अहम् ब्रम्हास्मि |
अहम् ब्रम्हास्मि |
2009 सालची ही घटना. मंडलेश्वरला येऊन मला दहा पंधरा दिवस होऊन गेले होते. छोटी खरगोन जवळ श्री गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित श्री भालचंद्र जोशी राहतात. मी त्यांना जोशी काका म्हणते. तिथे त्यांनी चैतन्य धाम नावाचे एक साधना केंद्र देखील सुरू केले आहे. माझ्यासाठी भाड्याचे घर शोधण्यापासून ते माझ्याकडे कोणी पाहुणे आले तर बसायला किमान पाच-सहा खुर्च्या तरी हव्यात या साऱ्याची सोय करण्याची जबाबदारी जणू काकांनी स्वतः कडे घेतली होती. मला गरीब मुलांना शिकवायचं आहे आणि तेवढ्या साठीच मी नाशिक सोडून मंडलेश्वरला आले आहे. तर त्या गरीब वस्त्या दाखवायची जबाबदारी पण काकांची. छोटी खरगोन ला अत्यंत गरीब वस्तीत एक सरकारी शाळा आहे. शाळा अकरा वाजता सुरू होते. सकाळी सात आठ वाजता सुद्धा ही मुलं तयार असतील शिकायला. आपल्या शाळेच्या आसपासच राहतात ही मुले. अकरा वाजता शाळेत जातील. या मुलांना काही येत नाही. त्यांना शिकवशील का ? मलाही ती जागा आवडली. मुलांशीही दोस्ती झाली. सत्तर-ऐंशी मुले शिकायला येऊ लागली. खेळ गाणी गोष्टी आणि अभ्यासही. अगदी तिसऱ्या चौथ्या दिवसापासूनच सत्तर ऐंशी मुलांची संख्या कायम होती. महिना होऊन गेला. एक नवीन चेहरा वर्गात दिसू लागला. सगळ्यात मागे जाऊन बसायचा. कोणाशी बोलायचा नाही फारसा.
मी त्याला विचारलं, “ कौन हो तुम बेटा ?”
मला अपेक्षित उत्तर होतं - मेरा नाम सुनील - संजय वगैरे असं काही तो सांगेल. पण तो उठून उभा राहिला मान खाली घालून सावकाश पावलं टाकीत माझ्या खुर्ची जवळ आला आणि फक्त मला ऐकू येईल इतक्या हळू आवाजात म्हणाला, “ मॅडमजी, मै हरिजन हूं |”
नकळत माझे डोळे पाणावले. केवढी मोठी चूक केली होती मी प्रश्न विचारताना ! मी त्याला नाव विचारायला हवं होतं. खुर्चीतून उठून मी उभी राहिले. त्याच्या पाठीवर हात फिरवून म्हणाले, “ बेटा, इसके बाद ये जबाब फिर किसी को नही देना | हम सब केवल इन्सान है | मै तो बस तुम्हारा नाम जानना चाहती थी | और हां, मुझे मॅडम मत कहना | ये सब बच्चे मुझे दीदी कहते है | तुम भी दीदी कहो |”
“जी, दीदी” असं म्हणून तो जागेवर जाऊन बसला. माझं बोलणं त्याच्या किती ध्यानात आलं ठाऊक नाही. त्या दिवशी मुलांना शिकवताना माझं मन थाऱ्यावर नव्हतं एवढं नक्की. बासष्ट वर्ष होत आली स्वातंत्र्य मिळून आणि अजूनही खेड्यात ही स्थिती ?
घरी परत जात असताना त्या मुलाचं “ मै हरिजन हूं ” हे वाक्य कानात आणि मनात गुंजत होतं आणि अचानक ब्रेक लागल्यासारखी पावलं थांबली.
काय म्हणायचं होतं त्याला नक्की? " मैं हरिजन हूं" की अहम् ब्रम्हास्मि ? ? ?
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Website -
Facebook -
दीदी,
ReplyDelete" कौन हो तुम बेटा " पासून " अहं ब्रह्मास्मि " पर्यंतचा प्रदीर्घ प्रवास, किती कमी शब्दांत मांडलात तुम्ही !
��
Dhanyavad
Delete