गोष्ट एका शाळेची (28)

गोष्ट एका शाळेची (28)



“तुझ्या आयुष्याच्या कॅनव्हासवर तू देखील नवीन चित्र काढू शकतेस.” सूर्याचं हे केवळ सहज उद्गारलेलं वाक्य होतं का ? छे ! माझ्यासाठी तर सूर्याने जीवनाचा मूलमंत्रच दिला. खूप मोकळं वाटलं सूर्याच्या त्या एक वाक्याने.
 
उत्साहाने शाळेत पोहोचले. मुलांचे हसरे चेहरे पाहिले की ताप, सांधेदुखी, बांधकामाच्या विवंचना हे सगळंच विसरायला होतं. आयुषला आज माझी वेणी पकडून रेलगाडी – रेलगाडी खेळायचं होतं. प्रमितला माझ्याच मांडीवर बसून – माझ्याच हाताने डबा खायचा होता. असंही त्याला हाताने भरवलं नाही तर शाळा सुटेपर्यंत त्याचा डबा संपतच नाही. बबिताच्या आईने खास माझ्यासाठी वेगळा डबा पाठवला होता. पराठे, खास राजस्थानी लोणचं आणि फुलकोबीची भाजी. लोक खरंच किती भरभरून प्रेम करतात !
 
आज स्वयंपाकाची चिंता नसल्याने जेवण पटकन आटोपलं. बांधकामाचे हिशेब लिहिले. आणि या आठवड्यातल्या कामांची यादी केली. थोडी विश्रांती घेऊन मग रॉबिनदांकडे काझीरंगा updates द्यायला जाऊ असं ठरवलं. दुपारी झोपही खूप गाढ लागली. पाच वाजता दारावरची बेल वाजली. रॉबिनदांचा माळी जगदीश बोलवायला आला होता. “डॉक्टरसाब ने तुरंत याद किया है |” मला वाटलं रॉबिनदा माझ्या काझीरंगा ट्रीपबद्दल उत्सुक असतील. त्यांना मनापासून धन्यवाद द्यायला हवेत.

मी तातडीने त्यांच्या बंगल्यावर पोहोचले. रॉबिनदांचे गावातील एक डॉक्टर मित्र आणि अजून  दोन-तीन मंडळी होती. जमाल दिवाणखान्याच्या दरवाज्यात उभा होता. वातावरण थोडं गंभीर होतं.
 
“नमस्ते रॉबिनदा. माझी काझीरंगा ट्रीप खूपच छान झाली. खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे मला फारच विशेष आदरतिथ्य मिळालं तिथे.” मी उत्साहाने म्हणाले पण त्यावर रॉबिनदांची काही प्रतिक्रिया नव्हती.
 
“चार दिवसांपूर्वी ज्या मुलानी रेती पाठवली त्याच्या संदर्भात काही बोलायचं आहे. तो कोण – कुठला आणि तुझा त्याच्याशी कसा आणि किती परिचय आहे ? आम्हाला स्पष्ट सांग.” रॉबिनदांच्या शब्दात थोडा कडवटपणा होता. मला आरोपीच्या पिंजऱ्यात बसल्यासारखं वाटलं.
 
मी अवाक् ! हसावं की रडावं समजेना. “रॉबिनदा, तो शाळा सुरू करण्यापूर्वी पहिल्यांदा भेटला तेंव्हा तुम्ही मेक्सिकोत होता. त्यानी मी शाळा सुरू करू नये म्हणून सौम्य शब्दात धमकी देण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट मी डॉ रॉय आणि मेजर जनरल कुकरेती यांना सांगितली. कुकरेतीजी पोलिस अधिक्षकांना सांगतो म्हणाले होते. तुम्ही परत आल्यावर तुम्हालाही याबद्दल मी सांगितलं होतं. नंतर एकदा दोनच मिनिटं शाळेत आला होता. तेंव्हा त्याने शाळेचं कौतुक केलं. तेही मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर बांधकाम सुरू झालं तेंव्हा पुन्हा धमकवायला आला होता पण मीच त्याला खडसावलं. तो बांधकाम बघायला येतो असं म्हणतात, पण माझी भेट नाही. रेती त्याने मला विचारून टाकली नाही. ती वापरायची का हे मी तुम्हाला आधी विचारलं. तुम्ही हो म्हणालात आणि मगच सोनाने ती वापरायला सुरवात केली. यात माझं काय चुकलं ? तो कोण, त्याचं नाव-गाव काय याच्याशी मला कर्तव्य नाही.” मी थोडी चिडलेच.
 
“तो कुठल्या अतिरेकी संघटनेचा सदस्य असू शकतो” इति डॉ. रॉय. नंतर जमालने त्यांचीच री ओढली.
 
“तुम्हाला पक्की माहिती आहे ? असेल तर सांगा मलाही. पोलिसात तक्रार नोंदवा. एक गोष्ट नक्की. त्याच्याशी दुश्मनी घेऊन मी इथे राहू शकत नाही. कारण मी एकटी राहते. माझ्या जीवाला धोका होऊ शकतो. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे मीच नाशिकला परत जाते. म्हणजे प्रश्नच मिटेल. कुठल्या परिस्थितीत मी काम करतेय माझं मला ठाऊक.
 
तुमच्या म्हणण्या प्रमाणे एखाद्या अतिरेकी संघटनेचा सदस्य आपल्या बांधकामासाठी मदत करतो आहे तर ही मी एक success story मानते. स्वामी विवेकानंदांची ‘मनुष्य निर्माण’ ही संकल्पना तरी काय आहे ? वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो ना ?” एवढं बोलून मी थांबले.
 
“तसं नाही गं. आम्हाला तुझी काळजी वाटते.” रॉबिनदांचा स्वर बदलला होता.
 
“आपण इथल्या प्रतिष्ठित लोकांची एक कमिटी तयार करू. म्हणजे मग तुझं काम सोपं होईल.” डॉ.xxx म्हणाले. उदाहरणादाखल त्यांनी गावातल्या काही लोकांची नावे सांगितली.
 
“डॉक्टर, या सगळ्या लोकांकडे मी स्वत: जाऊन आलेय. बांधकाम चालू झालं आहे. तुम्ही बघायला या. काही मार्गदर्शन करा. कारण मला बांधकामातलं काही समजत नाही. पण आजवर कुणी आलं नाही. रेतीसाठी मी यांच्याकडे वणवण फिरले पण कुणी मदत केली नाही. आजवर तुम्ही देखील बांधकामावर फिरकले नाहीत. एखाद्या समितीत पद मिळालं तरच आम्ही काम करू असं असतं का ? समिति स्थापन करणं हा विषय माझा नाही. तुम्ही श्री बाळकृष्णनजी यांच्याशी बोला.” मला त्यांची दुखरी नस सापडली होती. रॉबिनदांचे कान भरवण्याचे काम कोणाचं याचाही अंदाज आला.
 
“एक गोष्ट स्पष्ट बोलते रॉबिनदा. आपल्याला रेती कुणी दिली ही बातमी गावभर झालीच कशी? तुमचा हा नोकर जमाल आपण बोलत असतांना इथे उभं राहून का एकतो आपलं बोलणं ? त्याला एवढा सुद्धा शिष्टाचार ठाऊक नाही ? येते मी. खूप कामं आहेत मला” खुर्चीतून उठत मी म्हणाले.
 
“तुझी कामं आटोपली की पुन्हा ये थोडा वेळ. तुझ्या काझीरंगा ट्रीपबद्दल ऐकायचं आहे.” रॉबिनदांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते.
 
उद्विग्न अवस्थेत मी बाहेर पडले. बांधकाम बघायला गेले. दोन दिवसात सोनाने बरंच काम पूर्ण केलं होतं. दरवाजे आणि खिडक्यांच्या चौकटी लागल्या होत्या. आतलं प्लास्टर झालं होतं. बाहेरचं सुरू होतं.  सोना उत्साहात होता. आता पत्रे बसवण्यासाठी लाकडी फ्रेम बसवण्याचे काम सुरू होईल.  काम बघून माझाही मूड बदलला. बाजारात जाऊन भाजी आणली. सरळ घरी जाणार होते पण रॉबिनदांची आठवण आली. त्यांनी परत बोलवलं होतं. म्हणून त्यांच्या घरी गेले.
 
“कशी झाली तुझी ट्रीप ? आवडलं ना तुला काझीरंगा ?” मी पण तेवढ्याच उत्साहात सगळी माहिती दिली.
 
चहा झाल्यावर मी जायला निघाले तर रॉबिनदा म्हणाले, “ही बातमी गावभर जमालनेच केली असणार. आज आलेली मंडळी जरा वेगळ्या मूडमध्ये होती. तुझ्या लक्षात आलं असेलंच. तुला दुखवायचा माझा हेतु नव्हता. तू जे बोललीस ते फार चांगलं झालं. कधी कधी मलाही कळत नाही या लोकांचं वागणं.”
 
रात्री झोपतांना सखी हसत म्हणाली, “काझीरंगाला जायला निघाल्यापासून तू तर रेती, सोना, तो मुलगा सगळं विसरलीस. आज रॉबिनदांकडच्या चर्चेनंतर मला एक गोष्ट आठवली ती ऐक. एका गुरुकडे दोन ब्रह्मचारी शिष्य राहत होते. गुरूंनी त्यांना काही कामानिमित्त परगावी पाठवलं. पायी प्रवास होता. वाटेत भरपूर पाणी असलेली एक नदी लागली. तिथे नाव नव्हती. पोहून जावं लागणार होतं. एक तरुणी काठावर उभी होती. तिला पोहता येत नव्हतं पण अत्यंत तातडीच्या कामासाठी नदी पलीकडच्या गावी जायचं होतं. तिने या दोघांना विनंती केली. एका शिष्याने तिला पाठीवर घेतलं आणि पोहत ती नदी पर केली. आठ दिवसांनी दोघे शिष्य गुरु गृही परतले. सोपवलेल्या कामाबद्दल काही बोलण्याच्या आधीच त्या दुसऱ्या शिष्याने गुरूंना त्या तरुणीची घटना सांगितली.
 
पहिला शिष्य म्हणाला, “मित्रा, मी तर तिला नदी पार करेपर्यंतच पाठीवर घेतलं आणि विसरलो. पण तिचं स्मरण तू आठ दिवसानंतरही आपल्या मनात करतो आहेस.”  



भारती  ठाकूर
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश

Website -
 
Facebook -
 
Blog -

Nimar Abhyudaya Rural Management And Development Association  (N.A.R.M.A.D.A) Documentary - 

Comments

  1. दोन शिष्यांच्या कथेचं प्रयोजन कळलं नाही. 🤔

    ReplyDelete
  2. काझीरंगाला गेल्यावर बांधकामाच्या कटकटी, सोना, डी सी यांना विसरणं, बांधकामाची प्रगती बघून मीटिंगमधले आरोप विसरणं आणि तरीही रॉबिनदांना काझीरंगाचा रिपोर्ट द्यायला आवर्जून जाणं हे सोपं नाही. 'गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा' ही स्थितप्रज्ञता सहजासहजी लाभत नाही. 🙏
    त्या तरुणीला वाहून नेणाऱ्या शिष्यात तीच स्थितप्रज्ञता होती.
    पण रॉबिनदांना देखील सारासार विचार करायची, मन संतुलित ठेवायची शक्ती होती हेही महत्त्वाचं.

    ते काम पुरं व्हायचंच होतं. 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....