माझं आकाश लाल- गुलाबी असू शकतं ना ?

माझं आकाश लाल- गुलाबी असू शकतं ना ?


1988 सालची घटना. गोलाघाट  विवेकानंद केंद्राची शाळा सुरु झाली होती.  बालवाडीत मुलांना प्रवेश देण्याचे काम चालू होतं. गोलाघाटच्या या शाळेत एके दिवशी दुपारी  एका गोड मुलाला घेऊन त्याचे आई-वडील शाळेतल्या प्रवेशासाठी आले.  बसकं  नाक,  गोबरे गाल आणि छोटेसे  डोळे. आईवडिलांनी स्वतःचा परिचय करून दिला.  मुलाचं नाव सांगणार त्याआधीच  त्या चिमुरडयाने स्वतःचे नाव सांगितले . “My name is Ayush ! आई-वडिलांनी आल्याआल्याच त्याला इंग्लिशचे किती शब्द माहित आहेत आणि  किती वाक्य तो इंग्लिश मध्ये बोलू शकतो हे अभिमानाने सांगितलं. वडील इंजिनीयर होते आणि सरकारी नोकरीत   होते. आई-वडील दोघेही बोलक्या स्वभावाचे.  मुलगा मात्र शांत बसून होता. 

“दीदी, मी तुमचं चित्र काढून दाखवू ?”  थोड्या वेळाने  त्याने मला स्वतःहून विचारलं,

मला कौतुकही वाटलं आणि तितकंच आश्चर्यही.  त्यानी वही आणि पेन्सिल बरोबर आणली होती.  बहुदा आई-वडिलांना  त्याने ABCD लिहून दाखवावं  अशी इच्छा असावी.  मी हो म्हणताच  कसलेल्या कलाकाराने  सहजतेने एखादं   रेखाचित्र काढावं  तसं माझं रेखाचित्र काढलं .  मुलीचा चेहरा कुंकू आणि समोर घेतलेली लांब वेणी.  बाल कलाकाराचा  उत्साह पाहून मलाही आनंद झाला.  आई-वडिलांच्या चेहर्‍यावर मात्र  ABCD लिहायचे सोडून हा हे काय   काढतो आहे असा भाव होता. 

शाळा सुरू झाली  आयुष आता पहिलीत गेला . आयुष बरोबर त्याच्या आई-वडिलांशी देखील  माझा परिचय वाढला.  खूप सज्जन माणसं.  प्रत्येक कामात हिरहिरीने भाग्य घेणारी.  माझ्या अडचणींना उपयोगी पडणारी.  मुलाच्या शैक्षणिक प्रगतीच्या बाबतीत मात्र त्यांच्या अपेक्षा थोड्या जास्त आहेत असं जाणवायचं. 

मला स्वतःला चित्र अजिबातच काढता येत नाहीत.  मी शाळेत शिकत असतांना मला चित्रकलेत नेहमी 50  पैकी 17  गुण असायचे.  तेही कदाचित  विद्यार्थ्यांना चित्रकलेत नापास करायचं नाही असे काही नियम शाळेचे असावेत म्हणून.  त्यामुळे शाळेत माझ्या शाळेत मी मुलांना कधी चित्रकला शिकवण्याच्या भानगडीत पडले नाही.  कधीकधी गाणं शिकवण्याचे सुद्धा धाडस केलं पण चित्रकला मात्र कधीच नाही.  माझ्या लक्षात आलं की या शाळेत  बर्‍याच मुलांना  चित्रं  काढायला आवडतात-- रंगवायला आवडतात आणि विशेष म्हणजे त्यात ते खूप रमतात देखील.  गोलाघाट मध्ये एक   युवक  चित्रकलेचे वर्ग घेतो असं समजलं.  मी त्याला निरोप पाठवला आणि शाळेत बोलावून घेतलं.  त्यानी स्वतःची काही चित्र देखील आणली होती.  ती बघितल्यानंतर  मला जाणवलं की मोठ्या वर्गांना नाही पण लहान मुलांना छोटी-छोटी चित्रं  किंवा आकार  शिकवण्या इतपतच  त्याची क्षमता आहे. माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. प्राथमिक वर्गातल्या मुलांना चित्र  काढायला शिकवशील का  असं मी त्याला विचारताच   तो आनंदाने तयार झाला.  आणि दुसऱ्या दिवशी पासून मुलांचा चित्रकलेचा  वर्ग  शाळेत सुरू झाला.  

मुलांना आपल्या आवडीचं शिकायला मिळतयं  म्हणून मीही निश्चिंत झाले.  एक दिवस दुपारी शाळेच्या कार्यालयात मी काही काम करत होते. अचानक आयुष  मोठ्याने रडत आणि धावत कार्यालयात  शिरला.   त्याला हुंदके आवरेनात. 

“काय झालं आयुष ?  का रडतोस ?” मी  काळजीने विचारलं. 

हुंदके  देत देत त्याने मला झालेली घटना सांगितली.  चित्रकलेच्या  सरांनी त्यांना आकाश डोंगर, झाडं, सूर्य आणि नदी असं  एक चित्र स्वतः काढून दाखवलं तसं मुलांना काढायला सांगितलं. गंमत म्हणजे त्यांनी झाडाला हिरवा, सूर्य पिवळा, नदी पांढरी आणि आकाश निळं  असे रंगही  त्यात भरायला सांगितले.  आज्ञा पालन करीत इतर मुलांनी सरांनी सांगितल्या  प्रमाणे रंग भरले.  आयुषने  मात्र आकाश किंचित  लालसर गुलाबी रंगाचं तर झाडांच्या  पानांसाठी तपकिरी  झाक असलेला  पिवळा रंग भरला.  ते चित्र पाहताच सर त्याला खूप रागावले. " मी झाड हिरवं   रंगवायला  सांगितलं होतं.  तू पिवळं  का रंगवलंस ? आकाश कुठे लाल गुलाबी  रंगाचं असतं का? निळा रंग का नाही दिलास आकाशाला ?" सर भलतेच रागावले होते. पण एका चांगल्या  बाल चित्रकाराचा  इतर मुलांसमोर अपमान झाला होता.  तो सहन न झाल्याने रडत रडत तो माझ्या कुशीत शिरला.  हुंदके देत त्यांनी मला  प्रश्न केला, “ दीदी,  माझा आकाश लाल -गुलाबी रंगाचं असू शकतं ना?  ते माझं स्वतःच आकाश होतं”.

त्याला कुरवाळत मी म्हणाले,  “होय राजा,  तुझं  आकाश लाल-गुलाबी असू शकतं.  प्रत्येकाचं आपलं  स्वतःचं  आकाश  असतं आणि  आणि आपल्याला हवा तो रंग आपण त्या आकाशात भरू शकतो”  इतका वेळ आयुष हुंदके देत होता - आता हुंदका आवरणं  मलाही शक्य झाले नाही. 

चित्रकला शिक्षकाला  आवश्यक तेवढी जाणीव आणि समज मी दिली.  सुदैवाने आदल्याच दिवशी संधीप्रकाशात लाल-गुलाबी आकाश खूप सुंदर दिसलं होतं याची आठवण मी त्यांना दिली.  पानगळ  होत असताना झाडांची पान सोनी पिवळी  तर कधी तपकिरी लाल होतात हेही त्यांच्या लक्षात आणून दिलं. आयुष त्याचं आकाश हिरव्या -पिवळ्या रंगानेही रंगवेल. कारण ती त्याची अभिव्यक्ति असेल.   कृपा करून मुलांना कॉपी करायला शिकवू नका. त्यांची कला बहरून यावी यासाठी आपण फक्त सहाय्यक म्हणूनच काम करायचं असतं हेही पटवून द्यायचा प्रयत्न केला. त्याला ते किती समजलं माहीत नाही.

विवेकानंद केंद्रातल्या माझ्या वास्तव्याला पाच वर्षे पूर्ण झाली आणि ठरल्यानुसार मी नाशिकला परत आले.  क्वचित कधीतरी  दोन चार वर्षातून  गोलाघाटला जाणं व्हायचं.  बहुधा   तो सहावीत  असे पर्यंत  गोलाघाटच्या या शाळेत होता.  दरम्यान  त्याने एका  आसामी  भाषेतील सिनेमात बाल कलाकार म्हणून काम केल्याचेही समजलं.   नंतर त्याच्या  वडिलांची दुसऱ्या गावी बदली झाली म्हणून की काय कुणास ठाऊक पण तो शाळा सोडून गेला.  मधली काही वर्ष त्याची काहीच खबरबात नव्हती.  2013 साली  शाळेच्या रौप्य  महोत्सवासाठी मी गोलाघाटला गेले. पहिल्या बॅचची जवळजवळ सगळीच मुलं लांब लांबहून आली  होती.  आयुष  कुठे दिसेना.  त्याच्या वर्ग मित्रांना विचारलं तर सगळ्यांचेच डोळे पाणावले. “ दीदी आपको पता नही?  आयुष अब हमारे बीच नही रहा” 

‘काय?  काय झालं त्याला ?  असं कसं शक्य आहे?”  त्या विचारानेच मन सैरभैर झालं. 

त्याच्या वर्ग मित्रांनी मन घट्ट करुन हकीकत सांगितली.  त्यानी IAS  व्हावं ही घरच्यांची सगळ्यांची इच्छा.  दिल्लीला जाऊन तीन वर्ष महागडं  कोचिंग घरच्यांनी घ्यायला लावलं. दोन-तीनदा परीक्षा देऊनही तो पास झाला नाही.  चौथ्यांदा  मात्र त्याचा आत्मविश्वास ढासळला.  परीक्षेला जाण्यापूर्वीच  आयुषने  स्वतःचं आयुष्यच  संपवलं. 

आयुषचे  वर्गमित्र  ही घटना मला सांगत होते. माझ्या डोळ्यासमोर मात्र  रडत रडत-माझ्या कुशीत  शिरून माझं आकाश लाल गुलाबी रंगाचं  असू शकतं ना ? असं विचारणारा चिमुरडा आयुष होता. 


भारती ठाकूर 
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन 
मध्य प्रदेश


Website -

Facebook -

Comments

  1. इतक्या सुंदर शिकवणुकीचं पर्यवसान अशा शोकांतिकेत व्हावं हेच किती दुःखद आहे ! कोण चुकतंय् ?
    पालक, पाल्य, समाज की मुळात शिक्षण पद्धती?

    ReplyDelete
  2. सद्य शिक्षण पद्धती, पालकांच्या पल्याकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा व पाल्यांच्या कडून पालकांची त्यांनी स्वतः पाहिलेली (पण त्यांच्याकडूनच अपूर्ण राहिलेली) स्वप्नं पूर्ण व्हावीत ही खुळचट अपेक्षा अशा सगळ्या चुकलेल्या मापदंडांनी भारताची घडी बिघडली आहे. अभ्यासक्रमही भीषण आहेत. पुस्तकं सत्य सोडून छुपे राजकीय मुद्दे शिकवताहेत. भारतीय इतिहासाचा कसा बट्ट्याबोळ केलाय पहा इथे: https://youtu.be/D_MZPW0-qSI

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आत्मभान