गोष्ट एका शाळेची (7)

गोष्ट एका शाळेची (7)



1986 सालापर्यंतचं नाशिक मधलं आयुष्य आता आठवलं तरी स्वत:चाच हेवा वाटतो. गिर्यारोहण, पद भ्रमण, नाशिक ते दिल्ली सायकल प्रवास आणि वेगवेगळ्या अभयरण्यातून मनसोक्त भटकंती. मनात येईल तेंव्हा सिनेमा, नाटकं, संगीताचे कार्यक्रम आणि चांगली व्याख्याने यात रमणारी मी. असं सगळं असतांना मग अचानक हे समाजकार्याचं खूळ कुठून आलं ?  

नेमका हाच प्रश्न मला आज दीप्ती ने विचारला.  - तू विवेकानंद केंद्रात का आलीस ? केवळ विवेकानंदांचे साहित्य किंवा त्यांचे जीवन चरित्र वाचले म्हणून ? नक्कीच नाही. तू नेहमी सांगतेस तो सुंदर बाग असलेला बंगला, नाशिकला  संरक्षण खात्यातील नोकरी आणि कुठलीच आर्थिक अथवा कौटुंबिक जबाबदारी नसतांना - आयुष्य सुरळीत चालू असतांना असं काय घडलं की घर सोडून यावसं वाटलं? 

तिच्या या प्रश्नावर मला मनापासून  हसू आलं.  आम्ही बसलो होतो तिथल्या टेबलावर 'कथा विवेकानंद शिला स्मारकाची' (Story of Vivekananda Rock Memorial)  हे पुस्तक होतं. ते पुस्तक तिच्या हातात देत म्हणाले या पुस्तकामुळे मी विवेकानंद  केंद्रात आले.  या पुस्तका बरोबरच सेवा साधना  आणि विवेकानंदांचे साहित्य  माझ्या या संस्थेत येण्याला कारणीभूत झाले.  माननीय श्री एकनाथजी रानडे  हे विवेकानंद शिला स्मारक आणि विवेकानंद केंद्र याचे संस्थापक.       मा.  एकनाथजींनी  शिला स्मारकाचे काम काम हाती घेतले  तेव्हा तेही एकटेच  होते.  कन्याकुमारी हे ठिकाणही त्यांना नवीनच होतं.  पण कार्य हाती घेतल्यावर  असंख्य कार्यकर्त्यांनी  स्वतःला  या राष्ट्रकार्यामध्ये  झोकून दिलं.  विवेकानंद शिला स्मारक  हे आज आपल्या देशाची शान आहे.  केवळ  एक  सुंदर वास्तु म्हणून नव्हे  तर युवकांसाठी ते एक अत्यंत प्रेरणादायी असं स्थान आहे.  भर समुद्रातल्या  एका प्रचंड मोठ्या शिलेवर अशी वास्तू उभारणं  हे खरोखर फार मोठं  आणि अवघड काम आहे.  कोरीव काम केलेले मोठ मोठे दगड नावेतून  त्या शिलेवर  नेणं -  समुद्राच्या खाऱ्या वाऱ्या पुढे  ते किती टिकतील,  एवढे मोठे बांधकाम तो खडक पेलू शकेल का ?  तो आतून पोकळ तर नाही ? यासारख्या छोट्या-मोठ्या तांत्रिक बाबींपासून  ते  कोट्यवधी रुपयांच्या  निधी संकलन पर्यंत ती जबाबदारी त्यांनी लीलया कशी पेलली ?  त्याचबरोबर  संपूर्ण देशभर  या कामासाठी जे काही संघटितपणे  काम  झालं  ते सगळच विलक्षण होतं.  आणि हे काम त्यांनी तरुण वयात केलं असेही नाही. वयाच्या पन्नाशीत  ही जबाबदारी त्यांनी हाती घेतली.  हे एक देशव्यापी  वैचारिक आंदोलनच त्यांनी सुरू केलं.  मुख्य म्हणजे  विवेकानंद शिला स्मारक  पूर्ण झाल्यावर  या जबाबदारीतून मुक्त होणे त्यांना सहज शक्य होतं.  पण मला विवेकानंदांचं केवळ दगड-मातीचं  स्मारक बनवायचं नाही तर  स्वामीजींना अपेक्षित असलेले कार्यकर्ते  देशभरात जाऊन त्यांच्या स्वप्नातला भारत घडवतील हे स्वप्न एकनाथजींनी पाहिलं. आणि विवेकानंद केंद्र या संस्थेची स्थापना केली. 


अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार  यासारख्या दुर्गम प्रदेशात  त्यांनी  राष्ट्रप्रेमाची शिकवण देणाऱ्या अनेक शाळा सुरू केल्या. 1984 साली  मी  कन्याकुमारीला एका  योग् शिक्षा शिबिरासाठी गेले होते.  तिथे  माननीय एकनाथजींनी  दिलेल्या व्याख्यानांचे संकलन असलेलं 'सेवा साधना'हे पुस्तक वाचत असताना  माझं फुलपाखरासारखं उन्मुक्त आयुष्य मलाच खटकायला लागलं.  आपण आपले आयुष्य व्यर्थ घालवतो आहे.  स्वामी विवेकानंदांना  किंवा  माननीय एकनाथजी रानडे  यांना अभिप्रेत असलेलं   राष्ट्रसेवेचे काम आपणही का करू नये ?  हा विचार मनात प्रबळ व्हायला लागला. दुर्दैवाने एकनाथजी  आज हयात नाहीत.  पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने माझ्या मनावर एक विलक्षण गारुड घातले आहे.  माझ्यासाठी  ते फार मोठे आदर्श आहेत.  


नाशिकला असतांना कौटुंबिक जबाबदारी तर कुठली नव्हतीच.  अडचण एकच होती.  ती म्हणजे नोकरीची.  मी ऑफिसात  माझा राजीनामा सादर केला.  पण माझ्या बॉसने  काहीतरी खुळ  आलंय तुझ्या डोक्यात  असे म्हणत तो अनेकदा फाडला. शेवटी त्यावर एक तोडगा निघाला. आर्टिलरी सेंटरच्या  आमच्या कमांडंटकडे  जाऊन  यासंदर्भात चर्चा करायची.   कमांडंट म्हणाले,  “तुझं जितकं  वय आहे  त्याहून अधिक माझी नोकरी झालेली आहे.  अनेक पावसाळे पाहिलेत मी.  जग पाहिले  आहे.  मी तुला पाच वर्षाची  बिन पगारी रजा देऊ शकतो.  आर्थिक स्वातंत्र्य तू गमावू नयेस असं मला वाटतं.  आज तुझे आई-वडील हयात नाहीत,  त्यांनी कदाचित तुला हाच सल्ला दिला असता.  पाच वर्षानंतर  तू राजीनामा देऊ शकतेस किंवा परत येऊ शकतेस". अशाप्रकारे पाच वर्षांची रजा घेऊन  मी विवेकानंद केंद्रात आले आहे.  याची पूर्ण कल्पना  मी तत्कालीन  अध्यक्षा  डॉक्टर लक्ष्मीकुमारी यांना दिलेली आहे. आत्ता कुठे तर माझ्या कामाची सुरुवात होते.  पाच वर्षानंतरची स्थिती कोणाला  ठाऊक ? 

दीप्ती म्हणाली,  हे सगळ खरं आहे गं पण अशा  दूरवरच्या अनोळखी ठिकाणी एकटीने येऊन  काम सुरु करणं,  अनंत अडचणींचा डोंगर उभा असतांना हे काम चालू  करणं मला तरी शक्य झालं नसतं.  तुला भीती नाही वाटत हे सगळं  करतांना ?  खरंच  शूर आहेस तू !

तिचं बोलणं ऐकून मला हसू आलं. मी म्हणाले शौर्या संदर्भात मा.  एकनाथीजी  काय म्हणाले  ते  ऐक.” आपल्या क्षमता प्रकट करण्यासाठी या  आपदा आणि अडचणी असतात. ध्येय साध्य करताना बाह्य  संघर्षा बरोबर  आंतरिक  संघर्षही असतोच. या संघर्षाला  आपण धैर्याने तोंड दिले पाहिजे.  शौर्य  हे केवळ  युद्धभूमी पुरतेच   मर्यादित नसते.  रोजच्या जीवनातही ते तितकंच आवश्यक आहे.  निव्वळ शस्त्रांनी  युद्ध  लढले जात नाहीत . ती  फक्त साधने असतात. खरा लढतो तो अपार धैर्य असणारा माणूसच.  आपल्या अडचणींचा उपयोग आपल्यातील क्षमता प्रकट करण्यासाठी करायला हवा” . मी स्वतः काही शूर नाही.  अडचणी आल्या  की मी पण अस्वस्थ होते. अशावेळी या दोन पुस्तकांपैकी  कुठलंही ही एक पुस्तक हातात घेऊन मी वाचायला सुरुवात करते.  

स्वामी विवेकानंद म्हणत-  प्रत्येकात सुप्त  देवत्व (divinity) आहे.   तशीच ही शक्ती देखील प्रत्येकात आहे..  लष्करी वाहनांमध्ये  कठीण  चढ  चढण्यासाठी  एक  खास  गिअर असतो. आपल्यालाही  प्रत्येकाला अशी देणगी लाभलेली आहे.  किंबहुना आपल्यातील सगळ्या क्षमतांचा चा विकास  व्हावा  म्हणूनच  परमेश्वर ही शक्ती आपल्याला देतो. 

दीप्तीचा गंभीर चेहरा पाहून  मला वाटलं की आपण फारच  क्लिष्ट बोलतोय की काय ! तिला अशा प्रकारचे विचार ऐकण्याची  बहुधा कधी सवय नसावी.  पण  यानिमित्ताने मा.  एकनाथजींच्या  विचारांचे मला  स्मरण झाले  हेही नसे थोडके. अशा विचारांचे वारंवार स्मरण म्हणजे एक प्रकारचं recharging असतं.


भारती  ठाकूर
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com

Contact Person -
Nilesh Giri
Mobile no. - 6266370705

Website -
http://narmadalaya.org/

Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo

Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/

Comments

  1. किती उदात्त आणि उपयुक्त काम ! ते ही इतक्या विशाल आणि व्यापक स्वरूपात !
    एकनाथजींना मनोमन दंडवत !
    या कार्यासाठी ऐषाराम सोडून झोकून देणं हे ही किती अवघड !
    आदराने मस्तक झुकतंच !

    ReplyDelete
  2. कठीण चढ चढण्यासाठी असलेला खास गियर एकदम पटला. सगळीकडून संकटांनी कोंडीत पकडलं की कुठूनतरी एकाएकी बारा हत्तींचं बळ संचारतं अंगात. 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....