गोष्ट एका शाळेची (5)

गोष्ट एका शाळेची (5)


मला धमकावून- थोडा दिलासाही देऊन ती मुलं निघून गेली.   एकीकडे मी मनाला धीर देत होते.  पण खूप अस्वस्थही  वाटत होतं.  डोळे बंद करून बराच वेळ दिर्घ श्वसन करून पाहिलं अस्वस्थता कमी होईना . स्वामी विवेकानंदांचे एक छोटेसे पुस्तक Thus Spake Swami Vivekananda  टेबलावर होते.  जे पान उघडलं त्यावर पहिलं वाक्य होतं-  कुठलेही मोठे काम करत असताना तुमच्या मार्गात जर खूप अडचणी येत असतील तर विश्वास ठेवा की तुम्ही योग्य मार्गावर आहात. हे वाचल्यानंतर थोडीशी रिलॅक्स झाले.  रात्रभर पाऊस पडतच  होता.  जोडीला विजांचा कडकडाट देखील.  वर्षातले जवळजवळ आठ महिने बरसणाऱ्या या आसामच्या पावसाशी आता जुळवून घ्यायला हवं. विचारांनी आणि पावसाच्या आवाजानी रात्रभर झोप तर आली नाहीच. पहाटेच थोडा डोळा लागला होता. पण  पुन्हा पाच वाजता कोकिळेच्या आवाजाने जाग आली. 

पहाटेचा गारवा खूप सुखद वाटत होता.  अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी कुठेतरी दूर  फिरायला जावं असा विचार मनात आला. खरं तर ती माझी नळावरून पाणी भरण्याची वेळ. पण  आज  आहे तेवढ्या पाण्यात  भागवू  असे ठरवून दरवाज्याला कुलूप लावून बाहेर पडले.  नेहमीप्रमाणे हातात  पर्स होती.  अर्धा  फर्लांग जात नाही  तोच एक ओळखीचे सायकल  रिक्षावाले काका जाताना दिसले .  एवढ्या पहाटे त्यांना जाताना पाहून मला जरा आश्चर्यच वाटलं.  त्यांनी रिक्षा थांबवून विचारलं, “कुठे जायचे  आहे?  कसं कोण जाणे  मी म्हणाले , “रेल्वे क्रॉसिंग च्या पलीकडे नदी आहे ना?  तिथं जायचं आहे.  येणार ?” 

“हो, येतो की !  मलाही त्याच बाजूला जायचं आहे.”  सायकल रिक्षावाले काका उद्गारले.  

बऱ्याचदा  मी बाजारातून किराणा आणि भाजी  आणातांना  हीच रिक्षा असायची.  आमच्या थोड्याफार गप्पा देखील रिक्षात होत.  पण आज मला गप्प गप्प पाहून त्यांनी विचारलं, “आपण आज  एवढ्या शांत कशा काय ? आणि नदी किनारी काय काम आहे ?”  

मी म्हटलं,  “काही नाही सहजच.  आवडतं मला नदी काठी जायला.”

नाशिकला असताना आईची आठवण आली की  मी बरेचदा  माझी लुना घेऊन सोमेश्वरला  गोदावरीच्या काठी जाऊन बसत असे.  सूर्यास्त होईपर्यंत बराच वेळ मग माझं गोदामाईशी हितगुज  चाले.  तिच्या आठवणीने आज खूप व्याकुळ झाले होते.  सायकल रिक्षावाल्याने  नदीच्या पुलापाशी सोडलं.  वाट काढत मी तिच्या किनाऱ्यावर पोहोचले. एकटीच चालायला लागले.  सूर्याच्या प्रकाशाने नदीचं पाणी चमकत होतं.  या नदीचे नाव आहे धनसिरी. आम्ही दोघी एकमेकींना पहिल्यांदाच भेटत होतो.  तिला मी म्हटलं, “ तुझे नाव भलेही धनसिरी  असेल पण  मी मात्र तुला धनश्री  म्हणणार.  चालेल ना? आजपासून आपण दोघी मैत्रिणी “   तिच्या किनाऱ्याने चालत असताना नदीच्या प्रवाहात रानकेळ्यांच्या  चार-पाच भल्या मोठ्या खोडांना एकत्र बांधून त्याची नाव करून मजेत वल्हवणारा एक बारा चौदा वर्षांचा मुलगा दिसला. मला ती कल्पनाच मोठी रोमांचक  वाटली. हाताने  खूण करून मी त्याला किनाऱ्यावर बोलावलं. 

“मी बसू शकते का तुझ्या या नावेत ? पडणार तर नाही ? ” माझ्या या विचारण्याचं त्याला आश्चर्य वाटलं असावं.

“हो, बस ना ! नाही पडणार तू. मी आहे ना काही झालं तर ! ” आश्चर्याने माझ्याकडे  बघत तो म्हणाला. त्याचं एकेरी संबोधन मला खूप भावलं. बऱ्याच लांबची चक्कर मारून त्याने मला पुलाजवळ आणून सोडलं. त्याच्या श्रमाचा काही मोबदला त्याला द्यावा म्हणून मी पर्स उघडली. “छे ! छे ! पैसे नकोत. मी तर माझ्यासाठी चालवत होतो. रोजच येतो मी इथे. 

गोदावरीचं पात्र नाशिकला फारसं मोठं नाही. तरीसुद्धा ती गोदामाई वाटते. पण ही गोलाघाटची धनश्री नदी  मात्र मैत्रीण वाटली. पहिल्याच भेटीत या धनश्री बद्दल खूप आपलेपणा वाटला.      

पूल चढून मी सडकेवर आले. आश्चर्य म्हणजे सकाळचे ते सायकल रिक्षावाले काका पुलाजवळ उभे  होते.  "अरे वा !  तुमची कामे  आटोपली वाटतं.”  असं म्हणत मी सायकल रिक्षात बसले.  ते म्हणाले, “मी माझ्या कामासाठी गेलोच नाही.  तू खाली गेलीस तेव्हापासून पुलावर उभे राहून तुझ्यावर लक्ष ठेवून होतो.  काळजी वाटली मला.  इतक्या भल्या पहाटे कुणी तरुण मुलगी एकटीच विनाकारण नदी किनारी येते काय?  आजकाल दिवस चांगले नाहीत.  माझी पोर पण तुझ्याच वयाची आहे”.  

रिक्षा चालवत असताना त्यांना मागे वळून बघता आलं नाही हे ठीकच झालं.  त्यांच्या त्या बोलण्याने माझे डोळे भरून आले होते.  आपल्या घरापासून इतक्या दूरवर कुणाला आपली काळजी वाटते आहे ही कल्पनाच मोठी सुखावह होती. यालाच “वसुधैव कुटुंबकम्” म्हणतात का ? 


भारती  ठाकूर
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com

Contact Person -
Nilesh Giri
Mobile no. - 6266370705

Website -
http://narmadalaya.org/

Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo

Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/

Comments

  1. कोणतंही एक पान उघडल्यावर योग्य मार्गदर्शन करणारं वाक्य समोर येणं, हे अनेकांनी अनुभवलंय्.
    मी सुद्धा ...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....

मातृत्व