गोष्ट एका शाळेची (10)

गोष्ट एका शाळेची  (10)


पद्मश्री डॉ. रॉबिन बॅनर्जीचा जन्मदिवस १२ ऑगस्टला असतो  म्हणून त्यांच्याच इच्छेनुसार सुरू होणाऱ्या या शाळेचं उद्घाटनही आम्ही १२ ऑगस्ट १९८८ रोजी करायचं ठरवलं. ते मात्र लंडन-मेक्सिकोच्या दौऱ्यावर होते. ते इथे असते तर शाळेचं उद्घाटनही त्यांच्याच हस्ते झालं असतं. गोलाघाटमधल्या अनेक मान्यवरांना उदा. इथल्या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. नेओग तसंच नगरपालिकेचे अध्यक्ष लखी बरुआ वगैरेंना विनंती केली - पण भूमिपूजनाच्या वेळी झालेला वेगवेगळ्या संघटनांचा विरोध लक्षात घेता सर्वांनीच नकार दिला. शेवटी ठरवलं केवळ सरस्वती वंदना आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन झालं म्हणून जाहीर करायचं. एकूण 28 मुलांची शाळेत प्रवेशासाठी नाव नोंदणी झाली.  28 पालकांनी तरी माझ्यावर विश्वास दाखवला ही माझ्या दृष्टीने महत्त्वाची बाब होती. 

जसजशी 12 ऑगस्ट ही तारीख जवळ यायला लागली, एका अनामिक भीतीने मला ग्रासलं.  कुणी दरवाज्यावर टकटक केली तर दरवाजा उघडायला पण भीती वाटायची. पुन्हा कोणी धमकी द्यायला तर येणार नाही ? डॉक्टर बॅनर्जी पण इथे नाहीत .आपलं  काही बरं वाईट झालं तर ?  या अपरिचित गावात आपण शाळा सुरू करतोय. भाषेचा प्रश्न आहेच. येईल का मला शिकवता ? अशा  विचारांनी अस्वस्थ झाले की एखादं पुस्तक वाचायला सुरवात करायचे. त्या रात्री रिचर्ड बाख याचे  Illusions हे पुस्तक हातात घेतले. पुस्तक उघडलं ते नेमकं साठावं पान होतं. त्यावरचं पहिलंच वाक्य  वाचून मी मोठ्याने हसले. ते वाक्य होतं -

You 
teach best 
what you most need
 to learn.

पुस्तक सलगपणे वाचत होते असं नाही. कुठलही पान काढून वाचायला लागायचे. दुसऱ्या ज्या वाक्यावर थबकले ते वाक्य होतं -

Every person,
all the events of your life
are there because you have 
drawn them there. 
What you choose to do with them is 
upto you. 

सखी म्हणाली, गोलाघाटला यायचा तुझाच अट्टाहास होता ना ? मग आता येतील त्या समस्यांना सामोरं जा ! 
 
१२ ऑगस्ट १९८८

शाळेचा पहिलाच दिवस. औपचारिक उद्घाटन समारंभ आटोपल्यावर पालक मुलांना शाळेत ठेवून घरी निघून गेले. काही मुलं शाळेत येतानाच रडत होती तर काही इतरांचे रडणं बघून रडायला लागली. त्यांच्या या रडण्याच्या गोंधळात वाटलं आता आपल्यालाही बहुधा रडू येणार. रेणूबाय - शाळेसाठी नेमलेली सेविकाही मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती. दोन-चार धीट मुलं मात्र अजिबात रडत नव्हती. त्यापैकी एक म्हणजे प्लविता कौशिक. रडणाऱ्या मुलांना शांत करण्यासाठी ती मला व रेणूबायला मदत करत होती. पंकजचे मोठमोठ्याने रडणे सुरू होते. रडता रडता तो काहीतरी सांगत होता. प्लविता त्याच्याजवळ जाऊन अगदी समजावून सांगण्याच्या अविर्भावात म्हणाली, 'न कांदिबा पंकज. आमार बायदेव तुमार कथा भुजी न पाय!' (थोडक्यात, रडू नकोस पंकज, तू जे काही सांगतो आहेस ते आपल्या शिक्षिकेला कुठं समजतंय? कारण तिला आपली भाषा येत नाही). तिच्या या वक्तव्यावर रेणूबाय मोठ्याने हसू लागली. मला आसामी भाषा येत नसल्याने मी तिला हसण्याचे कारण विचारले तर तिने प्लविता काय म्हणतेय ते तोडक्या-मोडक्या हिंदीत मला सांगितलं. मला मात्र हसू आलं नाही. उलट धक्काच बसला. आपल्या शिक्षिकेशी आपण संवाद साधू शकत नाही ही भावना मुलांमध्ये असणं योग्य नाही. थोडं धोक्याचेच आहे. पण इलाज काय? माझंच डोकं गरगरायला लागलं विचारांनी. 

शाळा सुटल्याबरोबर मी दिप्तीकडे म्हणजे माझ्या घरमालकिणीकडे गेले. म्हटलं, आजपासून मी तुझी विद्यार्थिनी. मला आसामी भाषा लिहायला, वाचायला आणि बोलायला शिकव. मी घडलेला प्रसंग व त्याबद्दलचं माझं मत सांगितलं. दिप्तीच काय  पण चौघीही गोस्वामी भगिनी आनंदाने माझ्या शिक्षिका झाल्या. मी म्हणाले, सर्वप्रथम मला आसामी भाषेत हे वाक्य कसं बोलायचं ते सांगा. ते वाक्य आहे - 'मला आसामी समजतं, बोलता येतं. पण मी तुमच्याशी आसामी भाषेत बोलले तर तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी  भाषा कशी बोलता येईल? म्हणून तुम्ही जरी माझ्याशी आसामी भाषेत बोललात तरी मी उत्तर मात्र इंग्लिश मध्येच देईन.' अस्सल आसामी उच्चारात ते वाक्य मी दहा वेळा पाठ केलं. 

संध्याकाळी मला खूप थकवा जाणवायला लागला. दोन-तीनदा चक्कर देखील आली. शाळा सुरू करायच्या तयारीसाठी खूप धावपळ करावी 
लागली, आपल्याला पुन्हा कोणी धमकावेल का याचा मानसिक ताण आणि सकाळची मुलांची रडारड याचा तो एकत्रित परिणाम असावा असं माझं मीच मला समजावलं.    

दुसऱ्या दिवशी आसामी भाषेतनं मुलांशी बोललेल्या त्या एकमेव वाक्यानं जादू केली. आपल्या शिक्षिकेला आपली भाषा समजतेय हे कळल्यानं मुलंही आनंदली. खरंतर मातृभाषेमधूनच मुलांना शिक्षण दिलं जावं यावर माझा विश्वास आहे. पण विवेकानंद केंद्राच्या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या, शिवाय मलाही आसामी भाषा येत नव्हती. त्यामुळे दुसरा पर्याय नव्हता. 
                                                               ------***-------
दुसऱ्या दिवशी मुलांची रडारड जरा कमी होती. सकाळपासून थकवा खूप जाणवत होता. पण तरीही दुपारी बारा पर्यन्त गाडी कशी बशी रेटली. संध्याकाळी डॉक्टरांकडे जाऊया असा  विचार केला. एवढ्यात दिमापूर विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते  श्री मुकुंद कुलकर्णी आले आणि त्यांनी एक अत्यंत वाईट बातमी दिली. गुवाहाटी केंद्राचा आमचा एक कार्यकर्ता सतीश कामत हा 12 ऑगस्टला म्हणजे आदल्याच दिवशी कविळीने मरण पावला. पुन्हा एक आघात. गुवाहाटीच्या युवकांमध्ये  लोकप्रिय आणि  नेहमी हसतमुख  असा हा कार्यकर्ता. जेमतेम पस्तीशीचा पण नसेल. पंधरा दिवसपूर्वीच आमची भेट झाली होती. निरोप सांगून मुकुंद कुलकर्णी निघून गेले. मी न जेवताच पलंगावर आडवी झाले. काय होतंय कळेना. 

संध्याकाळी नेहमी प्रमाणे गप्पा मारायला दीप्ती आली. तिने माझ्या अंगाला हात लाऊन पाहताच ती घाबरली. शेजारच्या एका मुलाला डॉक्टरना आणायला पाठवलं. डॉ रवि खोंड आले. त्यांनी माझा ताप मोजला तर तो 105 डिग्री  होता.  ते म्हणाले,  हिला इथे ठेवता येणार नाही.  दवाखान्यात ॲडमिट करावं लागेल. सायकल रिक्षात  बसून  मी आणि दीप्ती सरकारी दवाखान्यात पोहोचलो. मागून स्कूटरवर डॉक्टर खोंड आले. मला एका  जागी  बसवून  त्या दोघांची  धावपळ चालू होती. एवढच मला समजलं की दवाखान्यात प्रायव्हेट रूम तर सोडाच पण जनरल वॉर्ड मध्ये सुद्धा पलंग उपलब्ध नाहीये .   मी अर्धवट ग्लानीत. दीप्तीने घरी जाऊन  तिच्याकडचा फोल्डिंग  कॉट (नवारीने विणलेला) आणला . जनरल वॉर्ड मध्ये दोन तिन पेशंटचे  पलंग जवळजवळ सरकवून अगदी दारातच माझा पलंग टाकला गेला. सलाईन सुरू झालं. दीप्ती माझ्यासाठी मुगाची खिचडी आणायला पुन्हा घरी गेली. 

माझ्या शेजारी एक वयोवृद्ध आजी होत्या. त्यांना काय आजार होता माहीत नाही. पण सर्व नैसर्गिक क्रिया त्यांनी अंथरूणातच केल्या असाव्यात. त्याची प्रचंड दुर्गंधी येत होती .त्यांना खरखरही लागली होती. कोणीही नातेवाईक त्यांच्या जवळ नव्हते. मला अॅडमिट  होऊन अर्धा तास पण झाला नसेल - शेजारच्या . 

आजीबाईंनी प्राण सोडले. त्यांच्या नातेवाईकांना यायला रात्रीचे अकरा वाजले. तोपर्यंत मी प्रेताच्या शेजारीच.. सरकारी दवाखान्यात  गलथान  कारभार असतो  हे ऐकले होते  ते प्रत्यक्ष  अनुभवायला  दवाखान्यात ऍडमिट  व्हावे लागले. दीप्ती डबा  घेऊन आली पण प्रेताशेजारी बसून काय खाणार ? नर्स कडे तक्रार केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. औषधांमुळे ताप थोडा उतरायला लागला होता आणि ग्लानिपण कमी झाली होती.  

सिविल सर्जन कुठे बाहेर गावी गेले होते. ते रात्री बाराच्या सुमारास आले.  डॉ रॉबिन बॅनर्जी यांची पाहुणी अॅडमिट आहे म्हणून मला पाहायला आले. दुसऱ्या दिवशी  प्रायव्हेट रूम रिकामी झाल्यास मला तिथे शिफ्ट करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

औषधांच्या प्रभवामुळे असेल - डोळ्यावर खूप झोप आली होती. पण काळजी होतीच उद्या शाळेत मुलं येतील. त्याचं काय करायचं ? पण लगेच आठवलं उद्या चौदा तारीख म्हणजे आमची शिक्षिका रुमी सैकिया येईल. शिवाय रेणूबाय आहेच. दीप्ती त्यांना सांगेलच माझी अडचण. 

डोळे खूप जड झाले होते. तेव्हढ्यात रिचर्ड बाखचा आवाज ऐकू आला -

Here is a test to find whether your mission on the earth is finished: 
If you are alive, it isn’t.


भारती  ठाकूर
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com
 
Contact Person -
Nilesh Giri
Mobile no. - 6266370705
 
Website -
http://narmadalaya.org/
 
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
 
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/

Comments

  1. कल्पनेपेक्षाही वास्तव किती धक्कादायक असू शकतं .....

    ReplyDelete
  2. हल्ली कधीकधी माझ्या मनाचं तारू जरा दिशाहीन भरकटत होतं. पण त्यात तुम्ही रिचर्ड बाखची आठवण करून दिली. I am grateful 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....