गोष्ट एका शाळेची (भाग 3)
गोष्ट एका शाळेची (भाग 3)
1985 नंतरचा हा काळ आसाम राज्याच्या दृष्टीने परिवर्तनाचा काळ होता. 1979 पासून सुरू झालेलं आसाम आंदोलन मुख्यत: बिहारी आणि बंगाली लोकांच्या - त्यातही विशेष करून बांग्लादेशी घुसखोरांच्च्या विरोधात होतं . ब्रिटिश काळात चहाचे मळे विशेष करून इंग्रजांच्या ताब्यात होते. मजूरी कमी द्यावी लागते म्हणून त्यांनी बिहारी मजुरांना या चंहाच्या मळ्यांमध्ये काम करण्यास प्रवृत्त केलं.मुनीम किंवा ठेकेदारांच्या रूपात बंगाली लोक आले. आदिवासी बाहुल्य असलेला हा प्रदेश. त्यातही स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाच्या संधी या प्रदेशात फार कमी असल्याने व्यापार प्रामुख्याने मारवाडी लोकांच्या ताब्यात होता. 1971 च्या बांगला देश (पूर्व पाकिस्तान ) युद्धानंतर लाखों बांग्लादेशी मुसलमान भारतात शरणार्थी म्हणून आले. आसामी लोकाना रोजगार मिळेनासा झाला. प्रश्न आता फक्त रोजगाराचा न राहता आसामी जनतेच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा झाला होता. या आंदोलनात ऑल आसाम स्टुडंट्स यूनियन (AASU - आसू) या संघटनेचा प्रामुख्याने सहभाग होता. प्रचंड नर संहार हे या आंदोलनाचे वैशिष्ट्य . चार लाखाहून अधिक बांग्लादेशी घुसखोरांना मतदानाचा अधिकार दिला या कारणास्तव 18 फेब्रुवारी 1983 साली आसाम मधील नगाव जिल्ह्यातील नेल्ली आणि आसपासच्या गावात या आंदोलकांनी जो नर संहार केला तो देशातला आजवरचा सगळ्यात मोठा नरसंहार होता (त्यात दहा हजाराहून अधिक लोक मारले गेले.अधिकृत सरकारी आकडा 2191- संदर्भ विकिपीडिया) असे म्हणतात. 1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या मध्यस्थीने आसाम करार होऊन हे आंदोलन थांबलं असं वाटत होतं. पण नंतर उल्फा (यूनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम) या माओवादी आतंकी संघटनेने डोकं वर काढलं. स्वतंत्र आसामची त्यांची मागणी होती. आणि सशस्त्र क्रांतीने आसाम भारतापासून वेगळा व्हावा हा त्यांचा प्रयत्न होता.
1985 साली विधान सभा निवडणूका होऊन नव्यानेच स्थापन झालेल्या आसाम गण परिषदेचे सरकार सत्तेवर आलं होतं. ऑल आसाम स्टुडंट्स यूनियनचे तरुण आंदोलक आता राज्यकर्ते म्हणून सत्तेवर आले होते. सत्तेत सहभाग न मिळालेल्या असंतुष्ट आंदोलकांचा एक वर्ग कुरबुरी करत होताच. थोडक्यात काय तर 1987 साली मी आसाममध्ये पोचले तेंव्हा वरवर शांतता वाटत असली तरी आसाम राज्य आतून धुमसत होतेच.
गोलाघाट हे गाव छोटं असलं तरी छूटपूट घटना होत राहत. गावकऱ्यांमध्ये उल्फा आतंकवाद्यांचा एक प्रकारचा धाक असायचा. AASU(All Assam Students Union) च्या कार्यकर्त्यांचा वचक पण होताच. नाशिक किंवा कन्याकुमारीला असतांना या राजकीय किंवा आतंकवादी घडामोडींचा मी कधी गंभीरपणे विचार केला नव्हता. गोलाघाटला आल्यावर आतंकवाद म्हणजे काय याची जाणीव व्हायला लागली. माझं जीवन शिक्षण सुरू झालं होतं.
या पार्श्वभूमीवर जन्माने बंगाली पण कर्मभूमी आसाम असलेल्या रॉबिनदांनी - अर्थात पद्मश्री डॉ रॉबिन बॅनर्जी यांनी कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राला शाळा बांधायला जमीन दान दिली त्याबद्दल गोलाघाटच्या लोकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती आणि राग पण होता . जमीन दान देऊन दीड वर्ष होत आलं पण अजून त्यावर काहीच काम कसं सुरू होत नाही म्हणून लोकांमध्ये काही चर्चाही चालू असायची. रॉबिनदांचे मित्रही त्यांच्याशी त्याच विषयावर सतत बोलत असत. रॉबिनदा नुकतेच हृदयविकाराच्या झटक्यातून सावरले होते . स्वत:च्या तब्येतीची काळजी, वाढते वय आणि लोकांच्या शाळेबद्दलच्या भोचक चौकशा यामुळे तेही निराश झाले होते . त्यांना डिप्रेशनचा अटॅक तर येणार नाही ही काळजी मला लागली होती .
बऱ्याचदा बोलता बोलता त्यांचे डोळे भरून येत. अशा वेळी काय करावं मला सुचायचं नाही. शाळेचं बांधकाम आपल्या डोळ्यादेखत व्हावंही त्यांची इच्छा मी सारखी पत्र लिहून विवेकानंद केंद्राचे महासचिव श्री. बाळकृष्णनजी यांना कळवत असे . माझ्या हातात तेवढंच होतं . शेवटी माझ्या प्रयत्नांना आणि प्रार्थनेला यश येणार असं वाटलं . २७ ऑक्टोबरला सकाळी भूमिपूजन आणि संध्याकाळी डॉ. रॉबिन बॅनर्जीचा जाहीर सत्कार करायचा ठरलं. तसं पत्र देखील कन्याकुमारीहून आलं. २७ ऑक्टोबर १९८७ कार्यक्रमासाठी कन्याकुमारीहून श्री बालकृष्णनजी, कोलकात्याहून अवस्थीजी , गोहाटीहून सतीश कामत आणि विश्वासजी वगैरे बरीच मंडळी जमली होती. आम्ही सगळेच आनंदात होतो. पण मला डॉ. बॅनर्जीचा आनंद विशेष वाटला . इतकी वर्ष त्यांनी उराशी जे स्वप्न बाळगलं ते साकारायला आता सुरुवात होणार.
भूमिपूजनाचा मुहूर्त सकाळी साडेदहाचा होता . ज्या जागेवर भूमिपूजन आणि सत्कार समारंभ ठरला होता तिथे प्रचंड गवत वाढलं होतं ते साफ करून घेतलं. स्टेज, मांडव, ध्वनिक्षेपक या सर्वांची सोय झाली. गावात अनेकांकडे जाऊन मी कार्यक्रमाचे आमंत्रणही देऊन आले. केंद्राचे सर्वच कार्यकर्ते या कामात सहभागी झाले होते. ठरल्यावेळी भटजी आले अन् मुहूर्तावर पूजा सुरूही झाली आणि अचानक लोक मोर्चा घेऊन निदर्शनं करायला आले . "We don't want your school- go out of Golaghat." या एका घोषणेखेरीज त्यांचे बाकीचे बोलणे आसामी भाषेतून. त्यामुळे मला काय घडतंय, ही माणसं का चिडली आहेत, काही कळेना. आमच्यापैकी सतीश कामत हा गोहाटीचा कार्यकर्ता त्यांच्याशी बोलायला पुढे आला.त्याने तसंच बाळकृष्णनजी, विश्वासजी व डॉ. बॅनर्जी यांनी निदर्शने करणाऱ्यांशी चर्चा केली. निदर्शनं करणारे तावातावाने बोलत होते. ५-६ मुलांचा एक ग्रुप मात्र या चर्चेत भाग घेत नव्हता. गुलमोहराच्या झाडाखाली उभं राहून ती मुलं फक्त निरीक्षण करत होती. सुरुवातीला ते आपसात काहीतरी बोलत होते. पण त्यांच्या म्होरक्याने त्यांना शांत केले.
चर्चा करून निदर्शनं करणारे निघून गेल्यावर मी सतीश कामतला काय घडलं ते विचारलं. तो म्हणाला, गोलाघाट मधली जमीन कन्याकुमारीच्या संस्थेला रॉबिनदांनी दान केलीम्हणून सर्वजण चिडले आहेत. बाहेरच्या राज्यातल्या लोकांनी इथे येऊन शाळा किंवा कुठलीही संस्था सुरू करणं हे त्यांना त्यांच्या संस्कृतीवरचं आक्रमण वाटतंय. मुळात आसामी लोकांना इतर राज्यातली माणसं खपत नाहीत. त्यातही बंगाली तर मुळीच नाहीत. डॉ. बॅनर्जी बंगाली, स्वामी विवेकानंदही बंगाली त्यामुळे इथे कुठलीशी बंगाली संस्था सुरू होईल, अशी त्यांना भीती वाटतेय. पण आम्ही त्यांना आश्वासन दिलंय की, ही शाळा गोलाघाटच्याच मुलांसाठी आहे आणि या शाळेमुळे तुमच्या संस्कृतीला धोका तर नाहीच पण तिचं जतन-संवर्धन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. हा मोर्चा फक्त एकाच संस्थेचा नव्हता तर नामघर, शंकरदेव समिती तसंच 'आसू' सारख्या आंदोलक संघटनेने देखील त्यात भाग घेतला होता. रॉबिनदांचा नोकर जमाल याने आणखी माहिती पुरवली- फक्त 'आसू'चेच नाही तर दहशतवादी संघटनेचे लोकही मोर्चात होते. मी ते सर्व ऐकून गंभीर झाले होते म्हणून मला चिडवत सतीश म्हणाला, 'घाबरू नकोस. दहशतवाद्यांशी लढायला भारतीला एक पिस्तुल द्या, असं सांगतो मी बाळकृष्णजींना.' तो मला चिडवतो आहे हे माहीत असूनही मला त्या क्षणी हसू आलं नाही. मी म्हणाले, “मला पिस्तुलाची गरज नाही. सगळेच वाद पिस्तुलाने सुटत नाहीत”. संध्याकाळी डॉ.बॅनर्जीचा सत्कार समारंभ मात्र व्यवस्थित पार पडला. विवेकानंद केंद्रातर्फे गोलाघाटला जी शाळा सुरू करण्यात येणार आहे त्या संबंधीचे माहितीपत्रक व मदतीचे आवाहन पत्रक यावेळी उपस्थितांना देण्यात आले. इतके दिवस डॉ. बॅनर्जीना जे नैराश्य आलं होतं ते या सत्कार समारंभामुळे जाईल, असं आम्हाला वाटत होतं पण सकाळच्या त्या घटनेमुळे ते अधिकच वाढेल, अशी मला भीती वाटली .
२८ ऑक्टो. १९८७. रात्रभर मला विचारांमुळे झोप आली नाही. काय आणि कसं काम करायचं गोलाघाटमध्ये ही एकच चिंता होती. सकाळी साडेनऊ वाजता बाळकृष्णनजींनी मला बोलावलं आणि म्हणाले, 'कालच्या घटनांमुळे निदान काही महिने तरी तुला गोलाघाटला ठेवता येणार नाही. तू तिनसुकिया येथील विवेकानंद केंद्रात थोडे दिवस रहा. गोलाघाटच्या शाळेचं बांधकाम कधी सुरू करायचं ते नंतर ठरवू.' माझ्या चेहऱ्यावरची नाराजी पाहून सतीश म्हणाला, 'काल निदर्शने करणाऱ्यांनी तुम्ही बांधकाम कसे सुरू करता आम्ही पाहून घेऊ,' अशी धमकी दिलीय. त्या लोकांना थोडं शांत होऊदे. बांधकामाची घाई नको. डॉ. बॅनर्जीही तिथेच बसले होते. त्यांच्या उदास चेहऱ्याकडे पाहाण्याची माझी हिम्मत झाली नाही. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं मीच मला वचन दिलंय. त्यांना जशी ही शाळा सुरू झालेली पाहायची आहे तशीच मलाही पाहायची आहे. डॉ. बॅनर्जी इतकीच मीही उदास आणि अस्वस्थ. मी निराश झाले की माझा सखा Richard Bach नेहमी माझ्या मदतीला धावतो. आजही तो तत्परतेने आला आणि माझ्या कानात कुजबुजला.
"You are never given a Wish
Without being given the Power
To make it TRUE.
You may have to work for it, however."
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com
Contact Person -
Nilesh Giri
Mobile no. - 6266370705
Website -
http://narmadalaya.org/
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/
खूप दूरच्या, परक्या मुलुखात, भयाच्या छायेत, पाय रोवून नुसतं उभं राहायचं नव्हतं. तर विरोधी वातावरणात नवीन शाळा काढून तिथल्या स्थानिकांची मनं जिंकायची होती.
ReplyDeleteही अचाट कामगिरी तुम्ही यशस्वीपणे तडीस नेलीत !
दीदी, आपको सलाम !
🙏