पिंकू तू मोठा हो ...
पिंकू तू मोठा हो ...
1987 साली आसाम मधील गोलाघाट या गावी भाड्याचे घर घेऊन तिथे मी विवेकानंद केंद्राची बालवाडी सुरू केली होती. माझ्या या घरापासून काही अंतरावर एक छोटसं घर होतं. बांबूच्या भिंतींना मातीने लिंपलेलं . आसाम मधल्या प्रत्येक घरासमोर छोटी का असेना पण बाग असतेच. बाग नसली तर किमान फुलझाडांच्या काही कुंड्या तरी प्रत्येक घरासमोर असतातच. मात्र या घरासमोर बागही नाही आणि फुलझाडांच्या कुंड्या ही नाहीत. त्यामुळे त्या परिसरात या घराचे वेगळेपण जाणवत असे. या घरातल्या माणसांबद्दल मला फार कुतूहल वाटायचं. घराचे दार कायम बंद असायचं पण साडेतीन चार वर्षाचा पिंकू नावाचा एक मुलगा मात्र आजूबाजूला एकटाच खेळत असायचा. स्वतःशीच बडबडायचा. टपोऱ्या डोळ्यांचा आणि कुरळ्या केसांच्या पिंकूशी माझी गट्टी समजायला फार वेळ लागला नाही. बरेचदा मी बागेत काम करत असले कि माझ्याशी गप्पा मारायला यायचा. म्हणायचा, “पुढच्या वर्षी मी तुझ्या शाळेत येणार आहे हं !” मी विचारायचे, “ पण मग आता का येत नाहीस तू शाळेतल्या मुलांशी खेळायला?" माझ्या प्रश्ना नंतर मात्र त्याचा चेहरा कावरा-बावरा व्हायचा. त्याच्याकडे माझ्या प्रश्नाचे उत्तर असेलही कदाचित . पण तो देऊ इच्छित नव्हता. पिंकूची आई कधीकधी रस्त्याने जाता येता दिसायची. वय 25 च्या आसपास. कृश देहयष्टी, दिसायला सुंदर पण चेहऱ्यावर कायम गंभीर - दुःखी भाव. तिला एकदा मी पिंकूला शाळेत का पाठवत नाहीस म्हणून विचारलं तर अधिकच दुःखी झाली. तिचा नवरा कसल्याशा असाध्य रोगाने आजारी आहे. सहा महिन्यांपासून सरकारी इस्पितळात त्याच्यावर इलाज चालू आहेत असे म्हणाली. दिवसभर ती नवर्याजवळ दवाखान्यातच असते. मुलाकडे लक्ष द्यायला, त्याला शाळेत पाठवायला तिला वेळच नव्हता. निदान त्याला शाळेत खेळायला तरी पाठव असं सांगूनही तिने पिंकूला कधी शाळेत पाठवले नाही.
एक दिवस आपले वडील हॉस्पिटल मधून घरी आल्याची बातमी मी पिंकूने मला दिली. माझ्या शेजारणीशी मी सहजच या कुटुंबासंदर्भात बोलले. पिंकूच्या आईचा उल्लेख होताच माझ्या शेजारणीचा पारा चढला. म्हणाली,” नाव काढू नकोस त्या बयेचे. पिंकूच्या वडलांचे वय 65 वर्षांचे. देवधर्मात रमणारा संत प्रवृत्तीचा माणूस. साठी उलटे पर्यंत त्यांनी लग्न केलं नाही. आणि एक दिवस अचानक या बयेला घरी घेऊन आला. कोण आहे - कुठली आहे कधी सांगितले नाही. लग्न केलं की नाही त्याबद्दल पण बोलायला तयार नाहीत ती दोघे.” शेजारीण बरेच काही बोलायला लागली पिंकूच्या आईबद्दल.
मी तिला थांबवलं आणि म्हटलं , "असेल तिची काही मजबुरी. जाऊ दे गं ! आपल्याला काय करायचं ? पण शेजारधर्म म्हणून आपण तिच्या आजारी नवऱ्याला भेटायला जायला हवं.” थोड्या नाराजीनेच ती माझ्याबरोबर पिंकूच्या वडलांना भेटायला आली. घरात शिरताच अठरा विश्वे दारिद्र्य म्हणजे काय हे लक्षात आलं. पिंकूच्या वडलांनी डोळे उघडून आमच्याकडे पाहिलं. क्षीण हसून मला म्हणाले, “ पिंकू नेहमी सांगतो मला तुमच्याबद्दल. या मुलाच्या नशिबात काय आहे कोणास ठाऊक !” तेवढ्या बोलण्यानेही त्यांना श्रम झाले. पाच -दहा मिनिटे तिथे थांबून आम्ही परतलो. शेजारणीच्या बागेत उभं राहून आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो. एवढ्यात पिंकूच्या आईचा मोठ्याने रडण्याचा आवाज आला. आम्ही धावतच तिथे गेलो. पाहतो तर काय ! पिंकूच्या वडलांनी प्राण सोडला होता. काही मिनिटांपूर्वी ज्याच्याशी आपण बोललो तो माणूस आत्ता ह्या क्षणी जिवंत नाही ही कल्पनाच आम्हाला असह्य झाली. डॉक्टरांना बोलावणं पाठवलं. आजूबाजूची काही मंडळी जमली पण फक्त पुरुषच. तेही औपचारिकता म्हणून . पिंकूच्या आईवरचा राग त्या कॉलनीतल्या बायकांच्या मनातून अजून गेला नव्हता. भरीस भर म्हणून मुसळधार पाऊस सुरू झाला. वीजही गेली.आणि रात्रही सुरू झाली . जमलेली पुरुष मंडळीही पांगली. पिंकूच्या वडलांना जवळचे कोणी नातेवाईक नव्हतेच. पिंकूच्या आईचे कुणी नातेवाईक की परिचित जवळच्याच खेड्यात राहायचे. पण मुसळधार पावसामुळे त्यांना रात्री निरोप धाडणंही शक्य नव्हतं. त्या काळात मोबाईलची देखील सोय नव्हती. किंबहुना तिच्याकडे कुणाचा फोन नंबर नसावा. त्या दीड खणी घरात अंधार दाटलेला. शेजारणीला मी म्हणाले, “ती एकटीच आहे घरात. आपण सोबत करूया का तिला?” यावर शेजारीण तत्काळ उत्तरली, “ छे छे ! माझा नवरा नाही परवानगी देणार मला तिथे थांबायला. आणि मला भीती वाटते प् काहीच न बोलता मी पिंकूच्या घरी पोहोचले. एकच मिणमिणता कंदील. बैठकीत पिंकूच्या वडलांचे प्रेत तर आम्ही तिघे म्हणजे- मी, पिंकू आणि त्याची आई स्वयंपाक घरात बसलो. घर अनेक ठिकाणी गळत होतं. मधूनच पाणी प्रेतावर ही टपकायचं. पण प्रेताला हलवणार कोण ? आणि कुठे?
पिंकूची आईही रडून-रडून थकली आणि भकास चेहऱ्याने पिंकूला पोटाशी धरुन बसली. माझ्या शेजारणीने पिंकूसाठी वरण-भात आणून दिला पण त्यानी तो खाल्ला नाही. डोळे मिटून भिंतीला पाठ टेकवून आम्ही दोघीही बसून राहिलो निशब्द पणे. तिला कुठल्या शब्दांनी समजवणार मी? मुसळधार पाऊस सुरू होता. लाईट आलेच नाहीत. रॉकेल संपल्याने कंदीलही विझला. माझं मलाच आश्चर्य वाटलं. अशा ठिकाणी थांबायचं धाडस माझ्यात आलं कुठून ? आणि समोर एवढे दुःख पाहूनही डोळ्यात एक टिपूस का आलं नाही माझ्या?
सकाळ झाली. पाऊसही थांबला. पिंकूची आई त्याला पोटाशी धरून बसूनच होती. पिंकू गाढ झोपेत. आजूबाजूला राहणारी माणसं हळूहळू जमा झाली. पुढच्या तयारीला लागली. थोड्यावेळाने शाळेत मुलं यायला सुरुवात होईल म्हणून मलाही निघावं लागलं. निशब्दपणेच मी तिचा निरोप घेतला. घरी आले. कुलूप उघडून दरवाजातून आत पाऊल टाकत नाही तोच रात्रभर गायब झालेले अश्रू डोळ्यातून घळाघळा वाहू लागले.
पिंकू च्या वडिलांना जाऊन पंधरा-वीस दिवस झाले. त्या पंधरा दिवसात तो माझ्याकडे शाळा सुटल्यावर यायचा. पण नेहमीप्रमाणे गप्पा मारायचा नाही. मी त्याला बोलते करण्याचा प्रयत्न करूनही त्याने कधी दाद दिली नाही. शाळेतल्या सगळ्या खेळण्यांवरून तो फक्त हात फिरवायचा . पुस्तक उघडून पहायचा. त्याचं न बोलणं बरंच काही सांगून जायचं. त्याने खेळण्यांना हात लावला की माझेच डोळे ओले व्हायचे.
एक दिवस मी बाजारातून परत येत होते. पिंकूच्या दारासमोर टेम्पो उभा होता. त्याच्या घरातलं सामान त्याची आई गाठोडे भरून टेम्पो मध्ये टाकत होती . मी थबकून ते सारं पहात उभी राहिले. पिंकू सावकाश पावलं टाकत माझ्याजवळ येऊन उभा राहिला. त्याच्याशी बोलायची अथवा त्याच्याकडे बघायची माझी हिम्मत झाली नाही. त्याने माझा पदर हळूच ओढला आणि माझं लक्ष वेधलं. खूप प्रयत्नपूर्वक त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले -
“ मी म्हणालो होतो ना तुला की पुढच्या वर्षी मी तुझ्या शाळेत येईन. पण आता जमणार नाही मला ते.”
त्याच्या टपोऱ्या डोळ्यात आसवं गच्च भरली होती.
“ का येणार नाहीस” हा प्रश्न विचारायचं धाडस मला झालं नाही. त्याचा हात हातात घेऊन मी बराच वेळ तिथे उभी होते. पण ‘काळजी करू नकोस- मी आहे ना’ हे आश्वासन मात्र मी त्याला देऊ शकले नाही.
नवीन महिन्यासाठी हजेरी पुस्तिकेमध्ये मी विद्यार्थ्यांची नावे लिहायला घेतली. पहिल्याच ओळी वर हात थांबला. ती रिकामी सोडून दुसऱ्या ओळीपासून मी विद्यार्थ्यांची नावे लिहायला सुरुवात केली. ती पहिली रिकामी ओळ पिंकू साठी. ती रिकामी ओळ मला नेहमी पिंकूची आठवण करून द्यायची. मी मनातल्या मनात म्हणायचे,
“ पिंकू, जिथे असशील तिथे सुखात रहा. कुठल्याही शाळेत जा. पण शिकून-सवरून शहाणा हो .-मोठा हो !”
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
www.narmadalaya.org
Facebook Link -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
या पिंकू ला भेटण्याचा योग दैवाने दिला का परत?
ReplyDelete