तत् त्वम् असि |

तत् त्वम् असि |


नाशिकला असतांना  वर्षातून किमान तीन-चार वेळेस वेगवेगळ्या अभयारण्यांना भेटी देणे, सह्याद्री अथवा  हिमालयात भटकंती असं काही ना काही चालू  असायचं.  अभयारण्यांमध्ये जातांना मैत्रिणींची किंवा नातेवाईकांची बच्चे कंपनी बरोबर असायची.  या अभयारण्याच्या  भेटींना आम्ही ‘अरण्य वाचन सहल’  असे म्हणत असू.  बरेचदा चंद्रपूरचा  प्रसिद्ध वन्यजीव  तज्ज्ञ  अतुल धामणकर हा देखील आमच्या बरोबर असायचा.  खास करून ताडोबा आणि जिम कॉर्बेट हे प्रवास त्याच्या बरोबर असायचे. या जंगल भटकंतीत वाघ बघणे हे तर एक आकर्षण असायचं पण जोडीला इतरही पशुपक्षी,  सरपटणारे जीव यांचा अभ्यास व्हायचा.  त्यांचे आवाज,  मूळ स्थान, विणीचा हंगाम,  पावलांचे ठसे आणि अजून बरंच काही.मुले अत्यंत ओढीने या  सहलींची वाट बघत असत.

नाशिकहून  लेपाला आले तेव्हा वाटलं आता हे असं अभयारण्यात जाणं - वन्य पशुपक्ष्यांना  पाहणं याला कितपत वेळ मिळेल कुणास ठाऊक !  कदाचित नाहीच .  पण वन्यजीवांच्या  सहवासाचा  योग हा बहुधा  माझ्या पत्रिकेतच  लिहिलेला असावा.

लेपा  पुनर्वास  येथे 2012 सली राहायला आले.  एका साधू बाबांनी त्यांचा आश्रम  नर्मदालयाच्या  कामासाठी दान दिला होता.  आसपास अजिबातच वस्ती नव्हती.  दूरवर एखाद दुसरे घर दिसायचे तेवढेच.  चारही बाजूला कापसाची, सोयाबीनची आणि नंतर  थंडीच्या दिवसात गव्हाची- हरभऱ्याची  शेतं.  पंधरा-पंधरा दिवस विजेचा पत्ता नसायचा. या आश्रमात आठ  फुटांवर छत म्हणून पत्रे टाकलेले.  उन्हाळ्यात तापमान 47 डिग्री च्या पुढे सुद्धा कधीकधी जाते.  मी  हसून स्वतःशीच म्हणायचे, “ तप करणं  काही आपल्याला जमणार नाही  म्हणून अशाप्रकारे देव  तापवतोय  बहुधा.” 

एक दिवस आश्रमाच्या एका छोट्या खोलीत बसून मी कम्प्युटरवर काही काम करत होते.  खूप वेळ खुर्चीत बसावे लागणार असेल तर मी चक्क खुर्चीत मांडी घालून बसते.  त्या दिवशीही तशीच बसले होते.  भिंतीला लागून काचेचे  पुस्तकांचे  कपाट होते.  तल्लीन होऊन माझं काम चालू होतं.  तेवढ्यात  आमचा एक कार्यकर्ता  काहीतरी विचारायला म्हणून आला.  दरवाजातच त्याचे डोळे विस्फारले.  “दीदी आपकी  कुर्सी  के नीचे... .”   त्याला घाम फुटला होता.  काय आहे बघायला मी उठून उभी राहिले.  एक भली मोठी घोरपड   माझ्या खुर्ची खाली होती.  कधी आली - कशी आली  ठाऊक नाही.  खुर्ची सरकण्याचा आवाज होताच  ती कपाटावर जाऊन चिटकली.  जंगलात  तिला शोधत फिरणे आणि ती आपल्या खुर्ची खाली असणे  यात फार फरक आहे. तानाजीने तिला पकडून सिंहगड चढणे आणि ती आपल्या खुर्ची खाली असणे यातही खूप फरक होता.  आता घाम मलाही फुटला होता.  आम्ही सगळेजण त्या खोलीतून बाहेर पडलो.  म्हटलं तिला हुसकावण्याच्या  भानगडीत पडू नका. तिची ती आपोआप जाईल. थोड्यावेळाने ती खरंच निघून गेली.

कोल्हे आमच्या या क्षेत्रात कुत्र्यांपेक्षा अधिक आहेत.  कुत्रे  दिवसा  जास्त दिसतात  तर कोल्हे रात्रीची भटकंती अधिक करतात.  मी नर्मदालयात राहायला आले  तेंव्हा संडास बाथरूम अंगणातच पण माझ्या खोली पासून  थोडं दूर  होतं.  रात्री उठावं लागलं  तर आधी खिडकीतून डोकावून  पहायचं. अंगणात दोन-तीन कोल्हे तरी सुस्तावलेले असायचे.  मग खोलीतून एखादं ताट आणि मोठा चमचा घेऊन यायचं  आणि त्याचा जोर - जोराने आवाज करायचा.  बिचारे कोल्हे !  झोपमोड होऊन बाहेर निघून जायचे.  कदाचित काय वैताग आहे ! झोपू सुद्धा देत नाहीत धडपणे असं मनातल्या मनात म्हणत  गेटच्या  बाहेर जात असावेत.

एक दिवस नर्मदालयाच्या अंगणात  साळींदरच्या  (porcupine) शरीरावरचा एक काटा (खरे तर त्याचा केस)   सापडला. एखादा खजिना सापडावा तसा मला आनंद झाला.  म्हणजेच हे  साळींदर महाराज जवळपासच कुठेतरी मुक्काम ठोकून आहेत.  लपून लपून तरी किती दिवस नजरेआड राहणार ?   एकदा रात्री अकरा वाजता मी इंदोरहून  लेपाला  परत येत होते .गाडीत ड्रायव्हर आणि मी दोघेच.  अगदी नर्मदालयाच्या कोपऱ्यावर  ड्रायव्हरने कचकन ब्रेक दाबले.  खरंतर मी पेंगुळलेले होते.  घाबरून  मी “काय झालं रे” विचारलं.  त्याच्या घश्याला  कोरड पडली होती.  त्यांनी हातानेच समोरचं दृश्य  मला दाखवलं.  भर रस्त्यात साळींदर पाठमोरा उभा होता. पिसाऱ्यासारखे शरीरा वरचे काटे त्याने फुलवले होते.  डावीकडे जाऊ की उजवीकडे  अशा द्विधा मनस्थितीत तो  होता. पण त्यामुळे तो नाचतो आहे असे वाटत होते.  कदाचित गाडीच्या प्रखर दिव्यांमुळे तो  बावरला असावा. मी ड्रायव्हरला म्हटलं, “ आधी गाडीचे लाईट बंद कर.  त्याला मराठीत साळींदर म्हणतात.  तुमच्या भाषेत काय म्हणतात  ठाऊक नाही.  पण हा असा सहजासहजी दिसत नाही.  आपलं भाग्य थोर  म्हणून दिसला.” ड्रायव्हरला आपलं भाग्य थोर वगैरे काही समजलं नसावं.  त्यांनी माझ्याकडे त्या समोरच्या प्राण्यापेक्षा माझ्या शेजारी बसलेला प्राणी अधिक विचित्र आहे या नजरेने पाहिलं आणि गाडीचे दिवे बंद केले . दोन  मिनिटांनी  गाडीचे   दिवे  पुन्हा चालू केले  तर साळींदर रस्ता पार करून पलीकडच्या शेतात निघून गेला होता.

विंचू  आणि साप  हे तर नर्मदालय परिवाराचे सदस्य असल्यासारखे आमच्याकडे मुक्काम ठोकून असतात.  त्यांचे प्रकार तरी किती ! नाग,  अजगर,  धामण,  घोणस,  मण्यार आणि मला माहित नसलेले असंख्य.  आमच्या छात्रावासात  राहणारी जी मुलं आहेत  ती सगळी वनवासी क्षेत्रातील आहेत.  त्यामुळेच साप या जीवाचं त्यांना  नाविन्य नाही.  चिकु नावाच्या सहा वर्षाच्या मुलाला  भल्या पहाटे पाच वाजताच घाईची  शी  आली.  अंथरुणातून उठून धावत तो  संडासात गेला.  इतकी घाईची लागली होती  की त्याने संडासातला दिवा देखील लावला नाही . पण  दुसऱ्या क्षणाला दरवाजा उघडून बाहेर आला.  त्याच्या पायाला  घोट्यापासून ते गुडघ्यापर्यंत एका सापाने विळखा घातला होता.  बाहेर येताच त्याने पाय झटकला.  सापाने विळखा सोडला आणि फरशीवर पडला.  आसपास  काही मुले  अंघोळ करत होती.  त्यातल्या एकाने त्याची शेपूट  पकडली  आणि बादलीत टाकला.  दुसऱ्याने धावत जाऊन स्वयंपाक घरातून एक ताट आणले आणि त्या बादली वर झाकण ठेवले.  थोड्यावेळाने मी बाहेर येऊन बघते मुलांच्या अंघोळी वगैरे सर्व व्यवस्थित चालू होते.  “ही बादली  ताटाने झाकून का ठेवली रे”  असं मी विचारताच “दीदी गंमत आहे बघा त्या बादलीत मी दाखवतो.” असं म्हणत  एका मुलाने ते ताट  उचललं.  आत मध्ये तीन साडेतीन फूट लांबीचा साप वेटोळं  घालून बसला होता.  सुदैवाने विषारी नव्हता म्हणून  मी सुटकेचा निश्वास टाकला.  साप पकडण्यात  तर आमचे शंकर आणि उदित हे दोन कार्यकर्ते खूपच तरबेज आहेत.  कितीही विषारी आणि मोठा लांबलचक साप असू देत.  ते त्याला लीलया पकडतात.  पण त्यांना  साप पकडण्याचे प्रशिक्षण नव्हते. ती जबाबदारी पुण्याच्या सौ वृषाली हळबे  आणि श्री विजय हळबे  यांनी घेतली.  रीतसर प्रशिक्षक बोलवून  मुलांना साप पकडण्याचे प्रशिक्षण दिले गेले.


एकदा संदीप  पडवीतल्या कपाटातून क्रिकेटची बॅट काढण्यासाठी गेला.   कुणा मुलाच्या  हलगर्जीपणामुळे कपाट उघडच होतं.  पाहतो तर काय एक नागराज फणा काढून बसलेले.  त्याने शांतपणे येऊन उदित ला सांगितलं आणि उदित शंकरने तितक्याच शांतपणे त्याला बाहेर काढून  एका तीन इंची  व्यास  असलेल्या  पाण्याच्या भल्यामोठ्या पाईपात घुसवलं आणि दूर जंगलात सोडून आले.  या अशा सापांच्या चित्तथरारक कथा.  मला बरीच भीती वाटते.  पण मुलं म्हणतात, “दीदी आमच्या घरांच्या आसपास तर यापेक्षा जास्त साप  आढळतात.  आम्ही घाबरत नाही त्यांना. आणि आपणही त्रास दिला नाही ना  तर ते पण आपल्याला काही करत नाहीत”  मी ह्या मुलांना काय आणि किती शिकवते ठाऊक नाही.  पण अनेकदा तेच माझे गुरु होतात.

नाशिकला असताना बिबट्या गावात येणे ही काही बातमी राहिली नव्हती तर आम घटना झाली होती.  कधी एखाद्या हॉटेलच्या रसोई मध्ये,  महात्मानगरला चक्क दुसऱ्या मजल्यावर तर रोजा कॉलनीत  कुणाच्या बाथरूममध्ये बिबट्यांनी हजेरी लावल्याचे अनेक पुरावे होते.  पण तो नर्मदालयाच्या आसपास फेरफटका मारेल असं कधी वाटलं नव्हतं.  आमच्या स्थानिक वर्तमानपत्रात लेपा, अमलाथा, कठोरा  ढालखेडा,  माकडखेडा यासारख्या ठिकाणी  बिबट्याच्या दोन माद्या आणि चार बछडे  यांचा वावर आहे अशी  बातमी अधून-मधून असायची.  एकदा  रात्रीचे साडेनऊ वाजले दहा वाजले होते.  परदेशातून  एका मित्राचा फोन आला.  नर्मदालयात मोबाईलला रेंज फार कमी मिळते.  त्यामुळे बाहेर रस्त्यावर येऊन मी दिव्याखाली  उभी राहिले.  अचानक कुत्रे आणि  कोल्हे  यांच्या जोराने ओरडण्याचा आवाज सुरु झाला. ओरडणे साधे नव्हते.  जंगलात वाघ किंवा दुसरा हिंस्त्र पशू  आसपास आला तर बाकीचे प्राणी असे ओरडायला लागतात.  त्याला अलार्म कॉल असेही म्हणतात.  माझ्या ते लक्षात आलं.  पण बिबट्या इतक्या जवळ असेल असा अंदाज नव्हता.  मी फोनवर बोलतच  होते.  दिव्याचा उजेड फक्त रस्त्यावर होता. पलीकडच्या शेतात मिट्ट काळोख.  त्या काळोखातून बिबट्या ची स्वारी शांतपणे रस्त्यावर आली.  माझ्याकडे बघत बघत रस्ता क्रॉस करून निघून गेली.  खिडक्या बंद केलेल्या  गाडीतून अभयारण्यातला वाघ  किंवा बिबट्या बघणं , त्याची माहिती गाडीत बसलेल्या मुलांना कौतुकाने सांगणं आणि प्रत्यक्षात पंचवीस फुटावर बिबट्याला समोर बघणं यातलाही फरक समजला.  पाय थरथरायला लागले.   भर थंडीत शरीराला घाम  फुटला.  फोनवरचं बोलणं फक्त ऐकू येत होतं.  मित्र “अगं  मी काय म्हणतोय  तुला” असं विचारत होता.  पण माझ्या घशाला पडलेली कोरड त्याला कशी समजणार?

माझ्या सांगण्यावर  नर्मदालयाच्या कार्यकर्त्यांनी  त्या रात्री विश्वास ठेवला नाही.  आमच्या छात्रावासातली मुलं मला चिडवत  म्हणाली, “ दीदी,  तेंदुआ भी आपको डरता है |”  उलट कुत्रा किंवा कोल्हा असेल असं म्हणून माझी  सगळ्यांनी थट्टा केली.  वनविभागाला सूचना केली असता त्यांचे  अधिकारी येऊन गेले.  पावलांचे  ठसे  मिळाले  आणि त्यांना पकडण्यासाठी विभागाने सापळेही  लावले.  दुसऱ्या दिवशी मात्र वर्तमानपत्रात फोटो सकट मोठी बातमी होती - लेपा जवळच्या हनुमान मंदिरा मागे बिबट्याने गायीची शिकार  करून तिला खाल्ले.  विशेष म्हणजे हे फोटो मोबाईल वरून काढलेले होते.  दुर्दैवाने अजूनही या बिबट्यांच्या माद्या किंवा त्यांची पिल्ले ( आता मोठी झाली असतील)  यांना  पकडण्यात वन विभागाला यश आलेले नाही.

बिबट्याने माझ्यावर झडप घातली नाही.  काही इजा केली नाही याचं कारण काय? अभयारण्यात मुलांशी बोलताना  आम्ही नेहमी  सांगायचो - “  भूक लागली नसताना सुद्धा  खाणारा जगातला एकमेव प्राणी म्हणजे माणूस.  वाघ सिंह बिबट्या यासारखे हिंस्त्र पशू देखील भूक लागली नसेल तर समोरच्या प्राण्यावर हल्ला करत नाहीत.  किंवा त्याला आज मारून ठेवू  आणि उद्या भूक लागल्यावर खाऊ असं देखील करत नाहीत.  साठवण ही गोष्ट त्यांच्या स्वभावातच नाही.  ती सवय फक्त माणसाची.”

नाशिकला उपनगरला माझ्या शेजारीच  माझी भाची  राहायची.  तिची छोटी आणि गोड मुलगी जाह्नवी.  तिला कुठे आणि कसे ठाऊक नाही पण जखमी झालेले पक्षी खूप सापडायचे.  सहा-सात वर्षाची होती ती. जखमी झालेला पक्षी माझ्याकडे घेऊन यायची आणि म्हणायची “आजी, आपण सांभाळू ना याला बरं  वाटेपर्यंत !”  अशा प्रकारच्या  जखमी पक्ष्यांचे संगोपन हा आमचा आवडता विषय झाला होता.  कधी बुलबुल,  चिमणी,  रॉबिन  तर कधी भारद्वाज देखील.  मात्र बरे होऊन हे पक्षी उडून गेले   घर  खायला उठायचं.

लेपाला आल्यावर  पक्षी दर्शन मात्र फार सुलभ झालं.  नीलपंख,  किंग फिशर,  कापशी घार,  घुबडांचे अनेक प्रकार,  चंडोल,  असंख्य चिमण्या, बुलबुल,  रातवे,   टिटव्या,  सातभाई,  पारवे,  रॉबिन,  सन  बर्ड्स... .   नावं तरी किती घ्यायची.  आसपासच्या  शेतांमध्ये सकाळ संध्याकाळ असंख्य बगळ्यांचे  थवे बसलेले  असतात.  एकदा  मी आणि दिग्विजय ( आमचा प्रकल्प समन्वयक)  चिचली नावाच्या गावाहून येत होतो.  एक बगळा  पायी रस्ता क्रॉस करत होता.  रस्त्यावर ट्रॅफिक बर्‍यापैकी होता.  समोरून एक स्कूल बस येत होती.  या बगळ्याला  उडून रस्ता क्रॉस करायला काय झालं ? असा मनात विचार येत नाही तोच  समोरच्या स्कूल बसने  त्या  बगळ्याला  उडवले. बगळ्याने उडण्याचा प्रयत्न केला. पण त्या प्रयत्नात तो  रस्त्याच्या पलिकडे असलेल्या झुडपात जाऊन  पडला.  आम्ही गाडी थांबवली.  जवळ जाऊन पाहिलं तर बगळा  जिवंत होता.  सुदैवाने  फारसं  लागलेलं नव्हतं.  पण त्याला उडता येत नव्हतं.  त्याला अलगद उचलून दिग्विजय गाडीत घेऊन आला.  मी त्याला माझ्या मांडीवर घेतलं .  थोड्यावेळाने गाडीच्या डॅशबोर्डवर असलेल्या  रामकृष्ण परमहंस, शारदा मा  आणि स्वामी विवेकानंदांच्या  छोट्या  फोटो मागे तो जाऊन बसला.  खरंतर इतक्या  कमी जागेत  तो मावला  तरी कसा  याचं आश्चर्य होतं.  प्रदक्षिणा घालाव्यात तशा  त्यानी त्या फोटो भोवती चकरा  मारल्या.  त्याला चालता येतंय म्हणजे जखम फार गंभीर नाही याची खात्री पटली.  नर्मदालयात पोहोचताच  तो गाडीच्या दरवाजातून बाहेर पडला आणि भांबावून आमच्या प्रार्थना कक्षात जाऊन बसला.  रात्रभर तिथेच होता.  मुलं गमतीने म्हणत -  हा मागच्या जन्मी कुणी साधू असावा किंवा रामकृष्णांचा भक्त असावा कारण रात्रभर तो प्रार्थना गृहातच  ठाकुरांच्या फोटो जवळ  बसून होता.  सकाळ झाली आणि  मुलांची गडबड सुरू झाली.  भुरकन दरवाजाबाहेर झेप घेऊन तो  शेतात जाऊन विसावला.

14 ऑगस्ट 2016.  मुलांनी  भल्या पहाटे मला हाक मारली.  मी योगासन करत होते.  “काय रे, थांबा जरा” असं म्हटल्यावर मुलं अजीजीने म्हणाली, “ दीदी ! जल्दी  बाहर आ जाओ !  देखो कौनसा पक्षी अपने प्रार्थना कक्ष में  आया है !    बगळ्याच्याच जागेवर  स्थानापन्न झालेला तो पक्षी म्हणजे फार मोठं आश्चर्य होतं.  ज्याला पाहण्यासाठी, किमान त्याची एक झलक तरी मिळावी म्हणून ताडोबाच्या जंगलात दिवस दिवस  ज्याचा आम्ही शोध घेत  असू तो चक्क नवरंग पक्षी (Indian Pitta)  होता.  बराच वेळ माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.  खरंच चिमटा घेऊन पाहिला मी स्वतःला. तोही बहुधा जखमी झालेला होता.  मुलांना  मी ताबडतोब बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे  बुक ऑफ इंडियन बर्ड्स हे पुस्तक काढून दाखवले.  मुखपृष्ठावरच नवरंग पक्षाचे चित्र होते.  विशेष म्हणजे संपूर्ण नर्मदा परिक्रमेत पाच महिने आणि त्यानंतर 2009 ते 2016 अशी सात वर्ष मी नर्मदा किनारी राहते आहे.  पण तो मला एकदाही दिसला नव्हता आणि त्या नंतरही आजतागायत कधी दिसला नाही. दोन दिवस तो नर्मदालयात मुक्काम ठोकून होता . 

हा लेख आज लिहायचं कारण म्हणजे आमच्या अतिथी कक्षा मध्ये रोज दुपारी मी थोडावेळ विश्रांती घेते.  माझ्या खोलीत मोबाईलला आणि wifi ला रेंज नाही म्हणून मी अतिथि कक्षात थांबते.   पलंगावर थोडावेळ आडवं  होऊन युट्युब वरच्या बातम्या बघणं किंवा व्हाट्सअप वरचे संदेश वाचणं  एवढाच उद्देश असतो.  अर्ध्या-पाऊण तासात पुन्हा बाहेर येऊन कामाला लागते.  आता सध्या पाहुणे मंडळी कोणी नाहीत.  त्यामुळे अतिथी कक्ष एरवी बंदच असतो.  काल  आमच्याकडे साफसफाईचे काम करणाऱ्या रेवा दीदीला मी म्हटलं- “अतिथी कक्षात सुद्धा झाडू पोछा करून घे.  आणि मी बाहेर आले”.  झाडू घेऊन ती दिवाणाखालून  केर काढत होती.  काहीतरी कडक दिवाणाखाली आहे असे तिला जाणवलं. डोकावून पाहताच  ती किंचाळली.  दिवाणाखाली एक भली मोठी घोरपड आराम करत होती.  ज्या दिवाणावर मी रोज  पहुडते,  तिथे ही घोरपड किती दिवसापासून होती ठाऊक नाही.  नेहमीप्रमाणे उदित शंकर गोलू या कार्यकर्त्यांनी तिला दरवाजा बाहेर काढलं.  तिला उचलणं  तर शक्यच नव्हतं.  तिने आल्या वाटेने परत जावे एवढीच आमची प्रार्थना होती.  विशेष म्हणजे तिने ती प्रार्थना ऐकली आणि एखाद्या डायनोसॉर सारखी डुलत डुलत ती गेटच्या बाहेर पडली.

ही मंडळी आम्हाला वारंवार अशी भेटतात याचं कारण म्हणजे आम्ही त्यांच्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे.  कदाचित त्याची आठवण करून  देण्यासाठीच त्यांचं आगमन होत असावं. कधीतरी संध्याकाळी आसपासच्या शेतातली  उभी  पिकं  आणि  पक्षांचे थवे  पाहताना,  त्यांची किलबिल  ऐकताना,  सूर्यास्ताच्या वेळी सूर्याचे आणि ढगांचे  रंग वैभव  पाहताना आपोआप हात जोडले जातात आणि मुखातून उत्स्फूर्तपणे फक्त एकच उद्गार निघतो - 
 
तत् त्वम् असि |


भारती ठाकूर 
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन 
मध्य प्रदेश

Website -

Facebook -

Comments

  1. Khup chhan lekh! Url sapdlyapasun na chukta vachna hota... I keep waiting for the new ones!

    ReplyDelete
  2. माझ्यासारख्या शहरवासियांना, दुरून डोंगरच नव्हे तर दुरून जंगल देखील साजरे, असेच म्हणावे लागेल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आत्मभान