गोष्ट एका शाळेची (11)

गोष्ट एका शाळेची  (11)



औषधांचा परिणाम असेल कदाचित पण रात्री बारा नंतर खूप गाढ झोप लागली. सकाळी आठ वाजता डॉ. खोंड आणि सिविल सर्जन डॉ. बोरगोहाय मला तपासायला आले. १०२ डिग्री  ताप अजूनही होताच . आणखी  नवीन काही औषधे चालू केली. सलाईन तर चालूच होतं.

मी दवाखान्यात अॅडमिटआहे ही बातमी मुलांना शाळेत सोडायला आलेल्या पालकांना समजली. एकेक जण मला भेटायला येऊ लागले. कुणी चहा-दूध, फळं-बिस्किटस् आणली तर कुणी डॉक्टरांनी  लिहून दिलेली औषधे आणून दिली. दीप्तीने नाशिकच्या कर्नल फडकर यांच्याकडे निरोप  पाठवला.  फडकर दादा वहिनी निरोप समजताच  मला भेटायला  दवाखान्यात आले.  त्याच वेळी  प्रायव्हेट रूम रिकामी झाली  असून  सफाई करून तयार आहे,  तिकडे शिफ्ट व्हा  असा निरोप आला. ज्या पलंगावर मी झोपले होते तो पलंग आणि गादी पांघरूण-  मच्छरदाणी हे सगळं दीप्तीच्या घरचं होतं.  तिथेच सोडून कसं चालेल ?  मला फडकर दादा वहिनींना  हे सांगायचा  संकोच होत होता. आणि ते सामान तिथे टाकून प्रायव्हेट रूम मध्ये जाता येत  नव्हतं. मी प्रायव्हेट रूम मध्ये का जात नाही याचे उत्तर मला द्यावेच लागले. त्यात संकोच का करतेस असं म्हणत  माझी गादी, पांघरूण आणि इतर सामान  या दोघांनी उचलून प्रायव्हेट रूम मध्ये नेलं.  मला खूप  गहिवरून आलं . ते दोघेही भेटायला आल्याने  मी खूपच रिलॅक्स झाले. त्यांनीही आता कसलीच काळजी करू नकोस  आम्ही आहोत  इथे असा विश्वास  दिला. 

संध्याकाळी  आमची नवीन शिक्षिका  रुमी सैकिया  भेटायला आली.  तुम्ही काळजी करू नका. मी  शाळेची  जबाबदारी  व्यवस्थित घेईन. लवकर बऱ्या व्हा असं  विश्वासक  बोलून  गेली. डॉक्टर खोंड आणि सिव्हिल सर्जन डॉ. बोरगोहाय दिवसातून तीन-तीनदा भेटून जात.  संध्याकाळी मी जरा बोलण्याच्या स्थितिमध्ये आहे हे   हे बघून  डॉक्टर खोंड  म्हणाले, “तुमची  13 तारखेला संध्याकाळची अवस्था  पाहून  मी खूप घाबरलो होतो. ताप खूप चढलेले पेशंट आजवर बरेच  पाहिलेत. पण  तुम्हाला काही झालं असतं  तर सगळ्या  गोलाघाट गावाला मला जाब द्यावा लागला असता. एकटीने राहून नव्या गावात शाळा सुरू करण्याच्या तुमच्या धाडसाचं गोलाघाटकरांना फार कौतुक आहे ”. डॉ . बोरगोहाय देखील हसले आणि म्हणाले, “आणि मला रॉबिनदांना जाब द्यावा लागला असता.”

“ मला ताप नेमका कशामुळे आला ? या प्रश्नावर ते गंभीर झाले. म्हणाले,” हे आसाम आहे. इथल्या पावसाची तुम्हाला सवय नाही. अनेक शक्यता आहेत. मलेरिया त्यापैकी एक. तुमच्या  ब्लड रिपोर्ट मध्ये  मलेरिया आहे  म्हणून लिहिले  आहे.  याप्रमाणे आपण ट्रीटमेंट सुरू केलीये.  काही दिवस वाट बघू.  गरज वाटल्यास  पुन्हा काही चाचण्या जोरहाटच्या लॅब मध्ये करू. डॉ. खोंड यांनी फार चांगला निर्णय घेतला आणि तुम्हाला अॅडमिट केलं.”

कितीही चांगली सोय असली आणि लोकांनी मदत केली तरी मला दवाखान्यात रहायचा कंटाळा यायला लागला. 
चार दिवसांनी मी डॉक्टरांच्या  मागे लागून  डिस्चार्ज घेतला. दवाखान्यातून घरी परत जातांना वाटेत टेलिफोन एक्स्चेंज मध्ये जाऊन दिब्रुगडच्या विवेकानंद शिक्षण प्रसारक विभागात फोन लावला. एखादी महिला कार्यकर्ता काही दिवस सोबतीला येऊ शकली तर मला या आजारपणात थोडा आधार मिळेल अशी विनंती मी वासुदेवन या कार्यालय प्रमुखास  केली. पण मला स्पष्ट शब्दात नकार मिळाला. तापाचा लपंडाव चालूच होता. 

फडकर दादा वहिनींची  मदत होतीच. मंगला वहिनींनी मला पूर्ण बरे वाटेपर्यंत  घरी स्वयंपाक करू दिला  नाही.   जवळजवळ पंधरा वीस दिवस बरोबर शाळा  सुटायच्या वेळी गरमागरम डबा मला घरपोच यायचा. मंगला वहिनी साक्षात अन्नपूर्णा.  प्रेमाने केलेल्या घरच्या जेवणाची मजा काही औरच असते.  माझी तब्येत ठीक व्हायला औषधांपेक्षा जास्त  मदत मंगला वहिनींच्या हातच्या जेवणाची  झाली यावर  माझा पूर्ण विश्वास आहे. 

आसामी भाषा लवकर शिकता यावी म्हणून मी छोटा ट्रान्झिस्टर विकत घेतला आणि नियमितपणे आसामी वर्तमानपत्रही वाचायला लागले. सुरुवातीला फक्त ठळक बातम्या अथवा शीर्षक वाचण्यापर्यंतच मजल जायची. पण नंतर अग्रलेख देखील वाचायला लागले. शाळा सुरळीत चालू होती. मुलं आनंदाने शाळेत येत. 

रुमीने  तिच्या घरची  हार्मोनियम  शाळेत आणून ठेवली.  बडबड गीत देखील  मुलं  हार्मोनियमच्या साथीने म्हणू लागली. 

एक दिवस hand puppets च्या सहाय्याने मुलांना गोष्ट सांगत होते. रेणूबाय घाबरीघुबरी होत बाहेरनं आत आली. म्हणाली, 'दीदी रस्त्यावर बघा मिलिटरीची किती वाहने थांबली आहेत. त्याच्यातले सैनिक आपल्याच शाळेत येताहेत. मी झटकन उठून बाहेर आले. पाहते तर काय, समोर, आर्मीच्या व्हीआयपी कार्स, पायलट कार्स वगैरेंचा ताफा. एका गाडीच्या झेंड्यावरून व गाडीच्या बॉनेटखालच्या स्टार्सवरून ती गाडी मेजर जनरल पदाच्या अधिकाऱ्याची होती हे मी ओळखलं. कोण असावं असा विचार करत असतानाच ते आणि  बरोबरचे अधिकारी शाळेच्या आवारात आलेही. अत्यंत उमद्या आणि करारी स्वभावाचे मेजर जनरल प्रेम कुकरेती त्यांच्या सहकाऱ्यांसह खास शाळा बघायला आले होते. मेजर जनरल प्रेम 'कुकरेती  म्हणजे आसाम रायफल्सचे  प्रमुख. विवेकानंद केंद्र आणि त्यांच्या शाळा हे त्यांच्या खास जिव्हाळ्याचे विषय. (सेवा निवृत्तीनंतर त्यांनी बरेच दिवस विवेकानंद केंद्रात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले). डॉ. रॉबिन बॅनर्जी हे देखील त्यांचे खास दोस्त. मी मात्र त्यांना प्रथमच भेटत होते. शाळा पाहून झाल्यावर त्यांचे सहकारी बाहेर जाऊन थांबले. कुकरेती जी  मात्र मुलांमध्ये रमले. त्यांची गाणी-प्रार्थना त्यांनी ऐकली. नंतर शाळे संदर्भात व गोलाघाट मधल्या माझ्या वास्तव्याबाबत आम्ही बोललो. दोन महिन्यापूर्वी काही लोक मला धमकी देऊन गेल्याचं आणि चर्चेअंती बालवाडी सुरू करायला हरकत नाही असे ते म्हणाल्याचं मी कुकरेतीजींना सांगितलं.  

“काळजी करू नकोस. मी जिल्हाधिकारी - आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कानावर  ही गोष्ट घालतो. ते लक्ष ठेवून राहतील. पण पुन्हा असं काही घडल्यास त्या दोघांना लगेच  कळवत जा ” आसाम रायफल्सच्या प्रमुखाकडून हे आश्वासन मिळाल्यावर मला काळजी कसली.?

'गोलाघाटच्या या शाळेत मी आज प्रथमच येतोय. काय देऊ शाळेसाठी?' कुकरेतीजींनी विचारलं. 

'आशीर्वाद आणि शुभेच्छा!' माझ्या या उत्तरावर ते हसले. एक हजार रुपये माझ्या हातात ठेवले व म्हणाले, 'मुलांसाठी काही खेळणी आण यातून !' आमच्या शाळेला मिळालेली ती पहिली देणगी माझ्या अजूनही स्मरणात आहे. शाळेची प्रगती पाहायला अधूनमधून नक्की येत जाईन असं आश्वासन देऊन मेजर जनरल प्रेम कुकरेतीजी निघून गेले. गोलाघाट छोटं होतं. आर्मीच्या इतक्या गाड्या शाळेसमोर उभ्या पाहून लोकांची तिथे खूप गर्दी जमली. मेजर जनरल प्रेम कुकरेती  यांच्याशी मी  खूप ओळख असल्यासारखी मोकळेपणाने बोलत  होते याचं  जमलेल्या गर्दीला  खूप अप्रूप वाटलं.  ती बातमी गोलाघाटभर पसरली. मलाही  तेच हवं होतं.   

शाळा सुरू झाल्यावर एक-दोन महिन्यातच मी या मुलांची शिक्षिका आहे आणि ते फक्त विद्यार्थी हा माझा गोड गैरसमज दूर झाला. भारतीय संस्कृतीत 'परस्पर देवो भव' अशी एक सुंदर संकल्पना आहे.  आम्ही परस्परांचे गुरु होतो. खरंतर ते माझ्याकडून जे काही शिकले असतील त्यापेक्षा अधिक मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. मी त्यांना शिकवण्यापेक्षा शिकायला मदत करत होते  हेच खरं.  एक सुंदर नातं माझ्या या मुलांबरोबर निर्माण झालं  होतं ते म्हणजे मैत्रीचं आणि विश्वासाचं. त्या काळातल्या  माझ्या आयुष्यातला  प्रत्येक क्षण ते समृद्ध करत होते. जगण्याला एक सुंदर कारण मिळालं होतं . जगण्यात संघर्ष जरूर होता तो वैयक्तिक कारणासाठी नव्हता. त्यामुळे संघर्षातही आनंद होता. 


भारती  ठाकूर
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com
 
Contact Person -
Nilesh Giri
Mobile no. - 6266370705
 
Website -
http://narmadalaya.org/
 
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
 
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/

Comments

  1. हुश्श ! आजच्या एपिसोड मधे फक्त चांगलं चांगलंच घडलं बुवा. तरी मधेच एकदा ती रेणुबाय घाबरीघुबरी होऊन आली, तेव्हा ठोका चुकलाच होता.
    आता लष्करी पाठिंबा मिळाला म्हणजे काळजी नको.
    एका मेजर जनरलने विवेकानंद केंद्रासाठी काम करणं हे खूपच आदरणीय. म्हणजे मे. ज. पण आणि केंद्र पण !

    ReplyDelete
  2. भोवतालच्या प्रत्येक माणसाकडून खूप शिकता येतं. आणि मग आयुष्यभर त्या शिकलेल्या गोष्टींसाठी ती व्यक्ती देखील लक्षात रहाते. रोजच्या जगण्यात त्यानेच तर खरी मजा येते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....

मातृत्व