माँ
माँ
आधारदादा. वयाची ६५ वर्षे उलटलेला माझा आते भाऊ. त्याच्या 'आधार' या नावाची मला नेहमी गंमत वाटते. इतकी समर्पक नावं खरं तर फार थोड्या लोकांची असतात. आपलं 'आधार' हे नाव त्यानं सर्वार्थाने सार्थ केलं. त्याचं उभं आयुष्य आर्थिक चणचणीत गेलं. पण मनाची श्रीमंती फार मोठी. दादा-वहिनी दोघांनीही संसार काटकसरीने केला. पण कुणालाही मदत करताना त्यांनी हात कधी आखडता घेतला नाही.
1995 सालच्या दिवाळीच्या सुटीत मी त्या दोघांना आग्रह केला, "आता तुमच्या मागे काही व्याप नाहीत. माझ्या बरोबर “सौराष्ट्र-गुजरातच्या ट्रीपला चला !" मोठ्या मिनतवारीने दोघेही तयार झाले. नाशिकच्या एका प्रसिद्ध यात्रा कंपनी बरोबर प्रवास करायचं ठरलं. माझी मोठी बहिणही सहकुटुंब आमच्या बरोबर होती.
नरक चतुर्दशीला आमचा मुक्काम गिरनार येथे होता. यात्रा कंपनीने या दिवशीच्या स्थळ दर्शनासाठी दोन पर्याय आम्हाला दिले. एक म्हणजे गिरनार पर्वताच्या हजारो पायऱ्या चढून गुरू दत्तांचे जे स्थान आहे त्याचे दर्शन घेणे. दुसरा पर्याय गीर अभयारण्य व जुनागढ शहर पहाणे, बहिणीच्या मुली लहान असल्याने तिने पर्वतावर न जाता गीर अभयारण्यात जाणे पसंत केले. मलाही गीर अभयारण्यातले सिंह बघायची इच्छा होतीच. दादा वहिनीला मात्र गिरनार पर्वतावर दत्त दर्शनाला जायचं होतं. वय जास्त असलं तरी दोघं आमच्या पेक्षा काटक. एव्हाना त्यांच्या वयोगटातील सहप्रवाशांशी त्यांची मैत्रीही झाली होती. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं, "तुम्ही आमची काळजी करू नका. इतर सहप्रवासी आणि टूर मॅनेजर आहेच आमच्या सोबतीला." मॅनेजरही म्हणाला, "काळजी करू नका. दुपारी 2 वाजेपर्यंत आम्ही गिरनार पर्वत उतरून धर्मशाळेत परत येऊ सुद्धा.'
भल्या पहाटेच आम्ही निघालो. गीर अभयारण्यात सिंह दर्शन फारच छान झालं. एका भल्या मोठ्या झाडाखाली सिंह परिवार नीलगाईची शिकार करून त्याचा नाश्ता करताना कौतुक भरल्या नजरेने आम्ही पाहिला. (गाडीत बसून तेही मजबूत जाळीच्या!). गीर अभयारण्यानंतर जुनागढ शहरातली अनेक ठिकाणं पाहिली. धर्मशाळेत परतलो तेव्हा अंधार पडला होता. धर्मशाळेच्या अंगणातच गिरनार पर्वतावरून परतलेले सर्व प्रवासी जेवायला बसले होते. माझी नजर दादा-वहिनीला शोधत होती. दोघंही कठं दिसेनात. आमच्या खोलीत जाऊन पाहिलं तर तिथेही नाहीत. एवढ्यात टूर मॅनेजर घाईघाईने येऊन म्हणाला, "तुमचे दादा वहिनी अजून परतले नाहीत हो गिरनार पर्वतावरून!"
"काय? तुम्ही त्यांची जबाबदारी घेईन म्हणाला होतात. मग त्यांना बरोबर न आणता खाली आलातच कसे?" माझी बहीण कडाडली. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली जणू! जबाबदारी फक्त त्याची की आमची पण ? मी स्वत:लाच दोष देऊ लागले. तिथं थांबण्यात अर्थ नव्हता. मॅनेजरला विचारलं, "येतोस का त्यांना शोधायला" तर कुरकूर करायला लागला. माझे मेहुणे त्यांच्या छोट्या मुलींना घेऊन बाजारात बोर्नविटा आणण्यासाठी गेले होते. दोघी मुलींना पायी घेऊन गेले होते. म्हणजे परतायला किती वेळ लागेल सांगता येत नव्हतं. वेळ वाया घालवण्यात अर्थ नव्हता. मी अक्षरश: पळतच बाहेर पडले. नरक चतुर्दशीची रात्र अन् मिट्ट काळोख . गिरनार पर्वतावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आधल्या दिवशी रात्री आम्ही धर्मशाळेत पोहोचलो तेव्हा या पायऱ्यांवर विजेचे दिवे ठिकाणी दिसत होते. त्या पायऱ्यांजवळ मी पोचले तेव्हा लक्षात आलं की दुरुस्तीसाठी म्हणून वीज विभागाच्या लोकांनी त्या पूर्ण रस्त्यावरचे लाईट बंद करून दुरुस्तीचे काम सुरू केले होते. लाईट यायला किती वेळ लागेल विचारलं तर म्हणाले सांगता येत नाही . दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तो असा. माझ्याजवळ तर टॉर्च पण नाही आणि विकत घ्यायचा म्हटलं तर पर्स पण बरोबर घेतली नव्हती. वाटलं, दादा-वहिनी आले असतील आता जवळ. मी अंधारातच पायऱ्या चढायला सुरुवात केली. “दत्त प्रभू, माझ्या दादा वहिनीला सुरक्षित ठेव.” नकळत मनातल्या मनात प्रार्थना सुरू झाली. धावत -धापा टाकत, मध्येच ठेचाळत पायऱ्या चढत होते. मधूनच “दादा- वहिनी कुठे आहात ?” अशी त्यांना साद घालत मी चालले होते. पण प्रतिसाद येत नव्हता . सुरवातीला गावातले लाईट दिसत होते दूरवर. आता तर तेही नाही. नेमकं आपण कुठवर आलोय हे देखील समजेना . उजव्या बाजूला दूरवर शेकोटी असावी असे काहीतरी जळताना दिसलं. नक्कीच कुणी तरी रहात असावं तिथे. दादा वहिनी तिथे थांबले असतील का ? त्या दिशेने पाय नकळत चालू लागले. धाप लागल्याने क्षीण झालेली माझी हाक दादा-वहिनी पर्यंत पोहोचत नसावी. तिथे जाऊन पाहते तर माझं उरलंसुरलं अवसानही गळून पडलं. ती शेकोटी नव्हती तर ते छोटंसं यज्ञकुंड होतं. संपूर्ण दिगंबरावस्थेतला एक जटाधारी साधू- वय ३०-३५ असावं, उभं राहून त्यात आहुती देत होता. मंत्र पुटपुटत होता . तांत्रिक असावा. बस्स! संपलं सारं. आपलं काही खरं नाही आता. वाईटातले वाईट विचार मनात आले. ओरडले तरी माझा आवाज कुणा पर्यंत पोचला नसता. पण वस्तुस्थिती अशी होती की ओरडण्याचे त्राणही माझ्यात उरले नव्हते. आयुष्यात प्रथमच स्त्री जन्म का दिलास म्हणून मनातच देवावर चिडले. माझ्या चाहुलीने साधू भानावर आला. शांतपणे त्यांनी माझ्याकडे पाहिलं. जागचा न हालता म्हणाला,
"माँ, क्या चाहिये? क्या हुआ? आहुतीसाठी घेतलेल्या समिधा त्याच्या ओंजळीत तशाच.
"मेरे भैय्या-भाभी..." मी रडत - अडखळत सर्व कहाणी सांगितली. नजर अग्निकुंडाकडे.
'माँ, चिंता मत करो. कुछ नही होगा आपके भैय्या-भाभीको ! आते ही होंगे। इंतजार किजिए !" शांतपणे त्यांनी परत मंत्र म्हणायला सुरुवात केली.
माझा कानांवर विश्वास बसेना. "माँ" या त्याच्या एका शब्दानेच मी थरारून गेले. स्वत:चीच लाज वाटली. का वाईट विचार आले माझ्या मनात ! एवढा वेळ त्याच्याकडे मान वर करून बोलायचं धाडस झालं नव्हतं. पण आता मात्र ते बळ आलं. नव्हे. - त्याच्या 'माँ' या संबोधनाने ते बळ मला दिलं. नजर वर केली. तो डोळे मिटून मंत्र पुटपुटत होता. माझी पावलं यज्ञ कुंडाजवळ वळाली. खाली वाकून मी "प्रणाम स्वामीजी" एवढंच म्हणाले. त्यांचं माझ्याकडे लक्षही नव्हतं. मी परत फिरले. दादा-वहिनीच्या शोधात. पंधरा वीस मिनिटातच दादा-वहिनी भेटले. ते दोघंच नव्हते तर एक सहप्रवासी महिलाही त्यांच्याबरोबर होती. प्रवासात तिच्याबरोबर तिच्या घरचे अथवा पूर्व परिचित कुणीही नव्हतं. गिरनार पर्वताच्या पायऱ्या उतरत असताना तिचा पाय मुरगळला. सूजही बरीच होती पायावर. बाकीची मंडळी आणि टूर मॅनेजर पुढे निघून गेले होते. त्या महिलेला 'आधार' देत दादा-वहिनी सावकाशीने येत होते. मला पाहून दोघंही आश्चर्य चकीत झाले. म्हणाले, "एवढ्या अंधारात का आलीस? आम्ही तिघं होतो. आलो असतो की सावकाश!' ते सुखरूप भेटल्याने माझ्या जीवात जीव आला होता. परतीच्या वाटेत ती धुनी दिसली नाही. बोलण्याच्या नादात कदाचित आमचं लक्ष तिकडे गेले नाही. पण त्या साधूचे 'माँ' हे संबोधन मात्र मनात गुंजत होतं. काही वेळापूर्वी स्त्रीजन्म का दिलास म्हणून देवावर चिडले होते. आता मात्र त्याच कारणासाठी देवाचे धन्यवाद मानत होते. फक्त स्त्री होते म्हणूनच "माँ" या पवित्र संबोधनाला मी पात्र होते. अशावेळी तुमचं वय, विवाहित आहात अथवा नाहीत, जात-पात, शैक्षणिक सामाजिक दर्जा या साऱ्याच गोष्टी गौण असतात. तो बहुमान असतो. फक्त तुमच्या स्त्रीत्वाचा. ज्याने हे संबोधन एका अपरिचित तरुण स्त्री साठी वापरलं त्याचं मन केवढं विशाल असेल ! माझ्या भटकंतीच्या पाठशाळेतला हा खरंच फार मोठा धडा होता.
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Website -
Facebook -
Comments
Post a Comment