गोष्ट एका शाळेची (19)

काही वाचकांनी ‘गोष्ट एका शाळेची’ या लेखमालेतील ‘सखी’ आणि ‘रिचर्ड बाख’ कोण असा प्रश्न केलाय.
‘सखी’ हा माझ्या अंतर्मनाशी झालेला संवाद आहे आणि रिचर्ड बाख हा माझ्या आवडत्या इंग्लिश लेखकां पैकी एक..
गोष्ट एका शाळेची (19)


विवेकानंद केंद्राचे तत्कालीन जनरल सेक्रेटरी श्री बाळकृष्णनजी आणि डिब्रुगढचे आर्किटेक्ट श्री राय बरूआ यांना घेऊन दिमापूर केंद्राचा कार्यकर्ता मनोहर गोलाघाटला आला. मला थोडं दडपण होतं की आतापर्यंत झालेल्या बांधकामाबद्दल श्री राय बरूआ काय प्रतिक्रिया देतील ? इमारतीचा पाया पूर्ण होऊन भिंतीचे बांधकाम सुरू झाले होते. श्री राय बरूआ यांनी बांधकामाबद्दल समाधान व्यक्त केले आणि मी निश्चिंत झाले.

सोनाला फक्त लेबर कॉंट्रॅक्ट दिले होते. बांधकामासाठी लागणारे सर्व सामान मलाच आणून द्यावे लागायचे. धावपळ खूप व्हायची. सततच्या तापामुळे थकवा पण खूप असायचा. आपल्याला एखादे दुचाकी वाहन मिळाले तर ? गोलाघाटचे त्या काळातले रस्ते लक्षात घेता लूना नावाची मोपेड जास्त सोयीची होती. मी जरा दबकतच हा विषय
श्री बाळकृष्णनजी यांच्याकडे काढला. पण क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, “लगेच घेऊन टाक. तुला सध्या फार गरजेची आहे लूना”. त्या काळात लुनाची देखील ऑर्डर बूक करावी लागायची. आठ दहा दिवसातच लूना हातात आली. गोलाघाटमध्ये लूना चालवणारी मी पहिली मुलगी होते.

दिब्रुगढच्या विवेकानंद केंद्र विद्यालयाचे प्रिन्सिपल श्री नारायणजी तीनचार महिन्यातून येऊन मला मार्गदर्शन करत. एखादाच दिवस थांबत. पण बांधकामातले अनेक बारकावे ते मला सांगत. गोलाघाट मधील अनेक प्रतिष्ठित लोकांकडे आम्ही जात असू. आपल्या संस्थेची माहिती कशी द्यायची आणि जनसंपर्क कसा करायचा हे मी त्यांच्याकडून शिकले. ते आले की रॉबिनदांकडे मुक्कामाला असत. रॉबिनदांचाही नारायणजींवर विशेष लोभ होता.

एकदा मी दिब्रुगढला काही कामानिमित्त गेले होते. विवेकानंद केंद्र शिक्षा प्रसार विभागाचे कार्यालय अगदी ब्रम्हपुत्रेच्या किनारी आहे. वाटेत जिल्हा न्यायालयाची इमारत लागते.अशील आणि वकिलांची भरपूर गर्दी तिथे होती. मी रमतगमत ते सगळं बघत रस्त्याने चालले होते. अचानक माझं लक्ष न्यायालयाच्या इमारतीवर लावलेल्या राष्ट्रध्वजाकडे गेलं. आसाममध्ये पाऊस आणि वारा इतका प्रचंड असतो की राष्ट्रध्वज फार लवकर खराब होत असणार. तो राष्ट्रध्वज विटलेला आणि थोडा फाटला होता. कुणाचं बहुधा त्याकडे त्यादिवशी लक्ष गेलं नसावं. मी मात्र अस्वस्थ झाले आणि सरळ न्यायालयाच्या इमारतीत शिरले. न्यायालयीन कामकाज जेवणाची सुटी झाल्यामुळे थांबलं होतं.

मी तिथल्या शिपायाला जाऊन विचारलं, “जज साहेब कुठे बसतात ?”

“काय काम आहे ?” त्याचा प्रतिप्रश्न.

“फक्त पाच मिनिटे भेटायचं होतं. माझी काही कुठली केस नाहीये. पण खूप जरूरी काम आहे”

कौतुक म्हणजे त्याने जजसाहेबांना आत जाऊन विचारलं. त्यांनीही परवानगी दिली.

“नमस्कार सर ! मी भारती ठाकूर. विवेकानंद केंद्राची कार्यकर्ती. गोलाघाटला संस्थेचे काम करते. काही कारणास्तव या रस्त्याने जात होते. योगयोगाने लक्ष या इमारतीवर लावलेल्या राष्ट्रध्वजाकडे गेलं. तो विटलेला आणि फाटलेला पण आहे. तो बदलून नवा राष्ट्रध्वज लावावा अशी इच्छा आहे”

“ आमची चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद भारतीजी. तो राष्ट्रध्वज नव्याने लावला जाईल. तुम्ही निश्चिंत व्हा” जजसाहेबांनी मला आश्वासन दिलं.

“गोलाघाटला डॉ रॉबिन बॅनर्जी राहतात. त्यांची कधी भेट झालीय ?”

“ हो, डॉ बॅनर्जी यांनी दान दिलेल्या जमिनीवर त्यांच्याच इच्छेनुसार आम्ही शाळा बांधत आहोत”. जजसाहेब रॉबिनदांना ओळखतात याचा मला आनंद झाला पण त्याहीपेक्षा जास्तआनंद त्यांना माझं उत्तर ऐकून झाला.

“माझा खूप चांगला परिचय आहे त्यांच्याशी - आम्ही मित्रच आहोत. पुढच्या आठवड्यात मी गोलाघाटला येणार आहे. तेंव्हा तुमच्या शाळेचं बांधकाम बघायला नक्की येईन.” .
एका चांगल्या व्यक्तिशी परिचय झाल्याच्या आनंदात मी कोर्टाच्या आवारातून बाहेर पडले.


--------------------*****---------------------

रॉबिनदांच्या आग्रहाखातर मी दिब्रुगढ मेडिकल कॉलेजच्या डॉ बेझ बरूआ यांना माझी तब्येत दाखवायचं ठरवलं. रॉबिनदांनी त्यांना माझ्या आजारासंदर्भात एक पत्रपण दिलं होतं.त्यांनी सर्व वैद्यकीय चाचण्या करून घ्यायला सांगितल्या. विकेवि दिब्रुगढचे प्रिन्सिपल श्री नारायणजी यांना ही गोष्ट कळताच ते म्हणाले, “ तू एकटी जाऊ नकोस. माझ्या शाळेतली एक शिक्षिका कृष्णा बरूआ हिला तुझ्या बरोबर पाठवतो. कृष्णा बायदेव (ताई) बरोबर मी डिब्रुगढ मेडिकल कॉलेज मध्ये पोहोचले. तिथली अस्वच्छता आणि अनास्था पाहून वाटलं, पेशंट इथे बरे होण्याऐवजी अधिकच आजारी होत असावेत.

चाचण्यांचे रिपोर्टस् संध्याकाळी मिळाले. रिपोर्टस् मधलं मला फारसं काही कळत नव्हतं. फक्त एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्यात माझा रक्तगट A Rh (-) च्या ऐवजी B + दाखवला होता. आम्ही डॉ बेझबरूआ यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेलो. मेडिकल कॉलेजच्या प्रांगणातच त्यांचे निवासस्थान होते. रिपोर्टस पाहून त्यावर डॉक्टरांनी काही प्रतिक्रिया देण्याआधीच मी त्यांना विचारलं, कुणाचा ब्लड ग्रुप बदलू शकतो का ? माझा तर A Rh (-) आहे. तो B + कसा झाला ? म्हणजे बाकीच्या रिपोर्टस् वर मी विश्वास कसा ठेवायचा? डॉक्टरांनी त्यांच्या लॅब टेक्निशियन कडून झालेली चूक मान्य केली. माझ्या आजारपणाबद्दल सविस्तर चर्चा झाली. त्यांनी पुन्हा एकदा प्रायव्हेट लॅब मध्ये चाचण्या करण्यास सांगितल्या.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा मी आणि कृष्णा बरूआ त्यांना भेटायला गेलो. रिपोर्टस् पाहून ते म्हणाले, “मी देतो ती औषधे काही महीने घेऊन बघा. ठीक झाल्यास उत्तम. आजारपणाचे मूळ कारण इथलं हवामान आहे. इथला पाऊस आणि पावसाळी हवा तुम्हाला मानवत नाही. या अशा हवामानाची तुम्हाला सवय देखील नाही. या वयात संधिवात झाला तर उरलेलं आयुष्य अंथरुणावर काढावं लागेल. कोरड्या हवामानात राहिल्यास हा त्रास जाईल किंवा कमी तरी होईल. कोरडे हवामान असलेल्या राज्यात तुम्ही बदली मागा. मी औषधे लिहून देतो. काही महीने घेऊन बघा. मी अत्यंत सौम्य औषधं लिहून देतो. कारण अॅंटी बायोटिक्समुळे तुम्हाला साइड इफेक्टस जास्त होतील. खाण्यापिण्याच्या बाबतीत अनेक पथ्यही त्यांनी सांगितली.

अत्यंत हताश मनस्थितीत तिथून बाहेर पडले. वाटलं, शरीरात काही त्राणच शिल्लक राहिले नाहीत. डोळ्यासमोर बांधकाम, शाळेतली मुलं, मुलांचे पालक, विवेकानंद केंद्र आणि रॉबिनदा असे सगळे उभे राहिले. आजवर आलं नसेल इतकं दडपण मला डॉ बेझ बरूआ यांच्या बोलण्याने आलं. देवा, काय करू मी ? तूच मार्ग काढ यातून. खरं तर हीच विनवणी देवाला मी गेल्या ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा ताप आला तेव्हा पासून करतेय.

दोन तिन तास झाले. अस्वस्थता कमी होत नव्हती. इतका वेळ मौनात असलेल्या सखीने ‘wait and watch’ चा सल्ला दिला. ‘देवा, काय करू मी ? तूच मार्ग काढ यातून. खरं तर हीच विनवणी देवाला मी गेल्या ऑगस्ट महिन्यापासून करतेय. का परीक्षा बघतोय तो माझी ?’ या माझ्या बोलण्यावर मात्र सखी हसली आणि म्हणाली,

If God answers
your prayers
He is increasing
your faith.
If He delays,
He is increasing
your patience.
If He doesn’t answer,
He knows you can
handle it well.



भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com

Website -
http://narmadalaya.org/
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/

Comments

  1. आजारपणाबद्दल डॉ. चं मत ऐकून तुम्ही हताश झाल्याचं वाचतानाच मनात खात्री उमटली की आता तुम्हाला बाख किंवा सखी नक्की भेटणार ! 😊
    ( मला दोघंही माहीत आहेत ! 😀 )

    ReplyDelete
  2. त्या बाख आणि सखीमुळे आपले काही जुने ऋणानुबंध पक्के होतायत असं वाटतं.
    'तच्चेतसा स्मरति नूनमबोधपूर्वम्
    भावस्थिराणि जननांतरसौहृदानि'
    असं होतं.
    मनःपूर्वक शुभेच्छांसह पुढल्या लेखाच्या प्रतिक्षेत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....

मातृत्व