गोष्ट एका शाळेची (१२)
गोष्ट एका शाळेची (१२)
आमच्या बालवाडीची वेळ सकाळी साडे आठ ते साडे बारा अशी होती. पण बऱ्याच मुलांना साडेबारा नंतर देखील घरी जायचं नसायचं. अनेकदा पालकच मुलांना उशिरा घ्यायला येत. मुलांची भूकेची वेळ झालेली असायची. मग कुकरमध्ये टोमॅटो बटाटे, असतील त्या भाज्या असे घालून मी खिचडी करत असे. रोज पाच सहा मुलं तरी अशी उशिराने जायची. वातींच्या स्टोव्हवर स्वयंपाक करणे म्हणजे माझ्यासाठी खरंच अग्निदिव्य असायचं . खिचडी झाली की मग उरलेली 5-6 मुले आणि मी असे जेवत असू. या एकत्र जेवण्याने एक वेगळीच मजा यायची.
एकदा संध्याकाळी अंबरीषची आजी मला भेटायला आली. मी स्वयंपाक करत होते म्हणून त्यांना तिथेच गप्पा मारायला बोलावलं. वातींचा स्टोव्ह पाहताच त्या म्हणाल्या, “हे काय ? तुझ्या कडे एलपीजी गॅस नाही
अजून ?”
मी म्हणाले, “माझ्या जवळ इथले रेशन कार्ड नाहीये. मग मला नवीन गॅस कनेक्शन कसे मिळेल ?” परप्रांतीयांविरुद्ध आसाममध्ये नुकत्याच झालेल्या आंदोलना नंतर निवडणुकीत मतदानाचा अधिकार आणि रेशन कार्ड ही गोष्ट परप्रांतीयांसाठी अशक्यप्राय होती.
“तू काळजी करू नकोस. मी सांगते माझ्या मुलाला. तो करेल सर्व व्यवस्था” आजीबाईंनी मला आश्वासन दिलं. आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळ पर्यन्त मला गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड घरपोच मिळाले. माझ्यापेक्षा या नव्या गॅस स्टोव्हचा आनंद मुलांना अधिक झाला. कारण आता पाच मिनिटात खिचडी तयार होणार होती.
-------***---------
एकदा रात्रभर वीज नव्हती. पाउस पडत होता,हवेत गारवा असल्याने झोप देखील चांगली लागली. सकाळी सहा वाजताच दारावरची बेल वाजली. दार उघडून पाहते तर ‘दोना’ नावाची आमची एक विद्यार्थिनी तिच्या आई बाबां बरोबर आली होती. दोना रडत होती. मी काळजी ने विचारलं, “ काय झालं ? ही का रडतेय ?”
आई बाबा मात्र हसत होते. बाबा म्हणाले, ही मुलगी रात्रभर लाईट नव्हते तर भारती दीदी तिच्या घरी एकटी आहे. तिला भीती वाटेल. तिला आपल्या घरी घेऊन या म्हणून मागे लागली. रात्रभर झोपली देखील नाही. रात्री उशिरा तुम्हाला डिस्टर्ब करायला आम्हाला संकोच वाटला. सांगा आता हिला की तुम्हाला अंधाराची भीती वाटत नाही.” मी दोनाला तसं सांगितल्यावर कुठे तिचे रडणे थांबले. निष्पाप प्रेमाची ती एक वेगळी अनुभूती होती.
---------****----------
एके दिवशी दुपारी मी मिसेस एच. मूर या एका ख्रिश्चन मिशनरी स्त्रीने १८७९ साली आसाममध्ये येऊन केलेल्या कामाचा आढावा. '20 years in Assam' हे पुस्तक वाचत होते. ११० वर्षांपूर्वीचा आसाम कसा असेल याची कल्पनाच केलेली बरी. दाट जंगले, दळणवळणाच्या सोयी नाहीत. अशा परिस्थितीत केलेलं सेवाकार्य कौतुकास्पद असलं तरी ते धर्मांतराच्या हेतूनं केलेलं होतं हा सल मनातून जात नाही. पुस्तक वाचत असतानाच दारावरची बेल वाजली. दरवाजा उघडून पाहिलं तर पाच-सहा ज्येष्ठ नागरिक बाहेर उभे होते. मी त्यांना आत बोलावलं. प्रत्येकाने आपला परिचय दिला. आडनावावरून सारेच उच्चवर्णीय होते. ही माणसं माझ्याकडे का आली असावीत? एकाने विषयाला सुरुवात केली. म्हणाले, "आम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी तुमच्याकडे आलो आहोत."
"काय काम आहे आपलं माझ्याकडे?'' माझं कुतूहल वाढलं.
"गेल्या आठवड्यात गोलाघाटमधील एका वेदशास्त्रसंपन्न अशा विद्वान व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांचे प्रेत घेऊन आम्ही स्मशानभूमीत पोहोचलो तर तिथे एका अत्यंत खालच्या जातीतील माणसाचे प्रेत आधीच जळत होते. आम्हाला ताटकळत तर उभं रहावं लागलंच पण ज्या जागेवर एका क्षुद्र जातीतील माणसाचे प्रेत जाळलं, तिथं एक विद्वान उच्चवर्णीयाच्या प्रेतावर अग्नि संस्कार व्हावा ही गोष्ट आम्हाला अजिबात पटली नाही. तुम्हाला तरी पटतेय का?" मी कसंबसं हसू दाबलं होतं. पण त्यांच्या प्रश्नाला मी काय उत्तर देणार? पटतं म्हटलं तर आपण धडधडीत खोटं बोललो असं होईल आणि नाही म्हटलं तर ही माणसं दुखावतील. आजमितीला तरी मला गोलाघाटमध्ये कुणाचाच विरोध नकोय. त्यामुळे गुळगुळीत उत्तर देण्या शिवाय पर्याय नाही. गंभीर चेहरा करून मी म्हणाले, "प्रश्न खरंच गंभीर आहे. पण या प्रश्नाशी माझा काय संबंध?"
"आम्ही असं ठरवलंय की गोलाघाटमध्ये उच्चवर्णीयांसाठी वेगळी स्मशानभूमी असावी. अशा वेगळ्या स्मशानभूमीसाठी नगरपालिका स्वतंत्र जागा तर देणार नाही. त्याऐवजी आपण सर्वांनी वर्गणी काढून त्या पैशातून उच्चवर्णीयांच्या (बोलताना -ते जातीचा स्पष्ट उल्लेख करत होते) स्मशानभूमीसाठी जमीन विकत घेऊ. तुमचाही सहभाग या पवित्र कामात असावा अशी इच्छा आहे. किमान ५०० रुपये तरी तुम्ही वर्गणी द्यावी अशी अपेक्षा आहे."
"आजोबा, तुम्हाला मदत करायला मला खूप आवडलं असतं. पण मला काही पगार मिळत नाही. हे एक सेवाभावी कार्य आहे. तरीसुद्धा तुमची ही मागणी मी आमच्या कन्याकुमारीच्या मुख्यालयाला कळवीन. नमस्कार." या अवघड प्रसंगातून सुटका करून घेण्यासाठी सोयीस्कर असा हा एकमेव मार्ग होता. (पुढे हा वेगळ्या स्मशानभूमीचा प्रस्ताव बारगळल्याचे समजले).
'ठीक आहे. कन्याकुमारीहून आलं काही उत्तर तर कळवा आम्हाला.' असं म्हणून त्यांनी माझा निरोप घेतला. आसाममध्ये भारतातील इतर राज्यांपेक्षा जातीयवाद, अस्पृश्यता खूपच कमी आहे. तरीदेखील अशा तुरळक घटना घडतातच. वर वर क्षुल्लक वाटणाऱ्या या घटनांमध्येच धर्मांतराची बीजं रोवलेली असतात. हास्यास्पद असली तरी हसण्यावारी नेण्यासारखी ही घटना नक्कीच नाही. खूपच अस्वस्थ झाले मी या घटनेनं।
बरेचदा रात्री जेवल्यावर माझ्या घर मालकीणी कडे मी टीव्हीवर बातम्या बघायला जात असे. 19 सप्टेंबर 1988 रोजी मी बातम्या बघत असताना अचानक ज्ञानपीठ पुरस्काराचा सोहळा दाखविण्यात आला.
माझ्यासाठी आश्चर्य आणि आनंदाची गोष्ट म्हणजे 1987 सालचा ज्ञानपीठ पुरस्कार त्यादिवशी नाशिकचे आपले सर्वांचे लाडके श्री. तात्यासाहेब शिरवाडकर अर्थात वि वा शिरवाडकर यांना प्रदान करण्यात आला. तो सोहळा दूरदर्शन वर बघत असताना माझ्या डोळ्यातून अश्रू घळघळा वाहू लागले.
दीप्तीला कळेना मला काय होतंय. ती माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. मी तिला म्हणाले, “अगं, हे आमचे तात्या. नाशिकला माझ्या शाळेजवळच त्यांचे घर होतं. शाळेच्या टाकीतले पाणी संपलं किंवा पाणी पिण्यासाठी मुलींची मोठी लाईन असली तर अनेकदा आम्ही मैत्रिणी धावत त्यांच्या घरी जाऊन पाणी पित असू. तुम्ही उन्हात धावत आल्या आहात तर एकदम पाणी पिऊ नका असे म्हणत ते आमच्या हातावर कधी शेंगदाणे तर कधी खोबऱ्याचा तुकडा ठेवत. त्या आठवणीने मला भरून आलेले आहे.
मी कॉलेजमध्ये असताना आमच्या जवळच्या वाचनालयात पुस्तक बदलण्यासाठी जात असे. तात्या तिथे त्यांच्या समवयस्क मित्रांबरोबर गप्पा मारत बसलेले असत . ते हटकून मी कोणतं पुस्तक वाचण्यासाठी नेते आहे ते बघत. त्यामुळे आलतू फालतू पुस्तक हातात धरण्याची पण हिम्मत होत नसे. तात्यांच्या आठवणीने आयुष्यात पहिल्यांदाच मी इतकी home sick झाले होते . खरंच काय नातं होतं माझं त्यांच्याशी ? भेटलो तरी कधी बोलणं होत नसे. पण मग तात्यांच्या आठवणीने आज अश्रू अनावर कसे झाले ? सखी म्हणाली, “ हे अश्रू नाहीत. त्या ऋषितुल्य महात्म्याला या सोहळ्याच्या निमित्ताने ही प्रेमांजली - भावांजली आहे”
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com
Contact Person -
Nilesh Giri
Mobile no. - 6266370705
Website -
http://narmadalaya.org/
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/
एखादी ' दोना ' आपल्या आयुष्यात असणं हीच जगण्याची प्रेरणा असू शकते !
ReplyDeleteमी आठवीत असताना कुसुमाग्रज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. मुंबईला त्यांचं भाषण झालं त्यावेळी मी गर्दीतून घुसून फक्त त्यांच्या पायां पडून, आनंदाने आसवं ढाळत, काही न बोलता तशीच गर्दीतून परतले होते. त्यांच्या पायां पडल्याचा तो आनंद अजून पुरलाय मला. तुम्ही तर पाणी प्यायला देखील त्यांच्याकडे जात होतां. तसं भाग्य उगाचच कुणालाही लाभत नाही. 🙏
ReplyDelete