मातृदिन

मातृदिन



07  मे 1988. आसाम मधील  गोलाघाट येथे विवेकानंद केंद्राची पूर्व प्राथमिक शाळा ( खरं तर फक्त बालवाडी)  सुरू करायची  म्हणून माझी तयारी चालू होती. खेळाचे सामान,  पुस्तक -पाट्या आणि बरंच काही. आसाम मधला  मे महिना असल्यामुळे  ऊन पावसाचा खेळ चालूच होता. ऊन खूपच कडक असायचं .  अचानक एके दिवशी दुपारी दिमापूरच्या विवेकानंद केंद्राचा कार्यकर्ता मनोहर त्याची ऍम्ब्युलन्स घेऊन हजर झाला.

“भारती दीदी, तुला आत्ता माझ्याबरोबर दिमापूरला यायचं आहे|” मनोहर म्हणाला.

“आत्ता ?  काय काम आहे ?”

“उद्या आपल्याकडे मंदिरात एक पूजा आहे. काही परिचित मारवाडी - बंगाली महिला येतील पूजेला”.

“पूजा आहे तर माझं काय काम आहे तिथे ? गोधन भय्या आहे ना तिथे पूजा करायला . आणि उद्या तर ठाकूर -मा किंवा स्वामीजींची तिथी पण नाही - ना कुठला सणवार. आणि तू कधी पासून पूजा अर्चा करायला लागलास ?” 
एवढ्या उन्हात  दिमापूरला  जायच्या विचारानेच मी वैतागले . पण लगेच लक्षात आलं की दिमापूरच्या जवळच खटखटी  नावाच्या खेड्यात विवेकानंद केंद्राचे ग्रामीण विकास केंद्र आहे.  तिथे मोहीनी दीदी आलेल्या आहेत. त्या soft toys खूप छान शिकवतात असं ऐकलं होतं. खटखटीला वनवासी युवतींना  नागा शाली  हातमागावर बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाई.  काही नवीन प्रकारच्या शालींचे डिझाईन देखील मोहिनी दीदी देत असत.  काही दिवस तिथे थांबून आपल्याला soft  toys बनवायला शिकता येईल.  हा विचार डोक्यात पक्का झाला आणि मी मनोहरला  दिमापुरला येते म्हणून सांगितलं.

गाडी सुरु झाली आणि अर्ध्या रस्त्यात आल्यावर मला दुसऱ्या दिवशी असलेल्या पूजेबद्दल आठवलं . मी त्याला विचारलं, “उद्या कसली पूजा आहे हे तुम्हाला सांगणार होतास”.  माझ्या या वाक्यावर  मनोहर मोठ्याने हसला.   म्हणाला, “सध्या  खटखटीला तीस-पस्तीस मुली राहतात.  त्यांच्या जेवणाची सोय आपल्याला बघावी लागते.  नाबार्ड कडे फंडिंग साठी आपण अर्ज केलेला आहे.  पण अजून पैसे  बँकेत पोहोचले नाहीत.  या मुली भात जास्त खातात आणि तांदूळ नेमका संपलेला आहे. यांचं  भात खाण्याचे प्रमाण  तुमच्यासारखं मूठभर नसतं. भरपूर तांदूळ लागतो.  नाबार्डचे पैसे येईपर्यंत त्यांच्या जेवणाची व्यवस्था आपल्याला करावी  लागेल. पण  एवढा पैसा कुठून आणायचा ?  उद्या मातृदिन आहे.  मी दिमापुर मधल्या मारवाडी आणि बंगाली महिलांना आमंत्रण दिले आहे.  गोधन पूजा करेल आणि तुला मातृशक्ती या विषयावर भाषण करायचं  आहे.  भाषणाच्या शेवटी या सगळ्या महिलांना धान्यदानासाठी   आवाहन करायचं आहे” 

मी चक्रावले. “हे मातृदिन वगैरे मी कधी ऐकलेलं नाही .  मला वाटतं  तू  थापा मारतो  आहेस. आणि समजा तू  साजरा करणारच असशील मातृदिन की काय ते,  तर तू कर ना भाषण.  त्यासाठी मी कशाला.”  मी पुरती वैतागले होते.  कुठलीही तयारी नसताना असं अचानक भाषण करायची मला तेंव्हा  सवय नव्हती. 

 मनोहर पुन्हा मोठ्याने हसला. “ खरंच उद्या मातृदिन आहे आपल्याकडे भारतात वगैरे फार मानत नाहीत पण परदेशात त्यांची प्रथा आहे. आणि उद्या माझी गरज आहे म्हणून मला या मातांपुढे हात पसरायचा आहे.  हे तुला मी गोलाघाटलाच सांगितलं असतं तर तू आलीच नसतीस.  म्हणून गाडीत सांगेन म्हणालो.  प्लीज माझ्यासाठी एवढं कर. आणि हो, मला आज रात्रीच गोहाटीला काही कामानिमित्त जायचं आहे. दोन तीन दिवसांनी परत येईन.” 

अर्ध्या रस्त्यातून  मला माघारी जाता येणार नव्हतं. मोहिनी दीदीकडे soft toys शिकायला जायचं आकर्षण होतंच. आलिया भोगासी असावे सादर  असे म्हणत उद्या भाषण काय करायचं याचा मी विचार करायला लागले. 

08  मे 1988 रोजी रविवार होता.  दिमापुर विवेकानंद केंद्रातला पूर्णवेळ कार्यकर्ता गोधन रोज सकाळ संध्याकाळ मंदिरात ठाकूरांची   पूजा- आरती करत  असे.  सकाळी साडेआठ वाजताच बायका येणार होत्या.  त्यामुळे पुजेची सर्व तयारी  गोधन भैय्या ने  करून ठेवली होती. लांब राहणाऱ्या काही मारवाडी बायका आठ वाजताच मंदिरात  येऊन पोहोचल्या होत्या.  आठच्या सुमारास मीदेखील मंदिरात पोहोचले.   गोधन भैया एका भिकारणीशी  वाद घालत होता. ती भिकारीण  बाहेर  बिडी  ओढत  होती.  गोधन  भैय्याला  ते सहाजिकच आवडलं नाही. तिने तिथे थांबू नये अशी त्याची इच्छा होती.  तिने  बिडी ओढणे तर थांबवले  पण तिथून जायला तयार होईना.  लोकांसमोर तमाशा नको म्हणून मी गोधन भैयाला म्हटले. “ जाऊदे,  बसू दे तिला तिथे बाहेर.  पूजेला उशीर नको.” 

मंदिरात काही बायकांनी मला विचारलंच , “ दीदी आज क्यो  मना रहे है मातृ दिन ?” माझ्याकडे काही उत्तर नव्हतं. मी  म्हणाले,” पता नही,  मनोहर  भैया को शायद किसी  पंडित जी ने बताया होगा “  त्याकाळात मोबाईल, गुगल- इंटरनेट असं काही नव्हतं.  त्यामुळे त्यावर शोधून काही उत्तर देणेही शक्य नव्हतं.  मी विषय बदलला. 

साडे आठ वाजेपर्यंत हॉल गच्च भरला होता. विशेष म्हणजे भिकारीण पण आत येऊन बसली होती.  पूजा झाली त्यानंतर माझे छोटेसे भाषण.  नेमकं काय बोलले मलाही आठवत नाही.  पण नंतर आवाहन केलं कि या तीस-पस्तीस मुली ज्या अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत आणि उपजीविका चालवता यावी म्हणून शाली विणायचं काम शिकत आहेत.  पण जर त्यांच्या जेवणाची व्यवस्था होऊ शकली नाही तर मात्र त्यांना नाईलाजाने आम्हाला परत पाठवावे लागेल.  आणि तुम्ही सगळ्या जणी माता आहात. या वनवासी मुलीसुद्धा तुमच्याच आहेत.  त्या उपाशी राहिल्या अथवा परत गेल्या तर तुम्हाला आवडेल का?  असं थोडसं  एक भावनिक आवाहन त्यांना केलं.  सगळ्यांनीच आपापल्या क्षमतेनुसार मदत करायचं आश्वासन मला दिलं.  प्रत्येकाला प्रसाद दिला गेला आणि या सगळ्या बायका एकेक करून निरोप घेऊन आपापल्या घरी परत  जायला बाहेर पडल्या.  ती भिकारीण मात्र बसून होती.  प्रसाद तर तिला दिला  होता.  आता मंदिर बंद करायची वेळ होईल असे मी तिला सांगायला गेले. मी काही म्हणायच्या आतच तिने स्वतःच्या साडीला मारलेल्या 2-3 गाठी सोडल्या. एकात  तांदूळ तर दुसऱ्यात डाळ  होती. मला म्हणाली “हे घे !” 

मी नको नको म्हणतेय -  हे तुलाच ठेव असंही तिला सांगतेय,  पण ते ऐकायला तयार नाही.  हे घ्यायला माझ्याकडे ताट किंवा भांडं  नाहीये असेही कारण तिला मी सांगितलं.  तर म्हणते कशी - “पदरात घे ना ! नाईलाजाने मी पदर पुढे केला तिने डाळ-तांदूळ सगळं एकत्र करून माझ्या पदरात टाकलं.  गंमत म्हणजे त्या डाळ तांदळामध्ये लहान मुले खेळतात त्या  दोन गोट्या,  दोन-तीन खडूचे तुकडे  आणि एक आगपेटी पण होती.” गोधनला मी सकाळीच तिला हाकलू  नको म्हणून रागावले होते.  अवाक होऊन तो हे दृश्य  बघत होता.  ते सामान माझ्या पदरात देऊन ती तिथून निघून गेली.  नंतर गोधन मला म्हणाला दीदी, आज पर्यंत मी इथे एकही भिकारीण पाहिली नाही. ही इथे कशी आली आज.?”

 “तिलाच विचार जाऊन “ - असे मी त्याला हसत उत्तर दिले.  बराच वेळ आमची त्यावर चर्चा झाली. तो  थट्टेने म्हणाला,  आगपेटी दिली आहे तर बिड्यांचे बंडल  पण द्यायला हवं  होतं. यावर मी म्हणाले,  असं नकारात्मक का विचार करतोस.  डाळ-तांदूळ दिलाय तर स्वयंपाक करायला  चूल पेटवावी लागेल. त्यासाठी ही आगपेटी”  आमचं हे सगळं बोलणं गमतीतच  चालू होतं. नंतर मनोहरला किती पोते डाळ-तांदूळ मिळाले ठाऊक नाही.  पण ते प्रशिक्षण चालू होतं  याचा अर्थ पुरेसं मिळालेलं  असावं. 

इतक्या वर्षानंतर ही घटना फरशी आठवणीत राहिली नव्हती,  आज सकाळी  व्हाट्सअप वर मातृदिनाचे काही मेसेजेस पाहिले.  आणि अचानक ही घटना आठवली.  लगेचच 88 सालची माझी डायरी काढून पाहिली आणि काय आश्चर्य !!  08 मे 1988 ला रविवार होता.  मदर्स डे ची  आणखी काय माहिती गुगलवर आहे म्हणून उत्सुकतेने  गुगल सर्च केलं,  तर समजलं की 1914 सालापासून मे महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी जगभर मदर्स डे साजरा करायची प्रथा सुरू झाली.   भारतात ही लाट भलेही उशिरा आली असावी  पण त्याची माहिती मनोहरला होती.  तो खोटं बोलला नव्हता. 

सकाळपासून ती  घटना मनातून आणि नजरे समोरून जात नाहीये. त्या भिक्षेकरी  महिलेने खडू आणि डाळ-तांदूळ माझ्या पदरात टाकण्या मागे नियतीचा काही संकेत होता का ?


भारती ठाकूर 
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन 
मध्य प्रदेश


Website -

Facebook -

Blog -

Comments

  1. अशा समयोचित घटना म्हणजे निव्वळ योगायोग असतील का ?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आत्मभान