ये हाथ मुझे दे दो ठाकुर !!!
ये हाथ मुझे दे दो ठाकुर !!!
बरेचदा आपण खूप मोठ्या योजना आखतो. आर्थिक नियोजन करतो आणि माझं प्लॅनिंग किती परफेक्ट आहे म्हणून स्वतःची पाठही थोपटून घेतो. पण कधीकधी नियती मात्र आपलं प्लॅनिंग मान्य करत नाही. तिच्या मनात काही वेगळेच असतं. या कोविड 19 अर्थात कोरोनाचेच उदाहरण घ्या ना ! नवीन वर्षाची सुरुवात झाली तेव्हा असं काही घडेल, दोन महिने घरात स्वतःला बंदिस्त करून घ्यावे लागेल असं आपल्याला स्वप्नात तरी वाटलं होतं का ? कुणाच्या घरी लग्न असेल तर कुणाच्या घरी दुसरी कुठली मंगल कार्ये असतील. कुणी देश-विदेशात ट्रिपला जायची योजना केली असेल. कोरोनाच्या रूपात आलेल्या या नियती पुढे मात्र सर्वच देशांना हात टेकावे लागले.
स्वतःचं कर्म आणि कर्तृत्व यावर एके काळी प्रचंड विश्वास असलेल्या मला नियतीने आपली वेगवेगळी रूपे आजवर दाखवलीत. त्यामुळे सुख दुःखाच्या कुठल्याही रुपात ती आली तर हसत “स्वागत आहे” एवढं एकच वाक्य मी तिच्याशी बोलते.
2005 साली नर्मदा परिक्रमेचा योग आला. परिक्रमेच्या दरम्यान जे काही विचारांचे मंथन -चिंतन झालं त्यातूनच लेपा या गावात एका धर्मशाळेत सकाळी तीन तास मुलांना शिकवणे यापासून सुरुवात झाली. नाशिक हून निघताना संस्था स्थापन करावी असा काही विचार स्वप्नात देखील नव्हता. 2010 साली काही निमित्त झालं आणि ‘NARMADA’ (Nimar Abhyuday Rural Management And Development Association) या संस्थेची निर्मिती झाली. 2012 साली लेपा या गावी एखादा अनोळखी साधू त्याचा पूर्ण आश्रम गोशाळा सहजपणे दान काय देऊन टाकतो, छोटी खरगोन या दुसऱ्या गावी एक सेवा निवृत्त शिक्षक आपली दोन मजली इमारत शाळा चालवण्यासाठी दान देतात तर भटयाण या ठिकाणी खुद्द ग्राम पंचायत आमच्या गावात राहणाऱ्या पण वर्ष दोन वर्षांनी स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी निशुल्क शिकवणार असाल तर जमीन तुमच्या संस्थेच्या नावावर करून देतो असे म्हणत नर्मदा किनारी शाळेसाठी जमीन काय दान देतात अशा काही अघटित - विश्वास न बसणाऱ्या घटना माझ्या आयुष्यात घडल्या आणि शिक्षण क्षेत्रातील एक वेगळेच क्रांतिकारी पर्व सुरू झालं. ज्याला ज्या विषयाची आवड आहे त्याने तेच शिकावं . असंही ठरवलं की हे शिक्षण विद्यार्थ्यांना नि:शुल्क असेल. आपल्याला शिक्षणाचा व्यापार करायचा नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते फक्त गरीब आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठीच असेल. शाळा सुरू झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बऱ्याच मुलांच्या डब्यात फक्त कुरमुरेच असतात. सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत ही मुलं उपाशीपोटी असायची. परिणाम कुपोषण आणि आजारपण. अभ्यासात लक्ष नाही. शिकवलेले लक्षात राहायचं नाही आणि एकूणच वागण्या-बोलण्यात अस्थिरता जाणवायची.
भट्टयाणच्या शाळेत एकदा दुपारी गेले असता एका शिक्षिकेनी तक्रार केली की चार सख्खी भावंडे आठ दिवसापासून शाळेत येत नाहीत. त्यांच्या झोपडीच्या आसपास फिरताना दिसतात . निरोप पाठवून पण येत नाहीत शाळेत. मुलांचे घर माझ्या परतीच्या वाटेवर होते. मुले बाहेरच बसली होती. मी त्यांना विचारलं कारे येत नाही तुम्ही शाळेत? मुलांनी दरवाज्याकडे बोट दाखवलं. आत डोकावून पहिलं तर आई जमिनीवर एका फाटक्या सतरंजीवर गोधडी पांघरून झोपली होती.
“काय झालंय आईला ? आणि वडील कुठे आहेत तुमचे ?l”
वडील माळव्यात कापूस तोडायला गेलेत. पण त्यांचा मोबईल लागत नाहीये. आईला आठ दिवसांपासून ताप येतोय. पहिले दोन चार दिवस शेजारायांनी जेवण दिलं. पण आता कोणी देत नाहीत. किराणा दुकानदार सुद्धा सामान उधार देत नाहीये. चार पाच दिवसांपासून आम्ही काही खाल्लेलं नाही. धाकटी भावंडे भुकेनी रडतात. आणि हे सांगत असताना तोच मोठ्याने रडायला लागला. त्याक्षणी माझी काय अवस्था झाली हे शब्दात वर्णन नाही करू शकत. भरीसभर म्हणजे त्या दिवशी मी दाल बाटी आणि शिऱ्याचे पोटभर जेवण करून गेले होते. स्वतःलाच खूप अपराधी वाटलं. त्या कुटुंबाच्या जेवणाची आणि आईच्या औषध पाण्याची तात्पुरती सोय करून मी परतले. पण जीवाला स्वस्थता नव्हती. ही एक प्रातिनिधिक घटना माझ्यासमोर आलेत. अशी अजून किती मुलं असतील की जी उपाशी पोटीच शाळेत येतात ? कुणास ठाऊक. दोनचार दिवस आधीच गौतम नावाच्या मुलानी वडील रोज संध्याकाळी दारू पिऊन येतात, आईला मारतात आणि तिने केलेला स्वयंपाक लाथ मारून फेकून देतात हे सांगितल्याचे आठवले. या साऱ्या समस्यांवर उपाय काय ?
“आपण शाळेतल्या सगळ्या मुलांसाठी माध्यान्ह भोजन सुरू करायचं का ?” मी आमचा प्रकल्प समन्वयक दिग्विजयला विचारलं.
“दीदी, संस्थेची आर्थिक स्थिति तर तुम्हाला माहीत आहेच. एवढ्या मुलांचा अन्न खर्च आपल्याला परवडणारा नाही .”
“होईल रे काही तरी व्यवस्था !” दिग्विजयने मला पटवून सांगायचा खूप प्रयत्न केला. पण शेवटी मी ऐकत नाही म्हटल्यावर विषयच बदलला. योगायोग म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी इंदोरच्या सारदा मठातून तथागतप्राणा माताजींचा फोन आला. “ भारती आज एक सज्जन अन्नदान के लिये पांच हजार रुपये देकर गये है | मैने शुभदा मराठे (आमच्या विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय संगीताच्या गुरु) के हाथ तुम्हारे पास भेजे है| इसे केवल अन्नदान के लिये खर्च करना | आपल्या या माध्यान्ह भोजन योजनेला सारदा मांचा होकार आहे या विश्वासाने मुलांसाठी ही योजना सुरू झाली.
मुलांची संख्या चारशेच्या आसपास. कुठलेही आर्थिक पाठबळ नाही. पण तरीही ठरवलं बघूया काय होतंय. गेली चार वर्ष ही योजना कुठल्याही सरकारी मदती शिवाय चालू आहे . संस्था आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करते आहे. तीनही शाळांना कुठलीही सरकारी मदत नाही. पण तरीही काम सुरळीत चालू आहे. दर महिन्याच्या पंचवीस तारखे नंतर जरा काळजी असते. एक तारखेला साठ जणांचे पगार द्यायचेत. किराणा आणायचा आहे. गाड्यांच्या डिझेलचे बिल ही सगळी यादी डोळ्यासमोर असते. थोडं टेंशन वाढत असतं. पण “योगक्षेमं वहाम्यहम्" चा सुखद अनुभवही लगेचच कुठल्या ना कुठल्या रूपात येतोच. विद्यार्थ्यांच्या दत्तक योजनेत (Sponsorship scheme) अनेक लोक प्रेमाने सहभागी होतात. स्थानिक शेतकरी वर्षभराची गव्हाची आणि गायींच्या चाऱ्याची जबाबदारी घेतात.
CSR प्रपोजल कसं लिहायचं हे माहीत नसलेल्या मला भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन या दोन संस्थांनी शाळेची भली मोठी इमारत बांधून द्यावी याहून आश्चर्याची गोष्ट ती कोणती ? पण हे श्रेय आमच्या संस्थेच्या अध्यक्षा डॉ ललिता देशपांडे यांचं. बघता बघता अलीराजपुर, बडवानी आणि खरगोन जिल्ह्यातल्या अत्यंत दुर्गम भागातील साठ वनवासी मुलं इथे शिकायला आली. मुलं मोठी होऊ लागली. काही मुलांना नववी दहावीचा अभ्यासक्रम झेपणार नाही हे लक्षात आलं. मग त्यांच्यासाठी एक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुद्धा सुरू झालं. त्याआधी पाच मुलांनी पाबळच्या विज्ञान आश्रमात वर्षभराचे प्रशिक्षणही घेतलं. काहींनी सकवार च्या रामकृष्ण आश्रमात जाऊन तिथे मोटर मेकॅनिकचे प्रशिक्षण तर दोघांनी पिंपळद येथील विवेकानंद केंद्रात प्लंबिंगचे तीन महिन्याचे प्रशिक्षण घेतले. पाबळच्या विज्ञान आश्रमात या मुलांना कॅम्पस इंटरव्ह्युमध्ये पुणे मुंबई सारख्या शहरात चांगल्या नोकऱ्या मिळत होत्या. पण आम्ही शहरात नोकरी करणार नाही कारण तुम्ही आमच्यासाठी शहर सोडून खेड्यात आल्या आहात असा एक सुखद आश्चर्याचा धक्का देत या मुलांनी आमच्या संस्थेतच राहायला सुरुवात केली. सुतारकाम, वेल्डिंग,प्लंबिंग, जैविक शेती, डेअरी ,शिलाई, होम वायरिंग या सारखे प्रशिक्षण सुरू केले. काही स्थानिक प्रशिक्षक सुद्धा यात सहभागी झाले. विशेष म्हणजे शाळेचे बेंच, डेस्क, टेबल वगैरे फर्निचर हे आमच्या शाळेतच तयार होते. शाळेच्या तीन मजली (तळ मजला + 2) इमारतीचे प्लंबिंगचे काम पण आमच्या या कार्यकर्त्यांनीच केले.
2017 साली एक आश्चर्य घडलं. मुंबईच्या भाभा परमाणु अनुसंधान केंद्राच्या ग्रामीण तंत्रज्ञान केंद्राची एक शाखा नर्मदा संस्थेत लेपाला सुरू झाली. आणि त्याच्या उद्घाटनासाठी साक्षात पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर लेपा च्या आमच्या छोट्याशा संस्थेत आले होते. आमच्यासाठी ती फार गौरवाची बाब आहे. या ग्रामीण तंत्रज्ञान केंद्रात आम्ही सोलर ड्रायरचे उत्पादन सुरू केले आहे.
अनेक लोक अगदी देश-विदेशातूनही आमची संस्था बघायला येतात. मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात. विशेष म्हणजे गोशाळेपासून ते तीन - चारशे मुलांच्या स्वयंपाकाचे व्यवस्थापन आमच्या संस्थेत राहुन मोठी झालेली आणि आता पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करत असलेली मुलंच करतात. शाळेसाठी च्या गाड्या आणि शाळेची इमारत यासाठी काही कॉर्पोरेट संस्थांनी मदत केली. पण रोजच्या खर्चाचं (recurring expenses) काय ? साठ जणांचा पगार, सात गाड्यांचे डिझेल, चारशे मुलांचे जेवण, दैनंदिन इतर खर्च हा साधारण मासिक सहा ते सात लाख़ांपर्यंत येतो. तुम्ही हे आर्थिक नियोजन कसं करता? एवढी मदत मिळते तुम्हाला ? असे अनेकांचे प्रश्न असतात. कुणी प्रत्यक्ष विचारलं नाही तरी त्यांच्या चेहऱ्यावर ते प्रश्न उमटलेले असतात. अशावेळी बऱ्याच वर्षापुर्वी घडलेली एक मजेदार घटना आठवते.
मी आणि माझी एक मैत्रीण पुण्याला सिंहगड रस्त्याने चाललो होतो. वाटेत रामकृष्ण मठ आहे. प्रवेशद्वारासमोर आल्यावर मी तिला म्हटलं “मी जरा मंदिरात जाऊन ठाकुरांचे दर्शन घेऊन येते. तू येतेस ?”
“नको नको. तूच जाऊन ये. मी थांबते इथे गेट पाशी” मैत्रिण उत्तरली. ज्याची त्याची श्रद्धा असे म्हणत म्हणत मी मंदिरात गेले. दर्शन घेऊन पाच दहा मिनिटात पुन्हा मैत्रिणी जवळ जाऊन पोहोचले. माझ्यामुळे तिला फार उशीर व्हायला नको. मला बघताच ती थोडं चेष्टेने म्हणाली, “ काय मागितलंस ठाकुरांकडे ?” (श्री रामकृष्ण परमहंस यांना त्यांचे भक्त “ठाकुर” म्हणून संबोधतात).
मी मनात म्हटलं,आजवर’ ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ - याखेरीज कुणाकडेही काहीही मागितलं नाही अगदी देवाकडेही. पण मला तिची थट्टा करायची लहर आली. अचानक शोले सिनेमातलं गब्बरसिंगच्या तोंडचं एक गाजलेलं वाक्य आठवलं. मैत्रिणीला चिडवत मी म्हणाले, “ मी ठाकुरांना काय मागितलं सांगू ? मी त्यांना म्हणाले - ये हाथ मुझे दे दो ठाकुर” मी थट्टा करते आहे हे तिच्या लक्षात आलं आणि विषय तिथेच थांबला. पण नंतर ज्या ज्या वेळेस मी ठाकुरांच्या फोटो समोर उभी असायची किंवा त्यांची कधी आठवण आली की ते वाक्य हटकून आठवायचं.
नर्मदा परिक्रमे नंतर नाशिक सोडून मंडलेश्वर - लेपा येथे आले. अक्षरशः शून्यातून हे काम उभं राहीलं. आता लक्षात येतंय “ये हाथ मुझे दे दो ठाकुर” असं मी जरी थट्टेने बोलले तरी ठाकुरांनी मात्र ते फार गंभीरपणे घेतलंय. आणि ठाकुरांचे हात दोन थोडीच आहेत ? ते तर हजारो आहेत.
या सर्व प्रकल्पामागे नर्मदा माईची प्रेरणा आणि आशीर्वाद सुद्धा पाठीशी आहेतच. आपण फक्त माध्यम आहोत - निमित्त मात्र आहोत हे पदोपदी जाणवत असतं. हे कोरोना प्रकरण चालू झाल्यानंतर देशभरातच नाही तर जागतिक स्तरावर त्याचे आर्थिक परिणाम होणार आहेत. अशावेळी पूर्णपणे जन सहयोगावर चालू असलेलं हे काम पुढे आपल्याला रेटता येईल का असा एक विचार दोन-तीनदा मनात आला. त्या विचाराने अस्वस्थही झाले. पण लगेचच तो विचार झटकूनही टाकला. असं वाटणं म्हणजे ठाकुरांवर - पर्यायाने त्या सर्वव्यापी शक्तीवर अविश्वास दाखवण्यासारखं होईल. 2020-21 च्या आर्थिक वर्षात ठाकुरांच्या त्या हजारो हातांची मी आतुरतेने वाट बघते आहे.
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Website -
http://narmadalaya.org/
Facebook -
Blog -
डोळे वाहात आहेत. निःशब्द झालो आहे.
ReplyDelete🙏🏾🙏🏾🙏🏾
ReplyDelete