दृष्टिकोन

दृष्टिकोन


श्रेयाची माझी पहिल्यांदा भेट झाली ती आमच्या नर्मदालयात 2010 साली. तीन वर्षाची श्रेया माझ्या मांडीवर ती हक्काने येऊन बसायची. गोबरे गाल, शेंबडं नाक आणि हरणाच्या पाडसा सारखे निष्पाप टपोरे डोळे. कुणीही पटकन उचलून कडेवर घ्यावं – लाड करावेत इतकी लोभस. घरच्या परिस्थितिबद्दल काही न बोललेले बरं. तिचे वडील डिप्रेशनचे पेशंट. बाहेरची ‘बाधा’ आहे म्हणून आजी भगताकडे नेऊन उपचार करायची. पण डॉक्टरकडे आम्ही अनेकदा सांगूनही नेलं नाही.

दिवस भराभर सरत होते. श्रेया अभ्यास, गाणं, नृत्य, चित्रकला या सगळ्यातच सर्वोत्तम. विशेष म्हणजे अत्यंत सालस आणि प्रेमळ . नर्मदालयाच्या बालवाद्यवृंदाची ती आजही लोकप्रिय गायिका आहे. चौथीत असतांना श्रेयाला एक भयंकर अपघात झाला आणि त्यात तिचा डावा डोळा निकामी झाला. इंदोर येथे मोठं ऑपरेशन करावं लागलं. ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी ती डॉक्टरांना म्हणाली, “मला भारती दीदीशी फोनवर बोलायचं आहे”

“दीदी, तुम्ही काळजी करू नका. मी लवकर बरी होईन.” असं म्हणत श्रेयानं मलाच धीर दिला.

डावा डोळा तर पूर्ण निकामी झाला होता. फाटलेल्या कपडयाला रफू करावं तसा तो डोळा शिवावा लागला. उजवा डोळा मात्र शाबूत होता. बाकी हातापायाला कुठेही खरचटलं देखील नव्हतं हे तिचं आणि आमचं भाग्यच.

दुसऱ्या दिवशी मी आणि काही कार्यकर्ते तिला भेटायला इंदोरला गेलो. कशी सामोरी जाणार मी श्रेयाला ? डोळ्याला पट्टी लावलेली श्रेया हॉस्पिटलच्या पलंगावर केविलवाण्या अवस्थेत पडलेली असेल का ? हॉस्पिटलच्या पायऱ्या चढतांना माझीच छाती धडधडत होती. विशेष म्हणजे डोळ्याला काळा चश्मा लावलेली श्रेया जिना उतरून एकटीच मला ‘सरप्राइज’ द्यायला हॉस्पिटलच्या स्वागत कक्षात येऊन थांबली होती. मला पाहताच धावत येऊन घट्ट मिठी मारत श्रेया म्हणाली, “दीदी, एक डोळा गेला तर काय झालं ? मला उजव्या डोळ्याने पूर्ण दिसतंय – आता काही महीने मी गॉगल पण लावणार आहे. मला छान दिसतोय ना गॉगल ?”

मला कळेना की मी श्रेयाची शिक्षिका आहे की ती माझी ? शाळेत मी तिला काटकोन, लघुकोन-विशालकोन शिकवले. पण ‘दृष्टिकोन’ मात्र तिने मला शिकवला. पेला अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा ? या प्रश्नाचं उत्तर इतक्या चांगल्या पद्धतीनं क्वचितच कुणी आजवर दिलं असेल.

भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com
Website -
http://narmadalaya.org/

Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo

Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/
Nimar Abhyudaya Rural Management And Development Association (N.A.R.M.A.D.A) Documentary -
https://www.youtube.com/watch?v=9uU0PbZHqqc&t=155s

Comments

  1. इतकं सकस लेखन आणि त्यामागचे विचार वाचायला मिळत आहेत हे मी माझं भाग्य समजतो.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....

मातृत्व