गोष्ट एका शाळेची

गोष्ट एका शाळेची


कोविड 19 च्या लॉक डाऊनमुळे का होईना पण गेल्या अनेक वर्षात मिळाला नाही असा निवंतपणा आजकाल मिळतोय. तेंव्हापासून  जुन्या डायऱ्या वाचायचा एक छंदच लागलाय. जुन्या डायऱ्यांना  एक वेगळाच सुगंध असतो, फक्त आपल्यालाच जाणवणारा. त्या वाचायला लागलं की त्यातली माणसं जणू पुन्हा भेटतात. त्यापैकी काही माणसं तर आता हे जगही सोडून गेलीत. त्यांच्या बरोबरचे ओले-हळवे क्षण पुन्हा जिवंत करतात या डायऱ्या. कालही असंच घडलं.

१९८७ सालचा एप्रिल महिना. एका मिटिंगमध्ये कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राचे तत्कालीन सचिव बालकृष्णनजी विवेकानंद केंद्राच्या आसाममधील गोलाघाट या गावी नव्यानेच सुरू करायच्या प्रोजेक्ट बद्दल माहिती देत होते. गोलाघाट येथे शाळा सुरू करण्यासाठी प्रसिद्ध वन्यजीव तज्ज्ञ व छायाचित्रकार पद्मश्री डॉ. रॉबिन बॅनर्जी यांनी जमीन दान केली होती. काझीरंगा या अभयारण्याचे ते संस्थापक अध्यक्ष. हे अभयारण्य एकशिंगी गेंडा आणि वाघ यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. बाळकृष्णनजी ही माहिती खास त्यांच्या स्टाईलने इंग्रजीतून सांगत होते. माझ्याकडे पाहात ते हसत म्हणाले, "Dr. Robin Banerjee is very fond of wild animals, so, we are sending sister Bharati to Golaghat to start the project’. 'त्यांच्या या वक्तव्यावर आम्ही सगळेच खळखळून हसलो.



गोलाघाट. या गावाचं तर नावही आपण कधी ऐकलेलं नाही. आसाम राज्याच्या नकाशात आधी मी हे गाव शोधलं. आसाम नागालँड सीमेजवळचं हे गाव. तिथे जाऊन विवेकानंद केंद्राची शाळा सुरू करायची आहे. ते देखील मी एकटीने तिथे राहून. नाही म्हटलं तरी टेन्शन थोडं वाढलंच. नवीन प्रदेश, नवीन भाषा, ओळखीचं एकही माणूस नाही. कसं होणार आपलं?

कन्याकुमारी ते दिब्रुगढ असा साडेचार दिवसांचा प्रवास करून एकदाची दिब्रुगढला पोहोचले. काही दिवस तिथे मुक्काम केला अन् अखेर गोलाघाटला जायचा दिवस उजाडला. माझ्याबरोबर दिब्रुगढच्या विवेकानंद केंद्रातला एक कार्यकर्ता- अरुण गौड हा देखील होता. अरुण मला गोलाघाटला पोहोचवायला आणि डॉ. रॉबिन बॅनर्जीशी ओळख करून द्यायला बरोबर आला होता. मला बालवाडीत पहिल्या दिवशी जाणारी मुलं आठवली. आई-वडील मुलाला शिक्षिकेच्या स्वाधीन करून निघून जातात. अगदी नवीन वातावरणात त्या मुलांच्या मनात काय विचार असतील? भीती, हुरहूर, उत्सुकता? काही धीट शहाणी मुलं पहिल्या दिवशीही रडत नाहीत, घाबरत नाहीत. आपणही त्या शहाण्या-धीट मुलांसारखं वागयचं .घाबरायचं नाही. माझ्याच विचारांचं मला हसू आलं. मी आणि अरुण गोलाघाटला जाणाऱ्या गाडीत बसलो होतो. दुतर्फा चहाचे मळे, त्यांचा मंद सुवास, मधूनच भाताची शेतं आणि बांबूची बेटंही. पावसाची भुरभूर चालूच होती. सगळीकडेच हिरवाई. जमिनीचा रंग कुठे दिसतच नव्हता. 

दिब्रुगढच्या मुक्कामात खूप जणांकडून डॉ. रॉबिन बॅनर्जीबद्दल बरंच काही ऐकलं होतं. एवढा 'पद्मश्री' मिळालेला हा माणूस ! त्यांचा एकूणच जीवनपट मला थक्क करणारा होता. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनमध्ये शिकलेला, त्यांच्या संस्कारात वाढलेला, ब्रिटिश नेव्हीचा डॉक्टर म्हणून दुसऱ्या महायुद्धात अनेक देशात फिरलेला हा माणूस. महायुद्धानंतर नेव्हीतली नोकरी सोडून ते भारतात परतले आणि आसाममधील काझीरंगाजवळच्या एका चहाच्या मळ्यात निवासी डॉक्टर म्हणून त्यांनी नोकरी धरली. सकाळचे दोन-चार तास रुग्ण तपासल्यावर फावला वेळ भरपूर असायचा. मग त्या वेळात भटकंती, वन्यजीवांचा अभ्यास आणि छायाचित्रणही. त्यांच्या वन्यजीवांवरच्या अनेक लघुपटांना आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत. काझीरंगा अभयारण्याच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा सहभाग होता.

मला त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं असलं तरी त्यांना मला भेटल्यावर काय वाटेल? कसे वागतील ते माझ्याशी? मला पाहिल्यावर कदाचित कपाळावर हात मारून घेतील. म्हणतील, “ही एकटी काय शाळा सुरू करणार इथे? हिला तर शाळेचा काही अनुभव नाही. हिला आसामी भाषाही येत नाही. कशी मिसळणार ही इथल्या लोकात?”  गोलाघाट जसंजसं जवळ यायला लागलं तसा 'आपण धीट-शहाण्या मुलासारखं वागायचं' हा माझा निश्चयही डळमळू लागला. विलक्षण बैचेन झाले. बाहेर पावसानेही जोर पकडला होता. बस ड्रायव्हर मात्र अत्यंत कौशल्याने गाडी चालवत होता. गोलाघाटला आम्ही पोचलो तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. डॉ.बॅनर्जीचा बंगला बस स्टँडपासून पाच मिनिटाच्या अंतरावर आहे. ब्रिटिशांच्या काळातला प्रचंड मोठा बंगला. भक्कम दगडी बांधकाम असलेल्या या बंगल्याला अनेक सुंदर लतावेलींनी जणू आपल्या कुशीत एखाद्या मातेप्रमाणे  घेतलंय. सभोवताली प्रचंड मोठी बाग. त्यात अनेक दुर्मिळ फुलझाडे. गुलाबाच्या तर शेकडो जाती. 

कुठल्याही नवीन वास्तुत शिरताना तिथल्या प्रवेशद्वारा पासूनच मला त्या वास्तुत राहणाऱ्या लोकांचे स्वभाव कळतात, असा माझा स्वत:बद्दलचा एक उगीचच गोड (!) समज. इथल्या बागेने तर मला क्षणात आपलंसं केलं.

पण वास्तू? तिच्या भव्यतेचे दडपण आलंय का माझ्यावर? की या वास्तुत राहणाऱ्या थोर व्यक्तीचं दडपण आहे हे? कारण काहीही असो, पण या वास्तुत शिरताना हृदयाचे ठोके वाढले होते हे नक्की.

डॉ. बॅनर्जीचा नोकर जमाल याने दिवाणखान्याचे दार उघडले ते गंभीर आणि रडवेल्या चेहऱ्याने. काळजात धस्स झालं. अरुणला तो ओळखत होता. म्हणाला, "अरुणजी, डॉक्टरसाबकी तबियत बहुत खराब है। उन्हे हार्ट अटॅक आया है।"  

देवाने माझी काय सत्त्वपरीक्षा घ्यायचं ठरवलं आहे का? अरुणशी बोलताना जमाल म्हणाला, "डॉक्टरसाब तो अब ७५ बरसके हो चुके है। बहुत जबरदस्त हार्ट अटॅक है। ऐसे में जिंदगी का क्या भरोसा?" जमालच्या बोलण्याचा मला राग आला पण तो चेहऱ्यावर न दाखविता मी मनात म्हटलं, "शुभ बोल नाऱ्या !" 

मला वाटलं, हार्ट अटॅक आलाय म्हणजे ते कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये  एडमिट असतील. मी तसं विचारताच जमाल म्हणाला, "दीदी, यहाँ गोलाघाट में अच्छा अस्पताल है कहाँ? एक टूटासा सरकारी अस्पताल है, लेकीन उसकी हालत ऐसी है की वहाँ जानेके लिए तो गरीब लोग भी डरते है।" जोरहाटच्या काही तज्ज्ञ  डॉक्टरांच्या देखरेखीखाली डॉ. बॅनर्जीवर त्यांच्या निवासस्थानीच उपचार चालू होते. परिस्थिती गंभीर होती. 

बाळकृष्णनजींना डॉ. बॅनर्जी एकदा म्हणाले होते, "मी दोन स्वप्नं पाहिली होती. एक गेंड्यांच्या अभयारण्याचं - जे पूर्ण झालंय. दुसरं स्वप्न माझ्या कर्मभूमीत शाळा सुरू करण्याचं. त्यासाठी मला तुमचं सहकार्य हवंय.'' हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यूशय्येवर पहुडलेला हा निसर्गप्रेमी त्याचं दुसरं स्वप्न सत्यात येईपर्यंत जगेल का? एरवी संकटाच्या अथवा कठीण प्रसंगी मला विवेकानंद  केंद्राच्या प्रार्थनेतील "प्रभो देही देहे बलं धैर्यमन्त:' ही ओळ हमखास आठवते. आज मात्र माझ्या मनांत "तवैव कार्यार्थमिहोपजाता:" हीच ओळ का येतेय सारखी?  देवाचा खूप राग आला होता. नकळत खालचा ओठ दातामध्ये घट्ट धरला. मनातच देवाला धमकी दिली, "या पुढे बल आणि धैर्याची याचना नाही करणार तुझ्याकडे. किती परीक्षा घ्यायचीय तुला माझी ती घे. तुझ्याच कार्यासाठी इथे आलेय ना? मग माझं अपयश हे तुझंही अपयश ठरेल. आता काय करायचं ते तूच ठरव. संकटांना नाही घाबरणार मी. पण डॉ. बॅनर्जीना वाचव." 

आम्हाला दिवाणखान्यात बसवून डॉ.बॅनर्जीचा नोकर आपल्या कामाला निघून गेला. इतका वेळ दिवाण खोलीच्या भिंतीकडे माझं लक्ष गेलंच नव्हतं. आता मात्र भिंतींनीच  माझं लक्ष वेधून घेतलं. ब्रिटिश काळातला तो भव्य बंगला. भिंतींची उंचीच किमान २०-२२ फूट असावी. त्या भिंतीवर देशविदेशातून चोखंदळपणे निवडून आणलेल्या, जणू काही त्या त्या देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधीच वाटाव्या अशा शेकडो बाहुल्या कलात्मक रीतीने मांडल्या होत्या. त्यांची वैशिष्ट्ये नजरेत भरावीत म्हणून त्यांच्यावर फोकस लाइट्स लावलेले. पंचाहत्तरी उलटलेला एक अविवाहित पुरुष आणि त्याला बाहुल्यांचे  वेड? मला गंमत वाटली आणि कौतुकही. छंदाला वयाचं बंधन नसतं हेच खरं. मला ते घर वाटलंच नाही. एक छोटंसं वस्तु संग्रहालय वाटलं. दिल्लीचं Dolls House हे बाहुल्यांचं म्युझियम मी पाहिलं आहे. पण इथे बाहुल्यांच्या मांडणीतील कलात्मक दृष्टी काही औरच ! दिवाणखान्यातलं फर्निचरही मोजकंच. मालकाच्या रसिकतेची साक्ष देणारे. बंगल्याचा व्हरांडाही प्रचंड मोठा. त्यात शेकडो कुंड्यांमधून फुलं फुललेली. व्हरांड्याच्या भिंती अनेक पक्ष्यांच्या आणि फुलांच्या फोटोंनी नटल्या होत्या. त्या बंगल्यातली प्रत्येक गोष्ट पाहून मी डॉ. रॉबिन बॅनर्जीना भेटायला उतावीळ होत होते. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर मधून मधून बाहेर येत पण गंभीर चेहऱ्यानेच. अजूनही आम्हाला त्यांनी डॉ. बॅनर्जीना भेटायला परवानगी दिली नव्हती. दुपारी बारा ते संध्याकाळचे सात अशाच अस्वस्थतेत वेळ गेला. शेवटी संध्याकाळी सात वाजता त्यांना भेटायची - नव्हे बघायची परवानगी आम्हाला मिळाली.

 त्यांच्या शयनकक्षातच त्यांच्यावर उपचार चालू होते. अरुणने माझी ओळख करून दिली. "ही भारती ठाकूर." परवानगी नव्हती तरी अरुण बोललाच. काय ! ठाकूर?' एवढ्या आजारी अवस्थेतही डॉ. बॅनर्जी गूढ हसले.

"भारती, हा माझा दुसरा हार्ट अटॅक. मरणापूर्वी मला शाळा सुरू झालेली पहायची आहे ." काय बोलणार मी ? फक्त त्यांच्या हातावर माझा हात ठेवला. मूक आश्वासन दिलं, 'Thy wish will be done.' त्यांच्यावर इलाज करणाऱ्या डॉक्टरांनी बजावलं होतं, डॉ. बॅनर्जीशी बोलायचं नाही आणि त्यांना बोलूही द्यायचं नाही. म्हणून आम्ही दिवाणखान्यात परतलो.

अशा परिस्थितीत मला तिथे एकटीला न ठेवता कुणीतरी सोबत हवं म्हणून अरुणाचल प्रदेशातील विवेकानंद केंद्राची एक कार्यकर्ती अपर्णा पालकर हिला काही दिवसांसाठी बोलावून घ्यावं असं ठरलं. मलाही आनंद झाला. कारण अपर्णाताईला या भागात काम करण्याचा खूप अनुभव आहे. तिच्या अनुभवांचा आणि सोबतीचा फायदा मलाही नक्कीच होईल. 

अरुण दिब्रुगडला परतला आणि चारपाच दिवसातच अपर्णाताई गोलाघाटला पोहोचली. ती नुसती नावाची ताई नाही तर अगदी खरीखुरी ताई वाटते. संध्याकाळी आसपासच्या वस्त्यांमध्ये जाऊन आम्ही ओळखी करून घ्यायचा प्रयत्न करायचो. लोक फारशी दाद देत नव्हते. त्यांच्या नजरेत असायचं थोडं कुतूहल आणि थोडा संशय. "आमच्याशी काय काम आहे यांचं?" हा संशय मिश्रित भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा.

डॉ. रॉबिन बॅनर्जीची तब्येत झपाट्याने सुधारु लागली. सकाळी आणि दुपारी आमच्याशी भरपूर गप्पा मारत. कधी शांती •निकेतनमधल्या आठवणी तर कधी महायुद्धाच्या. काझीरंगा अभयारण्याबद्दल तर भरभरून बोलायचे. कधी जगभरातल्या अभयारण्यावर बनवलेल्या त्यांच्या फिल्मस दाखवायचे. 

एक दिवस रॉबिनदांना जरा मूडमध्ये पाहून मी विचारलं, "आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा माझं ठाकूर हे आडनाव ऐकून तुम्ही हसलात का?' माझ्या या प्रश्नावर ते पुन्हा तसंच हसले. म्हणाले, 'मी रामकृष्ण परमहंसांचा भक्त आहे. रामकृष्णांना बंगाली लोक 'ठाकूर' असंच संबोधतात. आजारपणात मी सतत 'ठाकूरां' चे स्मरण करीत असे. स्वत:दर्शन देण्याऐवजी त्यांनी दुसऱ्याच 'ठाकूर' ला पाठवलं की काय असं वाटून मला हसू आलं. हृदयविकाराचा झटका आलेल्या अवस्थेत देखील त्यांची विनोदबुद्धी शाबूत होती याचं मला कौतुक वाटलं. एवढ्या आजारपणात देखील त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हसू कधी लोपलं नाही. आमचा चांगला परिचय झाल्यावर मला चिडवण्याची एकही संधी ते सोडत नसत.

एकदा त्यांच्या अभ्यासिकेत मी गेले. डॉ.बॅनर्जी थरथरत्या हातांनी एका छोट्या टाईपरायटरवर एक पत्र टाईप करत होते. मी त्यांच्यावर थोडी रागावलेच. 'डॉक्टरांनी तुम्हाला श्रम करू नका, विश्रांती घ्या असं सांगितलंय तर तुम्ही ऐकत का नाही?' रॉबिनदा म्हणाले, 'अगं, पत्रव्यवहार हा वेळच्या वेळीच व्हायला हवा.  त्यात दिरंगाई मला नाही आवडत.'  मी त्यांना चिडवत म्हणाले, 'अगदी खासगी पत्रव्यवहार नसेल तर मी करीन की तुमची पत्रं टाईप. तुमच्यापेक्षा बराय माझा टायपिंग स्पीड.' माझ्या चिडवण्यावर मात्र रॉबिनदा गंभीर झाले.म्हणाले, 'माझ्यासारख्या माणसाच्या आयुष्यात 'खासगी' हा शब्दच नसतो. जे आहे ते लोकांचं आहे. लोकांसाठी आहे. डॉक्टरांच्या हातातून टाईपरायटर घेत मी म्हणाले, 'हं सांगा काय टाईप करायचं!' डॉक्टरांनी डिक्टेशन द्यायला सुरुवात केली,

पत्र होतं मेक्सिकोमधल्या त्यांच्या मित्राला. मजकूर होता – दोन महिन्यांनंतर Butterflies of Mexico ही फिल्म मेक्सिकोमध्ये जाऊन पूर्ण करण्याबाबतचा. माझा स्वत:च्याच कानांवर विश्वास बसेना. थोडं अविश्वासाने - थोडं काळजीनं मी त्यांच्याकडे पाहिलं तर हसत म्हणाले, विश्रांती फार झाली. आता कामाला लागलं पाहिजे. देवाचं (ठाकुरांचे) बोलावणे कधी येईल सांगता येतं का?' मीही त्यांना चिडवत म्हणाले, 'इथल्या ठाकुरांनी जायची परवानगी दिली तर ना !' आणि हो, पंचाहत्तरी पार केलेल्या युवकांनी फुलपाखरांच्या मागे या  वयात धावायचं हे जरा अति होतंय असं नाही वाटत?'  

'फुलपाखरांमागे धावायला वयानी नाही तर मनानी तरुण असावं लागतं भारती.' इति डॉ. रॉबिन बॅनर्जी. त्या दिवशी वाटलं, मी इथे शाळा सुरू करायला आलेय पण माझ्याच शिक्षणाची तर आता कुठे सुरुवात होतेय.

                                                                                                                                    
भारती ठाकूर 
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन 
मध्य प्रदेश

Website -
http://narmadalaya.org/

Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo

Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/

Dr. Robin Banerjee -

Comments

  1. कथनात कुठेही आत्मप्रौढी नाही, फक्त आसुसून प्रत्येक गोष्टीतून चांगलं तेच पहाण्याची वृत्ती असल्यामुळे मुळात चित्तथरारक असलेल्या अनुभवांना वेगळीच उदात्त उंची लाभते.
    मला फार आवडते ही लेखमाला

    ReplyDelete
  2. श्रम पेरून बहरलेली ही अनुभवांची समृद्ध बाग आहे !
    कधी एकदा लेख येतोय् आणि तो वाचतोय् असं होतं ! !

    ReplyDelete
    Replies
    1. Very nice. Would love to read it on radio and you tube.
      My wup no is 9890650433. We can talk. thanks.

      meenakshi

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....

मातृत्व