गोष्ट एका शाळेची (15)

गोष्ट एका शाळेची (15)


सकाळी उठले तेंव्हा ताप चांगलाच होता. थर्मामीटर लाऊन पाहिला तर 102 डिग्री होता. रुमीला बालवाडी सांभाळ - मी डॉक्टरांकडे   जाऊन येते असं सांगायचं ठरवलं. पण  तासाभरात रुमीचा निरोप आला की ती आज शाळेत येऊ शकणार नाही. मी स्वतःशीच हसले. बहुधा देव माझ्या नशिबात  विश्रांती टाकायला लिहायला विसरला   होता. त्याला एखादं विनंती पत्र  लिहून विश्रांती माझ्या खात्यात  लिहायला सांगायची का ? आज रूमी नाही  म्हणजे  मुलांना  सांभाळणं  आणि शिकवणं ओघाने आलंच. 

शाळा सुटल्यावर डॉ खोंड यांच्याकडे जाऊन आले. त्यांनी पुन्हा सगळ्या वैद्यकीय चाचण्या  करायला सांगितल्या. त्या गोलाघाट येथे  न करता जोरहाट येथे कर म्हणाले. म्हणजे ताप असताना प्रवास करणे आलेच. गेल्या ऑगस्ट महिन्या पासूनचा हा ताप माझा पिछा कधी सोडणार आहे ठाऊक नाही. सरळ जोरहाटच्या गाडीत बसले. मनात माझ्या  तब्येतीचेच  विचार चालू होते.  अशी हतबलता पूर्वी कधी अनुभवली नव्हती. हाता पाया वरची सूज पण उतरत नव्हती. आतापर्यंतच्या आयुष्यात कधी सर्दी खोकलाही माहीत नव्हता. प्रारब्ध भोग म्हणतात ते हेच का ? 

काही  रिपोर्टस् घेऊन मी दुपारी परतले. उरलेले  रिपोर्टस दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मिळणार होते. अंगात ताप होताच. घरी पोहोचून एक तासही होत नाही तेवढ्यात रोबिंदांचा माळी जगदीश आला. “ दीदी, साब ने आपको    बुलाया है | “    

 ताप आहे येऊ शकत नाही असं उत्तर द्यायचं मनात आलं. पण जगदीशला सायकल रिक्शा आणायला सांगितली. अंगच काय - श्वासही गरम झाला होता. 

“आपण बोलावलंत मला ? काही विशेष काम ?” मी विचारलं.

“सोनाने काम किती केलं ते पाहिलस का ? काल तू तिथे आली पण नव्हतीस. आपण प्रत्यक्ष तिथे जाऊन रोज कामाचे सुपरविजन नाही केलं - केवळ दुसऱ्यांच्या भरोशावर कामं टाकली तर  कुठे चालतं का ?” इति रॉबिनदा. 

मी खालचा ओठ घट्ट दाबून ठेवला. काही वेडं वाकडं तोंडातून बाहेर पडायला नको.डोळ्यातून अश्रू बाहेर पडू नये म्हणून प्रार्थना करत होते. तरी डोळे पाणावलेच. 

“परवा तुला कोणी मुलानी कन्स्ट्रक्शन  साइटवर येऊन  धमकी दिली. जनरल  कुकरेती यांनी  असं काही घडलं तर  कलेक्टर आणि एस.पी. यांना  कळवायला सांगितलं होतं . तू  त्यांना तर कळवले नाहीसच  पण मला येऊन काही सांगितलं सुद्धा नाहीस.  काल दिवसभर तुझा  पत्ता नव्हता.  काही झालं तर  जबाबदारी आमची  आहे”. 

माझ्या डोक्यात लखकन् प्रकाश पडला. ड्रायव्हर जमालने रिपोर्टिंग केलेलं दिसतय.  मी घडलेली सर्व घटना सांगितली. आदल्या दिवशी बोकाजानला सिमेंट आणण्यासाठी  ट्रक घेऊन गेले. तिथे आलेल्या अडचणी- माझी सायकल सफर आणि परत येतांना चढलेला ताप- आज जोरहाटला जाऊन केलेल्या वैद्यकीय चाचण्या. हे आजचे रिपोर्टस् आणि कालचं सिमेंटचं बिल. कधी भेटणार मी तुम्हाला ? आता सुद्धा माझ्या अंगात 102 डिग्री ताप आहे . सोनाला आपण बांधकामाचा ठेका दिलाय. रोजंदारीवर तो काम करत नाहीये. त्यामुळे त्याचीही काही जबाबदारी आहे की नाही ? काल संध्याकाळी बोकाजान येथून  मी संध्याकाळी साडेसात वाजता पोहोचले. संध्याकाळी  तुमच्याकडे तुमचे काही मित्र येऊन बसलेले असतात. त्या तुमच्या ‘स्पेशल’ वेळी इथे यायला मला संकोच होतो. माझ्या बोलण्यात थोडा उद्वेग आणि थोडा त्रागा होता. डोळे पाणावले होतेच. रॉबिनदांच्या  चेहऱ्यावर आश्चर्य, सहानुभूति आणि कौतुक अशा संमिश्र भावना होत्या. 


“परवाच्या त्या धमकी प्रकरणानंतर मी काल तुम्हाला भेटले नाही कारण मी  गोलाघाटमध्येच नव्हते. तुम्हाला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. त्या मुलाकडून माझ्या जीवाला काही भीती नाही यावर आणि माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. समजा  मी त्याची तक्रार केली आणि अगदी त्याला पकडूनही दिले  तर काय होईल ? तो जेलमध्ये गेल्यावर माझ्या जीवाला आणखी  धोका असेल. कारण त्याच्या जागी कोणी दूसरा येईल. खुन्नस ठेवेल माझ्यावर. हवं तर मी आज करते लेखी तक्रार. पण मग माझ्या जीवाला धोका नसेल याची खात्री द्या. काल माझ्या इथे नसण्याने तुम्हाला जी काळजी वाटली त्याबद्दल तुमची क्षमा मागते. पण मी बोकाजानला जातेय  ही गोष्ट जमाल आणि सोना दोघांना ठाऊक होती. सकाळी खूप लवकर गेले मी. इतक्या सकाळी तुम्हाला डिस्टर्ब कशी करणार ? Extremely sorry. ” 

रॉबिनदांनी नोकराला सांगून पाणी आणि चहा मागवला. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. चहा 
पित असताना ते म्हणाले, “ठीक आहे. तू  हे सांगितल्यावर मी थोडा निश्चिंत झालोय. यावर आपण काहीतरी उपाय शोधू. पण काल तू  ट्रक घेऊन बोकाजानला सिमेंट आणायला स्वत: गेलीस.  तुझ्या धाडसाचं  कौतुक  करावं तेवढं थोडंच आहे.  पुन्हा जेव्हा सिमेंट लागेल  तेव्हा तुला  स्वतः जायची गरज नाही.  मला सांग. मी व्यवस्था करीन कुणाला तरी तिथे पाठवायची." हेच डॉ बॅनर्जी मला काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की बांधकामाच्या बाबतीत मी विवेकानंद केंद्राला म्हणजे तुलाही काही मदत करू शकणार नाही. 

कन्स्ट्रकशन साइटवर न  जाताच मी घरी परतले. काही खायची इच्छा नव्हती. पण औषधं घ्यायची म्हणून खिचडी बनवली. खिचडी शिजेपर्यन्त खुर्चीत बसूनच प्रार्थना म्हटली. जेवताना खूप ग्लानि येतेय असं वाटलं. तेवढ्यात रिचर्ड बाखचा आवाज आला. 

Argue 
for your limitations,
and sure enough 
they are 
yours. 

थकलेल्या स्वरात पण हसत मी त्याला म्हणाले, “कन्याकुमारीला बाळकृष्णनजी आणि लक्ष्मी दीदी आमच्या प्रशिक्षण काळात आम्हाला नेहमी सांगत, “sky is the only limit for every karykarta”  त्याचं काय करायचं ?   



भारती  ठाकूर
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com

Website -
http://narmadalaya.org/
 
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
 
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/

Comments

  1. सारखी आपली परीक्षाच द्यायची ! 😡
    मग अभ्यास कधी करायचा ? 🤔
    का परीक्षा हाच अभ्यास आहे ? 😳

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....

मातृत्व