मी नकोशी … मी देवी...
मी नकोशी … मी देवी...
सुमित्रा भावेच्या 'नितळ' या चित्रपटाची कथा मैत्रीण सांगत होती. मन भूतकाळात कधी शिरलं समजलंच नाही.
मार्च 1987 मध्ये विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी येथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आसाममधल्या गोलाघाट या ठिकाणी माझं पोस्टींग झालं. त्याच दरम्यान त्रिवेंद्रम ते गुवाहाटी अशी ट्रेन सरू झाली होती. हा साधारण साडे तीन -दिवसांचा प्रवास. पण ही ट्रेन मात्र कधी वेळापत्रकाला जुमानत नाही. कधी-कधी ४-५ दिवसही लागत गुवाहाटीला पोहोचायला. प्रवासात माझ्याबरोबर विवेकानंद केंद्राचं कुणीही नव्हतं. इतक्या लांबचा प्रवास एकटीनं करायची ही पहिलीच वेळ. सुदैवाने पूर्वी खास महिलांसाठी असलेल्या 'कूपे' मध्ये आरक्षण मिळालं होतं. तीन तामिळी महिला सहप्रवासी म्हणून बरोबर होत्या. त्यांच्याशी कामचलाऊ तमिळ भाषेत माझं अधून मधून बोलणं चालू होतं.
विजयवाडा स्टेशन आलं आणि दोन महिला पुढील प्रवासासाठी आमच्या 'कूपे"त येऊन बसल्या. दोघी मायलेकी होत्या. सधन आणि सुशिक्षित कुटुंबातील वाटत होत्या. मला पाहिल्या बरोबर मात्र दोघींच्या कपाळावर आठया पडल्या.
"बापरे! या 'कोडी' बरोबर प्रवास करावा लागणार आता!" मोठी म्हणाली.
"जरा ध्यानच दिसतंय'' इति धाकटी. त्यांचं मराठीत बोलणं चालूच होतं. त्रिवेंद्रमहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये मराठी समजणारी माणसंही असू शकतात हे त्यांच्या लक्षातच आलं नव्हतं. त्यांची मुक्ताफळे ऐकून मी मात्र अवाक् झाले. विचार केला की ह्यांना प्रत्युत्तर देण्यात काही अर्थ नाही. बघूया आणखी काय कोंमेंट्स करतात ते. आपल्या सहनशक्तीची छान परीक्षा आहे. त्यांच्या सामानाची आवराआवर करताना चुकून माझा स्पर्श त्या बाईला झाला तर माझ्या देखतच तिने तिचा हात रूमालाने पुसून टाकला. (शक्य झालं असतं तर बहुदा तिनं आंघोळही केली असती!) एखाद्या व्यक्तीला 'कोड' हा त्वचा विकार होणं हे गत जन्मीच्या पापांचे फळ आहे. यासंदर्भात काही पौराणिक कथा सांगून ती आपल्या मुलीचे प्रबोधन करत होती. गळा दाटून आला. पण मी गप्प बसले.
डोळ्यातलं पाणी इतरांना दिसू नये म्हणून मी ट्रेनच्या खिडकी बाहेर बघायला लागले. ३-४ तास 'कोड' ह्या एकमेव विषयावर ती बाई आपल्या मुलीशी बोलत होती. उपेक्षेचे दृष्टिक्षेप माझ्याकडे टाकत होती.
थोड्या वेळातच समुद्र वाटावा अशा मोठ्या जलाशयावर असलेल्या पुलावरून ट्रेन जायला लागली. शेजारच्या तामिळी महिलेला मी हा बंगालचा उपसागर आहे का असं विचारलं तर ती हसून उत्तरली "छे! ही तर गोदावरी नदी !"
काय ? मी आश्चर्यचकित ! एवढे प्रचंड पात्र आपल्या गोदावरीचे? माझ्या डोळ्यासमोर ब्रह्मगिरीवर गोमुखातून थेंब थेंब पडणारी गोदामाई आली. भर उन्हात ब्रह्मगिरी चढून गेल्यावर तहानेने कासावीस झालेली आणि मग त्या गोमुखा खाली ओंजळीनेच थंडगार पाणी पिऊन तृप्त झालेली माझी 'मीच' मला आठवली. विस्फारलेल्या नेत्रांनी गोदावरीचे ते विस्तीर्ण पात्र मी पहातच राहिले. इतका वेळ डोळ्यात अडवलेलं पाणी बांध तोडून कधी वाहायला लागलं समजलंच नाही. पण ते अश्रू सहप्रवासी मराठी महिलांनी केलेल्या अपमानांचे वा उपेक्षेचे नव्हते तर आनंदाचे होते. माझ्या गोदामाईच्या अनपेक्षित झालेल्या दर्शनाचे ते आनंदाश्रू होते. तिचं ते विस्तीर्ण पात्र जणू मलाही मन मोठं करायला शिकवत होतं. त्याच क्षणी गोदामाईला वचन दिलं. बस्स! आता ह्यापुढे अशा क्षुल्लक कारणांसाठी रडणार नाही. तुझी शपथ!
गंमत म्हणजे त्यानंतरचे दोन-तीन दिवस त्या मायलेकींनी केलेल्या एकाही अपमानाचं वाईट वाटलं नाही. राग आला नाही. जणू काही ते बोलणं आपल्यासाठी नाहीच. प्रवास संपत आला होता. त्या दोघी गुवाहाटीच्या आधी रंगिया नावाचे स्टेशन आहे. तिथे उतरणार होत्या. रंगियाला गाडी तीन मिनिटच थांबते हे मी रेल्वे टाईम टेबल चाळताना वाचलं होतं. मी मराठी आहे, मला मराठी समजतं, तुम्ही आतापर्यंत केलेली टीका आणि अपमानास्पद शब्द ऐकूनही मी गप्प होते हे त्यांना समजायला हवं म्हणून मी म्हणाले, "काकू, रंगियाला गाडी फार वेळ थांबत नाही. तुमचं सामान लवकर भरा''
माझ्या तोंडून मराठी ऐकताचं दोघीही अवाक् झाल्या. काय बोलावं त्यांना समजेना. थोड्या वेळाने धीर करून म्हणाल्या, "आम्ही तुमच्याबद्दल इतकं वाईट बोललो तरी गप्प का राहिलात?". आता पाणी त्या दोघींच्या डोळ्यात होतं. "जाऊ द्या सोडा तो विषय. सामान आवरा !" माझा परिचय पूर्ण करण्यासाठी मी म्हणाले. मी, भारती ठाकूर. विवेकानंद केंद्राची पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून आसाममधल्या गोलाघाट या गावी चाललेय. त्या दोघींनीही आपला परिचय दिला. पत्त्यांची देवाण-घेवाण झाली. _रंगिया स्टेशनात गाडी पोचली. मायलेकी सामानासह ट्रेन मधून खाली उतरल्या. मीही त्यांना निरोप द्यायला दरवाजा पर्यंत गेले. अचानक काय झालं कुणास ठाऊक ! परत त्या बाई ट्रेनमध्ये चढल्या. मला कडकडून मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबलं नव्हतंच. लेकीनं माझ्याशी प्लॅटफॉर्म वरूनच हस्तांदोलन केलं. त्या दोघींनी मला मराठी येतं हे समजल्यावर sorry का म्हटलं नाही या मला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर मिळालं. भावना व्यक्त करायला नेहमी शब्द कुठे लागतात? मनात विचार येतो की मी त्यांच्या टीकेला रागाने प्रत्युत्तर दिलं असतं तर त्यांना आपली चूक समजली असती का?
*****
घटना दुसरी- गोलाघाटमधील आमच्या शाळेतील पूर्व प्राथमिक वर्गातल्या मुलांची सहल एका चहाच्या मळ्यातील देवी मंदिरात गेली होती. काही कारणाने मला मुलांबरोबर सहलीला जाता आलं नाही. दुसऱ्या दिवशी मुलं शाळेत आल्यावर मी विचारलं, कशी आहे देवीची मूर्ती?" तपस डेका नावाचा एक चिमुरडा क्षणात उत्तरला, " दीदी, ती देवीची मूर्ती अगदी तुमच्या सारखी दिसते.”
मला कळेना काय प्रकार आहे. सहली बरोबर गेलेल्या शिक्षिकेने हसत हसत खुलासा केला. देवीची मूर्ती पांढऱ्या शुभ्र संगमरवराची आहे. मुलांमध्ये म्हणे मूर्ती पाहिल्यावर चर्चा चालू होती, "देवी अगदी आपल्या भारती दीदी सारखी गोरी आहे. तिचे केसही भारतीदीदी सारखेच लांब आहेत."
काय शिकायचं या दोन्ही घटनांमधून?
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Website -
http://narmadalaya.org/
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
नर्मदे हर !
ReplyDeleteनोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७ पायी परिक्रमेची संधी मैयाने प्राप्त करून दिली .
अत्यंत आनंदात व समाधानाने निर्विघ्नपणे परिक्रमा पूर्ण झाली.
यंदा १० दिवस बरमान घाट येथे सिद्धेश्वर महादेव मंदिरातून परिक्रमावासींची सेवा करण्याची संधी मैयाने प्राप्त करून दिली .
आनंद समाधान व मैयाच्या सानिध्यात सवस मिळाला.
आज प्रथमच आपले लिखाण वाचत आहे
पुण्याच्या सौ. साक्षी जोशी यांचे तोंडून.
परिक्रमेत असतांना आपल्या बद्दल ऐकले होते .
आत्मसंयमनाचा पाठ पढवलात दीदी तुम्ही . धन्यवाद !
कैलाशपुत्र नर्मदाभक्त ललितकिशोर, पुणे महाराष्ट्र
मो. 9922517270., email : lalitkishor4465@gmail.com