गोष्ट एक शाळेची (29)

गोष्ट एक शाळेची (29)



मुलं बालवाडीतली असली तरी पालकांच्या समाधानासाठी परीक्षेचं नाटक करावंच लागतं. “मुलांना परीक्षा आहे असं सांगून टेन्शन देऊ नका. त्यांच्या नकळत आम्ही परीक्षा घेऊ. असं तर आम्ही सततच मुलांच्या प्रगतीकडे लक्ष ठेऊन असतो. सगळीच मुलं चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होणार आहेत.” हे पालकांना वारंवार सांगावे लागे.

सहज म्हणून मी फळ्यावर चेंडूचे चित्र काढले. नुसताच गोल काढून कसं चालेल ? तो चेंडू वाटलाही पाहिजे. म्हणून मी त्याच्या मधोमध आडव्या रेषा काढल्या. “ओळखा हे काय आहे ?” एका सुरात  उत्तर आलं, “दीदी, हा शनि (त्यांच्या भाषेत ‘हनि’ कारण ते स, श चा उच्चार ह करतात) ग्रह आहे.” मी आश्चर्यचकित. माझी चित्रकला काय दर्जाची आहे मला ठाऊक असलं तरी चेंडूला एकदम शनि ग्रह म्हटल्यावर माझ्या मेंदूला झिणझिण्याच आल्या. माझ्या धनू राशीला तेंव्हा साडेसाती चालू होती असं कुणी तरी मला म्हणालं होतं. पण तो ‘शनि’ एकदम वर्गात प्रकट होईल असं वाटलं नव्हतं. “तुम्हाला कसं रे माहित हा शनि ग्रह आहे ?” मी आश्चर्याने विचारले. मग रहस्य उलगडलं, महाभारत या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेच्या टायटल सॉन्गच्या वेळी शनि ग्रह दाखवला जातो. मुलांच्या विचार शक्तीचे खूप कौतुक वाटले.

त्यांचा शब्द संग्रह वाढवण्यासाठी आम्ही काही कार्डस बनवली होती. पशुपक्षी, वाहनं, फुलं, फळं, भाज्या, स्वयंपाक घरातील वस्तू, दिवाणखान्यातील वस्तू वगैरे. नारायणला मी त्या सगळ्या कार्डामधून स्वयंपाक घरातील वस्तूंची चित्रं बाजूला काढायला सांगितली. त्यानी सगळी भांडी, कप-बशा, चहाचे गाळणे, डबे, ताट-वाटया, गॅस, कुकर यांच्या जोडीने झुरळाचे चित्रही बाजूला काढले. साडे तीन-चार वर्षाचे का असेनात – त्यांची निरीक्षण शक्ती जबरदस्त असते.

आमची संगीत शिक्षिका रुमी हिने मुलांकडून आसामी, हिन्दी आणि इंग्लिश बालगीतं खूप छान बसवून घेतली होती. गाण्याबरोबर मुलं नाचही करत. राष्ट्रगीत म्हणतांना सारंगपाणी किंवा अभिलाष छोटा ड्रम वाजवायचे. तालाचे अनेक मुलांना उपजतच ज्ञान असतं.  अनेक संस्कृत श्लोक मुलांचे पाठ झाले होते. गोष्टी सांगायची जबाबदारी माझी होती. गोष्टी ऐकतांना प्राण्यांचे आवाज माझ्या आधी मुलंच काढत. तो आवाज इतका मोठा असे की रस्त्यावरचे लोकही थबकून जात. साऱ्याच गोष्टी त्यांना अभिनयासकट पाठ झाल्या होत्या. रोज एक नवीन गोष्ट लागायची. मुलांच्या निमित्ताने त्याकाळात माझे वाचन पंचतंत्र, चांदोबा इसापनीती या सारख्या पुस्तकांचेच अधिक होत असे.   

कधी कधी त्यांचा आगाऊपणा मात्र माझ्या अंगाशी यायचा. मुलांना कागद कापायला खूप आवडतं पण घरी मोठी माणसं कात्री त्यांच्या हातात देत नाहीत म्हणून मी बिन धारेच्या अनेक छोट्या कात्र्या आणून ठेवल्या होत्या. जुनी वर्तमानपत्रे कापून मी मुलांना  पतंग बनवायला शिकवत होते. तेवढ्यात कुणी पालक आले म्हणून उठून बाहेर गेले. रुमी सुटीवर होती. रेनुबाय कसल्याशा कामात होती. मी पालकांशी बोले पर्यंत तपस आणि सिद्धार्थने सात आठ मुलांचे केस कापून ठेवले. मला वाटलं आता पालक भांडायला येतील पण सगळ्यांनीच ती गोष्ट हसण्यावारी नेली म्हणून वाचले.

या चिमुरड्यांच्या सहवासात असते तेंव्हा वाटतं, माझी दिवसभर होणारी शारीरिक मेहनत आणि ताणतणाव झेलायला जी ऊर्जा लागणार आहे ती सकाळच्या चार तासात मला मिळतेय. इतर बालवाडी  शिक्षकांना मुलांना शिकवतांना आपलं बालपण परत आलंय असं वाटतं का माहीत नाही. मला मात्र  सकाळचे चार तास मुलांबरोबर खेळतांना ते परत आल्यासारखं वाटतं. आम्ही अगदी भातुकली, बाहुला-बाहुलीचं लग्न, टीचर-टीचर असे सगळे खेळ खेळतो. मातीची भांडी, बनवणं, बाजार लावणं हा तर मुलांचा आवडता छंद. 

आयुष्याचा एक विरोधाभास मात्र सतत जाणवतो. तो म्हणजे मुलांना खूप लवकर मोठं व्हायचं असतं आणि मोठ्यांना बालपण फार लवकर सरल्याची खंत असते.

रात्री जेवणानंतर अंगणात खुर्ची टाकून जरा निवांत बसले. सगळ्याच मुलांची आकलन शक्ती सारखी नसते. त्यांना शिकवतांना ते प्रकर्षाने जाणवतं. कधी कधी त्यांच्याबद्दल काळजी वाटते.  आज पंकज बद्दल असाच काही विचार चालू होता. तो खूपच अशक्त आहे. आजारी पण असतो सारखा. आकलन शक्ती इतर मुलांच्या मनाने खूपच कमी आहे. सखी अशा संधीची वाटच पहात असते. ती म्हणाली, “If a child can’t learn the way you teach, then teach the way he learns”.

दोन-चार मुलं अत्यंत विघातक प्रवृत्तीची आहेत. सतत भांडत असतात. कधी कधी अपशब्दही त्यांच्या तोंडातून निघतात. त्यांचे आई वडिल भेटायला येतात तेंव्हा काही पालकांच्या बोलण्यातून जाणवतं की  कदाचित घरातले वातावरणच त्यांच्यावर प्रभाव टाकतंय. या मुलांमध्ये कसं परिवर्तन येईल ? सल्ल्यासाठी मी सखीकडे अपेक्षेने पाहिलं तर म्हणाली, “Before educating their minds, you need to educate their hearts first. Then only you can expect their transformation. The process is not very difficult.”    


भारती  ठाकूर
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश

Website -
 
Facebook -
 
Blog -

Nimar Abhyudaya Rural Management And Development Association  (N.A.R.M.A.D.A) Documentary - 

Comments

  1. मुलांची मोठं होण्याची घाई आणि मोठ्यांची बालपण लवकर सरल्याची खंत यातला विरोधाभास अगदी बरोब्बर टिपलात . 👍

    ReplyDelete
  2. आमचा गीता मंथन ग्रुप गीता अभ्यास साठी आहे. कर्मयोगाचे उदाहरण म्हणून आम्ही हे भाग प्रसारित करतो आमच्या ग्रुप मध्ये. कृपया पुढील भाग लवकर टाकावे ही नम्र विनंती.
    गीता मंथन ग्रुप

    ReplyDelete
  3. जे हृदयातून होतं तेच खरं शिक्षण.
    सखी तिथेच रहाते ना?

    ReplyDelete
  4. माझी चित्रकला काय दर्जाची आहे मला ठाऊक 'असलं तरी चेंडूला एकदम शनि ग्रह म्हटल्यावर माझ्या मेंदूला झिणझिण्याच आल्या. माझ्या धनू राशीला तेंव्हा साडेसाती चालू होती असं कुणी तरी मला म्हणालं होतं. पण तो ‘शनि’ एकदम वर्गात प्रकट होईल असं वाटलं नव्हतं.'

    हा उत्कृष्ट लेखनशैलीचा नमुना आहे. आणि तो उत्स्फूर्त असल्याचं सहज कळतं आहे. त्यामुळे त्याचा दर्जा अधिक वरचा आहे.

    ReplyDelete
  5. नमस्कार, "भटकंतीची पाठशाळा"
    पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत. कृपया लवकर प्रसिद्ध करावे ही विनंती.
    अनिल पानट

    ReplyDelete
  6. मला "गोष्ट एका शाळेची" याचे पुढील भाग असे म्हणायचे होते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....