गोष्ट एका शाळेची (भाग 2)

गोष्ट एका शाळेची  (भाग 2)


गोलाघाट - स्वप्नातलं वाटावं असं हे टुमदार गाव. गावाच्या चहू बाजूंनी चहाचे मळे तर गाव वेगवेगळ्या वृक्षांनी नटलेलं. महाराष्ट्राचे राज्यपुष्प ताम्हण' याचे वृक्ष इथे शेकडोंच्या संख्येने आहेत. आसामच्या राज्यपुष्पाचे नाव नॉहोर. पांढऱ्या रंगाचे आणि आत पिवळे पराग असलेलं हे नाजूक फुल. नॉहोर वृक्षही बहरले की पाने दिसतच नाहीत. या वृक्षांच्या जोडीने गुलाबी कॅशिया, गुलमोहोर, बकुळ आणि अमलताश (बहावा) यांचेही अनेक वृक्ष गोलाघाटमध्ये आहेत. प्रत्येक ऋतुत गोलाघाट गावाला कुठली ना कुठली फुलं माळता यावीत अशीच जणू काही निसर्गाची रचना. इथली घरंही देखणी. बांबूच्या भिंतींना मातीचे नाहीतर सिमेंटचे प्लॅस्टर असते. पर्जन्यमान जास्त असल्याने घरं उतरत्या छपराची. प्रत्येक घरासमोर छोटी का असेना पण बाग असतेच. परसदारी पुखरी (छोटेसे तळे),फणसाची व सुपारीची झाडं आणि स्वत:च्या कुटुंबाला पुरेसा भाजीपाला लावलेला असतो. इथल्या गृहिणी खरंच 'सुगृहिणी' आहेत. घर नेहमीच नीटनेटकं आणि कलात्मक पद्धतीने सजवणाऱ्या. स्वयंपाक घर छोटंसंच आणि आवश्यक तेवढंच सामान असलेलं असतं.

आसामी लोकांची भाषा ऐकत राहावी अशी. 'ओ' कारान्त शब्दांचा ते जास्त वापर करतात. इथल्या लोकांना हिंदी समजते पण सराव नसल्याने ते थोडे बुजतात बोलायला. अनेक वर्ष आसाम -अरुणाचल प्रदेशात राहिल्याने माझ्याबरोबर काही दिवस राहायला आलेली अपर्णाताई मात्र आसामी चांगलं बोलायची. 

असंच एक दिवस आम्ही भाजी बाजारात गेलो. समोरून एक महिला भाज्यांच्या पिशव्या हातात घेऊन येत होती.   गोरीपान आणि सुंदर. काठ पदराची इंदुरी साडी नेसलेली. गळ्यात मंगळसूत्र आणि कानात कुड्या. हसरा प्रसन्न चेहरा, जुन्या मराठी-हिंदी सिनेमातल्या प्रेमळ वहिनीच्या चेहऱ्यावर असतात तसेच प्रेमळ भाव याही महिलेच्या चेहऱ्यावर होते. मी अपर्णाताईला म्हटलं, ''या बाई नक्की मराठी आहेत." अपर्णाताई म्हणाली, ''गोलाघाटमध्ये इंडस्ट्रिज नाहीत किंवा केंद्र सरकारी कार्यालयेही नाहीत, मग मराठी माणसे इथे कशाला येतील? पण हरकत नाही. आपण त्यांना विचारून तर पाहू.'' आम्ही जवळ जाऊन त्यांना विचारलं, '' क्या आप महाराष्ट्रीयन है?'', ''हाँ'' त्या उत्तरल्या. घाईघाईने मी मराठीत बोलले, ''आम्ही दोघीही मराठीच आहोत.'' आमचा पूर्ण परिचय आम्ही दिल्यावर त्या म्हणाल्या, ''मी मिसेस मंगला फडकर. माझे पती आर्मी ऑफिसर आहेत. इथे ते NCC मध्ये deputation वर आले आहेत. महाराष्ट्रात आमचं गाव नाशिक." त्यांच्या तोंडून नाशिकचं नाव ऐकताच माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. मी म्हणाले, 'अहो, मी देखील नाशिकचीच.'' आमच्या या भेटीला निव्वळ योगायोग मानायला माझं मन तयार होत नाही. आम्हाला त्यांच्याकडे येण्याचे आग्रहाचे आमंत्रण त्यांनी दिले. त्यांच्या घरी त्यांचे पती कर्नल फडकर व दोन अतिशय गोंडस आणि लाघवी मुली मोहिनी व अश्विनी यांची भेट झाली. अत्यंत सुसंस्कृत वाटलं हे कुटुंब.   पहिल्याच भेटीत त्यांना दादा-वहिनी हक्काने म्हणावं असं वाटण्याएवढी आपुलकी या कुटुंबाने आम्हाला दाखवली. आपल्या नाशिकचं कुणीतरी या परक्या गावात आहे ही जाणीवच मोठी सुखद होती. गोलाघाटला आल्यापासून तशी निराश मन:स्थितीतच होते. फडकर कुटुंबियांच्या भेटीने मात्र  मनाला नक्कीच उभारी मिळाली. 

सकाळी नऊ वाजले की रॉबिनदा व्हरांड्यात येऊन बसायचे. मग आमच्या गप्पा सुरू व्हायच्या.  त्यांच्या लहानपणीच्या अनेक आठवणी ते सांगत. ब्रिटिशांच्या राजवटीत त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते.  रॉबिनदा सहा वर्षाचे  असतानाच  त्यांची आई वारली.  वडिलांची फिरतीची नोकरी.  त्यामुळे लहानग्या रॉबिनला (खरं तर त्यांचं नाव  रविन. बंगाली  उच्चार होतो  रोबिन  आणि ब्रिटिशांनी त्याला केलं रॉबिन) शांतिनिकेतन मध्ये ठेवावं लागलं. 

शांतिनिकेतनच्या आठवणी सांगताना  रॉबिनदा  रंगून जात. “सहा सात वर्षांचा असतानाच  वडलांनी मला शांतिनिकेतन मध्ये ठेवलं. खरं तर माझ्या वयाची मुलं तिथे फार नव्हतीच. जी होती ती तिथल्या शिक्षकांची किंवा इतर सहकाऱ्यांची होती.  आमच्या  कुटुंबाचा आणि रवींद्रनाथ टागोर यांचा घनिष्ठ परिचय होता, म्हणून मी इतक्या लहानपणी तिथे राहू शकलो.  संध्याकाळी मला लवकर झोप येई.  सात आठ वाजेच्या सुमारासच  माझे डोळे जड व्हायचे.  मी चक्क रवींद्रनाथांच्या खोलीत त्यांच्या पलंगावर जाऊन झोपायचो तर कधी त्यांच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपायचो.   शांतिनिकेतन मध्ये चारू मासी नावाची  एक सहायिका होती.  माझ्यावर ती सख्ख्या  मावशी प्रमाणेच प्रेम करायची.  सकाळी मला जेंव्हा जाग यायची तेंव्हा मी माझ्या अंथरुणावर असायचो. अनेक दिवस मला हे गौड बंगाल  कळायचं नाही. मी तर रवीन्द्रनाथांच्या-  (आम्ही त्यांना गुरुदेव म्हणायचो) पलंगावर झोपलो होतो  आणि सकाळी माझ्या अंथरुणावर कसा पोहोचलो ? चारूमासी म्हणायची की एक परी येऊन मला माझ्या अंथरुणावर नेऊन ठेवते.  कधीकधी आईची आठवण आली की रडू यायचं.  अशावेळी  चारूमासीने मला थोपटून अंगाईगीत म्हणत झोपवल्याचं देखील आठवतं. चित्रकलेचं वेड मला शांतिनिकेतनातच लागलं. शांतिनिकेतन मधला पौष उत्सव आणि वसंतोत्सव मी कधीच विसरू शकणार नाही. तिथलं एकेक झाड देखील माझ्या परिचयाचे आहे. कित्येक झाडं आम्ही मुलांनीच लावली होती. आम्ही नेमानं  त्यांना पाणी  घालत असू. ” ह्या आठवणी ते सांगत असताना त्यांच्या डोळ्यात मला अख्खं शांतिनिकेतन दिसायचं. माझ्या “I envy you” या वाक्याने आमच्या गप्पांचा समारोप व्हायचा . 

डॉ. बॅनर्जीची तब्येत सुधारत होती  तरी त्यांना भेटायला येणाऱ्यांची संख्याही भरपूर . त्यामुळे म्हणावी तशी विश्रांती त्यांना मिळत नव्हती. . मला म्हणूनच त्यांच्या तब्येतीची काळजी वाटायची . काही माणसं रॉबिनदांशी बोलताना उगीचच भोचकपणा करायचे. कधी होणार तुमची शाळा? असा विषय काढला की  रॉबिनदांची चिंता वाढायची . शाळा काय एक दिवसात सुरू करायची गोष्ट आहे का? या लोकांना हे सगळं समजावून सांगताना मला कधी कंटाळा तर कधी उद्वेग यायचा . जिथे शाळेचं बांधकाम व्हायचं आहे ती जागा म्हणजे एक छोटंसं जंगलच होतं . भरपूर झाडी आणि ५-६ फूट उंचीचे दाट गवत. रस्त्याच्या पलीकडे एक प्रचंड मोठी पुखरी आहे. गोलाघाटचे लोक तिला 'जमना' म्हणतात. वर्षभर या पुखरीत भरपूर पाणी असते म्हणे. 

गोलाघाट जेमतेम 20 -25  हजार वस्तीचं गाव. पण इथे तीन  इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. पैकी दोन Convent Schools. शिवाय सरकारी शाळा आहेतच.  असं असताना डॉ. रॉबिन बॅनर्जीना अजून एक शाळा का हवीय? त्यांच्याशी या विषयावर बोलले तर म्हणाले, "तुझी शंका बरोबर आहे. पण या ज्या शाळा गोलाघाटमध्ये आहेत त्यात विद्यार्थी कुठे आहेत? त्यात तर फक्त परीक्षार्थीच आहेत. खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीची ओळख कुठे घडतेय मुलांना या शाळांमधून? पर्यावरणाचे संतुलन, रक्षण, निसर्ग व वन्यप्राण्यांशी मैत्री हे कुठं शिकवतात यांचे शिक्षक? मुलांना हे सारं शिकवणारी शाळा मला हवीय. माणसा-माणसांवर प्रेम करणारी, भारतीयत्वाचा अभिमान बाळगणारी नवी पिढी या शाळेतून घडायला हवीय." 

डॉक्टर रॉबिन बॅनर्जी हे सारं बोलत असतांना वाटलं, ती भव्य वास्तू हसत म्हणतेय, "तथास्तु!''

भारती ठाकूर 
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन 
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com

Contact Person -
Nilesh Giri 
Mobile no. - 6266370705

Website -
http://narmadalaya.org/

Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo

Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/

Comments

  1. ' गोलाघाटच्या अनुभवांचं पुस्तक आहे का ? नसेल तर या ब्लॉगवर तिथल्या आठवणी दीदी लिहितील का ? ' असे प्रश्न सारखे मनात येतच होते .

    आणि दीदींचं मन गोलाघाटमधे शिरलं .
    मी पण याला निव्वळ योगायोग मानायला तयार नाही.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....