बेटी है हमारी ..

बेटी है हमारी ..


माननीय बाबा आमटे यांची ‘भारत जोडो यात्रा’ अरुणाचल प्रदेशातील इटानगरपासून सुरू झाली होती. अनेकजण या सायकल यात्रेत सामील झाले होते. वाटेत गोलाघाट येथे एक दिवस त्यांचा मुक्काम आहे हे ऐकलं होतं पण नेमकी तारीख ठाऊक नव्हती. गोलाघाटला वर्तमानपत्र दुकानात जाऊन आणावे लागे. बरेचदा पाऊस असला की फक्त वर्तमानपत्र आणण्यासाठी दुकानात जायचा मी कंटाळा करत असे. त्यामुळेच बाबा आमटे ज्या दिवशी गोलाघाटमध्ये येणार होते त्याची मला वार्ताच नव्हती.

त्या दिवशी सायंकाळी बाजारातून परतताना बस स्टॅण्डसमोरच्या मैदानात बरीच गर्दी दिसली. कोणीतरी भाषण करत होतं . आता तर कुठल्याही निवडणुका नाहीत. मग कशा संदर्भात असेल हे भाषण ? एवढ्यात लाऊड स्पीकर  मुळे काही वाक्यं  कानावर पडली. त्यातल्या अखंड भारत, राष्ट्रीय एकात्मता वगैरे शब्दांमुळे लगेच ट्यूब पेटली, “नक्कीच बाबा आमटे!" अचानक देवच समोर दिसल्यावर एखाद्या भक्ताला होईल तसा आनंद बाबा आमटेंना स्टेजवर पाहून मला झाला. आसाम मधल्या सार्वजनिक मैदानावर होणाऱ्या भाषणांचे वैशिष्ट्य म्हणजे ही भाषणं लोक तासन् तास उभं राहूनच ऐकतात. खाली बसून नाही. बाबांचे भाषण चालू असताना २५-३० जणांचा एक ग्रूप मात्र जमिनीवर बसून भाषण ऐकत होता. म्हणजे ही माणसं नक्कीच आसामी नाहीत. त्यांच्यापैकी कुणी मराठी असेल का? आपल्याला बाबांना भेटता येईल का? कार्यक्रम संपल्यावर स्टेजवर बाबांना भेटणाऱ्यांची खूप गर्दी झाली. एवढ्या गर्दीत कशी भेट होणार बाबांशी ? तेवढ्यातच त्या खाली बसलेल्या माणसांचे एकमेकांशी मराठीत बोलणं ऐकलं. आनंदाने वेडीच झाले.  गोलाघाटमध्ये २५-३० माणसं मराठीत बोलताहेत? मी स्वत:चा परिचय त्यांना करून दिला. काही मंडळी पुण्याची होती. त्यातल्या काही महिला माझ्या पुण्यातल्या मैत्रिणींच्या परिचयाच्या होत्या. खरंच जग किती छोटं आहे हा विचार मनात येत नाही तोच समोरून यदुनाथ थत्ते आले. थत्तेकाकांना मी गोलाघाटमध्ये विवेकानंद केंद्राची शाळा सुरू केलीय, हे ऐकून खूप आनंद झाला. बाबा आमटे यांना भेटण्यासाठी ते मला स्टेजवर घेऊन गेले. बाबांशी ओळख करून दिली.

"आणखी किती कार्यकर्ते आहेतं तुझ्या बरोबर काम करायला?'' बाबांनी विचारलं, "मी एकटीच आहे सध्यातरी. काम वाढलं म्हणजे येतील आणखी काही कार्यकर्ते मदतीला."

“माझा हा प्रश्न विचारण्याचा उद्देश थोडा वेगळा आहे.  आम्ही आज जिथे रात्री मुक्काम करणार आहोत तिथे तुला राहायला  आणि जेवायला येता येईल का ?  सगळ्या कार्यकर्त्यांची भेट होईल,  विचारांची देवाणघेवाण होईल.”

‘ हो नक्कीच आवडेल मला यायला.  येईन मी.”  आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी माझी अवस्था झाली होती.  बाजारातून आणलेले सामान माझ्या निवासस्थानी ठेवून मी गोलाघाटच्या रोटरी क्लबने 'भारत जोडो' च्या कार्यकर्त्यांची आणि बाबांची   निवासाची ज्या ठिकाणी सोय केली होती  तिथे पोहोचले.

बाबा माझ्याशी सहजपणे गप्पा मारताना पाहून  रोटरी क्लबच्या एका आसामी  कार्यकर्त्याने मला  विचारले, "तुम्ही ओळखता एकमेकांना आधीपासून ?”

 मी फक्त हसले, मनात विचार आला, आपल्या दैवताशी - औपचारिक ओळखीची आवश्यकता असते का?  मी काही उत्तर देण्या आधीच बाबा म्हणाले, "बेटी हैं हमारी!" सहज पण मनापासून उच्चारलेल्या बाबांच्या त्या शब्दाने मी किती सुखावले ते शब्दांत नाही व्यक्त करता येणार. दुसऱ्यांना क्षणात आपलंसं करून घेण्याची किमया बाबांकडे आहे हे फक्त ऐकलं होतं, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. उगाच नाही सगळेजण त्यांना बाबा म्हणत.

रात्री 'भारत जोडो यात्रे' संबंधी बोलताना बाबांनी विचारलं, "तुला काय वाटतं या ‘भारत जोडो’ यात्रे विषयी'?
"बाबा, सायकल वरून संपूर्ण भारताची यात्रा करणं हे एक साहस म्हणून, निसर्ग जवळून पहाता यावा, वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांशी परिचय व्हावा म्हणून ठीक आहे.  पण एका भाषणाने, एका दिवसाच्या मुक्कामाने सर्व भारतीयांची मनं जोडली जातील, दहशतवाद थांबेल असं नाही वाटत मला. त्याऐवजी कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या राज्यात जाऊन, तिथे राहून काही सामाजिक कार्य केलं तरच ते शक्य आहे" हे वाक्य तोंडातून बाहेर पडल्यावर वाटलं, उगीचच आगाऊपणे बोललो आपण. बाबा दुखावले असतील का माझ्या बोलण्याने?

माझ्या या उत्तरावर बाबा हसले. म्हणाले, "तू म्हणतेस ते खरं आहे. पण अशाप्रकारचं काम करायला आहेत कुठे कार्यकर्ते इतक्या मोठ्या संख्येने ? नंतर त्यांनी गोलाघाटमधील विवेकानंद केंद्राच्या कामा संदर्भात मला विचारलं, दहशतवाद्यांसह सर्वच गोलाघाटकरांचा विरोध सुरूवातीला कसा होता आणि आता सगळ्यांकडून सहकार्य कसं मिळतंय हे ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला. यदुनाथ थत्ते हेदेखील आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी मला विचारलं, "आसामी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येते का?" 'हो' मी उत्तरले.

'मग एक काम आहे माझं तुझ्याकडे. चांगलं आसामी बाल साहित्य भाषांतर करून माझ्याकडे पाठव"
" बाप रे! खूपच अवघड काम आहे हे. कारण माझं आसामी भाषेचं ज्ञान अगदीच कामचलाऊ आहे. भाषांतरे करण्या इतकं चांगलं खरंच नाही." मी थोडं घाबरूनच त्यांना म्हणाले.

"प्रयत्न तर करून बघ. जमेल नक्की" बाबा म्हणाले. दोघांच्या या आग्रहाला मी राजकारण्यासारखं 'हो' असं आश्वासन दिलं. त्यानंतर तीन वेळा थत्ते काकांनी भाषांतरे करण्यासंबंधी स्मरणपत्रे पाठविली. अत्यंत सुंदर हस्ताक्षरातली ती पत्रे अजूनही शाळेच्या फाईलमध्ये आहेत. पण त्यांना दिलेलं आश्वासन मात्र मी पाळू शकले नाही. शाळा, बांधकाम, मला झालेला मलेरिया अशा सबबी देत राहिले. विरंगुळा म्हणून आठवड्यातून दोन-तीनदा तरी मी गोलाघाटला शेजारणी कडे टीव्हीवरचे कार्यक्रम बघायला जात असे. त्याऐवजी भाषांतराचा प्रयत्न केला असता तर? परवा गोलाघाटची दैनंदिनी वाचताना या घटना पुन्हा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. जणू आताच घडताहेत. मग स्वत:लाच बजावलं, “ आता यापुढे तरी आपल्याला झेपणार नाहीत अशी आश्वासनं कुणाला देऊ नकोस.  दिलीच तर ती पाळायला तरी शिक !’


भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश

Website -
http://narmadalaya.org/

Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo

Comments

  1. “ आता यापुढे तरी आपल्याला झेपणार नाहीत अशी आश्वासनं कुणाला देऊ नकोस. दिलीच तर ती पाळायला तरी शिक !’
    नर्मदे हर !
    स्वयं उपदेश खूपच छान.

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर नर्मदा ताई. मी फार पूर्वी विवेकानंद केंद्राचा कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. कुणाकडून तरी WhatsApp वर मोठा मेसइज आला.
    बऱ्याचदा मोठा मेसेज व तो हि मराठी म्हणाले कि न वाचण्याकडे कल असतो . पण हा वाचला, आवडला खूपच. मग इतरांनाही पाठवला.
    मेसे ज च्या खाली website व ब्लॉग चे URL दिले होते. दोन्ही पाहिले. ब्लॉग मराठीत आहे आणि ह्रीदयस्पर्शी आहे . कृपया असेच लिहीत राहा. यात लालित्य आहे, अनुभवाचा सार आहे, आणि कार्यकर्त्या च्या जीवनाचे पैलू आहेत. दुसर्यां ना प्रेरणादायक ठरतील . धन्यवाद .

    प्रथमच मराठीत एवढा मोठा मेसे ज type केला आहे. काही चूक असल्यास क्षमा करावी.

    ReplyDelete
  3. ब्लॉगच्या शेवटी जाणवलं की "सखी" शी तुमचा संवाद फार पूर्वीपासून सुरू आहे,. नुकतंच तुमचे '"नर्मदा परिक्रमा - एक अंतर्यात्रा" हे पुस्तक वाचले.. तुम्हाला सविस्तर email लिहीणार आहे पण तत्पूर्वी हा ब्लॉग वाचनात आला. कधी कधी आपण गुरूच्या शोधात असतो तेव्हा गुरु कुठल्या रूपाने आपल्याला ज्ञान देतील हे अकल्पित असतं. तसं काहीसं मला तुमच्या पुस्तकाच्या आणि लेखाच्या वाचनातून जाणवतंय. जास्त बोललं गेलं असेल तर क्षमा असावी.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आत्मभान