गोष्ट एका शाळेची (8)

    गोष्ट एका शाळेची (8)


मुलांच्या बालवाडी प्रवेशा बद्दल माझी प्रतीक्षा बऱ्यापैकी सफल होतांना दिसायला लागली. रोज तिन चार तरी मुलांची नाव नोंदणी व्हायची . त्यामुळे मलाही हुरूप आला होता. आता आवश्यकता होती सहायक शिक्षिकेची आणि साफसफाईसाठी मदत करणाऱ्या एका सहायिकेची. जवळच राहणारी रेणूबाय सहायिका म्हणून काम करायला तयार झाली. बालवाडी शिक्षिकेच्या संदर्भात मी अनेक लोकांशी बोलून ठेवलं होतं. 

एके दिवशी दुपारी रुमी सैकिया नावाची तरुण मुलगी मला भेटायला आली.हसमुख आणि प्रसन्न चेहऱ्याची. ती   म्हणाली, “मला तुमच्याकडे नोकरी मिळाली तर फार बरं होईल कारण घरची आर्थिक परिस्थिति फार बिकट आहे आणि मुख्य म्हणजे मला इथे खूप काही शिकायला मिळेल. पण मला शिकवण्याचा अनुभव काहीच नाही. तिने स्वतःची सर्टिफिकेटस् दाखवली. विज्ञान शाखेची पदवीधर होती आणि विशेष म्हणजे संगीत विशारद होती. बिहु संगीतात तिचे विशेष प्राविण्य होते. दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात तिचे बिहु लोकसंगीताचे काही कार्यक्रमही  झाले होते. एकूणच तिचे व्यक्तिमत्व अत्यंत लोभस होते. बोलण्यात नम्रता होती आणि जोडीला आत्मविश्वास पण होता. मी तत्काळ  तिला होकार दिला  आणि 12 ऑगस्ट पासून शाळेत यायला सुरुवात कर म्हणाले.

“ बारा ऑगस्ट रोजी माझा गाण्याचा एक कार्यक्रम आहे दिब्रुगडला - मी चौदा ऑगस्ट पासून आले तर चालेल ?” 
खरं तर शाळेच्या उद्घाटनाच्या दिवशी इतर तयारी साठी मला तिची जास्त आवश्यकता होती. पण मी म्हणाले, “ठीक आहे तुझ्या सोयीने ये.” 
 
                                                             -----xxxxx -------

नेहमी प्रमाणे संध्याकाळी दीप्ती भेटायला आली. रोज नेमाने अर्धा - पाऊण तास ती गप्पा मारायला यायची. नंतर मग आम्ही सायं प्रार्थना करायचो. गोड गळ्याची दीप्ती मला अनेक भजने शिकवायची.  तिच्या बरोबरच्या गप्पांमध्ये  माझा फायदा असा की मला आसामची राजकीय, सांस्कृतिक आणि थोडीफार भौगोलिक माहिती  मिळायची. वेगवेगळ्या विषयांवर आमच्या चर्चा  होत असत. आज मात्र दीप्ती ने आल्याआल्याच अगदी मुलाखत घेत असल्यासारखा मला प्रश्न केला, 

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल तुझं काय मत आहे.  या संघटनेशी तुझा कधी संबंध आला काय ?” तिच्या या अनपेक्षित प्रश्नाची मला गम्मत वाटली. 

 मी म्हणाले, “माझे वडील सरकारी नोकरीत होते.  त्यांना सतत फिरस्ती असायची. त्यामुळे घरात  राजकीय  अथवा  अशा प्रकारच्या कुठल्याही संघटनांबद्दल  चर्चा  झाल्याचं  मला आठवत नाही.  लहान असताना या संघटनेबद्दल  मला फारसं काही माहीत नव्हतं.  माझी आई तिची  घर  गृहस्थी आणि  दासबोध - ज्ञानेश्वरी  यासारख्या ग्रंथांच्या वाचनात व्यस्त असायची. त्यामुळे माझा  प्रत्यक्ष संबंध या संघटनेशी कधी आला नाही. मात्र अनेक नैसर्गिक संकटांच्या वेळी या संघटनेच्या स्वयंसेवकांनी  प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून अतुलनीय कामगिरी केल्याचे  अनेकदा आपण पाहतो.  त्याचे मला नक्कीच कौतुक आहे.  या देशात राहणाऱ्या सर्व  जाती धर्मांसाठी एकच  कायदा असावा असं मला  वाटतं. एखाद्या घरात चार भावंडं असतील आणि त्यात एकच मुलगा असेल   तर तो  अल्पसंख्य आहे  म्हणून त्याचे विशेष लाड व्हावेत  हे मला कधीच मान्य नाही. ज्या देशात, धर्मात आपला जन्म झाला याबद्दल अभिमान असण्यात गैर काय आहे ? आज ईशान्य भारतात फार मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण चालू आहे. 

एखाद्या धर्माची तत्वे पटतात म्हणून कुणी  स्वतःच्या इच्छेने  धर्म बदलला  तर त्याबद्दल माझा आक्षेप नाही.  पण पैसा देऊन  किंवा भूलथापा देऊन  निष्पाप अशिक्षित  आणि गरीब अश्या  आदिवासींचे धर्मांतरण केले जाते  त्याला मोठा विरोध आहे.  आणि   त्याचे दुष्परिणाम  आपण इथे भोगतो आहोत.  ते दुष्परिणाम कधी आतंकवादाच्या  रूपात असतात तर कधी  चांगल्या नांदत्या  समाजात तेढ निर्माण करणारे  असतात. हा देश  आतंकवादाचा  मारा  किती दिवस  सहन करणार ? कधी  पंजाब,  जम्मू कश्मीर,  ईशान्य भारत  तर कधी   दक्षिण भारतात आतंकवादाची ची वेगवेगळी रूपं आपल्याला पाहायला मिळतात. आतंकवादाचा बिमोड करण्यातच  जर या देशाची ताकद खर्च झाली  तर आपण विकास कधी करायचा ? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवभारताची निर्मिती होईल अशी एक आशा त्या काळच्या पिढीच्या मनात होती. पण आपण नेमकं काय मिळवलं स्वातंत्र्य प्राप्ती नंतर ?  भ्रष्टाचार,  आपसातले मतभेद,  राजकीय महत्वाकांक्षा  यापुढे  देश नेहमीच  गौण  ठरला.   

विवेकानंद केंद्राचे संस्थापक मा. एकनाथजी रानडे हे पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह होते. त्यांचा जाज्वल्य देशाभिमान, संघटन कौशल्य आणि दूरदृष्टि याने मी खूप प्रभावित झाले आहे.  या देशाच्या तरुणाईने राज्याच्या प्रगतीसाठी  स्वतःला झोकून देऊन  देशाचा विकास करावा, सांस्कृतिक  आणि सामाजिक एकता या देशात नांदावी यासाठी  त्यांनी हे काम  सुरू केले.  या देशातल्या प्रत्येक नागरिकाला हा माझा देश आहे  आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत  ही जाणीव व्हावी  यासाठी त्यांची धडपड होती. विशेष म्हणजे कॉँग्रेस पक्षाच्या इंदिरा गांधी असोत किंवा कम्यूनिस्ट पक्षाचे ज्योति बसू असोत संगळ्यांशीच त्यांचे सलोख्याचे संबंध होते. 

दीप्ती आज बहुधा माझा इंटरव्ह्यु घेण्याच्या मूड मध्ये होती. तिने दूसरा प्रश्न केला - “तू रोज भगवद्  गीता वाचतेस.
केवळ  कर्मकांड म्हणून वाचतेस की आवड म्हणून ? त्याचा आणि तुझ्या सामाजिक कार्याचा काय संबंध ?”

“व्वा ! छान प्रश्न  विचारलास.  भगवद्  गीता कर्मकांड नाही.  तर ती स्वतःला रिचार्ज करण्याची बॅटरी आहे. संपूर्ण भगवद्गीतेत  कुठेही हिंदू हा शब्द आलेला नाही.  म्हणजेच ती संपूर्ण मानवजातीसाठी आहे.  गीता हा  तत्वज्ञान विषयक  ग्रंथ असला  तरी माझ्या दृष्टीने मानवी व्यवहार  शास्त्राचे ते खूप सुंदर पुस्तक आहे.  ते तुम्हाला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवतं .  योग्य अयोग्य काय  याची जाणीव करून देतं.  कर्मयोगाची  महती पटवून देतं . गीता ही श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितली ज्यावेळी तो निराश आणि द्विधा अवस्थेत होता. आपलं रोजचं आयुष्य तरी युद्ध भूमी पेक्षा काय वेगळं असतं ? सामाजिक कार्य करतांना आपलीही अनेकदा द्विधा मनस्थिति असतेच. निराशाही  अनेकदा आपल्या आयुष्यात डोकावतेच. त्यासाठी ही भगवद् गीता.वाचायचा प्रयत्न. आणि हो, नाशिकला माझ्याकडे बायबल आणि कुराण पण आहे. मी वाचायचा प्रयत्न केला पण अनेक संदर्भ माहीत नसल्याने आणि भाषा वेगळी असल्याने  फारसं काही डोक्यात शिरलं नाही. अजून काही प्रश्न ?” 

तिने नाही म्हणताच मी  आमचं मुलाखत सत्र आटोपतं घेतलं. चल,आपल्या सायं प्रार्थनेला सुरवात करू या असं म्हणत आम्ही ऋग्वेदातल्या ऐक्य मंत्राने प्रार्थनेला सुरुवात केली. 

ॐ सं गच्छध्वं सं वदध्वं, सं वो मनांसि जानताम्
देवा भागं यथा पूर्वे , संजानाना उपासते ||
समानो मंत्र: , समिति: समानि |
समानं मनः,सह चित्तमेषाम् |
समानंमंत्रमभिमंत्रयेव: , समानेन वो हविषा जुहोमि ||
समानी व आकूतिः, समाना हृदयानिव: |
समानमस्तु वो मनो, यथा व: सु सहासति || ॐ शांति शांति शांति|



भारती  ठाकूर
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com
 
Contact Person -
Nilesh Giri
Mobile no. - 6266370705
 
Website -
http://narmadalaya.org/
 
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
 
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/

Comments

  1. आता वाट पाहायची, शाळा सुरू होण्याची .

    ReplyDelete
  2. गीतेच महत्त्व फारच छान पटवून दिलंय.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....