पुनर्जन्म
पुनर्जन्म
1986 ची गोष्ट. कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रात माझे
कार्यकर्ता प्रशिक्षण चालू होते. आम्ही दहा-बारा प्रशिक्षणार्थी होतो त्यात सुरुवातीला महिला फक्त मी आणि वर्षा बुजोणे अशा दोघीच. प्रशिक्षण सुरू
होऊन एक दीड महिना होऊन गेला होता. एक दिवस विवेकानंद केंद्राच्या तत्कालीन
अध्यक्षा डॉक्टर लक्ष्मी कुमारी
यांनी मला बोलवलं
आणि एका एकवीस
बावीस वर्षाच्या मुलीशी परिचय करून
दिला, “ ही शैलजा ! चेन्नई येथून आली आहे.
तुमच्याबरोबर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात असेल आणि तुमच्या रूम मध्ये राहील.”
व्वा ! अजून एक
नवीन मैत्रीण मिळाली या आनंदात मी तिला आमच्या रूमवर घेऊन गेले. काळी सावळी, टपोऱ्या डोळ्यांची, कुरळ्या केसांची पण अत्यंत कृश अशी शैलजा
! तिला
पाहिल्यावर हिला काहीतरी आजार असावा असं कोणाच्याही लक्षात येई. पण पहिल्याच भेटीत विचारणार कसं? शैलजा मनमोकळ्या स्वभावाची होती. एखाद्या अबोध निष्पाप बालकासारखी मनमोकळी हसायची, गप्पा मारायची.
तिला येऊन दोन तीन दिवस झाले असतील. रात्री तिच्या कण्हण्याचा आवाज आला. तिच्या जवळ जाऊन पाहिले तर घामाने थबथबली होती.
“ काय झालं शैलजा?” काही त्रास होतोय का ?
“होय. छातीत दुखत
आहे आणि श्वास घ्यायला त्रास होतोय. पण घाबरू नकोस. मला असा त्रास नेहमी होतो. माझी बायपास पण झाली आहे. औषध चालू आहेत. नेमाने घेते मी. काही दिवसांनी बरे वाटेल असं डॉक्टर
म्हणालेत.” शैलजाने
धापा टाकत मला हे सांगितलं. मी आणि वर्षा तिच्या जवळ बसून होतो. थोड्या वेळाने तिला झोप लागली आणि
आम्हीही निद्रादेवीच्या आधीन झालो.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चारच्या सुमारास - जेंव्हा आम्हाला निवांत वेळ असे, शैलेजाने तिची हकीकत सांगितली. तिच्या जन्माच्या आधीच वडिलांचा मृत्यू झाला. जन्म झाल्यानंतर वाईट पायगुणाची-
अवलक्षणी म्हणून
सख्या आईपासून सगळ्याच नातेवाईकांनी तिची अवहेलना सुरू केली. तिची एक मावशी चेन्नईला राहायची. तिला मात्र या निष्पाप बालिकेची करुणा
आली आणि ती शैलेजाला अगदी लहानपणीच चेन्नईला आपल्या घरी घेऊन गेली. मोठ्या प्रेमानं या मावशीने तिचं संगोपन केलं. शैलजाने विज्ञान शाखेची पदवी सुद्धा
प्राप्त केली . आणि मध्येच हे दुखणं उद्भवलं . मोठं खर्चिक दुखणं होतं हे. मावशी तर बिचारी कधी काही
बोलली नाही. पण
शेजारी-पाजारी, दूरचे
नातेवाईक टोमणे मारत. तिच्या दुखण्यासाठी किती खर्च होतोय याबद्दल बोलत. या सगळ्यातून सुटका व्हावी असं शैलजाला
वाटलं. आणि
कुणालाही न सांगता तिने थेट विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी गाठलं. विवेकानंद केंद्रातल्या पदाधिकाऱ्यांना
तिने आपली कहाणी सांगितली. कोणीही नातेवाईक इथे यायला मला परवानगी देणार नाहीत
म्हणून मी कुणाला न
सांगता पळून आलेय. माझा शोध घेऊ नका, मी एका चांगल्या संस्थेत आहे. सवडीने भेटायला
येईन असं मावशीला कळवलं आहे. मी आता बावीस वर्षांची आहे. कायद्याने सज्ञान आहे. माझं भलं बुरं मला समजतं. मी खूप चांगल्या ठिकाणी आले
आहे हे मला ठाऊक आहे. इथे आल्याने
माझ्या आयुष्याला एक चांगली दिशा मिळू शकते. मनावरचे दडपण कमी झाल्याने माझी
तब्येतही आता सुधारेल याची मला खात्री आहे.
“तिचा हात हातात घेऊन मी म्हणाले, बरं केलंस इथे आलीस. आधी तर तुझा छोटासा परिवार होता. आता बघ किती मंडळी आहेत तुझ्यावर प्रेम
करणारी”. पण मनात मात्र वाटलं ज्या मावशीनं हिला लहानाचे मोठे केले तिला तरी हिने विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं. तसे न
सांगण्यामागे अन्य काही कारणे असू शकतील. सगळ्याच गोष्टी ती काही आपल्याशी बोलू
शकणार नाही.
सगळ्यांनाच तिच्याबद्दल सहानुभूती आणि प्रेम वाटायचं.. तिचं प्रशिक्षणही
आमच्या बरोबर सुरू झालं. तिची तब्येतही सुधारते आहे हे आमच्या लक्षात आलं. सहा महिन्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर
सगळेच कार्यकर्ते
आपापल्या कार्यस्थळी जाऊन पोचले. शैलजा मात्र कन्याकुमारीलाच होती. तिच्या तब्येतीची काळजी सर्वांनाच
असल्यामुळे तिला लांब कुठे पाठवता येणार नव्हतं.
अधून मधून तिची खबर येत राही. पूर्वी
मोबाईल नव्हते. लँडलाईन फोन
केंद्राच्या ऑफिसमध्येच असायचा. त्यामुळे तिच्याशी प्रत्यक्ष संपर्क होऊ शकत नसे . पत्रव्यवहाराच्या बाबतीत मी आळशीच होते. मध्ये दोन-तीन वर्षे गेली असतील. एकदा सरस्वती दीदी गोलाघाट येथे
माझ्याकडे आल्या. शैलजा बद्दल
चौकशी केली. तर त्यांचा
चेहरा एकदम गंभीर झाला.
“ तुमचं प्रशिक्षण संपलं आणि तुम्ही सर्वजण
आपापल्या कार्यस्थळी आलात. पण काही
महिन्यांनी शैलजाचे नातेवाईक तिला शोधत शोधत विवेकानंद
केंद्रात कन्याकुमारीला पोहोचले. खूप तमाशा केला त्यांनी. कोर्ट केस करू म्हणाले. तिच्या मावशीनेही तिला समजवलं. आम्हालाही वाटलं कि तिचा आजार हा असा भयंकर. काही कमी जास्त झालं तर विवेकानंद
केंद्रावर ठपका ठेवायला हे लोक मागे
पुढे पाहणार नाहीत. ती आपल्या मावशी बरोबर परत गेली. तिचा आणि माझा पत्रव्यवहार नेहमीच असे एकदा कळालं कि ती पोंडीचेरीला एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट
आहे. मी तिला
भेटायला गेले तर ती
आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर होती. मला आत जाऊन तिला
फक्त बघायची परवानगी मिळाली. नंतर मी डॉक्टरांना भेटले. तर डॉक्टर म्हणाले, “ बस, काही क्षणांची सोबती आहे. आता
व्हेंटिलेटर आणि औषधं यांचा तसा
काही उपयोग नाही. उलट तिच्या
वेदनाच वाढवतो आहोत. आम्ही व्हेंटिलेटर काढलं की लगेच तिचा प्राण
जाणार आहे. तिची आई
यायची आहे. पंधरा-वीस मिनिटातच ती इथे पोहोचेल. मग आम्ही व्हेंटिलेटर काढू.
तिचे नातेवाईक येत आहेत म्हटल्यावर मी तिथून निघाले.” शैलजाच्या आठवणीनं सरस्वती दीदीना
गहिवरून आलं होतं.
सरस्वती दीदींच्या या कथना नंतर जीव खरंच उदासवाणा झाला. काय एकेकाचे
आयुष्य असतं. देव जन्माला तरी का घालतो अशांना ?
तिचं पुढे काय झालं याविषयी
माझ्या मनाला घोर लागून राहिला होता. तिच्या संपर्कात जी मंडळी होती त्यांना मी विचारत राहिले. एकाने सांगितलं, “ ती तर गेली असं ऐकलं मी” तो दिवस
पुन्हा खूप उदास होणार गेला. शाळेत प्रार्थना झाल्यावर मी आणि सर्व
विद्यार्थ्यांनी तिला
श्रद्धांजली देखील वाहिली.
काळाच्या ओघात शैलजाचं विषय जरी मागे पडला तरी आठवणींच्या साठवणीत ती कायमच
राहिली. 2007 सालची गोष्ट. युथ
होस्टेलच्या सिक्कीम
मधील संदकफु ट्रेकसाठी मी आणि माझी मैत्रीण जयश्री भावे गेलो होतो. परतीच्या वाटेवर कलकत्त्याला बेलूर मठात म्हणजे माझ्या गुरुस्थानी दोन दिवस थांबलो. पहिल्याच दिवशी मंदिरातून दर्शन घेऊन
आम्ही तिथल्या ग्रामीण विकास केंद्र तर्फे बनवलेल्या वस्तूंच्या विक्री केंद्रात
गेलो. वस्तू बघत
असत मला जाणवलं की तिथल्या गर्दीत एक संन्यासिनी पण आहे. आणि ती गर्दी तिच्याबरोबर असलेल्या
भक्तांची किंवा शिष्यांची आहे. भगवे कपडे, सावळा रंग, टपोरे डोळे, हसरा चेहरा. आणि मुख्य म्हणजे ती माझ्याकडे टक लावून
पाहत होती. . मलाही चेहरा
ओळखीचा वाटला. ही शैलजा तर नाही ? त्या विचारानेच माझ्या छातीचे ठोके
वाढले. खरंच ही
शैलेजाच असायला पाहिजे. तिच्यासारखीच दिसते.
“Are you Shailaja ?” न राहवून मी विचारलं त्या साध्वीला.
“Yes Bharati” असे म्हणून तीने मला घट्ट मिठी मारली. जवळजवळ वीस
वर्षानी आम्ही एकमेकींना भेटत होतो. माझ्या तोंडून शब्द फुटेना. आनंदाचा भर ओसरल्यावर मी तिला हसत
म्हणाले, “अगं मला तर तुझ्या आजाराबद्दल खूपच काही
वेगळी बातमी समजली होती आणि आम्ही तर तुला शाळेत श्रद्धांजली पण वाहिली.”
“मी गेल्याची
बातमी ना ? होय. डॉक्टरांनी गेले म्हणून मला वेंटीलेटर वरुन काढलं. पण काय जादू झाली
कुणास ठाऊक. शरीराची
हालचाल दिसू लागली. श्वासोच्छवास
जाणवायला लागला. आणि
डॉक्टरांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले. मी पूर्ववत् झाले. महिनाभरा नंतर विवेकानंद केंद्राच्या
तत्कालीन अध्यक्षा म्हणजे
आपल्या लक्ष्मी दीदींशी बोलले. त्यांना माझा विचार सांगितला. हा एका अर्थाने माझा पुनर्जन्मच आहे. मला आता काहीतरी समाजासाठी करायचं आहे.
ही देवाची कृपा आहे यावर माझा ठाम विश्वास आहे. आता माझं उर्वरित आयुष्य
देवासाठीच. . लक्ष्मी
दीदींनी मला चिन्मय मिशनमध्ये जा असा सल्ला दिला. माझ्या
घरच्यांना आणि नातेवाईकांना मी हा विचार पटवून दिला. तत्पूर्वी तिरुमला
विद्यापीठाचा दोन वर्षाचा नॅचरोपॅथी चा कोर्स मी केला. तिथल्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार गेली अनेक वर्ष मी फक्त नैसर्गिक आहारच घेते. शिजवलेलं अन्न खात नाही. तेव्हापासून माझी तब्येत सुद्धा उत्तम
आहे. चिन्मय मिशन चा दोन वर्षाचा वैदिक अध्ययनाचा कोर्स मी केला. नंतर तिथेच ब्रह्मचारिणी म्हणून काही
वर्षे राहिले. मग माझी
संन्यासदीक्षा झाली. आता मी
आंध्रप्रदेश मधलं चिन्मय
मिशनचे एक केंद्र चालवते. गीता- भागवत यावर प्रवचने देखील करते.” थक्क होऊन
मी आणि जयश्री शैलजाचं
बोलणं ऐकत होतो.
“ तुझी आई आणि भावंडं यांची काय प्रतिक्रिया आहे तुझ्या या
संन्यास दीक्षेवर ? ते तर तुला
वाईट पायगुणाची म्हणत होते ना ?” मी .
शैलजा यावर खळखळून हसली. तिच्या भक्त परिवारातल्या एका महिलेला आणि युवकाला तिने समोर बोलवलं. म्हणाली, ही माझी आई आणि हा भाऊ ! आता चिन्मय मिशनचे भक्त
म्हण किंवा कार्यकर्ते म्हण. माझ्याबरोबर तीर्थयात्रेला आले आहेत.”
शैलजाचा निरोप घेताना एक विचार मनात आला, “पुनर्जन्म काय फक्त मेल्यावरच होतो ? आपल्या आयुष्यात जाणीवपूर्वक आणि
प्रयत्नपूर्वक बदल घडवून
देखील तो होऊ शकतो. तो सकारात्मक बदल असेल तर उत्तमच.”
आणि हो, देव जन्माला तरी का घालतो अशांना या माझ्या प्रश्नाचे उत्तर तिच्या भेटीनं मला मिळालं !
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास
(बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Website -
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
अत्यन्त सुंदर!
ReplyDeleteSundar!
ReplyDelete