गोष्ट एका शाळेची (24)

गोष्ट एका शाळेची (24)



सकाळी अचानक आसाम रायफल्सची  एक गाडी दारासमोर उभी राहिली. रोबिंदांचा माळी जगदीश गाडीच्या ड्रायव्हर बरोबर आला होता. “दीदी, डॉक्टरसाबने आपको बुलाया है | कुकरेती साब आये है |” 

गाडीत बसल्यावर  जगदीश म्हणाला,  “ दीदी, कुकरेती साब भोजन करेंगे | प्रदीप (स्वयंपाकी) तीन दिन के लिये कल ही छुट्टी लेकर घर गया है |”   मी विचार केला, रॉबिनदांकडे फ्रीज मध्ये भाज्या कुठल्या आहेत माहीत नाही. त्यापेक्षा बाजारातून आपणच घेऊन जाव्यात. आम्ही गाडी बाजाराकडे वळवली. भाजी खरेदी झाली. आणि आम्ही रॉबिनदांकडे पोहोचलो.

ज्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप आदरभाव आहे अशांपैकी मेजर जनरल प्रेम कुकरेतीजी होते. त्यावेळी ते आसाम राईफल्स चे ते GOC म्हणजेच General Officer Commanding होते. पण मला त्यांच्याबद्दल जो आदर होता तो आणखी एका वेगळ्या कारणाने. ते खूप चांगले गिर्यारोहक होते. 1987 सालच्या आसाम रायफल्सच्या कांचनगंगा (Kanchenjunga) मोहिमेचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. या मोहिमेबद्दल माझ्या मनात खूप उत्सुकता होती. त्यामुळे जेवणानंतर आमच्या त्याच विषयावर गप्पा झाल्या. या मोहिमेत समिट टीम (summit team) मधले तीन सदस्य अचानक झालेल्या हिमवादळात मृत्युमुखी पडले. त्यात एक फू दोरजी नावाचे शेर्पा पण होते. फू दोरजी यांनी 5 मे 1984 रोजी ऑक्सीजन न वापरता एव्हरेस्ट शिखर सर केलं होतं. अशाप्रकारे एव्हरेस्ट सर करणारे ते पहिले भारतीय होते. त्यांचा असा अपघाती मृत्यू  माझ्यासाठी  फार मोठा धक्का होता. कारण 1985 साली ब्रिगेडियर ग्यान सिंग यांच्या National Adventure Foundation च्या दिल्लीतल्या एका कार्यक्रमात त्यांची माझी भेट झाली होती. 

श्री कुकरेतीजी म्हणाले, “आपल्या टीममधल्या सदस्यांचे असे अपघाती मृत्यू खूपच क्लेशदायक असतात. But the show must go on. जगणं- मरणं, हार-जीत हे सगळं आयुष्याच्या खेळाचा अविभाज्य भाग आहे.” मग काहीतरी आठवल्या सारखं म्हणाले, “तुझं काम कसं चालू आहे ? चल, मी निघण्यापूर्वी आपण तुझं बांधकाम पहायला जाऊ या”. 

साइटवर जातांना त्यांनी विचारलं, “ आता काही अडचणी तुझ्या कामात ? काही धमक्या वगैरे ?” 

“नाही, सगळं सुरळीत चालू आहे.” चार दिवसांपूर्वी आसाम बंदच्या दिवशी घडलेली घटना मी त्यांना सांगितली. काम बघून ते पुढे जोरहाट येथे निघून गेले. 

फॉरेस्ट रेंजर श्री सैकिया यांनी टिंबर बिनानी सॉ मिल मध्ये पोहोचल्याचे सांगितले. म्हणून मी गावाबाहेर असलेल्या  त्या सॉ मिल मध्ये लूनावरनं गेले. छोट्याशा गावातील  त्या सॉ मिल मध्ये गेलेली मी बहुधा  पहिली महिला ग्राहक होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य मिश्रित कौतुक होतं. मालक बिनानी यांनी मला माल दाखवला. लाकडाचे ओंडके येऊन पडले होते. आता ते आपल्याला हव्या त्या साईजमध्ये तुकडे आणि चौकटी करून देतील. लाकडाच्या गुणवत्ते बाबत मला काही सुद्धा कळत नव्हतं पण मी आव असा आणला की खूप काही कळतंय.  

                                                       ****
   
आठ मार्च पर्यन्त बारीक रेतीची काहीच व्यवस्था होऊ शकली नाही. श्री जतीन सैकिया, पृथानि हार्डवेअर, जोरहाट येथील आसाम टी गार्डन असोसिएशनचे श्री  मायना सैकिया वगैरे परिचितांकडे  जाऊन पुन्हा रेती कुठे मिळेल का याची चौकशी केली. पण पावसामुळे आता सध्या रेती कुठेच उपलब्ध नाहीये असंच उत्तर मिळालं. रेती नाही म्हणून सोनाचा जीव वरखाली होत होता. मजूरांकडे काम नसेल तर त्यांना उगीचच मजुरी द्यावी लागेल. शिवाय खाली ‘दिमाग शैतान का घर’ या उक्तीप्रमाणे ते दारूबिरु पिऊन धिंगाणा घालू शकतात असं त्याचं म्हणणं पडलं. 

मी दुपारी साइटवर गेले तेंव्हा सोना खूपच नाराज होता. दिवस आणि त्याचे पैसे वाया जात आहेत. त्यापेक्षा मी मजुरांना घरी पाठवतो. बरेच दिवस ते घरी गेले नाहीत. मी पण आठ पंधरा दिवस घरी जातो.  तुम्ही रेतीची व्यवस्था झाली तर कळवा. असं त्याचं म्हणणं होतं. त्याकाळी फोन इतके सहज सुलभ नव्हते. हा बांगलादेश सीमेवर सिल्चर जिल्ह्यातल्या एका खेड्यात राहणारा. त्याला मी कुठे आणि कसा संपर्क करणार ? मी त्याची समस्या समजू शकत होते पण माझा देखील नाईलाज होता. अस्वस्थ मनस्थितीतच मी घरी आले. 

संध्याकाळी प्रार्थनेला बसले. एकदम लक्षात आलं की आपण रोज भगवद्गीता पाठ करतो. 
कन्याकुमारीला असतांनाच हे पाठांतर सुरू केले होते. पहिला आणि पंधरावा असे दोन  अध्याय आधीच पाठ होते. नंतर एकेक अध्याय करत अठराही अध्याय पाठ झालेत. आज अठराव्या अध्यायातले शेवटचे दोन श्लोक पाठ केले की झालं. एखादा गड  जिंकल्याचा मला आनंद झाला होता. त्याक्षणी रेती, पत्रे - सोना सगळंच विसरले. अठरा अध्याय पूर्ण  पाठ केल्याच्या खुशीत मी  मनाशीच विचार केला की उद्या असंही फार  काही काम नाहीये. दुपारी संपूर्ण भगवद्गीता म्हणू या आणि शिऱ्याचा नैवेद्य पण करू. 

सखीला मात्र अशावेळी काहीतरी खडूस बोलल्या वाचून राहवत नसावं. ती म्हणाली,”भारती,  तू भगवद्गीता फक्त पाठ केली आहेस पण आत्मसात केलीस का ? तू ती आत्मसात केलीस की  हे नैवेद्याचं वगैरे बघू हो आपण.” 

समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्‍गविवर्जितः॥
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्‌।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः॥

ही अशी भक्ताची अवस्था प्राप्त व्हायला हवी. अभी तो दिल्ली बहुत दूर है | तू तर कुणी काही वाईट बोललं की अपसेट होतेस. कुणी कौतुक केलं की आनंद होतो. या सगळ्याच्या पलीकडे कधी पोचणार तू ? 

इतक्यात दारावरची बेल वाजली.  दरवाज्यात सोना उभा होता. आता हा काय काम अर्धवट सोडून जायचा हट्ट करतोय की काय असा विचार मनात येत नाही तोच तो उत्साहाने म्हणाला, ‘दीदी, एक ट्रक रेती आलीय आत्ता थोड्यावेळापूर्वी.” 

“काय ? कुणी पाठवली ?” 

“मी नाव विचारलं तर म्हणाला  ‘डिसी’. तुम्हाला ओळखतो म्हणे. क्वचित कधी येतो बांधकाम बघायला. फार काही बोलले नाहीत.”

“पण त्याला  काय माहीत आपल्याला रेती हवीय ? मी तर कधी बोलले नव्हते”.

“परवा आले होते तेंव्हा मीच बोललो होतो. रेतीवाचून यांचं काम खोळंबलं आहे म्हणून."

“नको वापरू ती रेती सोना. माझी काही फार ओळख नाही त्याच्याशी. कोण कुठला हे देखील ठाऊक नाही. आपल्याला माहीत नाही त्यानी ती रेती कुठून आणली.” मी घाबरून म्हणाले.   
      
 “ रेती खूप चांगली आहे दीदी. एवढ्या पावसात अशी रेती मिळणार नाही. आणि काम नसेल तर मजूर घरी जातो म्हणून हट्टाला पेटलेत.”

“तरीही उद्या दुपार पर्यन्त थांब. आता रात्र झालीय. उद्या सकाळी मी रोबिंनदांना विचारते. मगच आपण निर्णय घेऊ.” थोड्या नाराजीनेच सोना परत गेला.

मी पुन्हा अस्वस्थ. सखी म्हणाली, “अॅंथनी डि मेल्लो यांचे Well Springs हे पुस्तक वाचल्याचं आठवतं तुला? त्यातल्या The Education या लेखात त्यांनी जे म्हटलं आहे ते मी तुला  माझ्या शब्दात सांगते”, 

It is impossible for us to forgive 'evil' people 
and people we dislike
unless like Jesus, we see good in them.
So, imagine Jesus here beside us 
teaching us to look at them afresh.
to make allowances,
to search for ignorance
and mitigating circumstances.
 
After this, we say something like this 
to each of them :
te condemn the evil you are doing.
but we cannot censure you
for you do not know what you are doing.

महर्षी नारदांनी कुठे वाल्या कोळयाला झिडकारलं होतं ? स्वामी विवेकानंद म्हणतात ते ‘मनुष्य निर्माण’ म्हणजे तरी नेमकं काय ? गौतम बुद्ध यांच्या जीवनातली अंगुलीमाल डाकूची गोष्ट तू ऐकली आहेस. आणि तो कोण ‘डिसी’ आहे-  तो नक्की काय करतो हे तुला तरी कुठे ठाऊक आहे ? तुझ्या अडचणीच्या वेळी  कुणी जर स्वत:हून मदत करत आहे तर का नाकारतेस ?  

“ना मी नारद, ना विवेकानंद, ना गौतम बुद्ध - ना येशू. मी एक सामान्य कार्यकर्ती आहे. आणि मला माझ्या मर्यादा आहेत हे विसरून चालणार नाही.” मी थोडी चिडलेच सखीवर. 

पण सखी शांत होती.” सामान्य कार्यकर्ती आहेस हे शंभर टक्के मान्य. पण आपण आयुष्यभर विचारांनी सामान्यच राहायचं का ? इतकी पुस्तकं वाचतेस तू  स्वामी विवेकानंदांची. कन्याकुमारीला असतांना त्यांची काही कोटेशन्स पण तू चक्क पाठ केली होतीस. आठवतंय ते प्रसिद्ध कोटेशन - “Each soul is potentially divine. The goal is to manifest this divinity by controlling nature, external and internal. Do this either by work, or worship, or psychic control, or philosophy – by one, or more, or all of these – and be free. This is the whole of religion. Doctrines, or dogmas, or rituals, or books, or temples, or forms, are but secondary details.” 

मी काही प्रतिक्रिया दिली नाही. सखी पुन्हा म्हणाली, “हे वाचलेलं तू आत्मसात कधी करणार ? याची अनुभूती कधी घेणार तू  ?” 



भारती  ठाकूर
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com

Website -
http://narmadalaya.org/
 
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
 
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/

Comments

  1. प्रार्थक तयारीचा असला की प्रार्थना सफल होतेच !
    🙏

    ReplyDelete
  2. हे लेख वाचले की आयुष्याकडे बघायची दृष्टी बदलते. अशाच लिहीत रहा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....

मातृत्व