गोष्ट एका शाळेची (9)
गोष्ट एका शाळेची (9)
गोलाघाट मधील सत्यसाई बाल विकास केंद्राच्या सभागृहात मी योगासन वर्ग घेत असे. अनेक महिला त्यात उत्साहाने भाग घेत. अशा प्रकारचा केवळ महिलांसाठीचा असा योगासन वर्ग गोलाघाटला त्या काळात म्हणजे बत्तीस वर्षापूर्वी बहुधा पहिलाच असावा. गीताली द्वारा (Dwarah) नावाची चौथीतली एक मुलगी तिच्या आईबरोबर येत असे. तिच्या आईला मी द्वारा बाइदेव (ताई) म्हणायची. दोघी स्वभावाने खूपच छान होत्या. मुलगी तर खूप बोलकी आणि चौकस होती. योगासन वर्ग संपल्यावर रोज निरोप घेतांना ती मला आवर्जून तिच्या घरी यायचं आमंत्रण द्यायची. म्हणायची “तू माझ्या घरी येशील ना तेंव्हा मी आईला लुसी (पुरी) भाजी आणि रसगुल्ले बनवायला सांगीन”. मी देखील हो ‘नक्की येईन हं लवकरच’ असं आश्वासन द्यायची.
दरम्यान खटखटी येथील विवेकानंद केंद्राच्या ग्रामीण विकास केंद्रात एका युवक शिबिरासाठी मला जावं लागलं. शिबिर संपल्यावर मी गोलाघाट येथे परतले. एक अत्यंत वाईट बातमी आल्याआल्याच समजली. माझ्या योगासन वर्गाला येणाऱ्या गीतालीचे Encephalitis या आजाराने अचानक निधन झाले. हा देखील एक viral fever चा प्रकार. मी सुन्न झाले. कशातच मन लागेना. तिच्या आईला भेटायला जायची पण हिम्मत होईना. दोन तिन दिवस त्यांच अस्वस्थतेत गेली. शेवटी हिम्मत करून एक दिवस तिच्या घरी गेले. काय बोलावं समजेना. तिच्या आईचा हात हातात घेऊन बसले. आम्ही दोघी मूकपणे अश्रु ढाळीत होतो. पाच दहा मिनिटांतच तिच्या आईने माझा हात दूर केला आणि “बसा हं जरा” असं म्हणत ती आत निघून गेली. अर्धा तास झाला तरी ती पुन्हा बाहेर आली नाही. गीतालीच्या वडलांशी मी किती आणि काय बोलणार. मी आता निघते असं म्हणताच पुन्हा आग्रह झाला,” नाही पाचच मिनिट थांबा”. गीतालीची आई पुरी भाजी आणि रसगुल्ले एका प्लेट मध्ये घेऊन आली. अश्रुभरल्या डोळ्यांनी ती मला म्हणाली, “गीताली सारखी म्हणायची, भारती दीदी आपल्याकडे आली ना की आपण पुरी भाजी आणि रसगुल्ले करूया. आज तुम्ही पहिल्यांदाच आमच्याकडे आलात. ती बघत असेल वरुन. प्लीज, नाही म्हणू नका”. माझं डोकं गरगरायला लागलं. गीतालीचा मान राखायचा म्हणून मोठ्या मुश्किलीनी एक घास तोंडात टाकला. पुन्हा प्लेट गीतालीच्या आईच्या हाती देत म्हणाले, “ मी तुमचा आणि गीतालीचा मान राखला. पण हे आत्ता - या क्षणी नाही खाऊ शकणार मी. मला खरंच क्षमा करा. कुठल्याही एखाद्या गरीब लहान मुलीला हे खाऊ घाला. गीताली पण माझी अवस्था समजू शकेल.”
घरी पायी जाण्याची ताकद शरीरात नाही असं वाटलं. सायकल रिक्षेत बसून घरी पोहोचले. अस्वस्थता जात नव्हती म्हणून भगवद् गीतेचा दूसरा अध्याय - सांख्य योग म्हणायला सुरवात केली.
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णा- न्यन्यानि संयाति नवानि देही ॥
(ज्याप्रमाणे वस्त्र जुने झाले की त्यांना बदलून मनुष्य नवीन वस्त्र धारण करतो त्याप्रमाणे जीवात्मा सुद्धा शरीराला त्यागून नवीन शरीर धरण करतो.) या श्लोकापाशी मात्र आपोआपच थबकले. गीताली, तुझं शरीररूपी वस्त्र तर इतकं जुनं झालं नव्हतं. मग ते बदलायची तुला एव्हढी काय घाई झाली होती बाळा ? कुठला हा तुझा आणि माझा ऋणानुबंध ?
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com
Contact Person -
Nilesh Giri
Mobile no. - 6266370705
Website -
http://narmadalaya.org/
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/
असे अंतःकरणाला भिडणारे, तीव्र चांगले वाईट अनुभव साठवण्याची तुमची क्षमता आहे तरी किती ? मला तर नुसते वाचूनच त्यांचं ओझं व्हायला लागलंय् !
ReplyDelete