पांडुरंगी मन रंगले
पांडुरंगी मन रंगले
2007 साल. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या आमच्या दिंडीचा मुक्काम लोणंद या गावी होता. लोणंद तसं बऱ्यापैकी मोठं गाव. आम्ही मुक्कामाला थांबलो होतो ती जागा म्हणजे मार्केट यार्डातलं एक धान्य गोडावून होतं . धान्यांनी भरलेली पोती भिंती लगत एकावर एक रचून आमच्यासाठी जागा रिकामी केली होती. भर बाजारातलं ते ठिकाण. क्षणभर वाटलं एवढ्या कलकलाटात आणि धुळीने भरलेल्या गोडावूनमध्ये कसं राहायचं? पण तो विचार क्षणभरच. बरोबरच्या वारकऱ्यांशी बोलताना, त्यांचे अनुभव ऐकताना या क्षुल्लक गैरसोयींचा अजिबात 'बाऊ' वाटला नाही. उलट वारकऱ्यांच्या वास्तव्याने तीच जागा पंढरपूर वाटू लागली.
डॉ.रामचंद्र देखणे यांच्या दिंडीत रोज संध्याकाळी भजन कीर्तन तर असेच पण प्रसिद्ध वक्त्यांची संतावर अथवा संत साहित्यावर व्याख्याने पण होत. लोणंद येथे पुण्याचे श्री. मुखत्यारजी पठाण भजन सेवा देण्यासाठी येणार होते. "पठाण' या आडनावामुळे थोडं कुतुहल वाटलं. पण वाटलं त्यात काय मोठंसं ? महम्मद रफी नव्हते का भजनं गात?
प्रत्यक्षात जेव्हा श्री. मुखत्यारजी पठाण यांना पाहिलं तेव्हा मात्र आश्चर्याचा धक्काच बसला. वारकरी लावतात तसा बुक्का कपाळावर आणि गळ्यात तुळशी माळ ! भजनाचा कार्यक्रम अप्रतिमच झाला. एवढ्या गर्दीत त्यांच्याशी मोकाळेपणानं बोलता येणं शक्य नव्हतं. तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला मला आवडेल असं म्हणताच त्यांनी पुण्याचा त्यांचा पत्ता दिला आणि आग्रहाचे आमंत्रणही !
दोन महिन्यातच त्यांना पुण्यात त्यांच्या घरी भेटण्याचा योग आला. त्यांच्या घरात शिरल्याबरोबर वाटलं की हे फक्त मुखत्यारजींचे घर नव्हे इथे तर सर्व संतांचा निवास आहे. घराच्या भिंती वेगवेगळ्या सन्मान चिन्हांनी तसेच ज्ञानेश्वर, तुकाराम यासारख्या अनेक संतांच्या आणि विठू माऊलीच्या तसबिरींनी सजलेल्या होत्या.
गप्पांच्या ओघात त्यांचा जीवनपट उलगडत गेला. पुण्याला शेती खात्यात शिपायाची नोकरी करत होते. मुळातच सेवाभावी वृत्ती. त्यामुळे या पदावर काम करताना सहकाऱ्यांची तसंच वरिष्ठांची मर्जी संपादन करणं सोपं गेलं. फायदा काय तर भजन-कीर्तनासाठी आणि वारीसाठी रजा मिळणं सोपं झालं. त्यांना मात्र चांगले सहकारी व वरिष्ठ मिळणं ही संत कृपा वाटते.
नोकरी बरोबरच ते सकाळी सायकली वरून ब्रेड-बटर विकण्याचा धंदा 40-45 वर्षांपूर्वी करत. एका गिन्हाईकाची उधारी त्याला चुकवता आली नाही म्हणून त्याने घरातली जुनी हार्मोनियम मुखत्यारजींना देऊन टाकली. आयुष्यात प्रथमच त्यांनी हार्मोनियम पाहिली. पण हार्मोनियमच्या स्पर्शानं जणू त्या हार्मोनियमचेच भाग्य उजळलं. हार्मोनियम वादनाबरोबर भजनं म्हणायचाही छंद जडला. अनेक भजन-कीर्तनकारांकडे भजने शिकत गेले. अनेक प्रसिद्ध कीर्तनकारांना हार्मोनियमवर साथ करीत. पण एका कीर्तनकाराने मात्र रागावून सांगितले, 'तू मुसलमान आहेस यावर माझा आक्षेप नाही. पण ज्या तोंडाने मांसाहार करतोस त्या तोंडाने भजनं म्हणायची हे मला पटत नाही. मांसाहार सोडून गळ्यात तुळशीमाळ घालणार असशील तरच तुला आमच्या भजन-कीर्तनात प्रवेश.' निर्णायक क्षण होता. मनानं कौल दिला, 'भजनासाठी मी माळ घालेन.' त्या रात्री स्वत: कीर्तनकार बुवांनी त्यांच्या गळ्यात तुळशीमाळ घातली. गेल्या चाळीस वर्षांपासून ते फक्त 'माळकरी'च नाहीत तर वारकरी देखील झाले.. (इ.स. २००० पर्यंत त्यांची पायी वारी कधी चुकली नाही, पण एका मोठ्या अपघातानंतर पायी चालणे त्यांना शक्य होत नव्हतं म्हणून गाडीने वारी करत.)
मात्र या साऱ्या संघर्षात घरच्या मंडळींनी टोकाची भूमिका घेतली. 'भजन सोड नाही तर घर सोड.' इथेही भजनच जिंकले. पत्नी व मुलासह त्यांनी नेसत्या वस्त्रानिशी घर सोडलं. आप्तजनांपासून दूर व्हायचे दु:ख खरेच मोठे. पण त्यांच्या मनाचा मोठेपणा त्याहून मोठा. या घटनेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, 'दहा-पंधरा जणांना दुरावलो असलो तरी आज माझा परिवार पंधरा -वीस हजार लोकांचा आहे त्याचे काय?'
मुखत्यारजी पठाण यांना त्यांच्या पत्नीची मोलाची साथ आहे. भजनाच्या कार्यक्रमात त्या देखील बरोबरीने गात. त्यांचा मुलगा हा उत्कृष्ट पखवाज वादक. त्यांच्या भजन मंडळाचा अविभाज्य भाग. पण दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी त्याला पक्षाघाताचा आजार झाला. पण या कठीण प्रसंगात विठू माऊली आम्हाला मनोधैर्य देते ही त्यांची श्रद्धा. एवढ्या अडचणीतही कुणी भजनाच्या कार्यक्रमासाठी बोलावलं तर त्यांची जायची तयारी असते. कारण त्यांच्यासाठी तो भजनाचा कार्यक्रम' नसतो तर विठू माऊली आणि सर्व संतांची ती फक्त सेवा असते.
त्यांचा निरोप घेताना संत शेख महम्मद यांचा अभंग आठवला -
"ऐसे केले या गोपाळे, नाही सोवळे ओवळे, शेख महम्मद अविंध, त्याचे हृदयी गोविंद ।।
(या लेखाला ब्लॉग वर टाकण्यापूर्वी एकदा मुखत्यारजींशी बोलावे अशी इच्छा झाली. संपर्क करायचा प्रयत्न केला पण झाला नाही. म्हणून डॉ. रामचंद्र देखणे यांच्याशी फोनवर बोलले तर एक दुखःद बातमी समजली. पाच सहा वर्षांपूर्वीच श्री मुखत्यारजी पठाण वैकुंठवासी झाले. मात्र त्यांनी शिकवून तयार केलेली काही मुलांनी त्यांच्या या भजन सेवेचे कार्य पुढे चालू ठेवले आहे.)
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Website -
Facebook -
खूपच छान लिहिता तुम्ही ताई. एक प्रश्न आहे
ReplyDeleteभक्त पांडुरंगा मध्ये विलीन झाले तर दुःख कसे?
साधक आणि साध्य एक झाले. मोक्ष या पेक्षा काही वेगळा असतो का?
ही तर ना आनंदाची घटना की जी साजरी करावी
किव्हा
ना दुःखद घटना की जिच्यासाठी हंबरडा फोडावा