गुरु

गुरु 



मध्य प्रदेशातील लेपा या  गावात नर्मदालयाची  एक गोशाळा देखील आहे आहे. दूध काढायला  एका दादाजींची नेमणूक केली आहे.   त्यांच्या  बरोबर शेण उचलायला, झाडायला आणि  इतर छोटी-मोठी कामे करायला नर्मदालयाच्या वसतिगृहातील सातवी आठवीची मुले देखील जातात.  कधीकधी गंमत म्हणून छोटी मुले पण गोशाळेत जातात.  या सगळ्याच मुलांच्या घरी गाई म्हशी किंवा बकऱ्या तरी असतात.  त्यामुळे  मुक्या जनावरांचे प्रेम या मुलांना लहानपणा पासूनच असते.

ही घटना आहे तीन वर्षा पूर्वीची.  शाळेतल्या  आणि वसतिगृहातल्या  मुलांची संख्या जसजशी वाढायला लागली तसे दूध अपुरे पडू लागले.  एखादी गीर  गाय विकत घ्यावी असा विचार मनात आला.  लेपा पासून जवळच बडवाहा नावाचे  शहर आहे आहे. तिथे एका शेतकऱ्याकडे गीर  गाय विकाऊ आहे असे समजले.   गाय गाभण होती.  ती व्याली की बछड्यासह घेऊन येऊ असा विचार केला.  गुरु पौर्णिमेच्या दिवशी या गीर  गाईला  बछडा ( गोऱ्हा ) झाला.  बछडयासह गीर गाय आता आपल्या  गोशाळेत दाखल होणार  याचा आनंद  सगळ्यांनाच  झाला.   आठ-पंधरा दिवसांनी गाईला घेऊन येऊ असा मी विचार केला होता.  पण गाईचा मालक तिला ताबडतोब घेऊन जा म्हणून मागे लागला.  शंकेची पाल तेव्हाच माझ्या मनात चुकचुकली.  गाईच्या  मालकाला पैशाची आवश्यकता असेल असा  दुसराही विचार मनात आला. त्या गाईला आम्ही एका  टेम्पो मध्ये घालून घेऊन आलो.  मुलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.  औक्षण करून,  गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून तिचं स्वागत करण्यात आलं.  तिच्या बछडयाचे  नामकरण करण्यात आलं ‘गुरु’. गुरु पौर्णिमेच्या दिवशी झाला म्हणून गुरु. 

 गाय गोशाळेत तर  आली.  पण ती काहीच खायला तयार नव्हती.  तिला श्वास घ्यायला देखील त्रास होतोय असं जाणवलं. आमच्या  या  वनवासी मुलांना गायीच्या आजारपणाबद्दल बरीच माहिती असते.  ते म्हणाले  गाईला तर ताप पण आहे.  माझ्या काळजाचा ठोका चुकला. ताबडतोब डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर म्हणाले,  हिला तर न्युमोनिया झाला आहे.  हिचे हृदय सुद्धा जरा कमजोरच आहे. बघूया औषधे देऊन काही फरक पडतो का ?  गाय बछड्याला दूध पाजायला पण तयार नव्हती.  त्याला दुसऱ्या गाईचं दूध बाटलीने पाजावे लागले.  बछड्यांना दूध पाजायचं काम छोटी मुलं उत्साहाने करत.  दोन दिवस  उलटून गेले.  गाईच्या तब्येतीला काही उतार पडेना.  ती जी एकदा  बसली ती उठून उभी पण रहात  नव्हती. 

गाईची तब्येत  जरा जास्त आहे असं मला आमच्या कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून समजलं.  आमच्या छोट्या मुलांपैकी महेशने मला विचारलं,  "दीदी, आपण गोशाळेत बसून आज संध्याकाळची प्रार्थना करूया का ? प्रार्थना  ऐकल्यावर तिला कदाचित बरं वाटेल." तिच्या तब्येतीत  फारशी सुधारणा होणार नाही.  काही दिवसांची अथवा तासांची ती सोबती आहे हे मलाही समजून चुकलं होतं. पण तरीही मुलांची इच्छा म्हणून गोशाळेत आम्ही संध्याकाळची प्रार्थना म्हणायचं ठरवलं. तिथे सतरंजी टाकली.  हार्मोनियम आणि तबला ही नेला. प्रार्थनेला सुरुवात झाली आणि खरोखर ती थोडा थोडा प्रतिसाद देत होती. उठून उभं राहायचा प्रयत्न करत होती.  थोड्यावेळाने व्हेटर्नरी डॉक्टर तिला सलाईन लावायला आले. त्यांना मी विचारलं, “ कुछ उम्मीद है बचने की ?”  त्यावर ते गंभीर चेहऱ्याने म्हणाले, “ बहुत कम - ना के बराबर”.  

प्रार्थना झाल्यावर   मी मुलांना म्हटलं,  "चला, आता जेवायला भोजनगृहात  जा”.  पण कोणीही उठायला तयार नव्हते. भूक नाही म्हणाले.  प्रार्थनाच काय, त्यांनी नंतर गाईला त्यांच्या कविता पण  ऐकवल्या. ताला सुरात पाढे पण म्हणून झाले.  रात्रीचे साडेअकरा वाजले.  तरी मुले उठेनात.  शेवटी आमचा दिग्विजय नावाचा एक कार्यकर्ता माझ्यासकट सगळ्यांनाच रागावला.  “  जा आता इथून.  उद्या सकाळी शाळा आहे तुम्हाला सगळ्यांना.  जेवण करा आणि झोपा  आता.”  नाईलाजाने आम्ही सगळे परत आलो.  फक्त चार-पाच कार्यकर्ते तिथे थांबले.  पहाटे पाच वाजताच गोविंद  नावाचा आमचा एक कार्यकर्ता नर्मदालयात  येऊन मला म्हणाला,  "दीदी, एखादे कोरे कापड असेल तर  हवं होतं."   गाय म्हैस बकरी यापैकी कोणीही मरण पावलं तर मृत शरीरा खाली कोरा कपडा ठेवतात हे मला  ठाऊक होतं.  मी  काय समजायचं ते समजले.  निशब्द पणे कपाटातून  कोरं  कापड काढून दिलं. 

रात्री उशिरा झोपल्यामुळे वसतिगृहातील मुले देखील थोडे उशीरा उठली.  त्यांना कोणालाच मी ही घटना सांगितली नाही.  कारण ती सगळेच गोशाळेकडे धाव घेतील हे मला माहीत होतं.  मुलांच्या आंघोळी आटोपल्या.  एरवी   सकाळची प्रार्थना   झाल्यावर नाश्ता होतो.  पण रात्री मुलं धड जेवली नव्हती.  आणि आता या बातमीने नाश्ता  करणार नाहीत याची खात्री होती.  म्हणून त्यांना  मी  म्हणाले,  चला आज  आधी नाश्ता करूयात  मग प्रार्थना.  काही मुलांनी मला विचारलंच, “ दीदी,  गाईची तब्येत  कशी आहे?”   मी  उत्तरले, “ मलाही ठाऊक नाही रे.  गोशाळेत कुठे गेले मी ?

 नाश्त्यानंतर  प्रार्थना गृहात येऊन मुलांनी प्रार्थनेला सुरुवात केली.  एक दोन प्रार्थना  झाल्या असतील. तेवढ्यात दिग्विजय आणि गोविंद बछड्याला घेऊन नर्मदालयात आले.ते  गेट मधून आत येताना  एका  विद्यार्थ्याचे लक्ष  त्याच्याकडे गेले.  तो प्रार्थना विसरला  आणि “ गुरु आ गया  मतलब गाय माता मर  गई”....  असे म्हणत त्याने भोकाड पसरले.  त्याचे  रडणे ऐकून इतर मुलंही धाय मोकलून रडायला लागली.  त्यांना आवरणं- समजावणं कठीण गेलं.  प्रार्थना गृहातून सगळीच मुलं  धावत बाहेर आली.  गुरूला कुरवाळायला लागली.  गुरु मुकपणे उभा होता.  काय घडलं आहे हे त्याला समजलं असेल का? 

गोशाळेत एवढ्या छोट्या बछड्याला एकटं  ठेवणं ठीक नाही असं  सर्वांचं मत पडलं.  कंपाउंड वॉल वरुन  उडी मारून कुत्री त्याला त्रास देतील.  शिवाय तिथे तो आपल्या आईला शोधत बसेल.  मला यातला काहीच अनुभव नसल्यामुळे मी ते मान्य केलं.  गुरु नर्मदालयातच राहू लागला.  बाटलीने दूध पिऊ लागला.  इतर मुलांबरोबर खेळू लागला. उड्या मारू लागला.  एवढंच नाही तर रोज प्रार्थना गृहात मुलांबरोबर प्रार्थनेच्या वेळी बसूनही लागला. त्याचा एक खास मित्र आहे.  मांगीलाल त्याचे नाव.  प्रार्थना म्हणताना सुरुवातीचे काही दिवस मांगीलालच्या मांडीवर तर नंतर त्याच्या शेजारी बसून तो प्रार्थना ऐकू लागला.  नर्मदालयातल्या खोल्यांमध्ये सुद्धा त्याचा मुक्त संचार असे.  कधीकधी स्वयंपाक खोलीत जाऊन हक्काने खायला मागे.  नंतर तो फ्रीज उघडायचं धाडस पण करायला लागला. मग मात्र  आम्ही फ्रिज  लॉक करायला सुरुवात केली .संध्याकाळी मी अंगणात बसले  की माझ्या हाताला आणि पायाला चाटायचा. बाहेर जायचं असेल  तर साडीचा पदर ओढायचा. 

एकदा मी पुण्याला काही कामानिमित्त गेले होते.  माझा एक चष्मा कायमच नर्मदालयात  मी जिथे वाचनासाठी बसते तिथल्या टेबलावर  कायमच असतो.  पुण्याला जातेय  हे गुरूला सांगायचं मी विसरले.. दुसऱ्या दिवशी मी आसपास दिसत नाही हे लक्षात येऊन तो माझा चष्मा तोंडात धरून स्वयंपाक खोलीत गेला.   आमच्याकडे स्वयंपाक करणाऱ्या ताईने घाईघाईने तो चष्मा हातात घेतला आणि त्याला म्हणाली “दीदी पुना गयी है |चार दिन बाद आयेगी |”  तिने बोललेलं समजल्या सारखं  करून गुरु पुन्हा अंगणात परतला. 

त्याचे सगळे लाड कौतुक चालू होते.  एक दिवस माझ्या लक्षात आलं की याचं  पोट इतर  बछड्यांपेक्षा खूपच कडक आहे. नाळ कापल्यानंतर बेंबीच्या जवळ  जी जखम होते  ती पण नीट भरली नाहीये.  डॉक्टरांना बोलावलं तर म्हणाले, “ गाय बछड्याच्या  बेंबीला चाटते. मग  ती जखम नैसर्गिक पणे बरी होते.  याची आई लवकरच केली म्हणून ही समस्या आहे. काही दिवसांनी ठीक होईल.  पण हा वयाच्या मानाने खूप अशक्त वाटतो.  आईचे दूध लहानपणी  मिळाले नाही ना म्हणून.” 

त्याच आठवड्यात आमची दुसरी एक गाय व्याली.  मी दिग्विजयला म्हणाले, “ मुलांसाठी या गाईचे दूध नाही मिळालं  तरी चालेल.  पण ती गुरुला पाजते  का बघ ना.  कदाचित त्याचा अशक्तपणा कमी होईल”.

माझे बोलणे दिग्विजयने  हसण्यावारी नेले.  म्हणाला, “ अशी नव्यानेच  व्यालेली गाय  दुसऱ्या कुठल्याही अनोळखी माणसाला अथवा प्राण्याला जवळ येऊ देत नाही.  ती त्याला लाथ मारेल.  आधीच तो अशक्त आहे.  खाली पडून जखमी झाला तर पंचाईत नको”.  पण मी आग्रह धरला, “ प्रयत्न करून तर बघू.  हवं  तर तू  धरून ठेव त्याला.”  माझ्या हट्टापायी दिग्विजय या गोष्टीला तयार झाला. त्याने गुरूला त्या नव्यानेच व्यालेल्या गाई जवळ नेले.  आणि काय आश्चर्य !  तिने स्वतःच्या बछड्याला आणि गुरूला दोघांना पाजायला सुरुवात केली.  मनात विचार आला, या गाईने गुरुच्या आईला मरतांना पाहिलं असेल.   ते तिला आता आठवलं असेल का ?  त्या दिवसापासून गुरु या आपल्या नवीन आईचे दूध नेमाने पिऊ लागला. धष्टपुष्ट होऊ लागला. दोन महिन्यांनी अजून एक गाय व्याली आणि तिने देखील आपल्या वात्सल्याचा पान्हा गुरुला दिला. गाईला गोमाता का म्हणतात याचं उत्तर मला या घटनांनी मिळालं.
विशेष म्हणजे गाईच्या मूळ मालकाला ही घटना आम्ही कळवली. मला वाटलं त्यांनी आम्हाला फसवलं पण नर्मदालयातल्या गरीब मुलांसाठी गाय नेली होती. त्यांना दूध मिळालं पाहिजे म्हणून काही दिवसातच त्याने स्वतः दुसरी एक गाय आम्हाला आणून दिली. किती मोठेपणा त्याच्या मनाचा !!

माझ्या जीवन शाळेत अजून काय काय शिक्षण बाकी आहे हे मात्र मला अजून माहीत नाही .



भारती ठाकूर 
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन 
मध्य प्रदेश

Website -

Facebook -

Comments

  1. वरील पोस्ट व नाशिकच्या तुमच्या जास्वंदीच्या झाडाची हकीकत वाचून डोळे पाणावले. प्राण्यांना पण तीव्र सहवेदना असतात हे मला 50 व्या वर्षी अजून एका स्वानुभवावरून कळलं. मी तो अनुभव वाचकांशी वाटतो. इंग्रजीत कथन केलं आहे, तेच इथे चिकटवतो :-

    We had a plan of doing about 70 KM trek over a period of 4 days from Lonavala to Bhimashankar from 29th September to 2nd October 2017. To test our fitness and capability of doing such a long walking trip, we decided to have a "test-run" on 10th of Sept month going from Lonavala to Rajmachi and back to Lonavala amounting to almost 39 km. On the way, as we were walking to Rajmachi, about one third way there is a place called Fanasraai. We halted there to have little bit of snacks and to relax our shoulders by throwing haversacks on the ground. As we were eating the goodies, a dog approached us. We offered it some bits of snacks thinking that it has approached us for food. It happily ate what we gave it but did not keep pestering us for more food. Just to open some topic for discussion with it, I asked him how he was, where he came from, how many siblings has it got, what do the siblings call him and how he is doing of late. It patiently listened to my questions and tried to reply by a uttering "unn, unn, unnn" 3 times. It then disappeared in the forest after this discussion.

    On 29th September on our lengthy trek, we stopped exactly at the same spot as there is canopy of trees and we waited for the trailing 3 comrades to join us. The same doggy came by and again we offered it something to eat from whatever we had carried with us. From that point onwards it kept accompanying us throughout the day. At the end of the day after an arduous walk through thick jungle we ultimately found our destination stop which was a small, isolated Temple. We refreshed ourselves on the stream which was flowing next to the temple and then we had some dinner from the packed food that we had carried with us, again sharing little bit of it with the dog. In the moonlight that was percolating through the thick fog we all sat outside the temple talking to each other and sharing our experiences. One of the trekkers was to have his birthday on 30th September. So we were waiting for midnight to wish him.

    Suddenly I experienced a crippling cramp within my thigh and calf muscles of the right and in the left foot muscles, all at the same time, which caused me to writhe in pain. This doggy who was about 4 to 6 feet away from where we were sitting approached me with the deepest sympathy I could see in its eyes. What it did next was unbelievable. It lifted its front paw and with all the gentleness, it started stroking my shin close to the ankle, so as to soothe me. It then sat down next to me resting both its front paws on my ankles and resting it's chin on my legs. Tears filled my eyes experiencing it's unfeigned love, emotions and sympathy. How could it tell that my legs were hurting? What made it feel that it should help me? I am overwhelmed with this touching experience.

    मला विद्यार्थी म्हणून तुमच्या इथे यायला आवडेल. तशी शक्यता असली तर कृपया कळवणे. ईमेल: SATHAYE3767@GMAIL.COM

    ReplyDelete
  2. Sir dolyat pani aala katha ani tumcha anubhav vachun. 🙏

    ReplyDelete
  3. नमस्कार.
    तुमचे अनुभव, आत्मकथन एक वेगळी ऊर्जा देतात असे वाटायला लागले आहे.
    मी एकदा आपल्या ला भेटायला, संस्थेचे कार्य जाणून घ्यायला तिकडे येणार आहे.
    माझ्या येण्याने संस्थेच्या कार्यात, उपक्रमात काही हातभार लावता आला तर मला आनंदच होईल.
    शैलेन्द्र शिर्के

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आत्मभान