गोष्ट एका शाळेची (13)
गोष्ट एका शाळेची
अंबरीष, उपाशा, सारंगपाणी, दोना, तपस, अभिलाष, लोपामुद्रा, प्लविता, उमा, मनदीप, नारायण आयुष अंशुमान, सिद्धार्थ, जिल अशी ही २७ नक्षत्रे होती पहिल्या वर्षी. सुरवातीला २८ मुले होती पण एकाला वय खूपच लहान असल्याने पुढच्या वर्षी ये म्हणून सांगितलं. ही २७ मुलं म्हणजे खरोखरच गुणी बाळं होती.
सगळ्या मुलांच्या पालकांशी चांगला परिचय व्हावा म्हणून मी आठवड्यातून ३-४ तरी मुलांच्या घरी जात असे. तपस अत्यंत खोडकर. एकदा त्याला काही कारणाने लटकं रागावले तर म्हणतो कसा, “ मी आता मोठा झालोय. मोठ्या मुलांना असं रागवत नाहीत”.
“पण तू मोठा झाला आहेस हे आम्ही कसं समजायचं ?” मी त्याला चिडवत विचारलं .
“तुझ्या लक्षात नाही आलं का ? हल्ली मी माझ्या हाताने चड्डी घालतो. मला आता रेणूबायची मदत लागत नाही. तुझ्या माहिती करता अजून एक गोष्ट सांगतो. मी मोठा झालो की सैनिक होणार आहे”
“हो, का ! पण सैनिक कारलं, पालक, मेथी, भेंडी, भोपळा अशा सगळ्या भाज्या खातात. तू तर डब्यात रोज बटाटाच आणतोस. मग तू कसा सैनिक होणार?” माझं चिडवणं चालूच होतं.
“हे नव्हतं मला माहीत. ठीक आहे, मी उद्यापासून सगळ्या भाज्या खाईन. माझ्या बाबांनी मला सैनिकाचा ड्रेस पण आणलाय. मग तर मला भाज्या खाव्याच लागतील." विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी पासून त्याच्या डब्यात
खरंच वेगवेगळ्या भाज्या यायला लागल्या. (अभिमानाची गोष्ट अशी की हाच ‘तपस’ आज भारतीय सेनेत कर्नल या पदावर कार्यरत आहे.)
रुमीने अनेक हिंदी, इंग्लिश आणि आसामी बालगीतांना चाली लावल्या. मुलांची गाणी चालू असतील तर रस्त्यानी येणारा-जाणारा कान टवकारून दोन-पाच मिनिट रस्त्यावर थांबून गाणं ऐकायचा. काही जण मुद्दाम शाळेत डोकावून मुलांचं कौतुक करायचे. शास्त्रीय संगीताचा पाया म्हणजे अलंकार. हे सारे अलंकार मुलांचे पाठ झाले होते. एखादा मुलगा रडत असेल आणि गाणं सुरू झालं तर रडणं विसरून तो गायला लागायचा. पारिजात रूमीच्या घराजवळ रहायची. सुरात गायची. रुमीने तिला शास्त्रीय संगीत शिकवायला सुरवात केली. आणि विशेष म्हणजे पारिजात पाच वर्षांची असतांना तिने शाळेतल्या एका कार्यक्रमात स्वत: हार्मोनियम वाजवून यमन रागतली एक चीज गाऊन दाखवली.
आसामी संस्कृती मध्ये पान सुपारीला खूप महत्व आहे. प्रत्येकाच्या अंगणात सुपारीची झाडं आणि नागवेलीच्या पानाचे वेल असतात. आपण जेवण किंवा चहा नाश्ता झाल्या वर पान-सुपारी देतो. (घरी विडयाचे पान तर आजकाल आपल्याकडे कुणी ठेवत पण नाही) आसाम मध्ये कुणाच्या घरी गेले की आधी पान सुपारी आणि मग चहा-नाश्ता अथवा जेवण. चिमुरडा चिरंजीव सैकिया शाळेत येतांना एका पुडीत रोज सुपारी घेऊन यायचा आणि मला द्यायचा. माझ्या आजीने दिली आहे असं सांगायचा. रोज त्याच्या हातात सुपारी पाहून मी वैतागायची. सुपारी खाऊ नये. दात खराब होतात वगैरे बौद्धिक मी त्याला द्यायची. पण तरीही तो नेमाने सुपारी आणायचा. ती सुपारी फेकायची कशाला म्हणून एका डबीत भरून मी ठेवायचे. एक दिवस तक्रारीच्या सुरात ही गोष्ट मी दीप्तीला सांगितली तेंव्हा तिने मला आसामी संस्कृतीतलं सुपारीचं महत्व सांगितलं. " घरी आलेल्या व्यक्तिला सुपारी देणं हे समोरच्या व्यक्तिबद्दल असलेल्या आस्था-प्रेमाचं प्रतीक आहे. तिचा स्वीकार नाही केला तर तो देणाऱ्याचा अपमान मानला जातो. दिलीच कुणी सुपारी तर भले खाऊ नकोस- पण हातात तरी घेत जा." दुसऱ्या दिवशी त्या डबीतली सुपारी चिरंजीवच्या हाती त्याच्या आजींसाठी पाठवली. आणि त्या दिवशीपासून माझी काळजी घेणारी एक आईच मला मिळाली. माझ्या छोट्या मोठ्या अडचणींना धावून येणारी. फक्त ती आजीच नाही तर अंबरीषची आजी, उपाशाची आजी या सगळ्यांनी जणू माझं पालकत्व स्विकारलं होतं . हे पण ‘वसुधैव कुटुंबकं’ म्हणायचं ना ? या तिघींची भाषा मला समजायची नाही. मुलांशी मला अस्खलितपणे त्यांच्या भाषेत बोलताही येत नव्हतं. पण तरीही कुठे अडलं नाही. हृदयाची तार जुळली की भावना आपोआप पोचतात.
आसाम मध्ये मंदिरांच्या ऐवजी नामघर असतं. तिथे मूर्तीच्या जागी भागवत ठेवलेलं असतं आणि ज्या प्रार्थना तिथे म्हटल्या जातात त्याला बॉरगीत म्हणतात. आसाम मधल्या नव वैष्णव संप्रदायाचे संत श्रीमंत शंकरदेव आणि माधव देव यांच्या कृष्णभक्तीच्या रचना या नामघरात गायल्या जातात. अत्यंत भावपूर्ण आणि विशिष्ट ढंगात त्या गायल्या जातात. एके दिवशी संध्याकाळी उपाशाच्या आजी म्हणाल्या, “तुला आज माझ्या बरोबर नामघरात यायचं आहे.”
“काय विशेष ?” आसाममध्ये राहून सुद्धा माझं आतापर्यंत नामघरात जाणं झालं नव्हतं. आजींनी स्वत:हून विचारलं म्हणून जरा आश्चर्य वाटलं.
“काही नाही गं - तू आजारी होतीस ना तेंव्हा नवस बोलले होते तुला दर्शनाला घेऊन येईन म्हणून. तुझी शाळापण निर्विघ्नपणे सुरू झाली. तेही एक कारण होतं” मी आजींकडे पहातच राहिले. सखी म्हणाली, “आठवतंय रिचर्ड बाख काय म्हणाला होता ते ?”
The bond
that links your true family
is not of blood,
but of respect and joy in
each other’s life.
***********
डॉ रॉबिन बॅनर्जींच्या अनुपस्थित मी अधून मधून त्यांच्या बंगल्यात जात असे. मेक्सिकोला जाण्यापूर्वी त्यांनी तशी मला सूचना केली होती. त्यांच्या पुस्तकांच्या संग्रहातून मला हवे ते पुस्तक वाचण्यासाठी घेऊन जाण्याची सुद्धा मुभा होती. त्यामुळे नॅशनल जिओग्राफिक या मासिकाचे जुने अंक, रवींद्रनाथ टागोर यांची गीतांजली, सीक्रेट लाईफ प्लांटस् यासारखी अनेक पुस्तके वाचायला मिळाली. डॉक्टर बॅनर्जींच्या
बंगल्याजवळच एक ब्रिटिशकालीन वाचनालय होतं. त्यातही अनेक इंग्लिश पुस्तके वाचायला मिळायची. आश्चर्य म्हणजे रेव्ह. टिळकांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांच्या आत्मचरित्राचा १९५० मध्ये E. Josephine Inkster ने केलेला इंग्रजी अनुवाद ‘l follow after’ या वाचनालयात वाचायला मिळाला. दीप्तीच्या वडिलांचाही खूप चांगला ग्रंथसंग्रह होता. तिच्याकडची मार्गरेट मिशेल लिखित ‘Gone with the wind’ ही कादंबरी पण वाचायला मिळाली.
ऑक्टोबर १९८८ मध्ये रॉबिनदा मेक्सिकोहून परत आले. बालवाडीची सुरुवात, मुलांची संख्या, मेजर जनरल कुकरेती यांनी शाळेला आवर्जून दिलेली भेट या सगळ्या वार्ता ऐकून ते खूष झाले. मलाही समाधान वाटले. मेक्सिको मध्ये झालेल्या अन्नातील विषबाधेमुळे त्यांची तब्येत खूपच खालावली होती. डॉक्टरांनी दोन-तीन महिने तेल तिखट न घालता फक्त शिजवलेल्या भाज्या खायला सांगितल्या होत्या. त्यांचा जुना स्वयंपाकी लग्न ठरलं म्हणून गावी गेला होता आणि महिनाभर परत येण्याची शक्यता नव्हती. मी काहीच सुगरण या कॅटेगरीमध्ये बसत नाही. पण तेल तिखट न वापरता भाज्या फक्त उकडूनच द्यायच्या आहेत तर ते काम मी सहज करू शकते. काळजी करू नका असं आश्वासन मी त्यांना दिलं.
डॉ. रॉबिन बॅनर्जी मेक्सिकोहून परत आल्यापासून आम्ही भेटल्यावर एकदा तरी 'शाळेचं बांधकाम कधी
सुरू करताय तुम्ही?' हा प्रश्न विचारत. मी देखील विवेकानंद केंद्राचे तत्कालीन महासचिव बाळकृष्णजींना पत्र पाठवून लवकरात लवकर बांधकाम सुरू करण्याबाबत विनंती करत असे . कारण एक-दोन संघटना सोडल्या तर इतरांचा विरोध आता पूर्णपणे मावळला होता. पुढच्या वर्षी शाळेचा नवीन वर्ग सुरू करायचा तर बांधकाम लवकरात लवकर व्हायला हवे. पण अडचण अशी होती की, ज्या कार्यकर्त्यावर म्हणजे दिब्रुगडच्या अरुण गौड याच्यावर बांधकामाची जबाबदारी होती. त्याचे वडील खूप आजारी झाल्याने तो विवेकानंद केंद्रच सोडून हैदराबादला निघून गेला. पण यातूनही काही मार्ग निघणारच. बाळकृष्णजी दिब्रुगडला आले असता त्यांनी मला तिथे बोलावलं. मी बांधकामाचा विषय काढताच दीड लाखाचा चेक त्यांनी माझ्या हातात ठेवला.(बत्तीस वर्षांपूर्वीचे दीड लाख म्हणजे आजचे बहुधा १५ लाख तरी असावेत). श्री बाळकृष्णजी म्हणाले, “Go ahead with the construction.” मी चक्रावून गेले आणि त्यांच्याकडे,पहातच राहिले.
''मी बांधकामाची जबाबदारी घेऊ? मला तर बांधकामातलं काहीसुद्धा कळत नाही. तुम्ही माझी गंमत करताय का?'' काय बोलावं मला सुचेना.
"नाही. मी गंमत करीत नाही, पण आता दुसरा पर्याय नाही. बांधकाम हवं असेल तर ती जबाबदारी तुला घ्यावी लागेल. गोलाघाटमध्ये बांधकामातले काही जाणकार लोक असतील. त्यांना विश्वासात घे.डॉ बॅनर्जी यांचेही काही परिचित बिल्डर्स असतील. त्यांचाशी बोल. शाळेच्या इमारतीचा प्लॅन मात्र आपण दिब्रुगडचे आर्किटेक्ट श्री. रायबरूआ यांच्याकडून तयार करू. त्यांना घेऊन मी पुढच्या आठवड्यात गोलाघाटला येईन." बाळकृष्णजींचे हे बोलणे ऐकून मी सुन्न झाले. हा त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे असं मी समजायचं का? पण हे शिवधनुष्य पेलवेल मला?
आर्किटेक्ट रायबरूआ गोलाघाटला शाळेची जमीन पहायला येणार तर त्या जमिनीवर उगवलेले गवत कापून तिथली साफ सफाई करायला हवी. सहा-सात मजूर गवत कापायला लावले. ब्रिटिश भारत सोडून गेले तेव्हा तो बंगला व आसपासची जमीन आसाम चहा उत्पादक संघाने डॉ. रॉबिन बॅनर्जी यांना दिली. 1947 पासून त्या जमिनीवरचे गवत काढलेलंच नव्हतं. सुमारे पुरुषभर उंचीचे गवत आणि दाट झाडी. गोलाघाट गावातलं जणू ते छोटंसं अभयारण्यच होतं. गवत कापताना लक्षात आलं की तिथं एक मोठी पुखरी (पुष्करणी) देखील आहे. जी गवताने झाकली गेली होती. दोन छप्पर नसलेल्या पण पक्कं बांधकाम असलेल्या खोल्या देखील गवतात आढळल्या. अनेक प्रकारचे अगदी अजगरासारखे जाडजूड साप तिथे मुक्तपणे - वावरत होते. अजगरासंदर्भात मी डॉ. बॅनर्जी यांच्याशी बोलले तर ते हसायला लागले. म्हणाले, "बऱ्याच वर्षांपूर्वी मी अजगराची जोडी या बंगल्यात पाळली होती. ती जोडी एक दिवस गायब झाली. कदाचित त्यांचाच हा वंश विस्तार असावा”.
“तुला ठाऊक आहे त्या जोडीतली जी female होती तिचं नाव मी योगिता बाली ठेवलं होतं " डॉ. बॅनर्जी हे अगदी सहज सांगत होते. ते ऐकून मी मोठ्याने हसले. ‘रॉबिनदा, तिचं नाव योगिता बॅनर्जी तरी ठेवायचं. बाली तर आडनाव होतं त्या अभिनेत्रीचं.” ते गेंड्यांच्या किंवा इतर वन्य पशूंच्या जखमी पिल्लांना देखील सांभाळत. आता वन्यप्राण्यांबद्दलचे कायदे खूप कडक झालेत म्हणून आपण वन्यजीव पाळू शकत नाही याची खंत त्यांच्या बोलण्यात होती.
एक दिवस श्री बाळकृष्णजी आर्किटेक्ट रायबरूआंना गोलाघाटला घेऊन आले. रायबरूआंनी जागेची पाहणी केली. पाच-सहा दिवसात इमारतीचा आराखडा पाठवतो असं म्हणून जायला निघाले. दुपार झाली होती. मी म्हणाले, "जेवणाची वेळ झालीय. आता जेवण करूनच जा." एवढा वेळ आमचं बोलणं इंग्रजीत चाललेलं. पण जेवणाचा विषय काढताच ते मला मराठीत म्हणाले, ''गोड आंबट वरण आणि भरली वांगी करशील?" त्यांचे मराठी बोलणं ऐकून मला गंमत वाटली. म्हटलं, "मेतकूट भात आवडत असेल तर तोही आहे.अगदी सांडगी मिरची देखील आहे.” काही दिवसांपूर्वीच माझ्या वहिनीने मेतकूट, चटण्या, लोणची वगैरेचे पार्सल पुण्याहून दिब्रुगडला येणाऱ्या एका कार्यकर्त्याबरोबर पाठवले होते. रॉबिनदांच्या ड्रायव्हरला बाजारातून वांगी आणायला पाठवलं आणि रायबरूआंसाठी अस्सल म-हाटी बेत केला जेवायला. जेवताना गप्पांच्या ओघात त्यांनी सांगितलं की, त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण बडोद्यात झालं. तिथे चार-पाच वर्षे ते एका मराठी कुटुंबात पेईंग गेस्ट म्हणून रहात होते. मराठी भाषा व मराठी जेवण यावर त्यांचं मनापासून प्रेम होतं.
इमारतीचा आराखडा तर तयार होऊन आला. पण गोलाघाटमध्ये बांधकामाला कुणी तयार नव्हतं. भूमिपूजनाच्या वेळचा विरोध लक्षात घेता कशाला नसत्या भानगडीत पडा असाच त्यांचा दृष्टिकोन होता. एक-दोन जणांनी तयारी दाखवली पण बांधकामाचे दर फारच वाढवून सांगितले. डॉ. बॅनर्जी यांनीही बांधकामा संदर्भात काही मदत करण्यास असमर्थता व्यक्त केली. कसं होणार बांधकाम शाळेचं हा मोठा प्रश्न होता. पण इच्छा असेल तेथे मार्ग असतो हेच खरं. नागालॅण्ड-आसाम सीमेजवळील खटखटी या ठिकाणच्या विवेकानंद केंद्र ग्रामीण विकास प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले होते. सोना नावाच्या ज्या ठेकेदारांनी ते काम केलं तो अत्यंत विश्वासू होता. पंधरा गवंडी - मिस्त्रि लोकांचा ताफा त्याच्या हाताखाली काम करत होता. अत्यंत माफक दरात तो काम करायला तयार झाला. त्याच्या मजूर-गवंड्यासह बांधकामाच्या जागीच राहून चार पाच महिन्यात तीन हजार चौरस फुटाचे बांधकाम करून देईन म्हणाला. माझी तर आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन अशी अवस्था झाली. छप्पर नसलेल्या त्या दोन खोल्यांवर (गवतात आढळलेल्या) पत्रे टाकून घेतले. एका खोलीत सोना व त्याच्या साथीदारांची सोय झाली आणि दुसऱ्या खोलीत बांधकामाचे साहित्य ठेवले.
सोना हिंदी चांगलं बोलायचा. त्याच्या नावावरून मला वाटलं की तो बिहारी हिंदू असेल. पण एकदा सहज विषय निघाला तेव्हा त्यांनी तो व त्याचे सर्व साथीदार मुसलमान असल्याचे व भारत बांगलादेश सीमेवरच्या सिल्चर जिल्ह्यातले असल्याचं सांगितलं. सिल्चर गावाचे नाव सांगताना मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो खोटं बोलत आहे हे मला जाणवलं. मी म्हटलं, "सोना तू बांगला देशी असशील तर माझ्यापासून लपवू नकोस. नंतर कुणाच्या लक्षात आलं तर मी अडचणीत येईन, आताच स्पष्ट सांगितलंस तर मी पोलिस अधिकाऱ्यांच्या कानावर घालून ठेवीन. म्हणजे पोलिस त्रास देणार नाहीत. आधीच परप्रांतीय म्हणून मला केवढा विरोध सहन करावा लागला. तू तर परक्या देशातला." माझं बोलणं ऐकताना सोनाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. म्हणाला, "ज्या देशात माझे आई-वडील लहानाचे मोठे झाले. ज्या देशात माझे मामा, काका आत्या-मावश्या राहतात त्या देशात मी परका कसा काय? कुण्या राजकारण्यांनी देशाची हद्द ठरवली तेव्हा माझं घर बांगला देशांत राहिलं. केवळ म्हणून? सोना गहिवरला होता. मी विषय थांबवला. त्याचे म्हणणे चूक की बरोबर याचे उत्तर माझ्याकडे नव्हतं. त्याने आपण बांगलादेशी असल्याची कबुली दिली. माझं टेन्शन मात्र ‘वाढलं होतं. त्याला परत पाठवावं तर बांधकाम कोण करणार?" डॉ. बॅनर्जीना हे सारं सांगितलं तेव्हा ते हसले. म्हणाले, ''एवढी काय काळजी करतेस? आसाम मधला निम्म्याहून अधिक मजूर वर्ग बांगला देशी आहे." तरीसुद्धा पोलिस अधीक्षकांच्या कानावर ही गोष्ट घालण्याचे त्यांनी मान्य केलं. बांधकामाला मोठ्या मुश्कीलीने नगरपालिकेची परवानगी देखील मिळाली.
मुहूर्त पाहून भूमिपूजन केलं तरी केवढ्या अडचणी आल्या. आता कोणताही समारंभ-पूजा करायची नाही आणि गाजावाजा न करता बांधकामाला सुरुवात करायची असं ठरवलं. डॉ. बॅनर्जीना माझा हा निर्णय पटला नाही पण ते काही बोलले नाहीत.
२१ जानेवारी १९८९ रोजी सकाळी मी फक्त फुलं, हळद-कुंकू वाहून त्या जागेची पूजा केली. अथर्वशीर्ष, रामरक्षा, विष्णुसहस्त्रनाम वगैरे जेवढी स्तोत्रं आठवत होती ती मी एकटीनेच म्हटली. सोनाच्या हातात काही रुपये ठेवले आणि सांगितलं, आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. या पैशाची तुम्हा सर्वांसाठी मिठाई आण. दुपारी शाळा सुटल्यावर किती काम झालंय हे बघायला आले तर आश्चर्याने थक्कच झाले. सोनाने विश्वकर्म्याचा फोटो विकत आणून त्याची साग्रसंगीत पूजा केली होती. माझ्या हातावर त्याने खोबरं आणि पेढ्याचा प्रसाद ठेवला. गप्पा मारता मारता सोनाने घड्याळाकडे पाहिलं. म्हणाला, ''थांबा हं दीदी थोडावेळ. आमची नमाज पढण्याची वेळ झालीय. त्याच्या साथीदारांसह त्याने त्याच जागेवर नमाज पढायला सुरुवात केली. माझी खात्री पटली. या शाळेवर ईश्वर आणि अल्ला दोघेही मेहेरबान होणार हे नक्की.
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com
Website -
http://narmadalaya.org/
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/
हृदयस्पर्शी घटनाक्रम ! मन प्रसन्न झालं !
ReplyDelete😊😊
याला रोमहर्षक अनुभव म्हणायचं की ही एक रम्य कविता आहे? जीव मुठीत धरून तुम्ही काय सुंदर जगलात ! 🙏
ReplyDelete