घे भरारी
घे भरारी
नाशिकच्या आमच्या घराच्या ओट्यावर असलेल्या छताला दोन अडीच इंची एक आकडी टांगलेली होती. संध्याकाळ झाली म्हणजे एक शिंपी पक्षिण त्या आकडी मध्ये येऊन बसायची. तिथे येण्यापूर्वी ती जास्वंदीच्या झाडावर बसून खूप चिवचिवाट करत असे. मग मी म्हणायचे, “होय समजलं मला. ये येऊन बस आपल्या जागेवर”. तिला ते कळत होतं की तो निव्वळ योगायोग होता माहित नाही. पण ती शहाण्यासारखी येऊन बसत असे. मग रात्रभर जागची हलत नसे. अंधार पडला की शरीर फुगवून गाढ झोपी जाई. सकाळी पुन्हा नवीन नाटक असायचं. सकाळी उजाडलं की मी दरवाजा उघडून मी बाहेर यायचे. ती अजून आकडीतच बसलेली असायची. “गुड मॉर्निंग, उठा आता” असं म्हटलं भुरकन उडून जायची .
या ओट्याच्या समोरच बागेत एक कर्दळीचे रोप होतं. छोटसंच होतं. जेमतेम आठ दहा पानं आली असतील त्याला. त्यातही सगळ्यात खालच्या पानावर या शिंपी पक्षिणीनी आपलं घरटं बांधायला सुरुवात केली. सुकलेल्या गवताने ते पान शिवून काढलं. मोठी निष्णात कलाकार. आणि मग झाडाच्या सुकलेल्या बारीक काड्या आणि गवत हे सगळे एकत्र आणून बाळाचा बिछाना ही तयार होऊ लागला. एका पक्ष्या ऐवजी शिंपी पक्ष्यांची आता जोडी दिसायला लागली. मनात म्हटलं, जावई आला आहे की सूनबाई हे कळायला काही मार्ग नाही कारण शिंपी पक्ष्यात नर मादी सारखेच दिसतात. पण चला, यांचा सुखाने संसार सुरू झालाय. ते घरटे बनवत असताना- बाळाचा बिछाना तयार करत असताना त्या जोडीचे निरीक्षण करणं हा मला छंद लागला. त्यांच्या लक्षात येणार नाही याची खबरदारी घेऊन मी खिडकीतून त्या दोघांची लगबग पाहत असायची. एकदा ती दोघेही नसताना सहजच घरट्यात डोकावले तर लक्षात आलं की तिथे तीन छोटी छोटी अंडी आहेत. घरात नातवंड येणार असल्याची खबर आजीला लागली कि तिला जसा आनंद होत असेल तसाच आनंद मलाही झाला. या पिल्लांची मी आतुरतेने वाट बघू लागले.
एक दिवस सकाळी ऑफिसला जाण्याच्या तयारीत होते. आणि अचानक फोन खणखणला. आता एवढ्या सकाळी कोणाचा फोन असणार म्हणून फोन उचलला तर पलीकडून औरंगाबादच्या माझ्या एका नातेवाईकांचा फोन होता.
“ फार वाईट बातमी आहे भारती. आज पहाटे श्रीकृष्णरावांचा ( म्हणजे माझ्या धाकट्या बहिणीच्या नवऱ्याचा) अपघात झाला आणि त्यात ते गेले. आभाळ कोसळणं म्हणजे काय ते प्रत्यक्ष अनुभवलं. काहीच सुचेना. गावात राहणाऱ्या भाचीकडे ही बातमी पोचली होती. त्यांचाही फोन आला, “मावशी आपण बरोबर जाऊ तू काळजी करू नकोस.”
नाशिक ते औरंगाबाद कारने प्रवासाला अवघे चार तास लागतात. पण ते चार तासही मला चोवीस तासापेक्षाही जास्त वाटू लागले. वीणा - माझी धाकटी बहीण. शेंडेफळ म्हणून जरा अधिकच लाड कौतुकात वाढलेली. आई वडिलांच्या माघारी आम्हाला तिची काळजी जास्त. आता ती कशी सावरेल ? दोन मुलांना कशी वाढवेल ? या विचारांनीच जीव कासावीस झाला. ती आणि तिचा नवरा दोघेही नोकरी करणारे, स्वतःचं घर, दोन सालस मुलं असा हा दृष्ट लागण्यासारखा संसार. खरंच कुणाची तरी दृष्ट लागली असावी. तिचा चेहरा डोळ्यासमोरून हलत नव्हता. तिला आणि तिच्या मुलांना कुठल्या शब्दात समजवणार आता ? झाली घटना वाईटच होती. पण त्यातही तिची स्वतःची नोकरी आहे, घर आहे आणि मुख्य म्हणजे मोठा मुलगा M.B.A. होऊन आता नोकरीलाही लागलाय ही थोडीशी जमेची बाजू होती. पण तरीही मन मानत नव्हतं. कारण शेवटी ती धाकटी बहिण होती.
आम्ही औरंगाबादला पोहोचलो. सर्व सोपस्कार पार पडले. तिच्या मुलांचे केविलवाणे चेहरे बघत नव्हते. वीणा कडे तर बघण्याचं धाडसच मला होत नव्हतं. तिच्या सासरची सर्व मंडळी आलेली होती. माहेरची आम्ही सर्व भावंडे, नातेवाईक आणि परिचित अशी सगळी मंडळी जमलेली होती. पण अशा या अनपेक्षित दुःखावर फुंकर कशी घालणार ? त्याचे उत्तर फक्त काळच देऊ शकतो. भेटायला अनेक मंडळी यायची. त्यांनी तोच तोच विषय काढू नये असा आमचा प्रयत्न असायचा कारण मग तिचं रडणं थांबायचं नाही. एकदा एक गृहस्थ तिला भेटायला आले. सुरुवातीचं सांत्वनाचे बोलणं झाल्यावर ते मला म्हणाले,” तुमच्या नाशिकला महापुराने काय थैमान घातलंय. पाऊस थांबायचं नावच घेत नाही. नाशिकच्या सरकार वाड्यापर्यंत पुराचे पाणी आले अशी टीव्हीवर बातमी होती. दुतोंड्या मारुती ही बुडाला आहे म्हणे गोदावरीच्या पात्रातला.” त्यांच्या तोंडून हे ऐकलं आणि मी पुन्हा अस्वस्थ झाले. माझ्या बागेतल्या त्या शिंपी पक्ष्याच्या घरट्याचं काय ? अंड्यातून पिल्लं बाहेर आली असतील का ? असतील तर त्यांना पाऊस लागेल का? काय होईल त्यांचं ? या शिंपी पक्षांच्या आणि पिल्लांच्या आठवणीने मनात काहूर माजलं.
चार-पाच दिवस औरंगाबादला माझा मुक्काम होता. ऑफिसमध्ये कुणाला चार्ज न देताच आले होते. त्यामुळे नाशिकला परत जाणे भाग होते. जड अंतकरणाने नाशिकला परतले तर खरं पण गेटमधून आत येताच लक्ष शिंपी पक्ष्यांच्या घरट्याकडे गेलं. घरटं सुरक्षित होतं. घरट्या वरती जे कर्दळीचे पान होते त्या पानाला आडवं करून त्याचे छत या शिंपी पक्ष्यानी तयार केलं होतं. तिन्ही पिल्ल्लं सुरक्षित होती. माझा जीव भांड्यात पडला. करमत तर नव्हतंच. लक्ष सगळं औरंगाबादला बहिणीकडे. पण एक विरंगुळा मात्र मिळाला होता या पिल्लांचा आणि जीवाचं रान करून त्यांना भरवणाऱ्या शिंपी पक्षिणीचा . एक गोष्ट अचानक लक्षात आली ती म्हणजे घरटं बनवताना दोघे जण होते. पोषण मात्र पक्षिण एकटीच करतेय. शिंपी पक्षी कुठे गेला असेल ? पुन्हा अस्वस्थता. पुन्हा अश्रुधारा . निमित्त बहीण आणि पक्षिण दोघीही. शिंपी पक्षिण अथक प्रयत्न करून पिल्लाना भरवत होती आणि माझ्या डोळ्यासमोर मात्र माझी धाकटी बहीण येत होती.
एक दिवस सकाळी अचानक जरा जास्तच जोरानी चिवचिवाट ऐकू आला म्हणून बाहेर आले. शिंपी पक्षिणीची चिमुरडी पिल्लं घरट्याच्या बाहेर येऊन चिवचिवाट करत होती. उडण्याचा प्रयत्न चालू होता. तो सोहळा त्यांची आई कौतुक भरल्या नजरेने पाहत होती. इतर पक्षांनी त्यांच्यावर हल्ला करू नये म्हणून लक्ष ठेवण्यासाठी देखील तिथे थांबली असावी. पिल्लं मोठी झालीत. त्यांना पंख फुटलेत. आता त्यांनी आकाशात भरारी घ्यावी असं स्वप्न तिच्या डोळ्यात मला जाणवलं.
ऑफिसला जायला उशीर होतोय म्हणून तो उड्डाण सोहळा पहायला मला फार वेळ थांबता आलं नाही. दुपारी ऑफिस मधून परत आले तेव्हा मात्र घरटं रिकामं होतं. शिंपी पक्षिण जास्वंदीच्या झाडावर बसून ट्विट ट्विट आवाज करीत इकडून तिकडे उड्या मारत होती. संध्याकाळ झाली.पुन्हा जास्वंदीच्या झाडावर चिवचिवाट ऐकू आला. सवयी प्रमाणे “हो ये” असं मी म्हणाले. बाहेर जाऊन पाहते तर शिंपी पक्षिण ओट्यावरच्या त्या वरच्या आकडी मध्ये येऊन बसली होती. क्षणात माझ्या डोक्यावरचं अस्वस्थतेचं ओझं उतरलं.
शिंपी पक्षिणीचा इवलासा जीव जर आपल्या तीन पिल्लांची काळजी घेऊ शकतो तर माझी शिकली सवरलेली बहीण का नाही तिच्या मुलांना मोठे करू शकणार ?
या शिंपी पक्षिणीकडून एक धडा मात्र मी शिकले. पिल्लांनी भरारी घेतल्यावर तिने एकदाही त्या घरट्याकडे ढुंकून पाहिलं नाही. मी कष्टाने बांधलेलं घरटं म्हणून तिनं त्यात जीव अडकवला नाही.
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Website -
http://narmadalaya.org/
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
Comments
Post a Comment