वात्सल्याचा स्पर्श
वात्सल्याचा स्पर्श
दुपारची वेळ. आई पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल काही वाचत होती . त्यात एक उल्लेख होता की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची रक्षा विमानातून देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी विसर्जित करण्यात आली. आई म्हणाली, " ते देशाचे पंतप्रधान होते म्हणून हे शक्य झालं. एक तर तुमच्याकडे भरपूर पैसा तरी पाहिजे किंवा राजकारणात मोठे स्थान तरी .. माझ्यासारख्या मध्यम वर्गातल्या व्यक्तींची कितीही इच्छा असली की आपली राख देशभरातल्या मातीत मिळावी आणि अनेक पवित्र नद्यांमध्ये विसर्जित केली जावी तरी उपयोग काय?"
“ खरंच वाटतं तुला असं?” मी..
“हो हो खरंच !” आई उत्तरली.
मला तिची थट्टा करायची लहर आली होती. उजवा हात आशीर्वाद दिल्या सारखा उंच करून नाटकीपणाने मी म्हणाले, “कन्ये , अंतिम क्षणी माझं स्मरण कर म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल”.
हसत हसत "बरं माताजी” असं म्हणून आई पुन्हा वाचनात गढून गेली. दुर्दैवाने या प्रसंगानंतर चारच वर्षांनी आईचा कर्करोगाने मृत्यू झाला. अत्यंत शांतपणे आणि प्रसन्न चेहऱ्याने तिने या जगाचा निरोप घेतला . माझ्या डोक्यातून मात्र मी केलेली तिची थट्टा जात नव्हती. अंतिम क्षणी तिला खरच कोण आठवलं असेल ? मला वाटतं नक्कीच तिने तिच्या लाडक्या शंभू महादेवाला स्मरलं असेल. गावाला जाताना तिच्या अनुपस्थितीत घरात काय काय कामे करायची आहेत ते आम्हा भावंडांना सांगायची त्याच सहजतेने तिने देवाला देखील आमच्या प्रत्येका भावंडाबद्दल काहीतरी सांगितलं असेल. माझ्याबद्दल बोलताना म्हणाली असेल, ” स्वाभिमानाने आणि खंबीरपणे जगण्याचे संस्कार केलेत मी तिच्यावर. एकटी असली तरी तिच्यावर माया करणारी माणसंही भरपूर आहेत. ती काळजी नाही मला. पण कधी कधी अति धाडसानं वागते ही पोर. अशावेळी तिचे रक्षण कर”.
तिच्या इच्छेनुसार पुण्याच्या विद्युतदाहिनीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी तसेच अनेक नद्यांमध्ये तिच्या रक्षेचं विसर्जन व्हावं ही तिची इच्छा मी नातेवाइकांना सांगितली . गमतीत का होईना पण हे वचन मी तिला दिलं आहे . ते मी पूर्ण करणार. मे 1984 ते 86 या काळात हिमालयापासून कन्याकुमारीच्या महासागरापर्यंत तिच्या रक्षेचं अनेक ठिकाणी मी विसर्जन केलं.
फेब्रुवारी 1985. उत्तर काशीच्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग या संस्थेचा एडवेंचर कोर्स पूर्ण करून परतीच्या मार्गावर होते. सोबत नव्यानेच ओळख झालेली मैत्रीण विजया ही देखील होती. वाटेत ऋषिकेशला थांबून आईच्या रक्षेचं गंगेत विसर्जन करावं आणि मग पुढे दिल्लीला जावं असं ठरलं . विजया देखील कौतुकाने माझ्याबरोबर थांबली . गर्दीच्या ठिकाणी रक्षा विसर्जन न करता जरा दूर जाऊन करावं असे आम्ही दोघींनी ठरवलं . फुलांच्या दुकानातून मोठा द्रोण भरून फुले घेतली. दोघीही गंगेच्या किनाऱ्याने चालत होतो पण निशब्द पणे . माझी मनस्थिती विजया जाणत होती. तीन-चार कि. मी. चालून गेल्यावर आम्ही थांबलो. दाट झाडी आणि किनाऱ्यावरचे काही आश्रम- मठ. रस्ता निर्मनुष्य नव्हता तरी गर्दीही नव्हती. आश्रमातले काही संन्यासी आजूबाजूला दिसत होते .
माझी सॅक सांभाळत विजया गंगेच्या काठी बसून राहिली. हातात फुलांनी भरलेला द्रोण आणि कै. आईच्या रक्षेची छोटी पुडी घेऊन मी गंगेच्या पाण्यात शिरले. स्वच्छ नितळ पाणी.. खालचे दगड-गोटे ही स्पष्ट दिसत होते. .
दुपारचे दोन वाजले होते तरीही पाणी बर्फासारखे थंडगार होते .प्रवाहाचा वेगही बराच होता. गुडघाभर पाण्यात थांबून मी हातातली रक्षेची पुडी द्रोणातल्या फुलांवर ओतली. नेमके काय विचार होते त्या क्षणी माझ्या मनात? सांगता येत नाही. पण नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागले. किती वेळ अशी उभी होते हे देखील आठवत नाही. अचानक मागून माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला . वाटलं, हा ओळखीचा स्पर्श आहे. मागे वळून पाहिलं तर पन्नास-पंचावन्न वर्षाची एक संन्यासिनी. चेहऱ्यावर अत्यंत प्रेमळ भाव। यांना तर आपण ओळखत नाही. मग हा स्पर्श ओळखीचा का वाटला.?
शांत स्वरात पण किंचित हसत त्या म्हणाल्या, “ बेटी, अगर अपने दुख से आंखोमे आंसू आते है तो उनका कोई मोल नही होता | लेकिन दूसरों का दुख देखकर अगर आंखोमें आंसू आते है तो उनका मोल असली मोतियों से भी अधिक होता है|”
“ जी, मैं इसे हमेशा याद रखुंगी” बस्स ! एवढाच आमचा संवाद. माझ्या डोक्यावरून हात फिरवीत त्या “खुश रहो बिटिया” असे म्हणून निघून गेल्या. तेव्हाही वाटलं हा स्पर्श ओळखीचा आहे. हातातला फुलांचा द्रोण मी अलगद गंगेच्या प्रवाहात सोडला. आईचा आत्मा हे बघत असेल का ? असेल तर तिला काय वाटत असेल? 1985 सालची ही घटना. आता वाटतं असे विचार त्या कोवळ्या वयात येणं स्वाभाविक होतं .
नाशिकपर्यंतच्या परतीच्या प्रवासात ‘ मला त्या साध्वीचा स्पर्श ओळखीचा का वाटला’ या एकाच विचाराने पछाडलं होतं. पण उत्तर सापडलं नाही.
आज ही घटना शब्दबद्ध करत असताना अचानक ते कोडं सुटलं. का वाटला तो स्पर्श ओळखीचा .? कारण प्रत्येक स्त्री मध्ये उपजत असलेल्या वात्सल्य भावनेचा तो स्पर्श होता.
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
भावस्पर्शी , सुंदर , गमतीने झालेला संवाद व त्यातून निर्माण झालेली इच्छा, ईश्वरी शक्ती कसे पूर्ण करून घेते व आपले प्रारबद्ध संपवते, एक अनोखा जीवनानुभव . ......
ReplyDelete