गोष्ट एका शाळेची (6)

गोष्ट एका शाळेची (6)



गोलाघाटचे माझे  निवास स्थान  म्हणजे सहा छोट्या छोट्या खोल्यांचा बंगला असला तरी छत पत्र्याचे   होते.  पाऊस पडला कि ते पत्रे खूप वाजत आणि झोप लागत नसे. आसाममध्ये  प्रत्येक घराच्या जवळपास एखादी पोखरी -  म्हणजे छोटेसे तळं  असतंच. ते  जर वापरात नसेल तर डास खूप होत. आणि आसाम तर मलेरियाचे माहेरघरच आहे.  शिवाय या बंगल्यात पिण्याच्या पाण्याचा किंवा सांडपाण्यासाठी सुद्धा नळ  नव्हता.  ते सर्व पाणी मला माझ्या घरमालकिणीच्या नळावरून भरावे लागत असे. एक हॅन्ड पंप होता अंगणात पण  त्याचं पाणी विटकरी रंगाचं  असायचं.  तासभर पाणी बादलीत राहिलं तर खनिज तेलाचा तवंग त्यावर यायचा.  मी थट्टेने म्हणायचे की माझ्या अंगणात खनिज तेलाची विहीर आहे म्हणजे मी किती श्रीमंत !  पाण्याचा नळ पहाटे पाच वाजता यायचा  आणि घरमालकिणीच्या अंगणात जाऊन तिथून बादल्या भरून  प्यायला,  भांडी आणि कपडे धुवायला  अंघोळीला -पोच्या  लावायला असे किमान  वीस-पंचवीस बादल्या पाणी आणावे लागे.  उशिरा उठलं  तर घरमालकिणीच्या  पाणी भरण्याची वेळ झालेली असे.

या बंगल्याला बांबू कापून त्याचे  कुंपण केलेलं होतं. त्यावर अनेक प्रकारच्या वेली पसरलेल्या होत्या त्यावर कधी कारले, कधी गिलकी येत.  बागेतल्या गवतात अनेक रान भाज्या उगवत. त्या कशा ओळखायच्या- कशा बनवायच्या हे मला माझ्या घरमालकिणीनेच शिकवलं. आसामी स्वयंपाक तसा सोपा असतो. स्वयंपाकात मसाल्यांचा फारसा वापर नसतो. जेवणात पोळी नसते. त्यामुळे भात, फोडणीचं वरण आणि भाजी केली की संपला स्वयंपाक. मसाले कमी वापरत असले तरी त्यांच्या स्वयंपाकाची चव मात्र अप्रतिम असते. एकूणच आसामी लोक अत्यंत साधे, प्रेमळ आणि समाधानी. त्यांची राहणी पण अत्यंत साधी. मेखला -चादर हा तिथल्या महिलांचा पारंपरिक पोशाख . सूती किंवा रेशमी कापडावर सुबक असे डिझाईन असते. विशेष म्हणजे हे हातमागावर विणलेलं असे. प्रत्येक घरात एक छोटा हातमाग असायचा. त्यावर घरच्या वापरासाठी आणि बिहू या सणाच्या वेळी एकमेकांना भेट देण्यासाठी हे गमछे घरीच विणले जायचे.

गरजेपुरती लागणारी भांडी, कुकर आणि वातींचा स्टोव्ह  असा माझा  तिथला संसार होता. माझ्या लहान पणापासून घरात स्वयंपाकासाठी गॅस स्टोव्ह  वापरलेला मी पाहिला होता.  रॉकेलवर चालणारा  वातींचा स्टोव्ह  आणि माझे पाककौशल्य यांची मैत्री  होणं तसं कठीणच होतं.  एक  गादी - दोन चादरी  आणि एक  रजई  हे सामान देखील बाजारातून विकत आणलं. कन्याकुमारीहुन निघताना  सुटकेसमध्ये  फक्त चार साड्या  होत्या.  इथे  बेभरवशाचा पाऊस इतका असायचा की  कपडे लवकर वाळायचे  नाहीत. मग थोडं ऊन पडलं की बाहेर अंगणात वाळायला  टाकायचे.  आपले लक्ष नसलं कि एक बेवारशी कुत्रा  येऊन तारे वरचे कपडे ओढून खाली जमिनीवर टाकायचा.   त्या तारेत अडकून दोन  साड्याही फाटल्या.  तातडीने दोन साड्या घ्यायला हव्या होत्या.  मनात विचार केला की साड्यांपेक्षा आसामी महिलांचा पारंपारिक पोशाख म्हणजे मेखला  चादर  विकत का घेऊ    नये ?  नाशिकहून  निघताना आणलेले काही पैसे शिल्लक होते.  दोन  सुती मेखला चादर विकत आणल्या. 

माझी घरमालकिण दीप्ती मला त्यांच्या परिचयातल्या लोकांकडे किंवा नातेवाईकांकडे ओळख करून द्यायला घेऊन जायची. माझ्याही ओळखी वाढायला लागल्या. रोज दोन-तिन तरी मुलांचे पालक बालवाडीत मुलांच्या प्रवेशासाठी येत. बालवाडीच्या उद्घाटनाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसं माझं टेंशन वाढायला लागलं होतं. आपण हे एवढं धाडस करतो आहे - पण सर्व सुरळीत पार पडेल ना ?

डॉ xxxx गोलाघाट मधले डॉ बॅनर्जी यांचे एक जुने  मित्र- आणि सल्लागार.  ते  बरेचदा भेटायला यायचे  तर कधी मी पण त्यांच्याकडे जात असे. त्यांची पत्नी माझ्याकडे योगसन -प्राणायाम शिकायला यायची .  माणसांचे स्वभाव ओळखणं  कधी कधी फार  कठीण असतं. मी भाबडेपणाने आदल्या दिवशी मला धमकावून गेलेल्या मुलांबद्दल सांगितलं. ती बातमी पूर्ण गोलाघाट मध्ये पसरली. बरेच लोक मला सल्ले देऊ लागले गोलाघाट मध्ये एकटीने राहणं किती धोक्याचं आहे ते.  सुदैवाने मी ती घटना दीप्तीला -माझ्या घरमालकिणीला सांगितली नव्हती. तिने घाबरून जाऊ नये म्हणून आणि न जाणो भीतीने तिनेच मला घर सोडायला सांगितलं तर ?

संध्याकाळी प्रार्थने नंतर नुसतीच बसून होते. To be or not to be ची द्विधा मनस्थिति होती .  स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट डोळ्यासमोर आला. श्री रामकृष्ण परमहंस यांच्या समाधी नंतर गुरुबंधुं बरोबर कठीण आर्थिक परिस्थितीत  व्यतीत केलेला साधना काळ, भारत परिक्रमा आणि सर्वधर्म परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेत आलेल्या असंख्य अडचणी. एव्हढया तर आपल्या अडचणी नाहीत. मग ही निराशा का ? का आले मी इथे या अडचणी माहीत असूनही ? .

माझं अंतर्मन - म्हणजेच माझी सखी अशावेळी काहीतरी सुनावल्याशिवाय राहत नाही. ती  म्हणाली,

A cloud does not know
why it moves in just such a
direction and at such a speed.
It feels an impulsion ……….
this is the place to go now.
But the sky knows the reasons and patterns
behind all the clouds,
and you will know too, when you lift yourself
high enough to see beyond horizons.



भारती  ठाकूर
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com

Contact Person -
Nilesh Giri
Mobile no. - 6266370705

Website -
http://narmadalaya.org/

Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo

Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/

Comments

  1. तुमच्या गोलाघाटच्या आठवणींच्या प्रवाहात आम्ही देखील हळूहळू वाहात चाललो आहोत.

    ReplyDelete
  2. वाचायला लागल्यावर थांबू नये असे वाटत. सुंदर अनुभव.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....