गोष्ट एका शाळेची (20)

गोष्ट एका शाळेची  (20)



शाळेत मुलांची मस्ती, गाणी शिकण्यातला उत्साह हे सगळं वाखणण्या सारखं होतं. सुरुवातीला  मी त्यांच्याशी फक्त इंग्लिश मध्येच बोलायचे आणि ते माझ्याशी आसामी भाषेत. इंग्लिश बोलायलाही मुलं  फार लवकर शिकली . बहुधा त्यांना मी शिक्षिकेपेक्षाही मैत्रीण जास्त वाटत असावी. बरेचदा ही मुलं आपल्या आईवडलांबरोबर बांधकाम बघायला संध्याकाळी येत. तिथले वाळूचे ढिगारे हे त्यांचे खेळाचे आवडते ठिकाण. तिथे दाट झाडी देखील होती. लपंडाव खेळायला मजा यायची. मनदीपच्या वडलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. एकदा त्यांनी भरपूर जुने टायर्स आणून दिले आणि चांगल्या जाडजूड दोराने झाडाला झोक्यासारखे बांधून देखील दिले. सोनाने मुलांसाठी एक छोटा बोगदा जमिनीखालून तयार करून दिला. उड्या मारायला एक वाळूचा खड्डा (sand pit) पण तयार झाला.  एक दिवस मुलांकडून सूचना आली की आपण इथेच शाळा भरवली तर ?

“रोज तर शक्य नाही पण आठवड्यातून एकदा भरवू शकतो. याल तुम्ही ?”  त्या दिवशी गाणी, खेळ, गोष्टी आणि डबा खाऊन झाल्यावर डॉ बॅनर्जीकडे जाऊन त्यांची बाग बघायची आणि प्राण्यांची एखादी फिल्म पहायची असा कार्यक्रम सुरू झाला. अर्थात पाऊस सुरू झाल्यानंतर हे सगळं थांबलं. 

बांधकामाला तर नगरपालिकेची परवानगी मोठ्या मुश्किलीने मिळाली. पण पिण्याच्या पाण्यासाठी नळाचे कनेक्शन हवे होते. त्यासाठी नगराध्यक्ष  फार आडमुठेपणा करत होते. 
सोना आणि त्याचे कामगार पिण्यासाठी आणि अंघोळीसाठी डॉ बॅनर्जी यांच्या नळावरून पाणी आणत. बांधकामासाठी पोखरीचे पाणी वापरले जाई. 

एक दिवस रॉबिनदांनी मला बोलवणं पाठवलं. त्यांच्या बंगल्यावर मी पोचले तर ते आणि जमाल व्हरांड्यात उभेच होते.  माझ्या अभिवादनाला  प्रतिसाद न देता ते म्हणाले, “तू शाळेत  पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था करणार आहेस ? तुझे हे कामगार माझ्या बागेतल्या नळाचे पाणी इतकं वापरतात की माझी झाडं सुकायला लागलीत. बघ, त्यांची पानंदेखील पिवळी पडताहेत. उद्यापासून मी पाण्याची व्यवस्था नाही करू शकत त्यांची.” 
  
जिभेवर शब्द आले होते, “रॉबिनदा, रोज पाऊस पडतोय. पाण्या अभावी नाही तर अतिवृष्टीमुळे  झाडांची पानं गळून पडताहेत.”  पण ते शब्द मी ओठा बाहेर येऊ दिले नाहीत. हे सगळे जमालचे कारस्थान आहे हे माझ्या लक्षात आले.  तरीही माझ्या तोंडून एक वाक्य बाहेर पडलंच. “रॉबिनदा, तुमच्या निसर्गाच्या व्याख्येत माणूसही असता तर किती छान झालं असतं !”

मी तडक नगरपालिकेत गेले. कुठून अंगात - नव्हे मनात एवढं बळ आलं कळेना. मी नगराध्यक्षांना भेटले. त्यांनी ‘आम्ही नवीन नळाचे कनेक्शन आजकाल देणं बंद केलं आहे. तुमची तुम्ही व्यवस्था करा’ असे उत्तर दिले. 

“मी व्यवस्था करायला तयार आहे. पण ती काय असू शकते त्याचे आपण मार्गदर्शन केल्यास बरे होईल. मला त्याचा अनुभव नाही आणि मी गोलाघाट मध्ये येऊन फार दिवस झाले नाहीत. बोरवेल हा पर्याय असू शकत नाही कारण पाण्यात खनिज तेल आणि लोहाचे प्रमाण अधिक आहे. तुम्ही ज्या शाळेचे विश्वस्त आहात ती शाळा जवळच आहे. तिथून पाइप टाकून मी पाणी घेऊ शकते का ? ” 

नगराध्यक्ष गडबडले. “छे ! छे ! ते शक्य नाही. आणि तुम्ही पाण्याची काय व्यवस्था करावी हे सांगायला मी बांधील नाही. या आता आपण ” नकार घंटा वाजवून ते मला स्पष्ट शब्दात जायला सांगत होते. 

“शाळा, धार्मिक स्थळं आणि हॉस्पिटल्स यांना कुठलीही नगरपालिका, ग्रामपंचायत  अथवा महानगरपालिका नळाचे कनेक्शन नाकारू शकत नाही असा कायदा आहे. शिवाय डॉ रॉबिन बॅनर्जी - जे गोलाघाटचेच नाही तर संपूर्ण देशासाठी आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे,    त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्याच जमिनीवर जी शाळा उभी राहते आहे तिला तुम्ही पाण्याचे कनेक्शन देत नाही हे जर मी आसाममधल्या सगळ्या वर्तमानपत्रातून छापलं - तुमची बदनामी झाली तर मला दोष देऊ नका. येते मी.” त्यांच्या उत्तराची वाट न पाहता मी बाहेर पडले. 

लूना चालू करणार तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की पुढचं चाक पंक्चर आहे. लूना घेतल्यानंतर पहिल्यांदाच चाक पंक्चर झालं होतं.  लूना हातात घेऊन पेट्रोल पंपापर्यंत गेले. तिथे एक पंक्चर दुरुस्त करून देणारा माणूस  होता. पंक्चर दुरुस्त झाल्यावर त्या माणसाला पैसे द्यायला लागले तर त्याने पैसे घ्यायचे नाकारले. मी कारण विचारलं तर म्हणाला, 

“तुझ्याकडनं इतक्या छोट्या कामाचे पैसे घेतले तर देव पण  मला माफ करणार नाही. गोलाघाटच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून तू तुझं घरदार सोडून आली आहेस.” 
मी मनातल्या मनात म्हणाले, “या गरीब अशिक्षित माणसाला जे समजतं ते इतरांना का समजू नये ?” सकाळपासून जो राग मनात खदखदत होता तो क्षणात मावळला. लूना हातात घेऊन यावं लागलं होतं ते कष्टही  त्या माणसाच्या प्रेमळ शब्दांनी विसरले. 

दुपारचे दोन वाजले होते. घरी जाऊन खिचडी बनवून खाऊया असा विचार होता. घरी पोचले तर दीप्तीची सगळ्यात मोठी बहीण रीना बायदेव गेटमध्येच उभी होती. तिने मला विचारलं, “काय स्वयंपाक केलास आज ?” हा तिचा रोजचा प्रश्न असायचा. मी खिचडी असं  उत्तर दिलं तर रागवायची. स्वयंपाक तर अजून व्हायचा होता. तिच्या समाधानासाठी मी  “पोळी -भाजी”  असं मोघम बोलले. आणि तिचा पारा चढला. 

“का खोटं बोलतेस ?” तुझ्या घराचं मागचं दार आज उघडंच होतं. मी आत जाऊन बघून आलेय. काही केलेलं नाहीस अजून. आता करशील खिचडी. औषधं चालू आहेत तुझी. का आबाळ करतेस स्वतःची ? मी तुझं जेवण ठेऊन आलेय स्वयंपाक खोलीत. गरम करून खा. ही वेळ आहे का जेवायची ?”  तिचं ते प्रेमानी रागावणं देखील मला खूप आवडायचं. 
वाटलं, माझ्या स्वर्गस्थ आईचं आणि पृथ्वीवरच्या रीना बायदेवचं काही वायरलेस कनेक्शन असेल का ? 

जेवण करून थोडी आडवी झाले तेवढ्यात दरवाज्यावरची बेल वाजली. नगरपालिकेतला एक कर्मचारी आला होता. “तुमचं कनेक्शन मंजूर झालंय. आजच्या आज पैसे भरा. प्लंबर तुमच्या साइटवर पोहोचला आहे”. मी  “काय ? नळाचे कनेक्शन मंजूर झालं ?” असं म्हणत आनंदाने किंचाळलेच. कधी कधी  दबंग व्हायलाच लागतंच. त्याशिवाय कामं होत नाहीत.  

नगरपालिकेत  पैसे भरले. प्लंबरला विचारून पृथानि हार्डवेअर या दुकानात नळासाठी लागणाऱ्या पाइप, तोट्या , पाइप जॉइंटस वगैरेची ऑर्डर देऊन आले. माल परस्पर साइट वर पोचणार होता . परत येतांना रॉबिनदांसाठी थोडी मिठाई घेतली. रॉबिनदा बागेत खुर्ची टाकून बसले होते. मी त्यांना मिठाई दिली. प्रश्नार्थक चेहऱ्यानी त्यांनी माझ्याकडे पाहिलं. “मिठाई कशाबद्दल ?”

“नळाचं कनेक्शन मिळालं. पुढचे तीन-चार महिने मला एवढं पाणी लागणार नाही. तुमच्या बागेसाठी तुम्ही ते वापरू शकता. बाग सुकायला नको” 

“मी कधी कधी खूप विचित्र वागतो भारती. पण ते माझ्या नंतर लक्षात येतं. वाढतं वय, रक्तदाब आणि हृदय विकारासारख्या तब्येतीच्या काळज्या आहेतच. मी आज सकाळी तुला 
असं बोलायला नको होतं. पाण्याची काय मोठी गोष्ट आहे ?” 

“जे झालं ते ठीकच झालं. त्याखेरीज तातडीने पाण्याचे कनेक्शन मिळालं नसतं. निघते मी ”    
मला घरी जायची घाई होती. पण चहा घेतल्याशिवाय रॉबिनदांनी मला जाऊ दिलं नाही. 

घरी जाऊन लवकर झोपायचं ठरवलं. गीतेचा एक अध्याय म्हटला आणि अंथरुणावर पाठ टेकली. पण आठवलं, आज दिवसभरात सखीशी काहीच संवाद झाला नाहीये. स्वामी विवेकानंद म्हणायचे, “Talk to yourself at least once a day. Otherwise you would miss a meeting with an excellent person in the world.”

मी सखीला विचारलं, “ बोल, काय म्हणणं आहे तुझं आजच्या घटनाक्रमांवर ?”
नेहमीप्रमाणेच सखी हसली आणि म्हणाली, 

When you face difficult times,
Know that challenges 
Are not sent to destroy you.
They are sent to strengthen you.
So welcome all the challenges. 



भारती  ठाकूर
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com

Website -
http://narmadalaya.org/
 
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
 
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/

Comments

  1. असंच योग्य वेळी तुम्हाला रुद्रावतार धारण करायला बळ मिळो !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....

मातृत्व