा उशीराच आली .. देव पूजा न करताच मी ऑफिसला गेले . नेहमी प्रमाणे दुपारी अडीच वाजता मी ऑफिस मधून परतले . शबनमने दार उघडलं. तिचे टपोरे डोळे अश्रूंनी भरलेले. माझ्या छातीत धस्स झालं .
“काय झालं शबनम ?” मी.
“ भारती ताई तुम्ही मला रागावणार तर नाही ना ? माझ्या हातून एक मोठी चूक झाली आहे.” शबनम स्फुंदत स्फुंदत म्हणाली.
“नाही रागवणार. पण सांग तर काय झालं? तू सांगितल्या शिवाय कसं समजणार मला?”
तिचं रडणं वाढलेले पाहून माझ्या छातीतली धडधड वाढली. मनात नाना शंका. हात धरून ती मला तिच्या खोलीत घेऊन गेली. रांगोळी व फुलांची आरास करून तिने देव पूजा केली होती मला तर देव्हारा रोजच्या पेक्षा अधिक सुंदर वाटला.
“तुम्ही रोज पूजा करून जाता तर अभ्यास करताना खूप प्रसन्न वाटतं आज मात्र तुम्ही पूजा न करताच गेलात. कोमेजलेली फुलं मला देव्हाऱ्यात बघवेनात . पण पूजा झाल्यावर मात्र मी खूप घाबरले . मी मुसलमान तुमच्या देवाला हात लावला म्हणून तुम्ही रागावला तर? सॉरी ताई.चुकलं माझं.” तिचे डोळे अजूनही पाणावलेले.
मला मात्र हसू आलं. तिच्या पाठीवर थोपटत मी म्हणाले, “ वेडीच आहेस. राग येण्याऐवजी मला तर आज खूप आनंद झालाय. एवढेच नाही तर देव्हाऱ्यातले देवही मला आज अधिक प्रसन्न भासत आहेत. आणि हे ‘तुमचा देव’ काय आहे ? तुझ्या डोक्यात कुणी भरवलं हे ? बाळा, अल्ला काय आणि ईश्वर काय ही तर फक्त प्रतीक आहेत सद्गुणांची.
****
असाच कायम स्मरणात राहणारा प्रसंग. आंतरराष्ट्रीय युवा वर्षा निमित्त संपूर्ण भारतातल्या अनेक विद्यापीठातून युवक शिबिरासाठी विद्यार्थी कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रात आले होते. त्यात दिल्लीच्या जामिया मिलिया विद्यापीठातले काही विद्यार्थी सुद्धा होते. इतर सर्व कार्यक्रमात ते उत्साहाने भाग घेत असत. पण सकाळ-संध्याकाळच्या प्रार्थनेला गैर हजर रहात . त्यांचा लीडर गजाली याबाबतीत फार कट्टर होता. मी त्याला प्रार्थनेचा अर्थ समजावून सांगितला आणि समजावण्याचा प्रयत्न केला की यात गैर काहीच नाही आणि हे फक्त हिंदूंसाठीच असतं असं मुळीच नाही. पण त्याला ते पटेना . शेवटी मी त्याला म्हटलं , संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी तुम्ही जिन्यात थांबा. पहिली प्रार्थना ऐकल्यावर तुम्हाला प्रार्थना गृहात येऊन बसावसं वाटलं तर आत या. त्यांनी ते मान्य केलं. ऋग्वेदातला ऐक्य मंत्रचा अर्थ मी त्याला आधीच सांगितला होता. ऐक्य मंत्र आणि इतर एकदोन प्रार्थना म्हणून झाल्यावर मी एका प्रार्थनेला सुरुवात केली .
तू ही राम है तू रहीम है
तू करीम कृष्ण खुदा ही है
तेरी जात पाक कुरान में
तेरे दर्श वेद पुराण में
गुरु ग्रंथजीके बखान में
तू प्रकाश अपना दिखा रहा..
प्रार्थना पूर्ण म्हणून झाल्यावर मी मागे वळून पाहिलं. जामिया मिलिया विद्यापीठाचे शिबिरार्थीसुद्धा डोळे मिटून हात जोडून बसले होते.
प्रार्थना गृहातल्या मोठ्या समईत पाच वाती तेवत होत्या. मला वाटलं - एक वात हिंदूंची, दुसरी मुसलमानांची, तिसरी शिखांची, चौथी बौद्धांची आणि पाचवी ख्रिश्चनांची. त्यांचा प्रकाश सर्व दिशा उजळून टाकत आहेत.
दुसऱ्या दिवशी प्रार्थनेला मी काही न सांगताही जामिया मिलिया चे शिबिरार्थी येऊन बसले होते. सर्वांच्या हातात प्रार्थनेची पुस्तिका होती . आमच्या सुरात सूर मिसळून ते म्हणत होते ..
ॐ सं गच्छध्वं सं वदध्वं, सं वो मनांसि जानताम्
देवा भागं यथा पूर्वे , संजानाना उपासते ||
समानो मंत्र: , समिति: समानि |
समानं मनः,सह चित्तमेषाम् |
समानंमंत्रमभिमंत्रयेव: , समानेन वो हविषा जुहोमि ||
समानी व आकूतिः, समाना हृदयानिव: |
समानमस्तु वो मनो, यथा व: सु सहासति ||
ॐ शांति शांति शांति|
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Comments
Post a Comment