गोष्ट एका शाळेची ( भाग 4)

गोष्ट एका शाळेची ( भाग 4)


गोलाघाटला भूमिपूजनाच्या वेळी वेगवेगळ्या संघटनांनी केलेल्या निदर्शनांमुळे काही दिवसांसाठी मला गोलाघाट सोडून कधी आसाममधील तिनसुकिया येथे तर कधी नागालँड मधील दिमापूर येथील विवेकानंद केंद्रात रहावं लागलं. दोन्ही ठिकाणी योगासन वर्ग घेण्यापलीकडे माझ्यावर फारशी काही जबाबदारी नव्हती. दिवस वाया जात होते आणि मला तर प्रत्येक क्षण महत्त्वाचा वाटत होता. केवळ योगासन वर्ग घेण्यासाठी आपण इथे आलो आहोत का? त्यापेक्षा नाशिकला परत जावं हेच बरं. उदासी दिवसेंदिवस वाढत होती . सुदैवाने ईशान्य भारतातील २२ महाविद्यालयीन युवतींना घेऊन कन्याकुमारीला 'व्योमा' या अखिल भारतीय युवा शिबिराला जायची संधी मिळाली. कन्याकुमारीला पोहोचल्यावर माननीय श्री. बाळकृष्णनजी व डॉ. लक्ष्मीकुमारी यांच्याशी या संदर्भात बोलले. अर्थातच माझ्या परत जाण्याला दोघांनीही नकार दिला. श्री. बाळकृष्णनजी म्हणाले, "गोलाघाटला राहशील एकटी?"
"हो, फक्त डॉ. बॅनर्जीच्या घरी राहाणार नाही. कारण त्या भव्य वास्तूत सर्वसामान्य माणसं सहज येऊ शकत नाहीत. शिवाय तिथे मला बालवाडी, संस्कारवर्ग, योगासन वर्ग यासारखे कार्यक्रम सुरू करता येणार नाहीत. त्यापेक्षा मी भाड्याने घर घेऊन तिथे हे सर्व सुरू करेन." मी म्हणाले. माझ्या या प्रस्तावाला दोघांनीही आनंदाने मान्यता दिली. मीही उत्साहाने गोलाघाटला परतले. मला एकटीला भाड्याने घर कोण देणार एवढ्या छोट्या गावात? पण दोन दिवसातच जगत गोस्वामी रोडवरचा ६ खोल्यांचा एक बंगलाच भाड्याने मिळाला. शांत वातावरणातला आणि आजूबाजूला भरपूर मोकळी जागा असलेला. भाडं दरमहा फक्त ६००रुपये. डिपॉझिट नाही. बंगल्याच्या मालकिणी चार बहिणी होत्या. दीप्ती गोस्वामी गोलाघाटच्या कॉलेजमध्ये इंग्लिशची प्राध्यापिका होती . तृप्ती शिक्षिका तर मोठ्या दोघी घरीच असत. मी भाड्याने घेतलेल्या घराजवळच त्यांचेही घर होतं .
चौघीही गोस्वामी भगिनी मोकळ्या स्वभावाच्या असल्याने मला त्यांच्याशी मैत्री करणं सोपं झालं. त्यांचे वडील गोलाघाट मधले प्रसिद्ध वकील होते. त्यांचा इंग्लिशचा चांगला अभ्यास असावा. कारण दर्जेदार इंग्रजी पुस्तकांनी त्यांच्या घरातील कपाटे गच्च भरली होती. चौघीही सुंदर गाणाऱ्या. मला याहून अधिक काय हवं? संध्याकाळ झाली की गोलाघाट गावात सामसूम व्हायची. दुकानं अंधार पडला की लगेच बंद होतात. संध्याकाळी मी आणि गोस्वामी भगिनी भजनं म्हणायचो. त्यानंतर आसामच्या भौगोलिक, राजकीय आणि सांस्कृतिक बाबींवर चर्चा. 'आसाम' या विषयाच्या त्या माझ्या शिक्षिका झाल्या.
एक दिवस संध्याकाळी बाजारातून परत येत नाही तोच शेजारचा विनोद घामाघूम होऊन माझ्याकडे आला. म्हणाला, "एक खूपच धक्कादायक बातमी आहे. कल्पना एंटरप्राईज या दुकानाच्या मालकाचा, त्याच्या मुलाचा आणि नोकराचा iदहशतवाद्यांनी त्यांच्या दुकानात शिरून- गोळ्या घालून खून केला आणि मारेकरी सर्वां देखत पायी निघून गेले. त्यांना अडवायची कुणाचीही हिंमत झाली नाही.कारण मारेकऱ्यांच्या हातात बंदुका होत्या."
"काय?'' मी किंचाळलेच कारण एक तासापूर्वी मी त्याच दुकानातून किराणा सामान घेऊन आले होते. विश्वास बसत नव्हता पण बातमी खरी होती. जनतेने उघड्या डोळ्यांनी हा नरसंहार पाहिला पण प्रतिकार केला नाही. नपुंसक बनली आहे का दुनिया सारी? खून झालेले तिघंही 'बाहिरोर मानू' म्हणजे परप्रांतीय होते. काय होणार आहे या देशाचं? रात्रभर डोक्यात विचारांचे काहूर.
आठवडा उलटून गेला तरी गुप्ता पितापुत्र व त्यांच्या नोकराच्या मारेकऱ्यांपैकी एकालाही पोलिस अटक करू शकले नाहीत. परप्रांतीयांबद्दलची ही बेपर्वाई की अकार्यक्षमता? हळूहळू गोलाघाट त्या घटनेच्या धक्क्यातून सावरत होतं. मलाही सावरायलाच हवं.
डॉक्टर बॅनर्जींच घर सोडून मी भाड्याच्या घरात राहायला आले हे त्यांना मनातून फारसे पटलेले नव्हतं. पण जनसामान्यात मिसळायचं तर तिचे राहून मला शक्य झालं नसतं. सामाजिक कार्यकर्ता म्हटलं की माणसं वेळीअवेळी भेटायला येतात. त्यांच्याकडे येणारे पाहुणे मुख्यतः चहाच्या मळ्याचे मालक किंवा मॅनेजर असत. शिवाय आसाम नागालँडमधील आर्मीच्या युनिटचे मोठे मोठे अधिकारी असत. या लोकांची लाईफ स्टाईल वेगळीच असते. माझ्यासारखी एक सामाजिक कार्यकर्ती त्यात रमू शकत नाही.

त्यामुळे मी भाड्याच्या घरात शिफ्ट झाले आणि कामांनीही वेग घेतला. असं असलं तरी दिवसातून एकदा तरी मी रॉबिनदांना जाऊन भेटत असे. रोजच्या कामाचा आढावा त्यांना देत असे. त्यांच्या मेक्सिकोला जाण्याची तारीखही जवळ आली होती. तिकीट, व्हिसा आणि इतर किरकोळ खरेदी अशा आमच्या गप्पा चालायच्या. आमच्या संस्थेच्या दृष्टीने विशेष कोणी कामाची मंडळी भेटायला आली असतील तर ते मला निरोप पाठवून बोलून घेत. विशेषतः चहा मळ्यांचे मालक अथवा मॅनेजर. दहा पंधरा मिनिटं त्यांच्याशी बोलून- प्रकल्पबद्दल माहिती देऊन झाल्यावर मी लगेच घरी परतत असे.
रॉबिनदांचा मेक्सिकोला जाण्याचा दिवस उजाडला. या उतार वयात आणि नुकतेच आजारपणातनं उठल्या नंतर त्यांनी एवढ्या लांब प्रवास करू नये असं वाटत होतं. पण ते माझं ऐकणार नाहीत हेही मला ठाऊक होतं. त्यामुळे काळजी घ्या एवढेच सांगून मी हसत त्यांना निरोप दिला. 12 ऑगस्टला रॉबिनदांचा वाढदिवस असे. महिनाभरानंतर त्यांचा वाढदिवस होता. त्याच दिवशी बालवाडी सुरू करायची अशी एक आनंदाची बातमी त्यांना दिली. त्या दृष्टीने माझी तयारीला सुरुवात झाली आहे असेही सांगितलं. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शाळा सुरू होणार आहे याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसला.
त्याकाळात मोबाईल इंटरनेट अशा सुविधा नव्हत्या. एसटीडी आणि इंटरनॅशनल कॉल्स म्हणजे तर फार मोठा विनोद असायचा. तासन् तास कॉल बुक करूनही फोन लागेलच याची खात्री नसायची. एक दिवस त्यांचा नोकर जमाल माझ्याकडे आला आणि म्हणाला, “दीदी डॉक्टरांचा लाडका कुत्रा बोंजो तीन चार दिवसापासून खूप रडतो आहे. मी त्याला गाडीतून जोरहाटच्या पशु वैद्यका कडे नेऊन आणलं. औषधही चालू केली. पण तो रडणं थांबवत नाही. त्याला काही झालं तर डॉक्टर मला माफ करणार नाहीत”. त्याच्या या समस्येवर माझ्याकडेही काही तोडगा नव्हता. बघुया एक-दोन दिवस वाट. मग गरज लागलीच तर आणखी कुणाला दाखवूयात असा सल्ला मी त्याला दिला.
संध्याकाळी पुन्हा जमाल मला भेटायला आला. त्याला धड बोलणं सुद्धा जमत नव्हतं. कसंबसं त्यानी सांगितलं की डॉक्टर बॅनर्जींच्या एका मित्राचा कलकत्त्याहून फोन आला आहे की मेक्सिकोमध्ये त्यांना फूड पॉयझनिंग झालंय आणि ते हॉस्पिटलमध्ये असून अत्यवस्थ आहेत. माझ्याही हाता पायाला घाम फुटला. काय करावं कळेना .. सुदैवाने त्या कलकत्त्याच्या मित्राचा फोन नंबर डॉक्टरांच्या टेलिफोन डायरीत होता. मी त्याला फोन लावला. दोन तासांनी तो फोन लागला . जमालने सांगितलेली निरोप त्याने मलाही सांगितला. मेक्सिकोमध्ये आपल्याला कोणाशी संपर्क करता येईल ? या माझ्या प्रश्नावर त्याने मेक्सिको मधल्या त्यांच्या सहकाऱ्याचा फोन नंबर दिला. त्याच्याशी संपर्क साधला. त्याने थोडीशी दिलासा देणारी बातमी सांगितली. आता रॉबिनदांच्या जीवाला धोका नाही पण अजून बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले.
जमाल बरोबर होताच. मी त्याला एक प्रयोग करून बघायला सांगितलं. ते म्हणजे डॉक्टरांच्या कुत्र्याला- बॉन्जो ला तू औषध तर देतोच आहेस पण तुमच्या बंगाली भाषेत सारखं सारखं त्याला असं सांग की डॉक्टरांची तब्येत आता ठीक आहे. बघुया काही फरक पडतो का. कारण तुझ्या आणि डॉक्टरांच्या भाषेची त्याला सवय आहे. मी सुद्धा दिवसातून दोन तीन चकरा मारत असे. बॉन्जो च्या पाठी वरून हात फिरवीत त्याला सांगायचे, “डॉक्टर आता ठिक झाले आहेत. तू काळजी करु नकोस हं.” औषधांचा परिणाम होता वा आमच्या सांगण्याचा की त्याच्या अंतर्मनाचा प्रतिसाद होता ठाऊक नाही पण त्याचं रडणं बंद झालं. कदाचित तो निव्वळ योगायोग देखील असू शकेल. पण आमचा जीव भांड्यात पडला.
१२ ऑगस्ट १९८८ रोजी गोलाघाटमध्ये विवेकानंद केंद्राची बालवाडी सुरु होणार म्हणून प्रवेश अर्ज छापायला टाकले. प्रवेशा संदर्भातले तीन सूचना फलकही तयार करून आणले. दोन फलक बाजारात लावले तर एक माझ्या राहात्या घरासमोर. फलक लावून चार दिवस झाले पण कुणीही प्रवेशासंदर्भात चौकशीला आलं नाही. थोडी हिरमुसलेच. दीप्तीशी याबाबतीत बोलले तर, 'धीर धरी रे धीरापोटी फळे रसाळ गोमटी" अशा अर्थाचं काहीतरी आसामी भाषेत बोलली. मला फक्त त्याचा मतितार्थच समजला.
एके दिवशी संध्याकाळी सात -साडे सातच्या सुमारास मी स्वयंपाकघरात आवराआवर करत होते.बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. वीज कधी जाईल याचा भरवसा नाही. तत्पूर्वी स्वयंपाक करून ठेवायला हवा. एवढ्यात दारावर टकटक झाली. मी दार उघडलं. दोन अनोळखी मुलं दारात. दोघांचे वय 25-30 च्या आसपास. बाहेर त्यांची मोटर सायकल होती. पावसामुळे दोघांनीही रेनकोट घातले होते. बाहेर रेनकोट न काढता आणि मी आत या म्हटलं नाही तरी खोलीत शिरले. एकाने तोंडाला लावलेला मोठा रुमाल काढला. दुसऱ्याने मात्र तसाच ठेवला.
"भारती बायदेवना (ताई) भेटायचं होतं” एक जण म्हणाला.
"मीच ती. काय काम आहे?" माझ्या मनात आशेचा किरण. शाळाप्रवेशासंबंधी चौकशीला आले असतील का हे?
'हो.'' माझ्या आशा अजूनच पालावल्या.
"नमस्कार", मी म्हणाले . मला त्याला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. कुठं बरं पाहिलं याला? आठवलं, भूमिपूजनाच्या दिवशी ज्या संघटना मोर्चे घेऊन आल्या होत्या त्यात हादेखील होता. पण याने चर्चेत भाग घेतला नव्हता. हाताची घडी घालून तेव्हा तो फक्त निरीक्षण करत होता. मी माझा परिचय दिला.
''बंगाली आहात?'' त्याने विचारलं.
"भारतीय आहे. जन्म महाराष्ट्रातला आणि आतापर्यंतचं आयुष्य महाराष्ट्रातच गेलं." मी.
'शाळा सुरू करणार आहात? तुमचा हट्ट तुम्हाला महागात पडू शकतो. परिणाम फार वाईट होतील. त्याच्या स्वरात थोडी जरब - थोडी काळजी.

माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. हातालाही किंचित कंप सुटला होता. ओठ कोरडे पडले. आता हे कुठलं नवीन संकट उभं राहाणार आहे? एवढ्या जिद्दीने आणि उत्साहाने सुरुवात करतेय शाळेची, मग हे विघ्न का? हिम्मत करून मी बोलायला सुरवात केली. किमान पंधरा मिनिटे मी त्याला विवेकानंद केंद्र, त्यांचे कार्य याबद्दल समजावून सांगत होते. माझी स्वत:ची भूमिका स्पष्ट केली. ही काही पैशासाठी केली जाणारी नोकरी नाही. सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी अंगिकारलेलं एक पवित्र कार्य आहे. मला तुमचा विरोध नको सहकार्य हवंय. तुम्हाला देखील आसामचा विकासच हवाय ना? मग हा विरोध का? वगैरे. दहा-पंधरा मिनिटानंतर लक्षात आलं, फक्त आपणच बडबडतोय इतका वेळ.
"मला तुमचं म्हणणं पटतंय. पण माझ्या संघटनेतल्या लोकांना एकच गोष्ट खटकतेय. परप्रांतीयांना गोलाघाटमधील जमीन डॉ. बॅनर्जीनी का दान दिली? मी जाणतो की डॉ. बॅनर्जी ही दूरदृष्टी असलेली एक थोर व्यक्ती आहे. त्यांचा निर्णय नक्कीच चुकीचा नसणार. तुम्ही माझं ऐका, तुमचं कार्य फारतर बालवाडीपर्यंतच मर्यादित ठेवा. आजकाल बरे दिवस नाहीत." समजावणीच्या सुरात तो बोलत होता.
"निघतो आम्ही." त्याने टेबलावरच्या तबकातनं बडीशोप उचलली आणि तोंडात टाकली. बाहेर जाताना तो पुन्हा एकदा दरवाज्यातून मागे फिरला. 'येतो मी " त्याच्या नजरेत जणू आश्वासन होतं की ठीक आहे माझ्या संघटनेच्या वरिष्ठांचा निरोप मी सांगितला. पण तू तुझं काम चालू ठेव.
Richard Bach अशा वेळी हटकून काहीतरी सुनावतो. आजही पुन्हा तेच म्हणाला --
You are never given a Wish
Without being given the Power

To make it True
You may have to Work for it.
However.

भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com
Contact Person -
Nilesh Giri
Mobile no. - 6266370705
Website -
http://narmadalaya.org/
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/

Comments

  1. या दीदींच्या आयुष्यात आणखी किती थरारक अनुभव आहेत आणि त्यांना त्यांनी खंबीरपणे तोंड दिलं आहे, कोण जाणे !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....