मातृत्व
मातृत्व
“तू नर्मदालयात का येत नाहीस ? बघ, इथली मुलं कशी छान खेळतात आणि अभ्यासही करतात”. कडेवर एक आणि हातात धरून एक अशा दोन छोट्या मुलींना आत्मविश्वासाने सांभाळणाऱ्या त्या सात वर्षाच्या कन्येला मी विचारलं.
“या दोघी मोठ्या झाल्या की त्यांना पाठवणार आहे मी नर्मदालयात. मला वेळ कुठे असतो नर्मदालयात यायला ?”
माझ्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्नचिन्हं उमटली असावीत. घसरगुंडीवर खेळणाऱ्या दुसऱ्या मुलीने माहिती पुरवली –
“दीदी, ही सोनी दाडकी (मजुरी) करायला जाते. ती कशी येईल नर्मदालयात ?”
लेपा (बैरागढ) येथे आमच्या ‘निमाड अभ्युदय’ या संस्थेच्या वाढलेल्या कामाच्या व्यापामुळे माझं आजकाल भट्टयाण येथे नर्मदा किनारी असलेल्या नर्मदालयात वारंवार जाणं होत नाही. लॉक डाऊनच्या काळात तर तिथे जाणं शक्यही नव्हतं. त्यामुळे गेल्या दोन वर्षात नव्याने यायला लागलेल्या मुलांच्या कौटुंबिक स्थितीबद्दल मी जरा अनभिज्ञच होते. पण या मुलीच्या कहाणीने मात्र मला अस्वस्थ केलं.
सोनी आमच्या नर्मदालयाच्या जवळच राहते. दिवसभर ती कधीच दिसत नाही. फक्त संध्याकाळीच घसरगुंडी खेळायला तिच्या बरोबर दोन छोटया मुलींना घेऊन येते. लॉक डाऊनच्या काळापासून आम्ही संध्याकाळी देखील पौष्टिक आहार आसपासच्या सेवा वस्तीतल्या मुलांना देत होतो. तो खाऊन झाला की “नर्मदे हर दीदी” असं म्हणून निरोप घेणारी सोनी दिवसभर शेतात काम केल्यावर थकून भागून घरी येते. चुलीवरचा स्वयंपाक आणि नंतर भांडी घासणं यासारखी घरातली पुढची कामं तिला डोळ्यासमोर दिसत असतील. पण तरीही ती त्या दोन छोट्या मुलींना घेऊन घसरगुंडी खेळायला येते. नर्मदालयात संध्याकाळीसुद्धा राधूकाका पोहे, उपमा, मिसळ किंवा खिचडी बनवतात. त्यासोबत ग्लासभर दूध आणि एक फळ असा संध्याकाळचा पौष्टिक आहार असतो. सोनी हे सारं बरोबरच्या दोन लहानग्या मुलींना खाऊ-पिऊ घालून मगच स्वत: खाते आणि घाईने घरी परत जाते.
प्रसन्न चेहऱ्याची आणि हसतमुख अशी चिमुरडी ‘सोनी’ फक्त सात वर्षाची असली तरी ती आई आहे दोन छोटया मुलींची. हे मातृत्व तिच्यावर तिच्यावर निसर्गाने लादलेलं नाही अथवा तिने स्वत:हून स्वीकारलेलं नाही. तिच्या जन्मदात्या आईनेच स्वत:च्या दोन लहानग्या मुली सोनीवर सोपवून हे मातृत्व तिच्यावर लादलं आहे. तिची आई नवऱ्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून कायमची निघून गेली आहे.
सोनीचे वडील फारसं काही कमवत नाहीत. कमावलंच काही तर ते सगळं दारूच्या व्यसनात खर्च होतं. मग घर चालवण्यासाठी सोनीला कधी इतरांच्या शेतात कापूस तोडण्याचं काम करावं लागतं तर कधी दुसऱ्यांची गाई गुरे चरायला घेऊन जावं लागतं. कापूस तोडीच्या दिवसात ती किमान वीस किलो कापूस रोज तोडते. त्याचे तिला सहा रुपये किलो प्रमाणे एकशे वीस रुपये मिळतात. गाई गुरे चरायला नेते त्याचे किती पैसे मिळतात ते तिला सांगता येत नाहीत. “उसके पैसे रोज नही मिलते” असं मोघम उत्तर ती देते. कमावलेल्या पैश्यावर तिचा हक्क नसतो हे तिच्या फाटक्या कपड्यांवरूनच लक्षात येते. तिची कमाई घरातच खर्च होते. कदाचित त्याचा मोठा हिस्सा वडलांच्या दारूसाठी देखील खर्च होत असावा. सोनीची म्हातारी अन् सतत आजारी अशी आजी पण घरात असते. आजीच्या औषधपाण्याचा खर्च देखील सोनीच्याच कमाईतून होत असावा. तिच्या दोन लहान बहिणी कायमच तिच्या बरोबर असतात. एक कडेवर असते तर दुसरी सोनीचा हात धरून चालते. तिच्या शेजारपाजाऱ्यांना सोनी शेतात काम करते अथवा गुरे चारायला नेते याचे काही विशेष वाटत नाही. कारण त्यांची स्वत:ची मुलंदेखील कापूस तोडीच्या हंगामात शेतात मजुरीला जातात.
बाल मजुरी, बाल हक्क वगैरे कायद्यातल्या संकल्पना इथे कुणालाही आठवतील. मलाही आठवल्या. स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं सोनीला एखाद्या अनाथ आश्रमात अथवा सरकारी वसतिगृहात ठेवावं असं सतत मनात यायचं. पण मग माझ्याचकडे का नको ? एक दिवस धाडस करून मी तिला विचारलं, “सोनी, तू माझ्याकडे येशील का रहायला ? तुला शेतात काम करावं लागणार नाही आणि शाळाही शिकता येईल. मी विचारीन तुझ्या वडलांना”.
“नाही – नाही. या दोघींना कोण सांभाळणार मग ? त्यांना भूक लागली की त्या रडतात. त्यांना जेवू कोण घालेल ? बा मारेल ना त्यांना त्या रडल्यावर. दारू प्यायल्यावर त्याला कुठे काय कळतं ?” सोनी तिच्या बाजूलाच बसलेल्या दोन्ही बहिणींना जवळ घेत म्हणाली. त्यांना सोडून जायच्या कल्पनेनेच तिचे डोळे भरून आले होते.
“मग आपण या दोघींनाही घेऊन जाऊ तुझ्यासोबत.” मी तिच्या मनाची तयारी करत होते.
“नको नको. माझ्या आजीकडे कोण बघेल मग ? तिच्याकडून काम होत नाही.” सोनी घाईघाईने म्हणाली. हे असे संवाद नंतर अनेकदा झाले. घर न सोडण्याचा तिचा निर्णय ठाम असतो.
नवरात्रात भट्टयाण येथील नर्मदालयात मी रोज पूजेला जात असे. देवीची पूजा करतांना माझ्या डोळ्यासमोर चेहरा मात्र सोनीचाच यायचा. अष्टमीच्या दिवशी सेवा वस्तीतल्या मुलींसाठी त्यांच्या वयानुसार आणि मापानुसार कपड्यांचं वाटप आम्ही करत होतो. सोनी थोडी उशिरा पोहोचली. तिच्या बहिणींसाठी मापाचे कपडे मिळाले. सोनीच्या वयाची आणखी एक मुलगी होती अन् फ्रॉक मात्र एकच शिल्लक होता. माझ्यासमोर पेच-प्रसंग निर्माण झाला. काय करायचं ? दुसऱ्या दिवशी त्या मापाचा फ्रॉक आणून देता आला असता पण इतरांबरोबर आपल्याला नवीन फ्रॉक मिळाल्याचा आनंद मात्र त्या दोघींना मिळाला नसता.
सोनीने माझा प्रश्न तत्काळ सोडवला. “दीदी, हा फ्रॉक तुम्ही ज्योतीला द्या. मी नंतर घेईन.”
स्तिमित होऊन मी सोनीकडे बघतच राहिले. जबाबदारी घेणं, आपुलकी, प्रेम, समाधान, प्राप्त परिस्थितीला हसतमुखाने तोंड देणं आणि दिवसभर कष्ट करूनही तणावमुक्त जगणं - या गोष्टी ही मुलगी कुठल्या पाठ्यक्रमात शिकली असेल ? पूर्व प्राथमिक, प्राथमिक – माध्यमिक वगैरे पायऱ्या न चढता एकदमच वास्तव जगाच्या ‘विश्व विद्यालयात’ हिला प्रवेश कसा मिळाला ? काय होती हिची पूर्व पुण्याई ? की होता काही पूर्वाभ्यास गतजन्मीचा?
सोनीला औपचारिक शिक्षण देणाऱ्या शाळेत घालून तिला स्पर्धेच्या जगात ढकलण्याचे पाप तर माझ्याकडून होणार नाही ? भविष्यात ‘पॅकेज’वाल्या नोकरीची स्वप्नं तर तिला पडणार नाहीत ? Be practical – असं म्हणत स्वत:च्या प्रगतीसाठी सोनी तिच्या बहिणींना तर विसरणार नाही ? अनेकदा हे विचार मला अस्वस्थ करतात.
‘काळजी करू नकोस – मी आहे ना तुझ्या बरोबर’ असं बोलण्याची संधी देखील कुणाला न देणारी ‘सोनी’ मला मात्र अनेक आघाड्यांवर जगण्याचं बळ देत असते.
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com
Website -
https://narmadalaya.org/
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/
Nimar Abhyudaya Rural Management And Development Association (N.A.R.M.A.D.A) Documentary -
https://www.youtube.com/watch?v=9uU0PbZHqqc&t=155s
Aaj Tak India
ReplyDelete