गोष्ट एका शाळेची (27)
गोष्ट एका शाळेची (27)
हत्ती वरून जंगल सफारीला जायचं म्हणून जरा लवकरच उठले. खरं तर पूर्ण झोप लागलीच नव्हती. कुठल्या विचारांनी अस्वस्थ होते असंही नव्हतं. पक्ष्यांची किलबिल सुरू झाली होती. मी तयार होऊन रूम सर्विसवाल्या मुलानी आणून दिलेल्या चहाचा आस्वाद घेत होते. एक विलक्षण ऊर्जा त्या साऱ्या परिसरात पसरली आहे असं जाणवत होतं.
अचानक सखी म्हणाली, “आजचा दिवस तुझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे भारती. काही निर्णय तुला घ्यायचे आहेत शांतपणे”.
“झाली का तुझी सुरुवात ?” अशा अर्थाने मी चमकून सखीकडे पाहिलं. काही प्रतिक्रिया दिली नाही. तितक्यात मला Elephant Park पर्यन्त सोडायला जीप आली आहे असा निरोप आला. मी गाडीत जाऊन बसले. ड्रायव्हरने विचारलं, “हिन्दी समझता है मॅडम ? आप डॉ रॉबिन बॅनर्जी साब की मेहमान है सुना मैने |”
“जी, लेकिन मेरा गला आज कुछ खराब है | मौन रहना पसंद करुंगी |” माझा घसा खरंच थोडा खवखवत होता. मला त्याचं निमित्त मिळालं. रात्री पाऊस पडून गेला होता पण सकाळी मात्र आकाश निरभ्र होतं. रात्री पडन गेलेल्या पावसाचे थेंब गवताने अजूनही सांभाळून ठेवले होते. पावसाचा मोसम नव्हता पण आसाममध्ये पावसाला बेमौसम बरसायला अधिक आवडत असावं. हवाहवासा वाटणारा गारवाही हवेत होता. आईची शाल मी अंगावर लपेटली. माझ्या स्वर्गस्थ आईची ती एकमात्र आठवण माझ्याजवळ होती.
जैव विविधतेने नटलेलं हे अभयारण्य आहे. उंचच उंच गवत ज्यात कधी कधी गेंडा सुद्धा झाकल्या जातो. एकशिंगी गेंडा आणि वाघ या खेरीज अनेक प्रकारची हरणं - सांबर, चितळ, Hog deer, बारासिंघा तसेच पाणम्हशी, रानमांजर, कोल्हा यासारख्या असंख्य वन्य जीवांनी हे अभयारण्य समृद्ध केलंय. अर्थातच हत्तीवरून हे सारेच प्राणी काही सगळ्यांना दिसत नाहीत. मुख्य आकर्षण असतं एकशिंगी गेंडा. अक्षरश: माजलेल्या गवतात हे गेंडे मात्र भरपूर दिसत होते. तुंदीलतनु गेंडे शरीरावर चिलखत घातल्या सारखे वाटतात. हत्तीचा माहूत देखील गेंड्यांच्या जास्तीत जास्त जवळ हत्तीला नेत होता. गेंडे मात्र जन्मतःच स्थितप्रज्ञ असावेत. हत्तीच्या आणि आमच्या उपस्थितीचा त्यांच्यावर काही परिणाम होत नव्हता. माहूत आम्हा सर्वांना माहिती सांगत होता. जगातील एकशिंगी गेंडयाच्या एकूण संख्येपैकी सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ दोन हजार गेंडे आणि तितकेच हत्ती सुद्धा एकट्या काझीरंगा अभयारण्यात आहेत. भारतामध्ये आढळणाऱ्या माकडांच्या १४ जातींपैकी ९ जाती या उद्यानात आहेत.आसामी माकड, सोनेरी वानर व भारतात आढळणारे एकमेव एप माकड यांचा समावेश होतो. वाघांची संख्या भारतातील इतर अभयारण्यात आढळणाऱ्या वाघांपेक्षा अधिक आहे म्हणतात. मात्र दर वर्षी येणाऱ्या ब्रह्मपुत्रेच्या महापुरात असंख्य वन्य पशू वाहून जातात याचे दु:ख होते. काझीरंगात ब्रह्मपुत्र खेरीज दिफ्लू आणि मोरा धनसिरि या नद्या आहेत.
साधारणपणे दोन अडीच तास हत्तीवरून फिरवून माहुताने आम्हाला पुन्हा Elephant Park मध्ये आणून सोडलं. पुन्हा जीपमध्ये बसून अतिथीगृहात पोहोचले. व्यवस्थापकाने अगत्याने 'जेवण तयार आहे फार वेळ वाया घालवू नका. जीप सफारीला लगेच जायचं आहे' याची आठवण करून दिली.
जीपमध्ये ड्रायव्हरच्या जोडीने फील्ड गाईड पण होता. त्याला मी डॉ. रॉबिन बॅनर्जी यांची पाहुणी म्हणून मला जास्तीत जास्त माहिती सांगून मला इम्प्रेस करायचं होतं असं मला उगीचच वाटलं. मी जीपमध्ये बसल्या बरोबर त्या दोघांना सांगितलं की मला फक्त जंगलाचा आनंद घ्यायचा आहे. मला स्वत:ला प्राणी दिसले तर ठीकच. आपण फक्त जंगलाच्या शांततेचा आनंद घेऊया. बहुधा त्यांनी 'काय वेडी आहे ही बाई' असा माझ्या बाबतीत विचार केला असावा. ते तीन तास त्यांच्या साठी मौनात घालवणे किती कठीण गेलं असेल याची मी कल्पना करू शकते.
जीप अत्यंत सावकाश जात होती. वाऱ्याची झुळुकही नव्हती. जणू सगळं जंगल दुपारची झोप काढत होतं. क्वचित कुठे पक्ष्यांनी एकमेकांना घातलेली साद ऐकू येत होती. हळूहळू आकाशात पुन्हा ढग जमू लागले. असं काही वातावरण असेल की सखीला क धीकाळी वाचलेल्या कविता आठवायला लागतात. इतका वेळ गप्प बसलेली सखी मला तिच्या एक-एक आवडत्या कविता ऐकवू लागली.
How still it is here in the woods.
The trees stand motionless,
as if they did not dare to stir
lest, it should break the spell.
Sometimes a hawk screams or a woodpecker
startles the stillness from it's fixed mood
with his loud careless tap.
Sometimes I hear dreamy- white throat from the far off tree
Pipe slowly on the listening solitude
His five pure notes succeeding pensively.
मी विचारलं, “कोणाची कविता ?” तर सखी म्हणाली, “आठवत नाही गं ! बहुधा Lampmanची असावी. पण अजून एक कविता ऐक. खास तुझ्यासाठी”.
Go Wherever you want.
Be whoever you want
refresh your soul।
Move like a hummingbird
Drinking nectar.
Sit as quietly as a rock
and weave your memories
into a secret story that
you will keep with you
Always
अचानक समोरच्या झाडांच्या फांद्यांवर कुणी प्राणी धुमाकूळ घालतोय असं वाटलं. ड्रायव्हरने गाडी थांबवली. न राहवून गाईडने पहिल्यांदाच मौन तोडले. “मॅडमजी गोल्डन लंगूर देखिये |” तो जवळजवळ ओरडलाच. दुर्मिळ असे सोनेरी वानर एकटेच कुंभीच्या झाडाच्या फांदीवर उड्या मारत होते. आयुष्यात प्रथमच सोनेरी वानर पाहिले. बहुधा त्याचे साथीदार जवळपास असावेत. पण आम्हाला दिसले नाहीत. “मॅडमजी, फोटो खिचिये ना |” गाईडने मला सल्ला दिला. “मेरे पास तो कॅमेरा नहीं है भाई “ मी उत्तरले. त्याने मात्र त्याच्या जवळच्या कॅमेऱ्याने भराभर फोटो काढले.
पावसाचे दोनचार थेंब अंगावर पडले. आभाळही दाटून आलं होतं. सखी म्हणाली, “निघ आता परत. तुला ताप भरतोय असं वाटतंय.” पडत्या फळाची आज्ञा घेत मी ड्रायव्हरला गाडी अतिथी गृहाकडे घ्यायला सांगितली.
मी ड्रायव्हर आणि गाईडचे आभार मानले तर गाईड म्हणतो कसा,”मॅडमजी,धन्यवाद तो हमें आपको कहना चाहिये | जंगल की ये नीरव शांती भी कितनी आनंद देती है ये हमने जिंदगी में पहली बार अनुभव किया |”
सखी हसत माझ्या कानात कुजबुजली, “Yes, It was indeed a divine bliss.”
माझ्या परतण्याची चाहूल लागताच व्यवस्थापक पण तिथे पोहोचले. ते गप्पा मारायच्या मूडमध्ये होते. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी कृतज्ञ होते . त्यामुळे त्यांच्याशी न बोलून मी त्यांना दुखवू इच्छित नव्हते. चहा बरोबर नाश्तापण आला.
व्यवस्थापकांनी गाईडचे अपूर्ण राहिलेलं काम जणू पूर्ण करायचं ठरवलं होतं. “मॅडमजी, आपने इतिहास में लॉर्ड करझन का नाम तो सुना होगा | अंग्रेजोंके राज में भारतके वे वॉइसराय थे | उनकी पत्नी 1904 में यहां गेंडे देखने आई थी | ज्यादा कुछ गेंडे देख नही पाई | स्थानिक लोगों ने गेंडोंकी शिकार के बारेमे चिंता जतायी | तो 01 जून 1905 को यह क्षेत्र संरक्षित वन घोषित किया गया | हालांकी शिकार तो बंद नही हुई मगर कम हुई | यहां हाथी भी बहुत थे | पर्यटक आने लगे तो जंगल दिखाने के लिये उनका उपयोग होने लगा | काझीरंगामें एक महिला माहूत भी थी | बीबीसी के पर्यटन लेखक मार्क शॅन्ड ने काझीरंगाकी इस पहिली महिला माहूत पार्वती बरुआ पर एक पुस्तक भी लिखी है और एक फिल्म 'क्वीन ऑफ द एलिफंट्स' निकाली है | ( या पुस्तकाला १९९६चा थॉमस कुक ट्रॅव्हल बुक पुरस्कार व Prix littéraire d’amis पुरस्कार मिळालेले आहेत. अर्थात ही माहिती मला नंतर समजली).
व्यवस्थापक श्री हजारिका यांच्या लक्षात आलं की मी नेहमीच डॉ रॉबिन बॅनर्जी यांच्याबरोबर असते. तर मी काय आणखी काझीरंगाबद्दल हिला सांगणार ? “ अब आप आराम किजिये मॅडम, नमस्ते |” असे म्हणून त्यांनी माझा निरोप घेतला. थरमस फ्लास्क भरून चहा पाठवायला मात्र ते विसरले नाहीत.
कपडे बदलून मी व्हरांड्यात येऊन बसले. पावसामुळे किंचित गारवा होता म्हणून आईची शाल पांघरून बसले. ही शाल पांघरली की आईजवळ असल्यासारखं वाटतं. मी पुन्हा चहा कपात ओतून घेतला. एक क्रोसिनची गोळीही घेतली. मी थोडं रीलॅक्स होण्याची सखी जणू वाटच पहात होती.
“तुझ्याशी आज जरा महत्वाचं बोलायचं आहे भारती. गोलाघाट येथे आल्यापासूनचा तुझ्या तब्येतीतले चढउतार आणि हातापायांवर येणारी सूज याकडे तू गांभीर्याने लक्ष द्यावस असं मला वाटतं. संधीवाताचं हे दुखणं नाहीतर आयुष्यभर साथ देईल. माझा हा सावधानतेचा इशारा आहे. नाशिकच्या तोफखाना केंद्रातून तू पाच वर्षाची रजा घेऊन आली आहेस. पुढच्या वर्षी म्हणजे 30 जून 1990 ला तुझी रजा संपेल. आयुष्यभर कुणाला तुझी सेवा करावी लागली तर आवडेल का तुला ? काम न करता आर्थिक दृष्ट्या एखाद्या संस्थेवर अवलंबून रहायला चालेल तुला ? शाळेचं बांधकाम एकदोन महिन्यात पूर्ण होईल. ऐक माझं. शाळेचं नवीन सत्र सुरू व्हायच्या आत तू विवेकानंद केंद्राच्या पदाधिकाऱ्यांना सांगून परत जाऊ शकतेस. मुलांना शिकवण्याचे हे काम तू नाशिकलाही करू शकतेस . नाशिकला अशी अनेक वंचित मुले आहेत ज्यांना तुझा आधार मिळेल.” सखी खूपच गांभीर्याने बोलत होती.
“ सखी, तुझं म्हणणं पटतंय मला. पण तसं करणं म्हणजे विवेकानंद केंद्राचे पदाधिकारी, गोलाघाटचे पालक आणि विद्यार्थ्यांचाही विश्वासघात असेल. औषधं घेतेय ना मी ? वाटेल बरं काही दिवसात.निदान जून 1990 पर्यन्त मला थांबायलाच हवं. मी श्री बाळकृष्णनजी नाहीतर लक्ष्मी दीदी यांच्याशी बोलेन. हे काम सांभाळणारी कुणी व्यक्ति इथे आधी यायला हवी ना ? चर्चा पुरे सखी. माझी प्रार्थनेची वेळ झालीय ” माझा प्रतिवाद.
“ मी काही सांगायला लागले की तुला बऱ्या उठसूठ प्रार्थना कराव्याशा वाटतात.” सखी माझ्यावर कातावली.
“अगं, तूच तर काल रात्री म्हणालीस की आयुष्याचा प्रत्येक क्षण प्रार्थनामय व्हायला पाहिजे” मी तिला हसत टोमणा मारला. ती म्हणत होती तेही खरं होतं. लगेच नाही तरी जून 1990 मध्ये नाशिकला प्रस्थान करायला हवे. यावर मलाच गांभीर्याने विचार करायला पाहिजे..
जेवण करून मी प्रार्थनेला बसले. पण कालच्या प्रमाणे आजही नित्यपाठातल्या प्रार्थना ओठावर येईनात.”ठाकूर, मां आणि स्वामीजी, हे आयुष्य तुमच्या चरणी अर्पण केलं आहे. ज्या मार्गाने न्याल त्या मार्गाने जाईन. तुमची इच्छा प्रमाण !!
पुन्हा ही द्विधा मन:स्थिती नकोय मला.
आदल्या दिवशीच्या त्या नि:स्तब्ध-नि:शब्द मनाच्या अवस्थेचा अनुभव आज पुन्हा एकदा मिळाला.
रात्री दीड वाजता अंथरुणावर पाठ टेकवण्याआधी व्हरांड्यात एक चक्कर मारली. कृष्ण मेघ आकाशात अत्यंत वेगाने वहात होते. चंद्र मधूनच त्यातून डोकावत होता.
“तुला शुभ रात्री म्हणण्या आधी रिचर्ड बाखच्या दोन-चार ओळी ऐकवते” सखी म्हणाली.
A cloud does not know
Why it moves in just such a direction
and at such a speed.
It feels impulsion …..
This is the place to go now.
But the sky knows the reasons and the patterns
behind all the clouds.
And you will know , too, when
you lift yourself high enough
to see beyond the horizons.
Good night !!!
---------------------------
भल्या पहाटे गोलाघाटला जायच्या तयारीनेच बाहेर पडले. शाळा सुरू व्हायच्या आधी तिथे पोहोचायला हवं. उगवत्या सूर्याने दर्शन दिलं. लालबुंद तेजाचा गोळा त्यामागे सोनेरी कडा असलेले लाल ढग आकाशाच्या कॅनव्हासवर सूर्याने रेखले होते. मी मनोमन त्याचं कौतुक केलं. “रोजच किती छान रंगकला दाखवतोस रे तू आकाशाच्या कॅनव्हासवर ?”
सूर्य हसत उत्तरला, “तुझ्या आयुष्याच्या कॅनव्हासवर तूही नवीन चित्र काढू शकतेस ना ? नको कुणी म्हटलंय?
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com
Website -
http://narmadalaya.org/
Facebook -
Blog -
Nimar Abhyudaya Rural Management And Development Association (N.A.R.M.A.D.A) Documentary -
असा निर्णय घेण्याची इतक्यात वेळ आली असेल असं मुळीच वाटलं नव्हतं. ☹️
ReplyDelete