अनित्य.. अनित्य... अनित्य
अनित्य.. अनित्य... अनित्य
‘भटकंतीची पाठशाळा' या सदराच्या निमित्ताने एक वेगळाच छंद लागलाय. तो म्हणजे जुन्या डायऱ्या वाचायचा. आज १९८६ सालची डायरी हातात आहे. खरं म्हणजे प्रत्येक वर्ष आपल्याला काहीतरी नवीन देत असतं. पण तरीसुद्धा १९८६ हे माझ्या बाबतीत खास वर्ष होतं. आयुष्याला वेगळं वळण देणारं. चाकोरीबद्ध आयुष्यातून स्वत:ला बाहेर काढण्याचं धाडस देणारं, अनपेक्षित असे चांगले-वाईट धक्के देणारं हे वर्ष! विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी येथे पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून जायची इच्छा होती. त्यासाठी पाच वर्षांची रजा ऑफिसने (तेही केंद्र सरकारी कार्यालय) दिली ती याच वर्षी. आणि दार्जिलिंग येथे गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणासाठी ऑफिसने पाठवलं तेही याच वर्षी !
दार्जिलिंगच्या Himalayan Mountaineering Institute ने गिर्यारोहणाचे जे प्रशिक्षण आम्हाला दिलं ते सिक्कीममधल्या हिमालयाच्या बर्फाच्छादित प्रदेशात. हिमालयातील अति दुर्गम भागात जायची ही काही माझी पहिली वेळ नव्हती पण ज्या प्रकारचे प्रशिक्षण आम्हाला दिलं गेलं ते खरंच आमच्या शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी बघणारं होतं. जवळ जवळ महिनाभराचा कालावधी. रॅपलिंग, rock climbing, ice craft, river crossing हे सगळे प्रकार व शिखर सर करणं कष्टदायी असलं तरी तितकंच आनंददायी होतं. पण दार्जिलिंगला जाण्यासाठी परतीचा प्रवास सुरू झाला आणि पाठीवरचं ओझं सांभाळत डोंगर उतरणं कंटाळवाणं वाटायला लागलं. आमच्या प्रशिक्षकाला मी गंमतीने विचारलं, माझी सॅक जर चुकून इथं राहिली अथवा धक्का लागून खाली पडली तर मला किती दंड भरावा लागेल? तेही हसत म्हणाले, 'फार नाही-आठ ते दहा हजार रुपये !” मी त्यांना चिडवत म्हणाले, “मग ही सॅक मी इथेच सोडून जाते. कारण मला आता ह्या ओझ्याचा कंटाळा आलाय."
आमच्या ह्या संभाषणाला दहा-पंधरा मिनिटे होत नाहीत तोच एका ग्लेशियरवरून चालत असताना माझा पाय सटकला. छान पैकी पडले. उठून उभे राहण्याचा प्रयत्न करायला गेले तर तर हातातून प्रचंड कळ आली. हात टेकवता येईना. मी हाक मारून आमच्या प्रशिक्षकाला सांगितलं. पण त्यांना वाटले मला सॅक घ्यायची नाही म्हणून मी नाटक करतेय. ते हसत पुढे निघून गेले. म्हणाले- हरकत नाही सॅक ठेव आणि दंड भर. बरोबरच्या प्रत्येक मैत्रिणीच्या पाठीवर सॅक होती. माझं सामान कुणाकडे देणार?
मी गंमतीने जरी म्हणाले होते की सॅक इथेच ठेवीन तरी खरंच थोडी ना ठेवणार होते ! मैत्रिणीही काळजीत पडल्या. एवढ्यात आमच्या टीम बरोबर आलेले इन्स्टिट्यूटचे डॉ. चिमा तेथे पोचले. त्यांनी माझा हात हलवून पाहिला तर प्रत्येक वेळी जीवघेण्या कळा निघत होत्या. अगदी नखाच्या टोकापर्यंत. तेही हादरले. म्हणाले, बाप रे ! हे तर फॅक्चर आहे.
थंडी एवढी प्रचंड होती की अंगातले दोन-तीन स्वेटर्स काढून नेमकं कुठे फॅक्चर झालंय बघता येत नव्हतं. हात सुजून चांगलाच टम्म झाला होता. मुश्किलीने तो काटकोनात वळवून त्याला बँडेजच्या पट्टीने घट्ट बांधले आणि पट्टीची दोन टोकं माझ्या गळ्यात अडकवली. वेदनाशामक गोळ्यांचा मारा करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण दार्जिलिंगला पोहोचायला अजून चार-पाच दिवस होते. त्या कठीण दिवसात सर्वच मैत्रिणींनी खूप मदत केली.
'मोडका हात गळ्यात घेऊन, वेदनाशामक गोळ्यांचा खाऊ खात पण डोळ्यात पाणी न आणता (कारण आपण फार शूर आहोत, सहनशील आहोत हे लोकांना दाखवायची भारी हौस ना!) दार्जिलिंगला एकदाचे आम्ही पोहोचलो. डॉ.चिमा मला घेऊन थेट Planters Hospital मध्ये गेले. त्या काळातलं दार्जिलिंगमधलं ते सगळ्यात सुसज्ज हॉस्पिटल ! x-ray काढला आणि रिपोर्ट घेऊन आम्ही डॉ. चक्रवतींना दाखवायला गेलो.
"कधी झालं फ्रैक्चर"- डॉ.चक्रवर्ती. "पाच दिवसांपूर्वी"- मी. "
डॉ. चक्रवर्ती किंचाळलेच, "कशा सहन केल्यास एवढ्या वेदना?" त्यांच्या चेहऱ्यावर सहानुभूती स्पष्ट दिसत होती.
एक छोटंसं ऑपरेशन करावं लागेल आणि हॉस्पिटलमध्ये दोन-तीन दिवस मुक्कामही ! 'हो' म्हणण्या शिवाय माझ्यापुढे पर्याय नव्हता. ऑपरेशन नंतर मला ज्या खोलीत ठेवलं होतं तिच्या खिडकीतून कांचनगंगा शिखर (धुकं नसेल तर) अगदी स्पष्ट दिसायचं.
तिसऱ्या दिवशी discharge मिळाला हॉस्पिटलमधून. इन्स्टिट्यूटच्या होस्टेलवर पोहोचल्यावर समजलं की दुसऱ्याच दिवशी आमच्या प्रशिक्षणाचा समारोप समारंभ आहे. तोही एव्हरेस्टवीर तेनसिंग नोर्गे यांच्या उपस्थितीत. त्यांच्याच हस्ते आम्हाला सर्टिफिकेट्स दिली जाणार होती. माझी अवस्था तर आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, अशी झाली होती. आमच्या ग्रुप मधल्या काही मुलींची तेन सिंग यांच्याशी पूर्व परिचय होता. "चल आपण त्यांना भेटून येऊ. दुकानातून काही वस्तू पण आणायच्या आहेत." खरंतर हात दुखत होता. पण तेन सिंग यांचे घर पहायला मिळणार, त्यांच्याशी भेटता येईल हा आनंद दुखऱ्या हातापेक्षा मोठा होता.
श्री तेनसिंग यांच्या घरात शिरताना एक प्रकारची आदरयुक्त भीती मनात होती. पण त्यांच्या बोलण्यात कुठंही मोठेपणा डोकावत नव्हता. त्यांच्या बोलण्यात सहजता होती. आता या मोडक्या हाताने तू एकटी इतक्या लांबचा प्रवास कसा करणार ही काळजी त्यांच्या बोलण्यात होती. पंधरा मिनिटांचीच आमची भेट पण त्या तुलनेत खडतर असं गिर्याराहण प्रशिक्षण, अपघात, भयानक वेदना हे सर्व काही क्षुल्लक वाटायला लागलं. आपल्याला उद्या त्यांच्या हातून सर्टिफिकेट मिळणार या आनंदात रात्री अगदी गाढ झोप लागली.
पहाटे पाच वाजताच (दार्जिलिंगला पहाटे पाच वाजता उन्हाळ्याच्या दिवसात अगदी लख्ख उजाडलेलं असतं) आम्हा सर्व प्रशिक्षणार्थीना आमचे मुख्य प्रशिक्षक निमा ताशी यांनी इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात बोलावलं. सकाळी नऊ वाजताच समारोप समारंभ होता. त्यासंदर्भात काही सूचना असतील म्हणून आम्ही उत्साहाने तिथे पोहोचलो. एरवी सतत हसरा चेहरा असणाऱ्या निमा ताशी सरांचा चेहरा गंभीर होता. डोळे रडून सुजलेले. मोठ्या मुष्किलीने त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, " आपणा सर्वांसाठी एक अत्यंत वाईट बातमी आहे. आपल्या सर्वांचे लाडके श्री तेन सिंग नोर्गे यांचे काल रात्री हृदय बंद पडून निधन झाले. आजचा समारोप समारंभ रद्द करण्यात आला आहे. तुमचे सर्टिफिकेट्स तुम्हाला पोस्टाने पाठवण्यात येतील."
काय म्हणायचं या घटनेला ? नियती ?
आज हे लिहीत असताना इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात मा. सत्यनारायण गोएंकाजींच्या घनगंभीर आवाजात ऐकलेले शब्द कानात गुंजताहेत,
अनित्य.. अनित्य... अनित्य
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Website -
Facebook -
भावनांचा कल्लोळ उसळला असेल! खरंच अकल्पित असतात काही घटना.
ReplyDelete