गोष्ट एका शाळेची (22)

गोष्ट एका शाळेची (22)


आठ पंधरा दिवसातून एकदा तरी ऑल आसाम स्टुडंट्स यूनियन किंवा उल्फा तर कधी आणखी कुठली संघटना ‘आसाम बंद’ चे आवाहन करायची. त्यादिवशी शाळा-कॉलेजेस, बाजार आणि वाहतूक सर्वच बंद असायचं. मुळातच  इथे वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने किंवा मुसळधार पाऊस- पूर यामुळे शाळांना खूप सुट्या असायच्या. 28 फेब्रुवारीला  उल्फाने आसाम बंद घोषित केला. पुढच्या महिन्यात परीक्षा आणि  एप्रिल महिन्यात  बिहु सणाची मोठी सुटी द्यावीच लागणार होती. कारण वैशाख महिन्यातला बिहु हा आसामी लोकांचा सगळ्यात मोठा सण असतो. त्याला बोहाग बिहु म्हणतात. मुलांना घरी परत नेतांना पालकांनी विचारलं, “दीदी, उद्या आसाम बंद आहे. म्हणजे शाळेला सुट्टी ना ?”

“हो, घेऊ शकता. पण मग बिहुची सुट्टी कमी करेन. आधीच या महिन्यात खूप सुट्ट्या झाल्यात. आपल्या शाळेतली मुलं बालवाडीतली आहेत. त्यांचं फार नुकसान होणार नाही. पण असे जर आपण ऊठसूठ आसाम बंद ठेवायला लागलो तर मोठ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचे किती नुकसान होईल याचा कुणी विचार करतं का ? बाजार आणि वाहतूक बंद झाल्याने या राज्याचे आर्थिक नुकसान किती होतंय? माझी तर अजिबात इच्छा नाही उद्या सुटी द्यायची. काही जणांना माझं म्हणणं पटलं. बरेचसे घाबरत होते. ज्यांना मुलांनाउद्या शाळेत  पाठवायचं त्यांनी पाठवावं- अशी काही जणांनी भूमिका घेतली. 

“येणार असाल तर सगळे या. नाही तर आपण बिहुची सुट्टी कमी करू. मी चार पाच मुलांसाठी शाळा भरवणार नाही” मी जरा त्राग्याने बोलले. पालकांमध्ये बराच वेळ चर्चा झाली आणि आम्ही उद्या मुलांना शाळेत घेऊन यायची रिस्क घेतो असं म्हणाले. 

मी माझ्या कामाला लागले. पृथानि हार्डवेअरमध्ये जाऊन शाळेच्या इमारतीच्या छतावर टाकण्यासाठी लागणाऱ्या पत्र्यांच्याबाबतीत चौकशी केली. पृथानि बंधु नेहमीच मला योग्य भावात सामान देत आणि योग्य सल्ला देत. पत्र्यांबाबत ते म्हणाले, “आमच्याकडे पत्रे आहेत पण साधारण दर्जाचे आहेत. तुम्हाला शाळेच्या इमारतीसाठी ते जास्त संख्येने लागतील आणि चांगल्या दर्जाचे लागतील. तुम्ही गुवाहाटीला जाऊन स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मधून आणले तर ते स्वस्त पडतील आणि चांगल्या दर्जाचे मिळतील. शिवाय संस्थेच्या लेटर हेडवर त्यांना विनंती अर्ज दिलात तर भाव अजून कमी करतील.”  मलाही तो विचार पटला. अर्थात पत्रे ही काही तातडीची गरज नव्हती. भिंती पूर्ण होऊन मग त्यावर लाकडी सांगाडा बसवल्यानंतर पत्रे लागतील. 

रोजच्या updates देण्यासाठी मी रॉबिनदांकडे पोहोचले. ते बांधकाम पहायला येतो म्हणाले. पावसाने  रस्ता थोडा निसरडा झाला होता. जमालही छत्री घेऊन रॉबिनदां बरोबर आला. निमुळत्या पाय वाटेवर मी पुढे, माझ्या मागे रॉबिनदा आणि त्यांच्या मागे जमाल असे आम्ही पाऊल जपून टाकत चाललो होतो. रॉबिनदांनी ‘भारती’ अशी हाक मारली  म्हणून मी मागे वळून पाहिलं. रॉबिनदा पाय घसरून पडणार होते. घाबरून त्यांनी आधारासाठी हात पुढे केला  पण जमालने त्यांना लगेच पकडून  सावरलं. ते विनोदाने म्हणाले, “बघा, म्हातारपण किती वाईट असतं.  मागून सुद्धा  कुणी आधाराचा हात पुढे करत नाही.” तो टोमणा माझ्यासाठी होता. 

“मी काय कुणाला आधार देणार रॉबिनदा ? माझाच एक हात ठाकुरांनी (रामकृष्ण परमहंस) पकडला आहे आणि दूसरा सारदा मांनी. त्यांच्या आधाराने तर मीच चालते आहे” मी हसत म्हणाले.  

हे संभाषण गमतीत चालू होतं. पण माझ्या या वाक्यावर रॉबिनदा एकदम गंभीर झाले. 

“तू इथे आलीस तेंव्हा मला वाटलं की तुला तर बांधकामाचा काही अनुभव नाही. शाळा आणि बांधकाम या दोन्ही गोष्टी तुला कशा जमतील ? पण तू जिद्दीने दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमपणे पार पाडते आहेस कारण ठाकूर आणि सारदा मां तुझ्या पाठीशी आहेत.  नवीन ठिकाण, नवीन भाषा, नवीन हवामान, माझ्या कुरकुरी आणि तुझ्या  तब्येतीच्या तक्रारी याला तोंड देत तू खंबीरपणे उभी आहेस. खूप अभिमान वाटतो मला तुझा”.

मी थक्क होऊन त्यांच्याकडे बघतच राहिले. मनात म्हटलं, “ रॉबिनदा, आतापर्यंतचं तुमचं रागावणं, कुरकुरी -चिडचिड हे सगळं आत्ताच्या तुमच्या या बोलण्याने मी माफ केलंय. नाहीतर आयुष्यभर मी ते दुःख ऊरात ठेवूनच जगले असते.”   

पुढची वाट अजूनच निसरडी होती. एका बाजूने मी तर दुसऱ्या बाजूने जमालने त्यांचा हात पकडला आणि आम्ही बांधकामाच्या ठिकाणी पोहोचलो. 

“भारती, ही शाळा व्हावी हे माझं फार दिवसाचं स्वप्न होतं. ते साकार होतांना पाहून खूप छान वाटतंय”. रॉबिनदांच्या  शब्दातले भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले होते. 

“एवढ्या थोर व्यक्तीच्या स्वप्नपूर्ती साठी देवाने मला माध्यम बनवलं. मी खरंच किती भाग्यवान आहे. माझा मलाच हेवा वाटला” 

त्या दिवशी रॉबिनदांनी मला त्यांची शार्क माशांवर बनवलेली फिल्म दाखवली. मी हळूच विषय काढला, “रॉबिनदा, काझीरंगा मी फक्त तुमच्या लघुपटामध्ये पाहिलं आहे. ते प्रत्यक्षात बघायची इच्छा आहे. तिथे राहण्यासाठी आणि elephant ride साठी बुकिंग वगैरे कसे आणि कुठे करावे लागेल ?”

“तू काळजी करू नकोस. मी करतो ती व्यवस्था. कधी जायचं आहे ? पुढच्या महिन्यापासून म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबर काझीरंगा पर्यटकांसाठी बंद होईल. त्याच्या आत तू जाऊन ये ”  

 “11 आणि 12 मार्च हे दोन दिवस मला सोयीचे वाटतात. अकरा तारखेला शनिवार आहे. शाळा सुटली की जाईन आणि सोमवारी पहाटे परत येईन. चालेल ना ?”

“अगदी चालेल. दोन दिवस थोडी विश्रांती घे”.रॉबिनदांच्या या वाक्यावर मी मनातल्या मनातच उड्या मारल्या. 

मोठ्या आनंदातच घरी आले.  एक अपरिचित माणूस माझी वाट बघत व्हरांड्यात उभा होता. “कोण आपण ? काय हवं आहे ?”

“उद्या आसाम बंद आहे माहीत आहे ना ? तुम्ही शाळा चालूच ठेवणार आहात असं ऐकलं. या  आसाम बंदची घोषणा कुठल्या संघटनेनं दिलीय ठाऊक आहे ना ? ” त्याच्या वाक्यात थोडी जरब-थोडा नाराजीचा सूर होता. 

“या शाळेचं मुख्यालय कन्याकुमारी येथे आहे. तिथे फोन लागत नाही. त्यांना न विचारता मी शाळा बंद ठेऊ शकत नाही. दुसरी अडचण म्हणजे आसाम राईफल्सचे मुख्य अधिकारी मेजर जनरल प्रेम कुकरेती या एकदोन दिवसात माझ्याकडे येणार आहेत. ते जर उद्याच आले तर शाळा सुरू हवी ना ?” कुकरेतीजी मार्चच्या पहिल्या आठवड्यात येणार म्हणाले होते. मी मात्र ते एक दोन दिवसात येणार म्हणून सांगितलं. 

“तुमचा निर्णय फायनल आहे ?”

“हो. आणि या नंतर देखील  कुठल्याही संघटनेनं ‘आसाम बंद’ जाहीर केला तरी शाळा चालूच राहील.” तो थोडा रागातच निघून गेला. पण रॉबिनदांच्या आजच्या बोलण्याने मी इतकी खुशीत होते की मला त्याची पर्वा वाटली नाही. 

रस्त्यापलीकडचा प्रचंड मोठा ताम्हण वृक्ष फिकट जांभळ्या रंगाच्या फुलांनी  पूर्ण बहरला होता. सखी म्हणाली,  “कुणी आपली स्तुती करावी असं या ताम्हण वृक्षाला कधी वाटलं असेल का ? वाटसरु तर कधी मान वर करून त्याच्याकडे पहात देखील नाहीत. पण तरीही  तो बहरतो कारण बहरणं हा त्याचा स्वभाव धर्म आहे. तो कायमच स्थितप्रज्ञ असतो. रॉबिनदांच्या चार कौतुकाच्या शब्दांनी तुला तर आभाळ ठेंगणं वाटायला लागलंय. कशाला वाचतेस गीतेचा दूसरा अध्याय रोज? स्थितप्रज्ञाची लक्षणं फक्त पाठ करायला ?” सखीला मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. 

 दार न उघडता मी पडवीतच  खूप वेळ बसून राहिले. संध्याकाळ झाली. अंगणातल्या गुलबक्षीचा मंद सुगंध वातावरणात पसरला.  गुलबक्षीला आसामी भाषेत ‘गोधूलि गोपाल’ म्हणतात. कारण ती संध्याकाळी उमलते.  गुलबक्षी रंगाच्या फुलांच्या ताटव्यात एकच रोप पिवळ्या रंगाचं होतं. जणू गोपी आणि कृष्ण सखा. मी डोळे मिटून घेतले आणि ऐकू येऊ लागले फक्त त्याच्या बासरीचे सूर.


भारती  ठाकूर
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com

Website -
http://narmadalaya.org/
 
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
 
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/

Comments

  1. उद्या काय होणार या चिंतेने अस्वस्थ झालो आहे.
    😔

    ReplyDelete
  2. उद्याची चिंता आहेच. पण तरीही हे लेख वाचून मन शांत होतं. बारीकसारीक गोष्टींतून खूप शिकायला मिळतं या लेखांतून.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....

मातृत्व