शब्देविण संवादु

शब्देविण संवादु


चौदाव्या दलाई लामांचे (म्हणजे सध्याच्या)  'My Land - My People' आणि  Freedom in Exile’ ही दोन आत्मचरित्रं  वाचून मी खूपच प्रभावीत झाले होते. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाच्या जन्मपत्रिकेत दलाई लामा (तिबेटी लोकांचा सर्वोच राजकीय नेता आणि धर्म प्रमुख) बनण्याचा योग असणं, वयाच्या अवघ्या दुसऱ्या  वर्षी  त्यांची निवड, पाचव्या  वर्षी राज्याभिषेक, दलाई लामा बनण्याच्या दृष्टीने त्यांना अगदी बालपणापासूनच देण्यात येणारं धार्मिक, आध्यात्मिक आणि राजकीय प्रशिक्षण, वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी सर्व सूत्रे स्वीकारणं .. त्यातूनच त्यांचं उमलत जाणारं, प्रगल्भ होत जाणारं व्यक्तिमत्त्व, तिबेटी लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल असणारी अत्यंत आदराची भावना, चीनच्या डावपेचांमुळे आणि कुटिल कारस्थानांमुळे त्यांना वेषांतर करून भारतात पलायन करावं लागलं तेही अत्यंत कोवळ्या वयात... तेव्हा भारतात त्यांना मिळालेला राजकीय आश्रय आणि त्यानंतर ते तिबेटच्या स्वातंत्र्या साठी शांततामय मार्गाने देत असलेल्य  लढा...! सर्वच विलक्षण.  (2011 साली मात्र त्यांनी आपल्याकडे असलेले सर्व अधिकार तिबेट सरकारला परत केले).

मी ही दोन्ही पुस्तकं  वाचली  त्याच सुमारास त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिकही मिळालेलं होतं. त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची, भेटण्याची संधी मिळेल का? योगायोगाने त्यांच्या प्रत्यक्ष भेटीची संधी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी येथे 'भारत परिक्रमा सांगता सोहळ्यात मिळाली.  खरं तर कार्यक्रम पत्रिकेत कुठेही त्यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. पण त्याच सुमारास ते त्रिवेंद्रम येथे काही व्याख्याने देण्यासाठी आले होते. वर्तमानपत्रात त्यांनी या सांगता सोहळ्याबद्दल वाचलं आणि व्याख्यानमालेच्या आयोजकांना सांगितलं की, 'भारतभरातून हजारो युवक कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्रात जमले आहेत. त्यांना भेटायची मला इच्छा आहे', असा अनपेक्षित योग जुळून आला. त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर  तर  मी फारच भारावले. दलाई लामांचा शांत, हसरा चेहरा पाहून नकळत मला गौतम बुद्धांच्या चेहऱ्याची आठवण झाली. दोघांच्या चेहऱ्यात खरंतर काहीच साम्य नाही पण शांत  भाव मात्र अगदी सारखेच. दलाई लामांना - भेटल्यावर त्यांच्या संदर्भात अजून जाणून - घेण्याची इच्छा झाली म्हणून त्यांच्या बद्दलच्या अनेक पुस्तकांचे वाचन केले. 

ही पुस्तके वाचत असताना वाटायचं, आयुष्यात एकदा तरी तिबेटला जायला हवं. त्यांचा देश डोळे भरून बघायला हवा. गेली ५० वर्षे स्वत: दलाई लामा आणि हजारो तिबेटी लोक भारतामध्ये आश्रित म्हणून राहत आहेत. अत्यंत प्राणप्रिय अशा आपल्या देशाचे दर्शन त्यांना गेल्या अनेक वर्षात नाही. स्वतःचा हक्काचा देश असूनही दुसऱ्यांच्या देशात आश्रित म्हणून राहायची वेळ यावी याहून मोठं दु:ख कोणतं? पण तिबेटच्या स्वातंत्र्या साठी शांततामय मार्गाने ते देत असलेला लढा, तेही चीन सारख्या महाशक्तीशी,  तिबेटी निर्वासित - जे केवळ दलाई लामांसाठी आपला स्वत:चा देश सोडून आले त्यांच्या पुनर्वसनासाठी ते करत असलेलं कार्य खरोखर उल्लेखनीय. 

तिबेटमध्ये जाण्याचा मला योग आला तो कैलास मानसरोवर यात्रेच्या निमित्ताने. हा भू-भाग जरी तिबेटमध्ये असला तरी तिथे सत्ता आणि सैन्य मात्र चीनचे. दलाई लामांच्या बाबतीत चीनची भूमिका एवढी ताठर की तिबेटमध्ये उघडपणे त्यांच्या बाबतीत कुणी बोलूही  शकत नाही. त्यांचा फोटो घरात अथवा बौद्ध विहारात कुणी लावू शकत नाही. तिबेटी जनता मात्र त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु म्हणून (की बुद्धाचे अवतार म्हणून!) मनोमन त्यांनाच भजतेय. कधी तरी तिबेटला स्वातंत्र्य मिळेल आणि आपल्याला दलाई लामांचे दर्शन होईल या आशेने तिबेटी जनता डोळ्यात प्राण आणून त्यांची वाट बघतेय.  

कैलास-मानसरोवर यात्रेत खोजारनाथ येथील राममंदिर बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. तिबेटमधील हे एकमेव राम मंदिर. सरदार जोरावरसिंग याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला, असं म्हणतात. तिबेटी भाषेतील रामायणाचा अखंड पाठ या मंदिरात केला जातो, असं सांगण्यात आलं. राम, लक्ष्मण आणि सीतेच्या अत्यंत देखण्या आणि सोन्याचा मुलामा लावलेल्या मूर्ती या मंदिरात आहेत. विशेष म्हणजे या मूर्तीची पूजा-अर्चना बौद्ध लामाच करतात. (काही लोक या मूर्तीना बोधिसत्त्वाच्या मूर्तीही मानतात). इतक्या सुंदर मूर्ती पण या मंदिरात छायाचित्रण करायला मनाई होती. मन खट्टू झालं. तेवढ्यात कुणीतरी सांगितलं, 'पुजारी लामांकडे या मुर्तीचे  फोटो विकायला ठेवले आहेत.' उत्साहाने मी त्या पुजारी लामांकडे गेले. सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याचे, अत्यंत वृद्ध असे ते लामा होते. तिबेटी भाषे शिवाय त्यांना दुसरी भाषा येत नव्हती. खुणेनंच मी त्यांना मला मूर्तीचा फोटो हवाय म्हणून सांगितलं. त्यांनी फोटोंची चळतच माझ्यापुढे ठेवली. एकाच प्रकारचे सगळे फोटो होते तरी कुतूहलाने मी सारेच फोटो पहायला लागले. चुकून कुणाचा तरी धक्का लागला आणि ते फोटो माझ्या हातातून खाली टेबलवर पडले. विखरून पडलेल्या फोटोंमध्ये एक दलाई लामांचाही फोटो होता, बहुधा लपवून ठेवलेला. नेमका तोच फोटो मी उचललेला पाहून ते वृद्ध लामा घाबरले. घाईघाईने माझ्या हातातून तो फोटो ओढून घोऊ लागले. मला न समजणाऱ्या भाषेत  ते काहीतरी पुटपुटत होते. अस्वस्थ दिसत होते, मी खुणेनं त्यांना सांगितलं की, फोटोतल्या या व्यक्तीला मी पाहिलंय, त्यांच्याशी बोलले आहे, त्यांच्या  वंदन केले आहे. बहुधा मी खुणेनं सांगितलेलं सारं त्यांना समजलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद होता आणि डोळ्यात पाणी. त्यांच्या आराध्य दैवताला मी प्रत्यक्ष भेटले होते याचं त्यांना अप्रूप वाटत होतं. 
त्यांनी त्या मंदिरातल्या इतर लामांनाही बोलावलं. साऱ्यांनाच आनंद झाला. घाईघाईने ते वृद्ध लामा मंदिराच्या कोपऱ्यात असलेल्या खोलीत गेले आणि एक उपरण्यासारखा पांढराशुभ्र रेशमी रुमाल घेऊन आले. दलाई लामांचा तो फोटो त्यांनी त्या रुमालात गुंडाळला. थरथरत्या हातांनी वृद्ध लामांनी तो रुमाल माझ्या हातात ठेवला आणि  माझे दोन्ही हात त्यांच्या हातात घेतले. त्यांचे डोळे इतका वेळ पाणावलेले होतेच ते आता वाहू लागले. त्यांच्या अश्रुंचे  काही थेंब माझ्या हातावर पडले तेव्हा वाटलं, गुरुंच्या आठवणीने व्याकूळ होऊन आलेले हे अश्रू मानसरोवराच्या जला इतकेच नव्हे, त्याहून अधिक पवित्र आहेत. मीच धन्य झाले. त्या क्षणी त्यांच्या मनात काय चाललं होतं, हे त्यांनी शब्दात सांगायची गरजच नव्हती आणि माझ्या भावना शब्दात व्यक्त - करायची मलाही गरज भासली नाही. जाता जाता खुणेनं त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, 'हा फोटो मी तुला दिला आहे हे मात्र कुणाला सांगू नकोस.' मीही खुणेनंच त्यांना आश्वस्त केलं.

भारती ठाकूर,
नर्मदालय, लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिला - खरगोन
मध्य प्रदेश

Website -
http://narmadalaya.org/

Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo

Comments

  1. तुमचे सर्वच लेख खूप भावस्पर्शी आणि सुंदर आहेत. या लेखांचे पुस्तक व्हायला हवे, असे वाटून गेलं. लेखातील पात्रे, घटना लेख वाचताना डोळ्यांसमोर जिवंत उभ्या राहतात. आपले काम खूपच मोठे आणि आदरणीय आहे. आपल्याला सादर प्रणाम!

    ReplyDelete
    Replies
    1. सहमत! ह्या सगळ्या अनुभवांचे पुस्तक व्हायला हवे! नुसते भावस्पर्शी नाही तर आपल्या ज्ञानात भर पाडणारी माहिती आहे प्रत्येक लेखात..

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

आत्मभान