आत्मश्रद्धा

आत्मश्रद्धा



एका गावात एक महात्मा रहात होते. आपल्या ध्यान-धारणे बरोबरच गावातल्या लोकांना त्यांच्या अडी-अडचणीच्या वेळी योग्य सल्ला ते देत. भांडणं सोडवत. त्यांची ख्याती आसपासच्या गावातही पसरली. सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यन्त त्यांच्याकडे सल्ल्यासाठी लोकांची रांग लागायची. अनेक वर्ष सरली. लोकांच्या रोजच्या समस्यांना ते महात्मा कंटाळले. समस्या शांतपणे विचार करून किंवा परस्परांशी संवाद साधून सोडवल्या जाऊ शकतात असे त्यांना वाटे. पण लोक विचारच करत नाहीत – संवाद करत नाहीत याचे त्यांना वाईट वाटे. मी तर त्यांना काही फार मोठे तत्वज्ञान सांगत नाही. लोक केवळ मी साधू म्हणून माझ्याकडे सल्ला मागायला येतात. त्यात खूप वेळ जातो. त्यामुळे माझी म्हणावी तशी साधनाही होत नाही. लोकानी शहाणं व्हावं असं त्यांना मनापासून वाटायचं. यावर उपाय काय ? त्यांनी खूप विचार केला. गावकऱ्यांची सभा घेतली आणि आपला निर्णय सांगितला.

“गावकऱ्यांनो गेली अनेक वर्षं मी आपल्या समस्या सोडवतो आहे. माझी वैयक्तिक साधना देखील चालूच आहे. सांगायला आनंद होतोय की या साधनेमुळे मला एक सिद्धी प्राप्त झालीय. मात्र यापुढे मला मौनात आणि एकांतवासात रहावे लागेल. मला कोणी पाहू अथवा भेटू शकणार नाही. माझ्या अन्न पाण्याची पण गरज भासणार नाही अशी ही सिद्धी आहे.”

“मग आमच्या समस्या कोण सोडवणार ?” गावकरी अस्वस्थ झाले.
“त्याचीही व्यवस्था केलीय. माझ्या दोन खोल्या आहेत. त्यापैकी मी आतल्या खोलीत दार बंद करून राहीन. हे दार यापुढे कधीच उघडले जाणार नाही. बाहेरच्या खोलीत समस्या असणारे लोक येतील. विचार करतील आणि समस्या समाधान होईपर्यन्त शांत बसून राहतील. समस्यांचे समाधान मिळाले की शांतपणे निघून जातील. कुणीही नारळ, फुले, प्रसाद वा दक्षिणा आणणार नाही.

अनेक वर्ष उलटली. लोक तिथे येऊन शांतपणे विचार करत. लोकांची श्रद्धा एवढी होती की त्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरंही मिळत. ते गाव तंटामुक्त म्हणून प्रसिद्ध झाले. एकदा काशीयात्रेस गेलेल्या गावकऱ्यांना ते महात्मा तिथे भेटले. आश्चर्यचकित झालेले गावकरी म्हणाले, “आपण इथे? मग त्या खोलीत....?”

“तिथे फक्त लोकांची श्रद्धा बंदिस्त आहे. यानिमित्ताने लोक विचार करायला तर शिकले. लोकांची आत्मश्रद्धा जागृत झाली की त्या खोलीचीही गरज भासणार नाही. मी केलेल्या नाटकाबद्दल क्षमा मागतो” महात्मा उत्तरले.


भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email -

Website -
Facebook -
Blog -

Nimar Abhyudaya Rural Management And Development Association (N.A.R.M.A.D.A) Documentary -

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....