सगुण-निर्गुण : लिपुलेखचा शंकर (महाराष्ट्र टाइम्स)
1998 साली केलेली कैलाश-मानसरोवर यात्रा काही दिवसांपासून सतत डोळ्यापुढे येतेय. उत्तराखंड राज्यातील धारचुला येथून या पदयात्रेला आरंभ होतो. कालीगंगेचे प्रथम दर्शनही इथेच होते. हिचा प्रवाह इतका वेगवान की 1999 साली झालेल्या अतिवृष्टीने मालपा नावाचे एक छोटे गाव तिने गिळंकृत केलं. कैलाश यात्रेतील लिपुलेख हे भारतीय हद्दीतले सतरा हजार फुटावरचं शेवटचं ठिकाण. वाटेत एक विचार सारखा मनात येत होता- हा भागचीनव्याप्त तिबेट आणि नेपाळच्या सीमेला लागून आहे. इतकी वर्षं झाली स्वातंत्र्य मिळून पण आपले सैन्य आणि सामग्री तिथे पोहोचण्यासाठी रस्तेच नाहीत. शत्रूने अचानक हल्ला केला तर?
हेच ‘लिपुलेख’ सध्या नेपाळने त्यावर आपला हक्क सांगितल्याने चर्चेत आहे. या क्षेत्रातला भारताचा सगळ्यात जास्त उंचीवरील आर्मीचा कॅम्प इथे आहे. इथूनच पुढे चीनव्याप्त तिबेटचा प्रदेश सुरू होतो. म्हणूनच देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्वाचे ठिकाण. वर्षातले आठ –दहा महीने हा प्रदेश बर्फाने आच्छादलेला असतो. कैलाश यात्रेच्या वेळी जे काही यात्रेकरू दिसतील तेव्हढेच. नंतर आर्मी कॅम्प मधले लोक सोडले तर मनुष्य प्राणीच काय जंगली जनावरं सुद्धा दिसणार नाहीत. कसे रहात असतील आपले सैनिक अशा ठिकाणी हा विचार मनात आला.
लिपुलेखचा आर्मी कॅम्प अगदी नजरेच्या टप्प्यात आला. तिथे आम्हाला भारतीय सेनेतर्फे नाष्टा देणार होते. सैनिकांची वर्दळ दिसू लागली. काही सैनिक आमच्या स्वागतासाठी समोर आले. अचानक “भारती मॅडम, तुम्ही इथे?” या प्रश्नाने आश्चर्याचा सुखद धक्का बसला. वर्षभरापूर्वी नाशिकच्या आमच्या तोपखाना केंद्रात प्रशिक्षणासाठी आलेला एक जवान “शंकरन्” मला हा प्रश्न विचारत होता. “मॅडम, तुम्हाला पाहून मला इतका आनंद झालाय तो मी शब्दात वर्णन नाही करू शकत.” त्याच्या आणि माझ्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या .
कैलास पर्वतावरचा शंकर यात्रेकरूंना दर्शन देतो का माहीत नाही. तो ज्याच्या-त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. पण कठीण परिस्थितीत आपल्या देशाचं रक्षण करणारा “शंकर” साक्षात माझ्यापुढे उभा होता. त्या क्षणी वाटलं, कैलासावरचा तो त्रिशूळधारी ‘शंकर’ एकाच नाही तर असंख्य सैनिकांच्या रूपात बंदूक घेऊन इथे उभा आहे.
कैलासावरच्या शंकराने गेल्या अनेक वर्षात ‘रुद्रावतार’ धारण केल्याचं ऐकिवात नाही. पण लिपुलेखच्या या ‘शंकरांनी मात्र आता शत्रूसमोर
‘रुद्रावतार’ धारण करावा अशी इच्छा आहे.
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com
Website -
Facebook -
Blog -
Nimar Abhyudaya Rural Management And Development Association (N.A.R.M.A.D.A) Documentary -
सर्व भारतीयांची हीच इच्छा आहे.
ReplyDeleteतथास्तु 🙏
ReplyDelete