गोष्ट एका शाळेची (25)

गोष्ट एका शाळेची (25)



भल्या पहाटे  उठून संपूर्ण भगवद्गीता म्हटली. मनाची अस्वस्थता जरा कमी झाली. मुलं शाळेत आल्यावर त्यांना रुमी आणि रेनुबायवर सोपवून रॉबिनदांकडे गेले. रेतीची अडचण त्यांना ठाऊक होतीच. आधल्या दिवशी आलेल्या रेतीच्या संदर्भात मी त्यांच्याशी सविस्तर बोलले. सोनाही माझ्याबरोबर होता . त्याची समस्याही सांगितली. 

“काय करू ? तुम्ही म्हणाल तसे करीन” 

“वापर की ती रेती. त्याने स्वत:हून आणून दिली आहे. तू काही मागायला गेली नव्हतीस.” 

सोना पडत्या फळाची आज्ञा घेत ‘लगेच काम सुरू करतो’ म्हणाला अन् पायऱ्या उतरून गेला देखील. 

“उद्या दहा मार्च. शाळा सुटली की काझीरंगाला जायला निघेन. तिथल्या  गेस्ट हाऊसचे तुम्ही आरक्षण केलं आहे माझ्यासाठी तर कुणाला संपर्क करायचा तिथे गेल्यावर ?” मी माझ्या दोन दिवसाच्या सुटी बद्दल रॉबिनदांना आठवण करून दिली. 

“अरे हो की ! तू उद्या काझीरंगाला जाणार. मी जमालला पाठवतो तुला तिथे गाडीने  सोडायला”. 

“नको -नको. मी बसने जाईन किंवा घरीच राहीन. पण जमाल नको सोबत.” मी घाबरून घाई घाईने म्हणाले.

त्यावर हसत रॉबिनदा म्हणाले, “जमालचा स्वभाव मलाही ठाऊक आहे.  मलाही अनेकदा तो  त्रासदायक वाटतो. जमाल  पैसा आणि इथल्या धान्याचा गैरव्यवहार करतो, दारू पितो हे सगळं मला समजतं.  पण आजकाल नोकर मिळतात कुठे चांगले ? मी हतबल आहे. गेले पंचवीस -तीस वर्ष तो माझी सेवा करतोय. माझी औषधं वेळच्या वेळी देणं आणि डॉक्युमेंटरी दाखवणं हे सगळं करणारा माणूस मला नव्याने कुठे मिळणार आता ? शिवाय तो  गाडी पण चालवतो.” जमालच्या स्वभावामुळे ते किती निराश आहेत हे त्यांच्या त्राग्यातून समजत होतं. 

“काझीरंगाच्या स्वागत कक्षात गेल्यावर तू स्वत:चं नाव सांग. तुझी व्यवस्था ते करतील. आणि तू माझी पाहुणी म्हणून जाते आहेस. मी आधीच आरक्षण करून ठेवलं आहे. पुन्हा आज फोन करतो. All the best. Enjoy your Kaziranga stay.”  

रस्त्यात एक विचार मनात आला की घरी एकट्याने राहणं वेगळी गोष्ट आहे. पण एखाद्या अभयरण्याच्या अतिथि कक्षात एकटीने रहाणं किती सुरक्षित असेल ? जावं की बेत रद्दच करावा ? मी विवेकानंद केंद्रातून कुणाची परवानगी देखील घेतली नाहीये. असं न सांगता जाणं बरोबर आहे का ?

यावर सखीने “तू दवाखान्यात अॅडमिट होतांना विवेकानंद केंद्रातल्या कुणाची परवानगी घेतली होतीस का ? ते अॅडमिट होणं तुझ्या शरीरा साठी आवश्यक होतं तसं काझीरंगाला जाणं हे तुझ्या मनाच्या विश्रांती साठी आवश्यक आहे. तुझे इथले स्थानिक पालकत्व ज्यांच्याकडे आहे त्या डॉ रॉबिन बॅनर्जी यांच्या  परवानगीने तू जाते आहेस. आता मागे पुढे पाहू नकोस.”   

घरी पोहोचले तर शाळेचा विद्यार्थी तपस डेकाचे आई वडील माझी वाटच बघत होते. संध्याकाळच्या जेवणाचे आमंत्रण द्यायला आले होते. “काय विशेष आज?” या माझ्या प्रश्नावर “काही नाही. सहजच. तपस खूप दिवसापासून दीदीला आपल्याकडे जेवायला बोलव म्हणून मागे लागला होता.”
                                           
संध्याकाळी तपसकडे गेले. तपसची आई मोठी सुगरण. वेगवेगळ्या असमिया पदार्थांची कृती मी तिला विचारत होते. तपस आमच्या आजूबाजूला घुटमळत होता. मध्येच काहीतरी बोलत होता. अचानक त्याने माझा हात पकडून मला शेजारच्या खोलीत नेलं. कपाटातून काहीतरी काढून ते मला देण्यासाठी हात पुढे केला आणि म्हणाला “हे तुझ्यासाठी”  

तपसच्या  चिमुकल्या मुठीत त्याच्या आईची लिपस्टिक होती. आसाम-बंगालमध्ये सगळ्याच महिला लिपस्टिक लावतात. मी  लावत नव्हते हे त्याने बहुधा निरीक्षण केलं असावं. मी हसत त्याला विचारलं, “पण तू आईला विचारलंस का हे मला देतांना ? ती रागवेल ना तुला ! आणि ही लिपस्टिक घेऊन मी काय करू ? मी तर लावत नाही.”    

“नाही रागावणार आई  - मी विचारलं आहे  तिला”. त्याने बळेच ती लिपस्टिक माझ्या हातात ठेवली आणि पुन्हा मला घेऊन स्वयंपाकघरात आला. त्याची आई हसत होती. म्हणाली, "सकाळपासून मागे लागला आहे मी दीदीला लिपस्टिक देतो म्हणून. मला माहिती आहे तुम्ही लावणार नाही. पण थोडावेळ त्याच्या समजुती साठी हातात ठेवा.” आम्ही इतर गप्पांमध्ये रमलो. जेवणं झाली.  तपस मात्र एकदम गप्प झाला होता. जेवतांना देखील कुणाशी बोलला नाही. मी घरी जायला निघाले तसा  तपस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, “दीदी, ती लिपस्टिक मला परत दे”

“का रे ?” मी आश्चर्याने विचारलं. 

“तू लिपस्टिक लावलीस तर छान नाही दिसणार” तपसने बहुधा लिपस्टिक लावलेली आपली भारती दीदी कशी दिसेल याचं मानसचित्र तयार केलं असावं. 

“मग नेलपेंटची बाटली दे” त्याची आई त्याला चिडवत म्हणाली. 

“नको. नको. दीदी असं काही लावणार नाही. तिला ते छान दिसणार नाही.” त्या तेवढ्या तासाभरात त्या चिमुरड्याच्या मनात विचारांची किती उलथा पालथ झाली होती ते त्याच्या चेहऱ्यावर उमटलं  होतं.   

वाटेत सखी म्हणाली, “बघ सामाजिक कार्यकर्त्याला आपली राहणी, बोलणं - वागणं या बाबतीत किती सांभाळून रहायला पाहिजे. अगदी छोटी मुलं देखील तुमचं निरीक्षण करत असतात.”  


भारती  ठाकूर
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com

Website -
 
Facebook -
 
Blog -

Nimar Abhyudaya Rural Management And Development Association  (N.A.R.M.A.D.A) Documentary - 

Comments

  1. शेवटचं वाक्य फक्त सामाजिक कार्यकर्तेच नव्हेत तर प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....

मातृत्व