गोष्ट एका शाळेची 18

गोष्ट एका शाळेची 18



डॉ रॉबिन बॅनर्जी त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या फुलपाखरांवरच्या डॉक्युमेंटरीसाठी पुन्हा मेक्सिकोला जायचे आहेत. अजून तिकीट काढून झाले नाही. हे सांगण्यासाठी त्यांनी आज मला खास बोलावलं होतं. त्यांना आवडणारा मुरमुऱ्यांचा चिवडा मी आठवणीने बरोबर घेतला. आम्ही लहानपणी मुरमुरे चहात टाकून खात असू तसे ते आता सुद्धा खातात. कधी कधी मलाही खायला लावतात. 

आज रॉबिनदा  जरा निवांत होते त्यामुळे त्यांच्या काझीरंगा या राष्ट्रीय उद्यानाच्या आठवणींमध्ये खूप रमले. जखमी किंवा अनाथ  झालेली गेंडयाची किंवा इतर जंगली प्राण्यांची पिल्लं  ते गोलाघाटला त्यांच्या घरी घेऊन येत. त्यांचं संगोपन करत आणि ती बरी झाली की पुन्हा जंगलात सोडत. त्यांच्या बंगल्याच्या आसपासचा परिसर इतका मोठा आणि दाट झाडी असलेला होता की या पिल्लांना ते जंगलच वाटावं. शिवाय  चारही बाजूंनी सुरक्षित. आता मात्र कुठलाही वन्यप्राणी घरी ठेवणे हे कायद्यानेच प्रतिबंधित आहे. असे प्राणी आता पाळता येत नाहीत याचे त्यांना दु:ख होतं.  “ पण  कायदा आपणच पाळायला हवा ना भारती” असंही ते लगेच म्हणायचे. 

“भारती,काझीरंगा अभयारण्यावर - खास करून त्यातल्या एकशिंगी गेंड्यांवर बनलेली माझी पहिली डॉक्युमेंटरी 1961 साली पहिल्यांदा बर्लिन टेलिव्हिजन वर दाखवण्यात आली. नंतर जगभरात ती वेगवेगळ्या देशातून दाखवली गेली. या सगळ्या प्रसिद्धीचा फायदा काझीरंगा अभयरण्याला झाला. भारत सरकारही जागं  झालं.  नाही तर शिकाऱ्यांनी आतापर्यंत सगळे गेंडे मारून टाकले असते. International Union for conservation of Nature अर्थात IUCN च्या रेड लिस्ट मध्ये या एकशिंगी गेंडयाचे स्थान फार वर होते .या डॉक्युमेंटरीने जगभरात खळबळ माजली. गेंड्यांच्या रक्षणासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून निधी येऊ लागला. पर्यावरणवादी आणि निसर्गप्रेमी या  गेंड्यांच्या रक्षणासाठी पुढे सरसावले. मुख्य म्हणजे काझीरंगा अभयारण्यामुळे आसामला सुद्धा जगभर प्रसिद्धी मिळाली. आज जगभरात जितके एकशिंगी गेंडे आहेत त्यापैकी दोन तृतीयांश गेंडे एकट्या काझीरंगामध्ये आहेत. खरं तर काझीरंगा हा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प. पण तिथे वाघांपेक्षा गेंडे जास्त आहेत”  हे बोलत असतांना रॉबिनदांच्या डोळ्यात जणू अख्खं काझीरंगा उतरलं होतं.  एक सात्विक समाधान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होतं. पन्नास मिनिटाच्या या डॉक्युमेंटरीला अनेक आंतर्राष्ट्रीय पारितोषिके मिळाली. 

“रॉबिनदा तुमच्या किती डॉक्युमेंटरींना भारतात पारितोषिके मिळाली ? मी. 

माझ्या या प्रश्नावर रॉबिनदा मोठ्याने हसले. “ मिळालीत काही. पण  मी आजपर्यन्त कुठल्याही पारितोषिकासाठी अर्ज पाठवला नाही. आपल्या सरकारला थोडी लाज वाटली असावी म्हणून पद्मश्री पुरस्कार मिळाला. लगेचच राज्यसभेचे सभासद व्हा म्हणून मागे लागले.”

“कधी होतात तुम्ही राज्य सभेचे सभासद? मला ठाउकच नव्हतं” मला आश्चर्य वाटलं. 

“छे ! छे !! मी काय राज्य सभेवर जातोय. गेलो असतो तर कदाचित पर्यावरण मंत्री देखील झालो असतो. पण असं काही पद मिळालं की खरा पर्यावरणवादी पर्यावरणासाठी  काहीच करू शकत नाही. ‘विकास-डेव्हलपमेंट’ या गोंडस नावाखाली त्याच्यावर अनेक राजकीय दबाव येतात. मी राज्यसभेसाठी नकार देण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलातली आणि इथली - या गावातली शांतता सोडून दिल्लीसारख्या गजबजपुरीत मी रमलो नसतो. मुख्य म्हणजे माझ्या विषयात ज्यांना आवड आहे असे लोक सोडून इतरांमध्ये मला मिसळायला फारसे आवडत नाही.”

 काझीरंगावरची डॉक्युमेंटरी मी तिन-चार वेळेस पाहिली होती. पण आज पुन्हा दाखवता का विचारल्याबरोबर तयार झाले. मला म्हणाले, “जा जमालला प्रॉजेक्टर लावायला सांग.  मी आलोच.”

रॉबिनदांच्या नोकरांच्या खोल्या बंगल्याच्या मागेच होत्या. जमालला हाक मारण्यासाठी मी निघाले तर तो   रॉबिनदांच्या भोजन कक्षातच होता. मला पाहताच तो  दचकला कारण डॉक्टरांच्या खास पाहुण्यांसाठी असलेल्या वाइनच्या बाटलीतून ती ग्लासात ओतून तो पित होता. बाटली देखील टेबलवर होती. हे असं मी त्याला अनेकदा बघितलं होतं. असेल त्याला रॉबिनदांची परवानगी. आपल्याला काय करायचे आहे ? असं म्हणून मी दुर्लक्ष केलं. 

“जमाल तुला रॉबिनदा बोलवताहेत. प्रॉजेक्टर लावायचा आहे.” एवढंच  बोलून मी तिथून सटकले.

काझीरंगावरची डॉक्युमेंटरी बघतांना वाटलं या एकशिंगी गेंडयासाठी रॉबिनदा म्हणजे देवदूतच म्हणायला हवेत.
काझीरंगातलं ते सहा सात फूटी गवत, जंगल, इतर प्राणी हे सगळं रॉबिनदांच्या कॅमेऱ्याने इतकं अचूक टिपलं आहे की डॉक्युमेंटरी पाहतांना वाटावं आपण प्रत्यक्ष त्या जंगलातच आहोत. 

“रॉबिनदा, 1959-60 सालाच्या आसपास ही डॉक्युमेंटरी पूर्ण झाली. मला कौतुक हे वाटतं की आता उपलब्ध असणारे आधुनिक व्हिडिओ कॅमेरे आणि तंत्रज्ञान तेंव्हा नसतांना  तुम्ही जंगलाचे आणि गेंड्यांचे  इतके बारकावे यात दाखवले आहेत की थक्क व्हायला होतं.  या पहिल्या डॉक्युमेंटरीला इतकी प्रसिद्धी मिळाली- काझीरंगा अभयारण्याला एव्हढी मदत मिळाली, गेंड्यांचे प्राण वाचले, त्यांची संख्या वाढली. हे फार मोठं यश आहे  - आपण achievement म्हणू या त्याला हवं तर.  हे सगळं घडल्यावर तुम्हाला काय वाटलं - तुमच्या भावना काय होत्या तेंव्हा ?” खरं तर एखाद्या पत्रकारासारखा हा प्रश्न होता पण माझ्या मनातली  ती अगदी प्रामाणिक उत्सुकता होती. 

रॉबिनदा अगदी मिश्किल हसले. “भारती, जेंव्हा ‘यश’ हा शब्द तुमच्या स्वत:च्या शब्दकोषात येतो ना तेंव्हा ‘समाधान’ हा शब्द त्यातून आपोआप नाहीसा (delete)  होतो. शिवाय ‘यशा’ च्या मागे comparitive आणि superlative degrees लागत राहतात आयुष्यभर. पुढे कुणीतरी त्याच क्षेत्रात मोठी कामगिरी करतो आणि  मग तो better बनतो. नंतर तिसरा कुणी best  बनतो. पहिल्याने कुठल्या परिस्थितीत ते काम केलं याचा मात्र सगळ्यांना विसर पडतो. या डॉक्युमेंटरीजचेच उदाहरण घे. 1950च्या दशकात मी शूटिंग करायला सुरुवात केली तेंव्हा अत्यंत साधे कॅमेरे होते. प्रवासाची साधनं कष्टदायक होती. फिल्म्सच्या डेव्हलपिंग आणि एडिटिंगच्या सोई सहज उपलब्ध नव्हत्या.  त्या तुलनेत आता तंत्रज्ञान फार पुढे गेलं आहे. अशा प्रकारच्या फिल्म्स सहज बनवता येतात. त्यामुळे या छंदातून तुम्हाला आनंद आणि समाधान किती मिळालं हे महत्वाचं.  गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचा विद्यार्थी म्हणून मी निसर्गदेवतेची थोडीफार सेवा  या माध्यमातून करू शकलो. त्यांनी केलेल्या संस्काराची- प्रेमाची परतफेड तर होऊ शकत नाही. हे सगळे लघुपट म्हणजे त्यांना कृतज्ञतापूर्वक दिलेली आदरांजली आहे असं समज.

आम्ही बोलत असतांना मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे रॉबिनदा सारखे माझ्या हाताकडे आणि पायाकडे पहात होते. ते असं पाहात आहेत म्हणून मला अवघडल्यासारखं होत होतं.  मी घरी जायला निघाले तेंव्हा त्यांच्या व्हरांड्यात थांबून त्यांनी माझी बोटं आणि पाय निरखून पाहिले. गंभीर होत ते म्हणाले, “भारती, तुझी बोटं सरळ कर बघू.” माझी बोटं पूर्ण ताठ होत नव्हती. काळजीच्या स्वरात ते म्हणाले, “तुझ्या बोटांवर आणि पायावर सूज देखील आहे. हे चांगलं लक्षण नाही”. 

“हो मलाही ठाऊक आहे. 99 ते 100 डिग्री तापही रोजच असतो. पण काय करू ? सध्या  कुठलीच अॅंटीबायोटिक्स लागू पडत नाहीयेत. कामही थांबवता येत नाही.जून महिन्या पर्यन्त  काम पूर्ण व्हायलाच हवं नाही तर शाळेत नव्याने येणारी मुलं कुठे बसतील ?” माझ्याही स्वरात काळजी होतीच. 

“थांब जरा. आलोच मी” असं म्हणत रॉबिनदा त्यांच्या खोलीत गेले आणि काही औषधं घेऊन आले. “हे घे. या औषधानी साइड इफेक्टस कमी होतील. सूजहि उतरेल. काळजी घे स्वत:ची. फार धावपळ चालू आहे तुझी”. 

मी अवाक् होऊन पहात राहिले. मागच्या आठवड्यात फक्त दोन  दिवस बांधकाम बघायला आले नाही म्हणून रागावणारे रॉबिनदा हेच का ? त्यांचं लहान मुला सारखं पटकन रूसणं आणि नंतर प्रेमानं विचारपूस करणं हे 
सगळं श्रावणातल्या ऊन-पावसाच्या खेळा सारखंच होतं. त्यांच्या त्या काळजी भरल्या शब्दांनी माझे डोळे भरून आले. त्यांना ते दिसू नयेत म्हणून मी ‘येते रॉबिनदा’ असं म्हणत पायऱ्या उतरले. 

आभाळही भरून आलं होतं. घरी लवकर पोहोचायला हवं .  पण पायांना गतीच येत नव्हती. . समोरचा रस्ताही  स्पष्ट दिसत नव्हता. सखी म्हणाली, “इतकं काही अंधारलं नाहीये  ढगांनी. तुझ्या सरावाचा - पायाखालचा  रस्ता आहे. First of all get your vision cleared.” सखी बरेचदा काही तरी खडूस बोलते. मला आताही तसंच वाटलं. पण लगेच ती मोठयानी हसत म्हणाली, “अगं,डोळे पूस तुझे. म्हणून दिसत नाहीये तुला रस्ता”. 

जादुमनी प्रिंटिंग प्रेसपर्यन्त पोहोचले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. वाटेत कुठे आडोसा देखील नाही. “बुखार की ऐसी-तैसी’ असं म्हणत ओलीचिंब होत मी घरी पोहोचले. कपडे बदलून चहा केला. ग्रंथालयातून आणलेलं Charles Dickens चे  Oliver Twist हे पुस्तक  हातात घेऊन वाचायला सुरवात केली. सखी म्हणाली, “Why do you always read books written by others ? Why don’t you read your own story book ?

“माझं पुस्तक ? मी कधी लिहिलंय पुस्तक ?”   प्रश्नार्थक नजरेने मी  तिच्याकडे पाहिलं.

“पुस्तक प्रकाशितच व्हायला हवं असं कुठेय? आपल्या प्रत्येकाचं आयुष्य एक पुस्तकच असतं त्याचंही कधी वाचन- चिंतन करत जा. आपण स्वत:बद्दल कधी विचारच करत नाही.”  सखीच्या बोलण्यात तथ्य होतं हे नक्की. मी डोळे मिटले आणि मनाच्या पडद्यावर आयुष्याच्या कथेचं एकेक पान उलगडत गेलं. 

I thought about myself. 
And started reading my own story book.
To my surprise,  I have written the most adventurous stories,
Also written about the fascinating moments,
Loving talks
And daring tasks. 
And of course -
My communion with HIM - the supreme reality. 
 

भारती  ठाकूर
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com

Website -
http://narmadalaya.org/
 
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
 
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/

Comments

  1. अप्रतीम !
    अत्यंत माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण संवाद !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....

मातृत्व