गोष्ट एका शाळेची (21)
गोष्ट एका शाळेची (21)
शाळेत अखेर पाण्याचा नळ लागला. दोन गोष्टींसाठी मला खूप आनंद झाला. ‘भगिरथ प्रयत्न’ म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने या नळ प्रकल्पामुळे मला समजलं आणि मी मनोमन त्या भगिरथ राजाला प्रणाम केला. स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणतांना त्याचे कष्ट काय असतील त्याची छोटीशी झलक मला गोलाघाट नगरपालिकेने दिली. त्यांनाही धन्यवाद. भगिरथ प्रयत्ना शिवाय भारती ठाकूरला आयुष्यात दूसरा पर्याय नाही हा पण एक साक्षात्कार या निमित्ताने झाला. दुसरं आनंदाचं कारण म्हणजे गोलाघाटला धनसिरि नदी जिला मी धनश्री म्हणते तिच्यातून पाणी पुरवठा होतो. धनश्री नदीचं - माझं मैत्र तर मी गोलाघाटला आल्यापासूनच जुळलं होतं. अधून मधून मी तिला भेटायला जायचे. तिच आता या नळाच्या माध्यमातून का होईना माझ्या शाळेत आली होती. आपल्या मैत्रीचा प्रत्यय तिने दिला.
नळाखाली पहिली ओंजळ भरतांना धनश्री नदीला स्मरत *“गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती। नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिम् कुरु॥” * हा श्लोक म्हणायला विसरले नाही. माझ्या या शाळेतल्या मुलांच्या आरोग्याची काळजी तुम्ही सर्वांनी घ्यावी अशी विनवणी करत त्या पहिल्या ओंजळीने सूर्यालाही अर्घ्य दिलं. सर्व कामगारांनी नळाचे पाणी प्यायल्यावर मग मी देखील त्या नळाचे पाणी पिऊन तृप्त झाले.
भिंतींचे बांधकाम सुरू झाले होते. ते पहाण्यासाठी तिथे पोहोचले तर सोनाने नवी मागणी केली. “दीदी, भिंती उभ्या रहायला फार वेळ नाही लागणार. दरवाजे, खिडक्या आणि वर छतासाठी जी फ्रेम करावी लागते त्यासाठी आपल्याला लाकूड (timber) लागेल. ते आणायला कुणा जाणकाराला बरोबर घेऊन जा कारण फसवणूक होण्याची शक्यता असते. आपल्याला चार सहा दिवसातच ते लागेल.” एकूण किती लाकूड लागेल त्याचं गणित त्याने मला समजावून सांगितल्यावर मी सुन्नच झाले. आसाममध्ये पाऊस जास्त असल्याने अधिकतर इमारती उतरत्या छपराच्या असतात आणि त्यावर पत्रे देखील असतात. डॉ बॅनर्जींचा एवढा भव्य बंगला पण त्यावरही पत्रे होते. गरमी होऊ नये म्हणून त्याखाली फॉल्स सिलिंग देखील लावतात. त्यासाठी वेगळे लाकूड.
मी हसत सोनाला म्हणाले “आजची रात्र तरी मला सुखाने झोपता येईल वाटलं होतं. पण सुखाची झोप बहुधा माझ्या नशिबातच नाही. तू तरी काय करणार ? बघू या होईल काही तरी व्यवस्था लाकडाची ” मला हसतांना पाहून धाडस करत सोना म्हणाला, “अशीही तुमची झोपमोड लाकडामुळे होणारच आहे ना ? मग दोन गोष्टी अजून जोडतो त्यात. आतल्या प्लॅस्टरसाठी बारीक वाळू आणि छतावर टाकायला पत्रे लागतील. हे सामान येऊन पडलं की मी पण निश्चिंत होईन. पावसाचा भरोसा नाही. काम थांबून रहायला नको”
तातडीने लाकूड लागणार होतं. त्यामुळे प्राथमिकता ‘Mission Timber’ हीच होती. कोण या कामात आपल्याला मदत करू शकेल असा विचार करतांना एकदम फॉरेस्ट रेंजर सैकिया आठवले. त्यांची मुलगी आमच्या शाळेत होती. सरळ त्यांचे घर गाठलं. मला अचानक बघून त्या पूर्ण कुटुंबाला आनंद झाला. मी लाकडाच्या संदर्भातली माझी अडचण त्यांना सांगितली. त्यावर ते म्हणाले, “तुम्ही काळजी करू नका. आमच्या फॉरेस्ट डेपो मध्ये जंगलातून चोरून नेत असतांना लाकूड पकडले जाते. ते आम्ही लिलावात विकतो. बरेचदा ते लाकूड सागवान किंवा बर्मा टीक असते. गुणवत्तेच्या बाबतीत हीच दोन लाकडं चांगली. त्यातही आपण सागवान लाकुडच घेऊ. ते मी सरळ सॉ मिल मध्ये पाठवतो. सोनाला खिडक्या आणि दरवाज्याची साईज लिहून द्यायला सांगा. त्याप्रमाणे सॉ मिल मधून ते आपल्याला कापून आणता येईल.”
सैकिया यांच्या बोलण्याने मला धीर आला खरा पण सागवान हे नाव ऐकून काळजी पण वाटली. मी जरा बिचकत त्याची किंमत साधारण काय असेल ते विचारलं तर म्हणाले, “किमतीची काळजी तुम्ही करू नका. आमचे वनाधिकारी डॉक्टर बॅनर्जी यांना चांगले ओळखतात. लिलावात त्याची किंमत किती लावायची हे आम्ही ठरवू.”
‘देव भेटला’ म्हणजे नक्की काय असतं ते त्याक्षणी अनुभवलं. आनंदात घरी गेले. प्रार्थना आणि जेवण झालं. तेवढ्यात दीप्ती बोलवायला आली. ‘इजाजत’ या हिंदी सिनेमाची व्हिडिओ कॅसेट आणली आहे. चल बघायला. मी हो अथवा नाही म्हणायच्या आत ती म्हणाली, “नाही म्हणू नकोस. You deserve some entertainment today. सतत कामाचा नाही तर तब्येतीचा विचार करत असतेस. चल उठ”
सिनेमा सुंदर होता. पण अधून मधून माझ्या डोळ्यासमोर सागवान लाकूड, पत्रे आणि प्लॅस्टरसाठी लागणारी वाळू येत होती. सखीचं मात्र माझ्या विचारांकडे लक्ष होतं.
मी माझ्या घरात शिरताच थोडं रागानेच सखी म्हणाली,
Bharati, I want you to become a Warrior and NOT Worrier. Try to give some space to yourself. You need a good vacation at least for a few days. Go to Kaziranga National Park. You would love that place.
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com
Website -
http://narmadalaya.org/
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/
असाच वेळोवेळी तुम्हाला देव भेटो 🙏
ReplyDeleteआता प्रतीक्षा काझीरंगाची 🦏