मोक्ष
मोक्ष
ही घटना आहे 27 नोव्हेंबर 2012 ची . नर्मदा किनारी नगावा नावाचे एक गाव आहे. गंमत आहे ना ! गावाचे नाव नगावा. तिथे अगदी नर्मदा किनाऱ्यावर केवट धर्मशाळेत शाळा मध्येच सोडून दिलेल्या मुलांसाठी आमचे एक अनौपचारिक शिक्षण केंद्र होते. आपण निशुल्क कोचिंग क्लास असे म्हणूया त्याला हवं तर. सकाळी दहा साडेदहा ची वेळ होती. मी वर्गात शिकवत होते. खिडकीतून बाहेर लक्ष गेले तर दोन परिक्रमावासी येताना दिसले. थोड्याच वेळात त्यांच्यापैकी एकाने वर्गाच्या खिडकीतून डोकावून मला विचारले, “भारती ठाकूर से मिलना था | कहा मिलेगी ?” मी हसून म्हटलं, “मीच आहे ती. दमून आला आहात. थोडं बसा, एवढा विषय संपवून मी येतेच.”
जवळच्याच एका मंदिरात परिक्रमावासींची रहाण्याची सोय होती. तिथल्या ओट्यावर दोघेही माझी वाट बघत थांबले. थोड्यावेळाने मी तिथे पोहोचले. एकमेकांशी परिचय झाला. पुण्याचे राहणारे ते दोघेही सख्खे भाऊ होते. एक श्री माधव परांजपे आणि दुसरे श्री मुकुंद परांजपे. दोघांचीही वयं सत्तरीच्या आसपास असावीत. थोरल्या भावानी बॅगेतून एक वही काढली. त्यातल्या एका पानावर काही जणांची नावे लिहिली होती आणि वरती शीर्षक होतं नर्मदा परिक्रमेत या लोकांना अवश्य भेटणे आहे. त्या चार -पाच नावांमध्ये माझेही एक नाव होते. माझ्या नावासमोर त्यांनी माझा मोबाईल नंबर लिहिला.
त्या मंदिरात आमचे नेहमीच जाणेयेणे असल्यानेतिथली सगळीच मंडळी माझ्या ओळखीची होती. तिथल्या व्यवस्थापकांना मी सांगितलं, “ये हमारे पुना के मेहमान है । जरा अच्छेसे ध्यान रखना इनका |” आणि मी तिथून पुन्हा लेपाला परतले.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच सहाच्या सुमारासच धाकट्या भावाचा म्हणजे श्री मुकुंद परांजपे यांचा फोन आला. “ ताई-दादा गेले. मी मुकुंद परांजपे बोलतोय” मला काही कळेना की कुठे गेले आणि इतक्या सकाळी ? मी विचारलं कुठे गेले? “ गेले म्हणजे दादा वारले काल रात्री. पहाटे अडीच तीनच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आम्ही भटयाण येथे गोधारी आश्रमात थांबलो आहोत. काल नगाव येथे जेवण करून पुढे निघालो आणि संध्याकाळपर्यंत गोधारी आश्रमात पोहोचलो आणि तिथेच थांबलो. आम्हाला रात्री झोपायला स्वतंत्र खोली पण मिळाली. रात्री झोपेपर्यंत दादा व्यवस्थित होते. पहाटे अडीच तीनला मला त्यांच्या हालचालीने जाग आली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय हे मला जाणवलं. मी त्यांना प्यायला पाणी दिलं. एखाद-दोन घोट पाणी प्यायले असतील. पण लगेच त्यांचा प्राण गेला. आश्रमातल्या स्वामीजींनी डॉक्टरांना बोलावले पण काही उपयोग झाला नाही. प्राण गेला होता. काय करावे मला सुचत नाहीये. मी घरी पुण्याला कळवलं आहे. पण घरचे लोक कुठल्याही वाहनाने आले - अगदी विमानाने सुद्धा तरी त्यांना रात्रीचे नऊ-दहा वाजतील यायला.” थोरल्या भावावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या धाकट्या भावाची अवस्था मी समजू शकले.
मी म्हणाले, “तुम्ही काळजी करू नका. मी पोहोचते तिथे. मी आमच्या दोन कार्यकर्त्यांना काय घडलं ते सांगितलं आणि लवकर तयार व्हा आपल्याला निघायचे आहे अशी सूचना देखील दिली. ताबडतोब आम्ही तिथे पोहोचलो. तो दिवस होता कार्तिकी पौर्णिमेचा. गोधारी आश्रम नर्मदा किनाऱ्यावर परशुरामांची तपस्थली म्हणून प्रसिद्ध आहे. मी बरोबर जाताना भगवद् गीता आणि इतर काही स्तोत्रांची पुस्तकं आठवणीने बरोबर घेऊन गेले. करण दिवसभर त्या भावाशी काय बोलणार ?
दिवस उजाडला आणि एका परिक्रमावासीचे नर्मदा किनारी देहावसान झाले आहे ही बातमी आसपासच्या गावात वार्यासारखी पसरली. लोक दर्शनासाठी येऊ लागले. त्यांच्या बोलण्यातून समजले की नर्मदा किनारी परिक्रमावासीचा मृत्यू आणि तोही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी होणे याला भाग्य लागतं. या भाग्यामध्ये श्री परांजपे यांचं ॲडिशनल भाग्य हे होतं की ते चित्पावन ब्राम्हण होते आणि परशुरामांच्या तपस्थलीवर त्यांचा मृत्यू झाला.
दिवसभर लोक दर्शनासाठी येत होतेच. आश्चर्य म्हणजे कोणीही रिकाम्या हाती आलं नाही. कोणी आमच्यासाठी चहा आणत होते तर कोणी दूध. कुणी साजूक तूप. कुणी गोवऱ्यांची व्यवस्था करत होते तर कुणी प्रेतावर पांघरण्याचे वस्त्र. गावातल्या बायकांनी आठवणीने मला सांगितले, “ दीदी, आमच्याकडे भरपूर लाकूडफाटा आहे. स्वयंपाकासाठी आम्ही तो गोळा करून ठेवतो. ती लाकडे घेऊन जा. आमची पिकअप व्हॅन या कामासाठी उपयोगी पडली. भरपूर गोवऱ्या आणि लाकडे लोकांनी किनाऱ्यावर रचून ठेवली. तो संपूर्ण दिवस खूप अस्वस्थतेत गेला. दर तासाला त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क चालू होता. त्यांचे इंदोर मधले परिचित श्री वाळुंजकर हे या परिवाराला भट्याणला घेऊन येणार होते. आम्ही त्यांच्याशीही संपर्कात होतो नर्मदा किनाऱ्यावर सरणाची तयारी चालू आहे आणि चिता रचली गेली आहे हे गोधारी आश्रमातल्या स्वामीजींना समजताच त्यांनी वेगळा पेच प्रसंग माझ्यापुढे उभा केला. श्री परांजपे परिक्रमेत होते. म्हणजे तो एक प्रकारचा सन्यासच असतो. आणि संन्यास घेतलेल्या व्यक्तीचे नर्मदा किनारी दहन होत नाही तर ते पार्थिव शरीर नर्मदेला अर्पण केलं जातं. पार्थिवाला जल समाधी दिली जाते.
अनेकदा अशी काही पार्थिव शरीरे जलसमाधी दिल्यानंतर नर्मदेच्या पात्रात असलेल्या खडकांमध्ये अडकतात आणि कुजतात हे मी वाचलं होतं, ऐकलं होतं आणि एक-दोन ठिकाणी बघितलेही होतं. त्यामुळे हे जलसमाधीचे खूळ लोकांच्या डोक्यातून निघावं अशी माझी इच्छा होती. मी तसा वाद घालूनही पाहिला .. लोकांचं म्हणणं असं कि शरीर सडतं हे खरं आहे पण ते मासे खाऊन टाकतात. त्यांना अन्न मिळतं. माझी समजूत पटेना. कारण तेच पाणी गावातले लोक हंडे भरून पिण्यासाठी आपल्या घरी नेतात. नर्मदेवर स्नानासाठी आलेले भक्त सुद्धा तेच पाणी पितात. त्यांचे काय ? खूप विचार केल्यानंतर एक युक्ती मला सुचली. कै. परांजपे यांच्या मुलाला मी इथे काय चर्चा चालू आहे लोकांमध्ये ते फोनवर सांगितलं. त्याला मी सांगितलं, की वडलांच्या चितेला अग्नी देणे हे मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे.आमचे सगळेच नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी इथे पोहोचू शकणार नाहीत. माझी आई सुद्धा येऊ शकत नाहीये. अशावेळी किमान मला अस्थिकलश घेऊन जाता यावा म्हणून तरी पार्थिव शरीराचे दहन होणे आवश्यक आहे.” असे तू त्या स्वामीजींना सांग. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वादात मी जिंकले. गावकरी आणि ते स्वामीजी नर्मदा किनाऱ्यावर कै. परांजपे यांचा अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले.
संध्याकाळी अंधार पडू लागला तसे अंत्यक्रियेसाठी लोक जमू लागले. कोणी फुलं हार तर कुणी उदबत्ती असं घेऊन आले. विशेष म्हणजे थोड्याच वेळात बँड पार्टी सुद्धा पोचली. परिक्रमावासीचा नर्मदा किनारी मृत्यू होणे हे भाग्याचं लक्षण आहे. तो दुःखाचा नाही तर आनंदाचा क्षण आहे म्हणून हा बँड बाजा.. खूपच गहिवरून आलं होतं मला. रात्री साडेनऊच्या सुमारास परांजपे यांचा मुलगा, मुलगी आणि जावई तसेच श्री. वाळुंजकर तिथे पोहोचले. कुणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. निशब्दपणे एकमेकांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचत होत्या. वाजत गाजत अंत्ययात्रा नर्मदा किनाऱ्यावर गेली. कार्तिकी पौर्णिमेचा चंद्र अगदी माथ्यावर आलेला होता.
त्यांच्या मुलीला - पूजाला सोबत म्हणून मी आश्रमातच थांबले. भांबावली होती बिचारी. थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं ही सगळी मंडळी अंत्ययात्रेला गेलीत पण आश्रमातले स्वामीजी आणि त्यांचे गावातच राहणारे एक परिचित हे दोघे मात्र आश्रमातच थांबले आहेत. न राहवून मी विचारलं त्यांना , “ दिवसभर तुम्ही इतकं सहकार्य केलं. मग आता अंत्यविधीसाठी का नाही गेलात ?” कदाचित जलसमाधी दिली नाही म्हणूनही स्वामीची गेले नसावेत असं मला क्षणभर वाटून गेलं. पण ते म्हणाले, “हम कैसे जा सकते है? हमारा असली काम तो अब चालू होगा | इन लोगोने भोजन नही किया है।भोजन की तयारी भी तो करनी है |” दोघांनीही आंघोळी केल्या आणि स्वयंपाकाला लागले. त्यांनी दाल बाटी चा बेत केला. कमी वेळात जास्त माणसांसाठी स्वयंपाक करायचा असेल तर दालबाटीला पर्याय नसतो.
अंत्यविधी झाल्यानंतर मंडळी परतली. त्यात गावकरीही होते. त्या सगळ्यांना स्वामीजींनी आणि त्यांच्या त्या गावातल्या सहकाऱ्याने प्रेमाने जेवू घातलं. दुसऱ्या दिवशी अस्थिकलश घेऊन कै. माधव परांजपे यांचे चिरंजीव शांतिशआणि लेक- जावई पुण्याला परतले.
अशीच एक घटना गेल्या वर्षी घडली. दिलीप गोखले हे माझी नाशिक ची मैत्रीण सौ. माधुरी माटे हिचे बंधू.
ते नर्मदा परिक्रमेत आहेत हे समजलं होतं. अशी अनेक मंडळी परिक्रमेत असतात. प्रत्येक वेळी भेट होऊ शकतेच असेही नाही. मुळात लेपा, भट्याण आणि छोटी खरगोन या ठिकाणी आमच्या ज्या गरीब कुटुंबातील मुलांसाठी निशुल्क शाळा चालतात त्याचे व्यवस्थापन आणि आर्थिक जुळवाजुळव यामध्येच वेळ इतका जातो की परिक्रमावासी आमच्याकडे लेपाला आले तरी त्यांच्याशी फार गप्पा गोष्टी होऊ शकतात असं नाही. नंतरही प्रत्येकाशी फारसा संपर्क राहतोच असेही नाही. त्यामुळे दिलीप गोखले येऊन गेले असतील आमच्याकडे पण मला नाव आठवत नव्हतं. एक दिवस भल्या पहाटे माधुरीचा फोन आला. तिचा भाऊ दिलीप नरसिंगपूर जवळच्या एका आश्रमात रात्री झोपेतच हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू पावला. त्याचं कुटुंब मुंबईला तर माधुरी नाशिकला. दोन्ही कुटुंबांनी लवकरात लवकर नरसिंगपूरला पोहोचायचं ठरवलं तरी दीड दोन दिवस लागणार होते. श्री दिलीप गोखले यांच्या मोबाईल मध्ये मुलाचा नंबर मिळाला म्हणून संपर्क तरी झाला. एकटेच परिक्रमा करत होते. म्हणून पोलिसांनी पोस्टमार्टेम करावं लागेल असं सांगितलं. आता काय करायचं? माधुरी आणि तिचे नातेवाईक काळजीत होते. माझ्याशी फोनवर संपर्कही चालू होता. अचानक मला आठवलं, महिनाभरापूर्वीच नरसिंगपूरचे डॉक्टर चांदोरकर व त्यांच्या पत्नी आमच्याकडे लेपाला येऊन गेले होते. त्यांचा परिचय झाला होता. त्यांना मी फोन केला. ही अडचण सांगितली. तर म्हणाले आता तुम्ही कुठलीच काळजी करू नका. या पुढची सर्व जबाबदारी माझी. माझा फोन नंबर दिलीप गोखले यांच्या नातेवाईकांना द्या. विशेष म्हणजे पोस्टमार्टेम करून घेण्यापासून तर पार्थिवाला बर्फाच्या पेटीत ठेवून स्वतःच्याच दवाखान्यात ठेवणे ही सोय त्यांनी केली. दुसऱ्या दिवशी दिलीप गोखले यांचे नातेवाईक तिथे पोहोचले तर बर्मानघाट येथे अंत्यसंस्काराची सर्व सोय आधीच तयार होती. मानवता म्हणून ही सोय करणं, त्यांच्या नातेवाईकांच्या राहण्याची भोजनाची सोय करणं हे मी समजू शकते. पण प्रसंग ओळखून त्यांच्या परतीच्या प्रवासा साठी रेल्वेचे आरक्षण करणे - जे मला कदाचित सुचलं देखील नसतं, ती व्यवस्थाही डॉक्टर चांदोरकर यांनी करून ठेवली होती.
नर्मदा परिक्रमा करत असताना एक महंत मला म्हणाले होते, “ नर्मदा परिक्रमा केलीत म्हणजे तुमचा सीमित परिवार असीम परिवार होतो.” याचा अनुभव या अशा प्रसंगातून येतो.
नर्मदा परिक्रमा करत असताना परिक्रमावासी जर मृत्यू पावला तर त्याला स्वर्ग प्राप्ती होते अथवा मोक्ष मिळतो असे म्हणतात. स्वर्ग आणि मोक्ष ही काय भानगड आहे हे आपण स्वतः मेल्याशिवाय कसं कळणार ? अशा वेळी मात्र मला विनोबाजींनी केलेली मोक्षाची व्याख्या आठवते. विनोबा म्हणतात, मोक्ष म्हणजे काय? मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. ही व्याख्या मला मनापासून पटते. कारण भौतिक आयुष्यात कुठलाच मोह उरलेला नसतो म्हणून हे लोक परिक्रमेला येतात.
मला मात्र मोक्ष म्हटला की स्वामी विवेकानंद यांची आठवण येते. ते म्हणत मी साधना भलेही करत असेन. पण ती मोक्षासाठी नाही. जोपर्यंत या देशातला एखादा बेवारशी कुत्रा देखील उपाशी आहे तोपर्यंत मी मोक्षप्राप्तीची कामना करणार नाही. स्वामी विवेकानंद माझे आदर्श ! त्यांच्या या संकल्पात मला थोडी भर घालावीशी वाटते. माझ्या स्वतःच्या बाबतीत. जोपर्यंत या देशातला गरीबातला गरीब मुलगा अथवा मुलगी शिक्षित होत नाही तोपर्यंत मलाही मोक्ष नको. अगदी मी नर्मदा किनार्यावर रहात असले तरी.
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Website -
http://narmadalaya.org/
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
This comment has been removed by the author.
ReplyDelete